निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
अर्जदार दत्ता सिताराम मोहिते हा मौजे गारगव्हाण ता. हदगांव जि. नांदेड येथील वयोवृध्द शेतकरी असून मौजे गारगव्हाण येथे गट क्र. 68 मध्ये 1 हे 20 आर तसेच त्यांचे भाऊ श्री ज्ञानेश्वर सिताराम यांची गट क्र. 67 मध्ये 1 हे 21 आर शेत जमीन आहे. अर्जदारास शेत जमिनीच्या उत्पन्नावरच आपल्या कुटूंबाची उपजिवीका करावी लागते. गैरअर्जदार 1 हे मौजे हिमायतनगर येथे खत व बि-बियाणाचे अधिकृत विक्रेते असून गैरअर्जदार 2 ही बि-बियाणाची उत्पादक कंपनी आहे. अर्जदाराने दिनांक 08/06/2012 रोजी गैरअर्जदार 1 यांच्याकडून 22 कपासीच्या बॅगा एकूण किंमत 16,140/- देवून खरेदी केल्या होत्या त्यामध्ये अंकूर, विभा, तुळशी, प्रभात, राशी नुतन, पारस, तुलशी आणि प्रतिवादी 2 यांनी तयार केलेले फॉर्चून सिड्स लिमीटेड या कंपनीच्या कपासीच्या बियाणाचा समावेश आहे. सदर बिलाचा बिल बुक क्र. 39 दिनांक 08/06/2012 असा आहे. अर्जदार यांनी त्याच्या व त्याच्या भावाच्या शेतात गैरअर्जदार यांच्या सुचने व मार्गदर्शनानुसार ठराविक अंतरावर औषधपाणी व इतर काळजी घेवून लागवण केली होती. गैरअर्जदार 1 यांनी सदर कापसाचे बियाणे अर्जदारास विक्री करतेवेळी प्रतिवादी क्र. 2 निर्मित बिंदू बिटी या कापसीच्या 5 बॅगा जाणीवपूर्वक अर्जदारास इतर कपासीच्या बियाणासोबत घेण्यास भाग पाडले. सदर बियाणे खरेदी करतेवेळी या वाणास रस शेषण किडीचा उपद्रव नाही, लाल्या रोगास प्रतिबंधक असून बोंड आळी होत नाही, तसेच मावा,तुडतुडे, फुलकीडे या सारख्या रस शोषणा-या किडीस प्रतिकारक क्षम तर बोंड आळी वा लालकोळीसाठी सहनशिल जात म्हणून कोणत्याही प्रकारचे रोग व बोंड आळी या वाणावर होणार नाही असे खोटे आश्वासन दिले. तसेच प्रति एकर 18 ते 20 क्विंटल निघेल अशी हमी दिली होती. अर्जदाराने सदर जातीच्या कपासीच्या बियाणाची आपल्या शेतात लागवड केल्यानंतर त्याची उगवण चांगल्याप्रकारे झाली व वाढ सुध्दा चांगली झाली. कपासीची झाडे अंदाजे 6 ते 7 फुट उंचीची झाली. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या मार्गदर्शनानुसार व सुचनेप्रमाणे सदर कपासीच्या रोपास औषध पाणी, खत पाणी, खुरपणी, कोळपणी केली परंतू सदर कपासीच्या झाडास फुले व बोंडे लागलीच नाहीत व नुसत्या फांदया उभ्या राहिल्या. तसेच ज्या कपासीच्या झाडास फुले व छोटी छोटी बोंडे आली त्या झाडांना कीड व विविध प्रकारे बोंड आळयांचा प्रार्दूभाव अधिक झाला. त्यावर फवारणी करुनही नियंत्रण झाले नाही. प्रतिवादी यांनी अर्जदारास बियाणे खरेदी करतेवेळी दिलेले आश्वासन हे खोटे असल्याचे सिध्द झाले. गैरअर्जदार यांनी अर्जदारास निकृष्ट दर्जाचे बियाणे दिल्यामुळे अर्जदाराचे आज जवळपास 1,80,000/- चे उत्पन्न बुडाले. अर्जदाराने जिल्हाधिकारी नांदेड, मुख्याधिकारी, जि.प. नांदेड, कृषि विकास अधिकारी, जि.प. नांदेड, तालुका कृषी अधिकारी, हदगांव यांना दिनांक 31/10/2012 रोजी लेखी तक्रार केली. तालुका कृषी अधिकारी, हदगांव व कृषी अधिकारी, पंचायत समिती हदगांव यांनी दिनांक 08/11/2012 रोजी मौजे गारगव्हाण येथील अर्जदाराच्या शेतावर जायमोक्यावर येवून पंचासमक्ष पंचनामा करुन कापूस बोंडे पक्व न झाल्यामुळे कापूस बिटी पिकास पाते व फुले लागली परंतू बोंडे पक्व होण्या आधिच संपूर्ण झाडांची बोंडे वाळून गेली त्यामुळे सदरील प्लॉटचे नुकसान झाले, असा अंतीम निष्कर्ष दिला. अर्जदार हा अल्पभूधारक शेतकरी आहे. अर्जदाराचे जवळपास 2,40,000/- आर्थिक नुकसान झालेले आहे. अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात यावा व गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत 1,85,000/- नुकसान भरपाई दिनांक 08/06/2012 पासून 12 टक्के व्याजासह सदरील रक्कम वसूल होईपर्यंत प्रतिवादी यांच्याकडून अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- देण्याचा आदेश व्हावा.
गैरअर्जदार 1 व 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार 1 यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
अर्जदाराच्या तक्रार अर्जातील परिच्छेद क्र. 2,3,4 व 5 मधील संपूर्ण मजकूर अमान्य आहे. अर्जदाराचे तक्रार अर्जातील परिच्छेद क्र. 6 ते 8 मध्ये दिलेली माहिती गैरअर्जदार यांना मान्य आहे. परिच्छेद 9 ते 11 मधील माहिती संपूर्ण खोटी असून गैरअर्जदार 1 यांना अमान्य आहे. गैरअर्जदार 1 चे पुढे असे म्हणणे आहे की, तालुका कृषी अधिकारी यांनी अर्जदाराच्या शेतात जावून पाहणी व पंचनामा केला. अर्जदाराच्या शेताच्या शेजारी असलेल्याना न बोलावता खोटी साक्ष, स्वाक्षरी देणा-या शेतक-यांना बोलावण्यात आले व त्यावर खोटे पंचनामे तयार करण्यात आल्याचे दिसून येते. पंचनाम्यावर वेळेविषयी तपशील दिलेला नाही तसेच कृषी अधिकारी यांनी प्रतिवादी क्र. 1 यांना पंचनाम्याची नोटीस दिलेली नाही त्यामुळे सदर पंचनामा बेकायदेशीर असून त्याचा फिर्यादी क्र. 1 यांच्यावर उपयोग करता येणार नाही. पंचनामा तयार करणारे हे विद्वान व्यक्ती नाहीत, त्यांना बायोलॉजीचे ज्ञान नाही किंवा बायोलॉजीत उच्चशिक्षीत नाहीत. ते फक्त कृषी अधिकारी आहेत. त्यांनी फक्त त्यांचा अंदाज वर्तवला आहे असे दिसून येते. कंपनीकडून उत्पादित बियाणे हे शासकीय निकषाचे पालन करुन शासन मान्य प्रयोगशाळेत व यंत्रणेद्वारे बियाणे उत्तम दर्जाचे असल्याचे सिध्द झाल्यानंतरच कंपनीने पुढील वितरणासाठी बियाणे बाजारात आणले. सदर बियाणे हे उत्कृष्ट दर्जाचे असून त्याबद्दल शासनाने प्रमाणपत्र सुध्दा दिलेले आहे. पंचनाम्यात बियाणे सदोष असल्याबाबत कोठेच नमूद केलेले नाही. अर्जदार जेव्हा बियाणे निकृष्ट दर्जाचे आहे असे म्हणतो तेव्हा अर्जदाराने बियाणे महामंडळाला पार्टी करणे आवश्यक आहे. बिज महामंडळ बियाणे उत्कृष्ट आहे किंवा नाही हे तपासूनच बियाणे विक्रीची परवानगी देते म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळणे न्यायाचे ठरले. हिमायतनगर परिसरातील बरेच शेतकरी प्रतिवादी क्र. 2 ने उत्पादित बियाणावर समाधानी आहेत. त्यांनी त्यांचे लेखी मनोगतही दिले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडून बियाणे खरेदी करुन जसेच्या तसे बियाणे विक्री केले आहे त्यामुळे अर्जदारास नुकसान भरपाई देण्याची प्रतिवादी 1 ची जाबाबदारी नाही म्हणून प्रतिवादी नं. 1 विरुध्द अर्जदाराचा अर्ज 5,000/- दंडासह फेटाळण्यात यावा.
गैरअर्जदार 2 यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे. अर्जदाराच्या तक्रारीतील परिच्छेद क्र. 1 मधील माहिती गैरअर्जदारास नाकबूल आहे. परिच्छेद 2 मधील कथन गैरअर्जदार यांना कबूल आहे. दिनांक 08/06/2012 च्या बिल क्र. 39 नुसार घेतलेल्या कपाशीच्या बॅगा हया उघारीवर घेतलेल्या होत्या म्हणून अर्जदाराचे कथन की, त्या नगदी घेतल्या होत्या हे खोटे आहे. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार 1 यांनी प्रति एकर 18 ते 20 क्विंटल उत्पन्न निघेल अशी हमी दिली होती, हे म्हणणे पूर्णपणे अमान्य आहे. तसेच प्रतिवादी क्र. 2 निर्मित ‘बिंदू बिटी’ या कपासीच्या 5 बॅगा जाणीवपूर्वक अर्जदारास विकल्या हे कथन देखील गैरअर्जदारास अमान्य आहे. अर्जदाराचे हे म्हणणे मान्य आहे की, अर्जदाराने कपाशीच्या सदर जातीच्या बियाणाची आपल्या शेतात लागवड केल्यानंतर त्याची उगवण सुरुवातीला चांगल्याप्रकारे झाली परंतू हे म्हणणे अमान्य आहे की, झाडास फुले व बोंडे लागलीच नाही व नुसत्या फांदया उभ्या राहिल्या व ज्या झाडांना कपाशीची बोंडे लागली ती पण छोटी छोटी लागली व त्यावर आळयांचा प्रार्दूभाव झाला व फवारणी करुनही नियंत्रणात आले नाही. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, अर्जदाराचे रु. 2,40,000/- चे नुकसान झाले. गैरअर्जदाराने अर्जदाराचे बहुतांश म्हणणे अमान्य केलेले आहे. बियाणे उगवण्याकरिता बरेचशे घटक जबाबदार असतात म्हणून बियाणे हा घटक तक्रारदाराच्या तक्रारीशी जबाबदार नाही. गैरअर्जदार यांनी उत्पादित बियाणे उत्कृष्ट दर्जाचे असून सर्वश्रुत व डीआयएटार अवार्डने गौरवांकित केलेल्या कंपनीचे आहे. अर्जदाराने दिनांक 08/06/2012 रोजी एकूण 22 बॅग नगदी पैसे देवून कपाशीचे बियाणे खरेदी केले होते हे कथन खोटे आहे हे दाखल बिलावरुन स्पष्ट आहे. अर्जदार बियाणे दिनांक. 08/06/2012 रोजी विकत घेतले व दिनांक 18/06/2012 रोजी त्याची लागवड केली. त्यामधील 10 दिवस बियाणे कशा स्थितीत होते याची माहिती नाही. अर्जदाराच्या तक्रारीत दाखल केलेला 7/12 च्या उतारा पाहता अर्जदाराच्या एकटयाच्या नावावर शेतजमीन नाही. अर्जदाराने वेगवेगळया कंपनीचे व वेगवेगळया जातीचे कपाशीचे बियाणे एकाच शेतात लागवड करुन फक्त गैरअर्जदार 2 विरुध्द ही तक्रार दाखल केली ते योग्य नाही. दिनांक 08/11/2012 रोजीच्या पंचनाम्याममध्ये ग्रेस, गणेश, बिंदू, पारस अशा वेगवेगळया जातीच्या बियाणाची नावे नमूद आहेत त्यामुळे दाखल पंचनामा हा फक्त गैरअर्जदार 2 फॉर्चून हॉब्रड सिडस या कंपनीच्या बियाणाबद्दल नाही. अर्जदाराचे कथन की, त्याच्या लागवडीसाठी हजारो रुपये खर्च लागला हे खोटे आहे. अर्जदाराच्या शेताचा पंचनाम्यावर तालुका निवारण समितीच्या 7 सदस्यांच्या स्वाक्ष-या नाहीत. समितीने शेताची पाहणी केली त्यावेळेस फक्त समितीतील एक सदस्य व अर्जदार हजर होते. त्यामुळे सदर पाहणी अहवाल आयोग्य असून शासन नियमावली जिल्हा स्तरीय समितीच्या सदस्याच्या सहया शिवाय पाहणी करता येत नाही. तसेच पंचनाम्यात बियाणाच्या दोषाबद्दल काहीही निष्कृष दिलेला नाही. पंचनामा हा बियाण्याच्या दोषाबद्दल स्तब्ध आहे म्हणून गैरअर्जदार यांनी मंचास विनंती केली आहे की, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करावा.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
अर्जदार दत्ता सिताराम मोहीते हा गैरअर्जदार यांचा ग्राहक होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या पावती क्र. 39 दिनांक 08/06/2012 यावरुन स्पष्ट आहे. अर्जदाराने त्याच्या शेतात पेरलेल्या कापसांच्या उत्पादनाबद्दल तालुका कृषी अधिकारी हदगांव व कृषी अधिकारी, हदगांव यांना कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनी पंचनामा करुन अहवाल देण्यास सांगितले होते. हे अर्जदाराने दाखल केलेल्या सदर पत्राच्या झेरॉक्स प्रतीवरुन स्पष्ट आहे. तालुका कृषी अधिकारी हदगांव, कृषी अधिकारी, हदगांव व कृषी अधिकारी, पंचायत समिती यांनी जायमोक्यावर जावून दिनांक 27/11/2012 पहाणी करुन अहवाल दिलेला आहे. अर्जदाराने सदर मुळ अहवाल मंचासमोर दाखल केलेला आहे. त्यामध्ये अर्जदाराच्या उत्पादनात 80 टक्के घट झालेली आहे असा निष्कर्ष काढलेला आहे. कापसाचे बोंडे पक्व झालेली नसल्यामुळे वाळून गेली असा निष्कर्ष दिलेला आहे. गैरअर्जदार यांनी पंचनाम्या बद्दल अक्षेप घेतलेला आहे. जिल्हास्तरीय समितीने पंचनामा केलेला नाही हा मुख्य मुदा उपस्थित केलेला आहे. अहवालाचे निरीक्षण केले असता असे दिसते की, सदर अहवाल हा शासन गठीत समितीने केलेला आहे. तक्रारींचा ओघ व कामाचा तान यावरुन पंचनामा कोणी करावयाचा हे शासन ठरवत असते. त्यामुळे गैरअर्जदाराचा सदर अक्षेप ग्राहय धरता येत नाही. तसेच अर्जदार यांनी कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केलेली आहे परंतू कृषी अधिकारी यांनी नियमानुसार पंचनामा केलेला नाही. कृषी अधिकारी यांच्या चुकांचा फायदा गैरअर्जदार यांना घेता येणार नाही, कारण अर्जदाराच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीस गैरअर्जदार हे सर्वस्वी जबाबदार आहेत. गैरअर्जदार यांनी अर्जदारास बियाण्यासंदर्भातील पेरणी व पिकांची घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिलेली होती, असा पुरावा मंचासमोर दिलेला नाही.
भारत देशातील बहुसंख्या शेतकरी हे अशिक्षीत व खेडयामध्ये राहतात त्यामुळे त्यांना योग्य ती माहिती पुरवणे हे बियाणे उत्पादक, विक्रेते यांचे कर्तव्य आहे. मा. सर्वेच्च न्यायालय यांनी दिलेल्या प्रकरण मधुसुदन रेड्डी विरुध्द नॅशनल सिड्स मधील निवाडयानुसार अर्जदाराच्या नुकसानीस गैरअर्जदार जबाबदार आहेत, असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने इतर शेतक-यांचे मनोगत दाखल केलेले आहेत. सदर मनोगत ग्राहय धरता येणार नाहीत कारण मनोगत दिलेल्या शेतक-यांचे शपथपत्र दाखल केलेले नाहीत. तसेच सर्व मनोगत हे एकाच हस्ताक्षराने लिहिलेले असून मुद्दाम लिहिल्या सारखे वाटतात.
अर्जदाराने विकत घेतलेले बियाणे हे बी.टी. प्रकारचे होते व त्यापासून अपेक्षीत उत्पादन मिळणे आवश्यक होते. अर्जदाराने इतर प्रकारचे बि.टी. बियाणे विकत घेतलेली होती. अर्जदाराची तक्रार फक्त गैरअर्जदाराच्या बियाण्याबद्दलच आहे. यावरुन हे स्पष्ट आहे की, गैरअर्जदाराच्या बियाणामुळे अर्जदारास नुकसान झालेले आहे व गैरअर्जदार हा अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे, असे मंचाचे मत आहे. अर्जदाराने त्याचे नुकसान 1,85,000/- एवढे झालेले आहे असे म्हटलेले आहे परंतू त्याबद्दल कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे संदर्भात मा. वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयाचा संदर्भ दिलेला आहे. सदर निवाडयातील वस्तुस्थिती व प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थिती ही वेगळी आहे. त्यामुळे सदरील निवाडे प्रस्तुत प्रकरणांत लागू होत नाहीत.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास त्याला झालेल्या एकूण नुकसानीबद्दल रक्कम रु. 8,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास दावा खर्चापोटी रु.2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.