(घोषित दि. 13.02.2015 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून ट्रॅक्स क्रूझर हे वाहन खरेदी केले. वॉरंटी काळात त्यांना गाडीचा पत्रा चिरत असल्याचे दिसुन आले. याबाबत गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली तरी सुध्दा गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी दिनांक 01.11.2013 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादीत केलेले ट्रॅक्स क्रूझर क्लासिक हे वाहन गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून खरेदी केले. सदरील वाहन खरेदी केल्यानंतर काही काळातच ड्रायव्हर साईडच्या पत्र्याचा भाग चिरत असल्याचे दिसुन आले. त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांना याबाबत माहिती दिली व गाडी बदलून देण्याची विनंती केली. अर्जदाराने वॉरंटी काळातच गाडीचा पत्रा सडल्यामुळे गैरअर्जदार यांच्याकडे वारंवार त्याबद्दल तक्रार केली. परंतु तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे त्यांनी दिनांक 17.06.2014 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविली. गैरअर्जदार यांनी गाडी बदलून देण्यास नकार दिला. त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन सदरील गाडी बदलून देण्याची व मानसिक, आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत वकीला मार्फत गैरअर्जदार यांना पाठविलेली नोटीस, वाहनाचे आर.सी.बुक, इन्शुरन्सची पावती इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार सदरील तक्रार ही खोटी व चुकीची आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते वाहन निर्मिती करणारे असून डिलर व त्यांचे संबंध प्रिन्सिपल व एजंट असे नसून प्रिन्सिपल व प्रिन्सिपल असे आहेत. वाहनाची निर्मिती केल्यानंतर डिलर्स ते घाऊक प्रमाणात विकत घेतात व ते विक्री करुन त्यानंतर विक्री पश्चात सेवा देतात. त्यामुळे विक्रेत्याच्या कृतीची जवाबदारी त्यांची नसते. प्रत्येक वाहनाची पूर्ण तपासणी केल्यानंतरच ते कारखान्यातून बाहेर पडते. त्याची पूर्ण चाचणी झाल्यानंतरच ते ग्राहकाला देण्यात येते. सदरील वाहन श्रीराम टेम्पो या विक्रेत्यांना देताना ते पूर्णपणे चांगल्या स्थितीतच होते. त्यात कोणताही उत्पादकीय दोष नव्हता. अर्जदाराने सदरील वाहनात उत्पादकीय दोष असल्याबद्दल कोणत्याही तज्ञ व्यक्तीचे मत दाखल केलेले नाही. रस्ते खराब असल्यास किंवा क्षमतेपेक्षा जास्त भार लादल्यास वाहनास जर्क बसून जॉईन्ट खराब होण्याची शक्यता असते. आम्ही त्यांच्या तक्रारीची दखल घेतो. आजही त्यांची तक्रार योग्य असल्यास त्याची दखल घेतली जाईल. वॉरंटीचा अर्थ, जर वाहनाच्या ज्या भागात दोष असेल ते भाग विनामूल्य बदलून देणे अथवा दुरुस्त करुन देणे असा आहे. त्यामुळे वाहन बदलून देता येत नाही. तसेच अर्जदाराने सदरील वाहन हे व्यापारी कारणासाठी घेतले असल्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार दाखल करु शकत नाही. सदरील तक्रार खोटी व चुकीची असून ती खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे. अर्जदाराने त्यांच्याकडून वाहन खरेदी केल्याचे त्यांना मान्य आहे. अर्जदाराने दिनांक 29.11.2013 रोजी गाडीची पहिली, दिनांक 01.02.2014 रोजी दुसरी सर्व्हिसिंग करुन घेतली या दोनही वेळेस गाडीचा पत्रा चिरत असल्याबद्दलची तक्रार केलेली नाही. दिनांक 03.03.2014 रोजी अर्जदाराने गाडीचा पत्रा चिरत असल्याची तक्रार केली. त्यानुसार त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 व त्यांच्या लातूर येथील मुख्य कार्यालयात कळविले. त्यानुसार त्यांना गाडीचा पत्रा दुरुस्त करुन देण्याची संमती मिळाली. परंतु अर्जदाराने दिनांक 09.06.2014 रोजी सर्व्हिसिंग झाल्यानंतर गाडी बदलून देण्याची मागणी केली. गैरअर्जदार 2 यांनी गाडी बदलून दिली जात नाही पत्र्याची दुरुस्ती करुन देतो असे सांगितले. त्यानंतर अर्जदाराने वकीला मार्फत नोटीस पाठविली. गैरअर्जदार 2 यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी नोटीसला उत्तर दिले व 15 दिवसात येऊन पत्रा दुरुस्त करुन गाडी घेऊन जाण्याबाबत सांगितले. परंतू अर्जदार आले नाही. गाडीच्या पत्र्याला तडा जाण्यास रस्त्यावरील खड्डे, योग्य मेन्टेनन्स न ठेवणे, जास्त लोड घेऊन जाणे इत्यादी गोष्टीही कारणीभूत असू शकतात. त्यामुळे कंपनी किंवा डिलर जवाबदार असून शकत नाही. अर्जदार व्यापारी कारणासाठी वाहन वापरत असल्यामुळे ते या कायद्या अंतर्गत तक्रार दाखल करु शकत नाही. अर्जदाराने त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल केली असून ती खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी जवाबसोबत जॉब कार्ड दाखल केले आहेत.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसुन येते की, अर्जदार श्री.गणेश भाऊराव शितोळे यांनी दिनांक 01.11.2013 रोजी ट्रॅक्स क्रूझर क्लासिक हे वाहन गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून खरेदी केले. वाहनाचा नोंदणी क्रमांक एम.एच.21 व्ही 7794 असा आहे. सदरील वाहन काही काळ चालविल्या नंतर ड्रायव्हर साईडचा पत्रा फाटला असल्याची अर्जदाराची मूळ तक्रार आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सदरील वाहनाचे जॉब कार्ड मंचात दाखल केले आहेत. यामध्ये पहिली सर्व्हिसिंग दिनांक 21.11.2013 रोजी केली असून यामध्ये व्हॉइस इन फ्रन्ट असे नमूद केलेले दिसून येते. दिनांक 09.06.2014 रोजीच्या जॉब कार्डमध्ये क्रॅक अॅट व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी असे नमूद केलेले दिसून येते. म्हणजेच अर्जदाराच्या जॉबशीट वरुन पत्रा फाटल्याचे दिसुन येते. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनीही पत्रा सडल्याचे त्यांच्या जवाबात मान्य केलेले आहे. अर्जदाराने सदरील वाहन दिनांक 01.11.2013 रोजी विकत घेतले असून त्याच्या वॉरंटी काळातच वाहनाचा पत्रा चिरल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अर्जदाराने वाहनाचा पत्रा चिरल्यामुळे वाहनच बदलून मागितले आहे. परंतु वाहनाच्या इंजिनमध्ये कोणताही दोष नाही व तसा कोणत्या तज्ञांचा अहवालही नाही. त्यामुळे वाहन बदलून देण्याची मागणी मंच मान्य करीत नाही. वॉरंटी काळात वाहनात दोष निर्माण झाल्यास तो भाग बदलून दिला जातो किंवा दुरुस्त करुन दिला जातो. सुनावणी दरम्यान गैरअर्जदार यांनी वाहनाचा चिरलेला पत्रा बदलून देण्याची तयारी दर्शविली होती.
वरील सर्व निरीक्षणा वरुन गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदारास चिरलेला पत्रा बदलून त्याजागी नवीन पत्रा विनामूल्य बसवून द्यावा हे योग्य ठरेल.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदाराच्या वाहनाच्या ड्रायव्हर साईडचा चिरलेला पत्रा काढून त्या जागी नवीन पत्रा विनामूल्य 30 दिवसात बदलून द्यावा.
- गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चा बद्दल रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) नुकसान भरपाई द्यावी.