निकालपत्र
(दि.09.07.2015)
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार हा निवघा बाजार,तालुका हदगांव,जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे. गैरअर्जदार क्र. 1, 3 ते 5 हे सेल्स प्रोमोशन स्कीमचे मालक आहेत. गैरअर्जदार क्र. 2 हा गैरअर्जदार क्र. 1 यांचा अधिकृत एजंट आहे. सन 2010-11 मध्ये गैरअर्जदार यांनी संकल्प होम अप्लायंसेस अंतर्गत सुलभ हप्ता गृहपयोगी वस्तु विक्री उत्तेजनार्थ सेल्स प्रोमोशन स्कीम चालु केली होती. सदरील योजनेमध्ये मासिक हप्ता रक्कम रु.500/- एवढी किंमत भरावयाची होती. तसेच हप्ता क्रमांक 5,10,15,20,25 आणि 30 चा हप्ता रुपये 1,000/- एवढी रक्कम भरावयाची होती. गैरअर्जदार क्र. 2 या एजंटाव्दारे अर्जदारास योजनेची माहिती मिळाली. सदरील योजना आवडल्यावर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचे कार्यालयात जाऊन योजनेच्या नियम व अटी याबद्दल सविस्तर माहिती घेतली. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी दिलेल्या माहिती नुसार अर्जदारास सभासद फी रु.100/- व मासिक हप्ता रक्कम रु.500/- प्रमाणे 30 हप्ते रक्कम भरावयाची होती. प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला बक्षीस स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या बक्षीस स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकास बक्षीस लागेल त्यांना माहिती पत्रकावर नमुद केलेले बक्षीस दिले जाणार व शेवटपर्यंत ज्यांना कोणतेच बक्षीस लागणार नाही त्यांना गृहपयोगी वस्तु देण्याचे गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांनी कबुल केले होते. अर्जदाराने दिनांक 31.01.2011 रोजी रु.100/- भरुन सभासदत्व स्विकारले. अर्जदाराचा सभासद क्र.240 असा आहे. दिनांक 31.01.2011 रोजी पहिला मासिक हप्ता क्रमांक 1 रक्कम रु.500/- अर्जदाराने भरणा केले. त्यानंतर योजनेच्या नियम व अटीप्रमाणे अर्जदाराने शेवटपर्यंत सर्व मासिक हप्ते प्रामाणिकपणे भरणा केले. तसेच हप्ता क्रमांक 5,10,15,20,25 आणि 30 चा हप्ता रक्कम रु.1000/- प्रमाणे भरले. अर्जदाराने सभासद फीसह एकूण रक्कम रु.18,100/- भरणा केलेले आहे. अर्जदाराने पुर्ण एकूण 30 हप्ते भरले. दिनांक 21.08.2013 रोजी 30 वी बक्षीस स्पर्धा घेण्यात आली. अर्जदार हा विजेता स्पर्धक ठरला त्याप्रमाणे सर्वांसमोर घोषीत सुध्दा केले. तिसाव्या महिन्याचे बक्षीस हे Chrvrolet Beat कार हे आहे. अर्जदार सदरील कार मिळणेस पात्र ठरला. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे कारची मागणी केली असता, गैरअर्जदार यांनी कारऐवजी कारची रक्कम स्विकारणे विषयी अर्जदारास विचारणा केली. त्यावेळेस अर्जदाराने होकार दर्शविला. सदरील कारची किंमत रक्कम रु.6,19,043/- (सर्व कर वगळता) एवढी आहे. त्यामुळे अर्जदार पुर्ण रक्कम रु.6,19,043/- मिळणेस पात्र आहे. परंतु दिनांक 13.09.2013 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास फक्त रक्कम रु.3,45,000/- दिले व उर्वरीत रक्कम 2/4 दिवसांनी घेणेविषयी विनंती केली. त्यामुळे दिनांक 13.09.2013 रोजी अर्जदारास रक्कम रु.2,74,043/- एवढी रक्कम कमी मिळाली. त्यानंतर अर्जदार गैरअर्जदार याचेकडे जाऊन उर्वरीत रक्कमेची मागणी केली असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास उलटसुलट उत्तरे दिली. अर्जदाराने नियमित व वेळेवर मासिक रक्कमेचा भरणा केला व प्रत्येक अटीचे व नियमांचे पालन केले. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास ग्राहक या नात्याने विश्वासघात केला. गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांनी अर्जदारास त्रुटीची सेवा देऊन फक्त स्वतःच्या फायद्यासाठी उर्वरीत रक्कम न देता उलटसुलट उत्तरे दिली. त्यामुळे अर्जदारास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला. अर्जदाराने दिनांक 26.10.2013 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस गैरअर्जदार यांना पाठविली. सदरील नोटीस स्विकारणेस गैरअर्जदार यांनी नकार दिला. त्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांनी त्रुटीची सेवा दिल्याबद्दल अर्जदारास गैरअर्जदार यांचेकडून येणे दाखविलेली रक्कम रु.2,74,043/- दिनांक 20.08.2013 पासून रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह द्यावेत. तसेच गैरअर्जदार यांनी मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.10,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार 1 तसेच गैरअर्जदार क्र. 2 ते 5 यांनी स्वतंत्रपणे आपले लेखी जबाब दाखल केले आहेत. परंतु सर्व गैरअर्जदार यांचे लेखी जबाबातील कथन सारखेच आहे.
गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलमाच्या आधारे नसल्या कारणाने सदरील तक्रार खारीज होणेस पात्र आहे. तसेच अर्जदार हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2(1)(डी) या व्याख्येत बसत नाही. तक्रार दाखल करणेसाठी अर्जदारास कुठलेही कारण नाही. तक्रारीतील केलेल्या विनंतीवरुन स्पष्ट होते की अशी कोणतीही मागणी मंजूर करण्याची मुभा ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या तरतुदीखाली नाही. अर्जदाराने चुकीची तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदारास सदरील योजनेचे माहिती पत्रक तो योजनेचा सभासद होणेपुर्वी वाचुन दाखविण्यात आले होते. त्यावरील नियम व अटीप्रमाणे भरावयाची रक्कम तसेच दिले जाणारे बक्षीस या विषय सविस्तर माहिती होती. त्याप्रमाणे कंपनीच्या नियम व अटीप्रमाणे सभासदास जर बक्षीस स्पर्धा लागले तर त्यास बक्षीस घ्यावे लागेल बक्षीस वस्तुच्या बदल्यात रक्कम दिली जाणार नाही. जर सभासदास बक्षीस वस्तुच्या बदल्यात रक्कम पाहिजे असल्यास कंपनीच्या संचालकांनी सदरील बक्षीस वस्तुची रक्कम द्यायची किंवा नाही या विषयी योजनेचे हक्क अधिकार त्यांचेकडे अबाधित ठेवलेले असलची माहिती अर्जदारास देण्यात आली होती. गैरअर्जदार क्र. 1 यांचे कंपनीने किंवा त्यांनी स्वतः तसेच गैरअर्जदार क्र. 2 यांनी सुध्दा अर्जदारास तिसाव्या मासिक बक्षीस स्पर्धेला असलेली Chevrolet Spark I.O. Base ही कार असलेविषयी सांगितले होते. गैरअर्जदार क्र. 1 यांच्या कंपनीने सदर योजनेमध्ये बक्षीस स्वरुपात दिलेल्या सर्वच सहा कार या पेट्रोल मॉडेल असुन त्या त्या कंपनीचे बेसीक मॉडेल आहेत. गैरअर्जदार यांचे कंपनीने योजनेच्या शेवटच्या बक्षीस स्पर्धेपुर्वी म्हणजेच दिनांक 19.08.2013 रोजी बाफना ऑटोमोटीव्हज,नांदेड यांचेकडून Chevrolet Spark I.O. Baseया कारचे घेतलेले कोटेशन सोडतीपुर्वी सर्व सभासदांना दाखविले होते व तिसाव्या मासिक बक्षीस स्पर्धेमध्ये विजेत्यास Chevrolet Spark I.O. Base ही कार बक्षीस देण्यात येणार असल्याचे सर्व सभासदांना सांगितले होते. गैरअर्जदार व त्यांचे कंपनीच्या संचालकानी अर्जदारास लागलेले तिसाव्या महिन्याचे बक्षीस देण्याची तयारी दर्शविली असता अर्जदाराने बक्षीस वस्तुऐवजी बक्षीस वस्तुच्या रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडे केल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 19.08.2013 रोजी बाफना ऑटोमोटीव्हज,नांदेड कडून Chevrolet Spark I.O. Base या कारचे कोटेशन प्रमाणे रक्कम देण्याचे आश्वासन दिले व अर्जदारास दिनांक 16.09.2013 रोजी बक्षीस वस्तुच्या बदल्यात कारची रक्कम रु.3,45,000/- अदा केली. तशी पावती अर्जदाराने गैरअर्जदार यांचे कंपनीस लिहून दिली आहे ज्यामध्ये असे नमुद केलेले आहे ‘’ मी प्रभाकर बापूराव कदम सभासद क्रमांक 240 , दिनांक 21.08.2013 रोजी झालेल्या बक्षीस स्पर्धेमध्ये मला लागलेले बक्षीस रक्कम रु.3,45,000/- किंमतीची गाडी मला मिळाली आहे. ची कॅश मिळाली आहे करीता लिहून देत आहे.’’ सदरील पोहोच पावतीवर रेव्हेन्यु तिकीट रु.1/- वर अर्जदाराने सही केलेली आहे. अर्जदाराने सदरील रक्कम विरोध/आक्षेप दर्शवुन अथवा नाखुशीने उचलल्या विषयी पोहोच पावतीवर उल्लेख केलेला नसल्याने अर्जदारास सदरील रक्कम वस्तुच्या बदल्यात मिळालेली आहे व त्यावर तो संतुष्ट असल्याचे निदर्शनास येते. अर्जदाराने आक्षेप न दर्शविता उचलेली रक्कमेविषयी पुन्हा मागणी करु शकत नाही. सदरील रक्कम राजीखुशीने उचललेली असल्याने तो त्याच्या कृत्यापासुन प्रतिबंधीत(Estopped) झालेला असल्यामुळे त्यास सदरील तक्रार दाखल करणेस कुठलेही कारण घडलेले नाही. त्यामुळे सदरील तक्रार खारीज होणेस पात्र आहे. सबब गैरअर्जदार यांनी अर्जदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. सन 2010-11 मध्ये गैरअर्जदार यांनी संकल्प होम अप्लायंसेस अंतर्गत सुलभ हप्ता गृहपयोगी वस्तु विक्री उत्तेजनार्थ सेल्स प्रोमोशन स्कीम चालु केली होती ही दोन्ही बाजूस मान्य आहे. सदर योजनेच्या नियम व अटी स्विकारुन अर्जदार हा योजनेचा सभासद झालेला असून योजनेनुसार नियमितपणे मासिक हप्त्यांची रक्कम गैरअर्जदार यांचेकडे भरणा करीत होता ही बाब दाखल पावत्यांवरुन सिद्ध होते. अर्जदाराने पुर्ण हप्ते गैरअर्जदार यांचेकडे भरल्यानंतर 30 महिन्यानंतर घेण्यात आलेल्या बक्षीस स्पर्धेमध्ये अर्जदारास विजेता घोषीत करण्यात आले व योजनेनुसार तिसाव्या बक्षीस स्पर्धेचे बक्षीस Chrvrolet कंपनीची कार आहे. गैरअर्जदार यांनी दिलेले माहिती पुस्तक दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी दाखल केलेले आहे. सदर माहिती पुस्तकाचे अवलोकन केले असता तिसावे बक्षीस Chrvrolet कंपनीची कार असल्याचे दिसते. परंतु Chrvrolet कंपनीचे कोणते मॉडेल आहे हे माहिती पुस्तकात स्पष्ट दिलेले नाही किंवा माहिती पुस्तकामध्ये दिलेल्या चित्रामध्येही कोणते मॉडेल आहे हे स्पष्ट होत नाही. अर्जदारास विजेता घोषीत केल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदारास बाफना ऑटोमोटीव्हज,नांदेड यांनी दिनांक 19.08.2013 रोजी दिलेल्या कोटेशननुसार Chevrolet कंपनीच्या Spark I.O. Base या मॉडेलची किंमत रक्कम रु.3,45,723/- अर्जदारास दिलेली आहे व अर्जदाराने सदरील रक्कम दिनांक 16.09.2013 रोजी स्विकारलेली आहे. अर्जदाराचे म्हणणे असे आहे की, गैरअर्जदार यांनी Chrvrolet कंपनीच्या Beat या मॉडेलीची रक्कम गैरअर्जदार यांनी देण्याचे आश्वासन दिलेले होते व सदरील रक्कम स्विकारतांना उर्वरीत रक्कम दोन-तीन दिवसांनी देतो असे गैरअर्जदार यांनी सांगितले होते. दोन्ही कारमधील फरकाची रक्कम रु.2,74,043/- एवढी आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी सदरील रक्कम व्याजासह द्यावी अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून रक्कम स्विकारलेल्या पावतीचे अवलोकन केले असता अर्जदाराने सदर Chevrolet Spark I.O. Base या मॉडेलीची रक्कम स्विकारलेली असून त्यावर स्वाक्षरी केलेली आहे. तसेच उर्वरीत रक्कम बाकी आहे असा आक्षेप नोंदविलेला नाही. तसेच गैरअर्जदार यांनी दिलेल्या माहिती पुस्तकामध्येही Chrvrolet कंपनीचे Beat हे मॉडेल तिसाव्या स्पर्धेचे बक्षीस आहे असे नमुद नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांनी अर्जदारास Chrvrolet Beat या मॉडेलची रक्कम देऊ असे आश्वासन दिले होते याबद्दलचा पुरावा दिलेला नाही. त्यामुळे अर्जदार आपली तक्रार पुराव्यानीशी सिद्ध करु शकलेला नाही असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.