निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार हा समाजतील एक होतकरु व जागरुक नागरीक आहे. दिनांक 02/06/2012 रोजी अर्जदाराने त्याच्या कुटूंबासह गैरअर्जदार 1 यांच्या दुकानामध्ये असलेला सँन्डविच, आईसक्रीम इत्यादी वस्तु खरेदी केल्या व त्यांचे सेवन केल्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार 1 यांच्या दुकानातून पाणी पिण्यासाठी म्हणून ‘बेली’ कंपनीची म्हणजेच गैरअर्जदार 1 व 2 यांची पाण्याची बॉटल खरेदी केली. सदर बॉटल घेवून अर्जदार पाणी पिण्याच्या तयारीत असतांना अचानक अर्जदाराचे लक्ष पाण्याची बॉटल उघडण्यापूर्वी सदरील बॉटलमध्ये असलेल्या सिलबंद पाण्याकडे गेले. जेव्हा अर्जदारास सदर पाण्यामध्ये एक छोटी पाल दिसली त्यामुळे अर्जदार भयभीत झाला. सदरचे सिलबंद बॉटल अर्जदाराने त्याच्या कुटूंबातील व्यक्तींना दाखवली तेंव्हा सर्वांनी सिलबंद बॉटलमध्ये पालच आहे असे सांगितले त्यामुळे अर्जदार यांनी लगेचच ती बाब गैरअर्जदार 1 यांच्या निदर्शनास आणून दिली. गैरअर्जदार 1 यांनी सदर बाबींची गंभीर नोंद घेवून सदर बॉटल बदलून देतो असे सांगितले. परंतू अर्जदार यांनी ही बाब पटली नाही. अर्जदाराचे एक मिनीटाकरिता जर दुर्लक्ष झाले असते तर अर्जदार हे सदरच्या बॉटलमधील पाणी पिले असते व कदाचित अर्जदार व त्याचे कुटूंब पाल मिश्रीत भेसळयुक्त पाण्याचे मरण पावले असते. त्यामुळे सदरची बाब ही फारच गंभीर व चिंताजनक आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार 1 यांच्याशी सदरच्या घटनेबाबत कायदेशीर पाऊल उचलण्यात येईल असा इशाला दिला व त्यानंतर गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास गैरअर्जदार 2 व 3 यांच्याशी संपर्क करुन आपणास कळविण्यात येईल, असे सांगितले. त्यावर गैरअर्जदार 2 यांचा सेल्समन राजू कळसे यांच्याशी गैरअर्जदार 2 मार्फत पुरविलेल्या सिलबंद बॉटलमध्ये पाल असून योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगितले. तसेच गैरअर्जदार 1 यांनी गैरअर्जदार 2 व 3 यांना दिनांक 04/06/2012 रोजी घटनेबाबत नोटीस पाठविली. परंतू गैरअर्जदार 2 व 3 यांच्यामार्फत गैरअर्जदार 1 यांना कोणताही समाधानकारक प्रतिसाद व प्रतिउत्तर मिळाले नाही. ही बाब गैरअर्जदार 1 यांच्याकडून अर्जदारास कळविली.
गैरअर्जदार 2 व 3 यांच्यासारख्या अधिकृत, प्रतिष्ठीत व विश्वासू कंपनीकडून अशाप्रकारे गंभीर व निष्काळजीपणाची व चुकीची सेवा अर्जदारास मिळाल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांना माफी दिली व त्यांना शिक्षा देण्याचे कार्य पार पाडले नाही तर अशा प्रकारे भविष्यात आज अर्जदार व त्याचे कुटूंब वाचले परंतू उदया इतर कोणी ग्राहक त्याचा बळी ठरेल. या गोष्टीचे भान ठेवून अर्जदार यांनी सदरची तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार 2 व 3 यांच्या अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करण्यास लगाम बसेल या उद्देशाने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास क्षतीग्रस्त वस्तु देवून फसवले आहे व गैरअर्जदार हे त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास कमी पडले आहे त्यामुळे अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्दल गैरअर्जदाराने अर्जदारास नुकसान भरपाई दयावी. अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांच्याकडून गैरअर्जदार यांनी अर्जदारास पुरविलेल्या सिलबंद बेली पाण्याच्या बॉटलमध्ये पाल मिश्रीत, फेसळयुक्त पाणी दिल्यामुळे व अर्जदारास झालेल्या मानसिक धक्का व आघातापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 10 लाख दयावेत. गैरअर्जदार यांनी दिलेल्या चुकीच्या व सेवेतील त्रुटीमुळे व मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 5 लाख तसेच दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- इत्यादी रक्कमेची मागणी तकारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
गैरअर्जदार 1 यांना अनेकवेळा संधी देवूनही त्यांनी आपला लेखी जबाबत दाखल केलेला नाही. परंतू गैरअर्जदार 1 यांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. त्यांच्या लेखी युक्तीवादातील कथन थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
गैरअर्जदार 1 हा मे. रणबीर फुड्स स्टफ्स कँडबी चा मालक असून गैरअर्जदार हा आपला व्यवसाय भाग्यनगर नांदेड येथे चालवतो. अर्जदाराने दिनांक 02/06/2012 रोजी गैरअर्जदार 1 कडून गैरअर्जदार 2 ने वितरीत केलेल्या व गैरअर्जदार 3 ने उत्पादित केलेल्या ‘बेली’ कंपनीची पाण्याची सिलबंद बॉटल आहे त्या अवस्थेत व अन्य खादय पदार्थ खरेदी केले व त्यापोटी रक्कम रु. 90/- स्विकारुन गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदारास बिल दिले. सदर पाण्याची बॉटल खरेदी केल्यानंतर अर्जदाराने त्यात मृत पाल असल्याचे सांगितले. गैरअर्जदार 1 हे सदर पाण्याची बॉटल अर्जदारास बदलून देण्यास तयार होते परंतू अर्जदाराने त्यास नकार दिला. गैरअर्जदार 1 यांनी बॉटल आहे त्या स्थितीत सिलबंद अवस्थेत विक्री केली असून अर्जदाराने नमूद केलेल्या कथीत सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी पध्दतीकरिता गैरअर्जदार 1 यांना जबाबदार धरण्यात येवू नये अशी विनंती लेखी युक्तीवादात केली आहे.
गैरअर्जदार 2 याचा लेखी जबाब थोडक्यात खालील प्रमाणे.
3. अर्जदाराने गैरअर्जदार 2 यांच्याकडून कोणत्याही प्रकारची पावती प्रमाणे बिसलरी कंपनीची पाणी बॉटल खरेदी केलेली नाही अथवा या गैरअर्जदाराने तथाकथीत बेली कंपनीची पाणी बॉटलचे विक्री केलेली नाही त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही. अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्याकडून खरेदी केलेल्या पावतीप्रमाणे बिसलरी कंपनीची पाणी बॉटल व तथाकथीत बेली कंपनीच्या पाणी बॉटलचे गैरअर्जदार 2 हे उत्पादक नाहीत. अर्जदाराने गैरअर्जदार 2 यांच्याकडून रक्कम उकळण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार 1 यांनी गैरअर्जदार 2 शी संपर्क केला व गैरअर्जदारास नोटीस पाठवली हे म्हणणे पूर्णतः खोटे आहे. अर्जदाराने मनघडीत कहाणी बनवून या गैरअर्जदाराकडून रक्कम उकळण्यासाठी खोटी तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने दिनांक 02/06/2012 रोजी तथाकथीत बेली कंपनीची पाणी बॉटल अर्जदाराने दाखल केलेल्या बिलाप्रमाणे खरेदी केल्यापासून मे-2013 मध्ये तक्रार दाखल केलेली आहे. जवळपास एक ते दीड वर्षानंतर तक्रार दाखल केलेली आहे यावरुन सुध्दा संशय निर्माण होतो म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
गैरअर्जदार 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात खालील प्रमाणे.
4. गैरअर्जदार 3 यांनी अर्जदाराच्या तक्रारीतील कथन संपूर्णपणे अमान्य केलेले असन गैरअर्जदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, अर्जदार यांनी खोटी तक्रार गैरअर्जदाराविरुध्द दाखल केलेली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या बिलावरुन अर्जदाराने Packaged Drinking Water- Bisleri 500 ml ची खरेदी केलेली आहे. सदर वस्तुचे उत्पादन गैरअर्जदार करीत नाहीत त्यामुळे गैरअर्जदार 3 यांची कुठलीही जबाबदारी नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार पारले अगेो प्रा.लि. हे बिसलरी 500 एमएल या वस्तुचे उत्पादक आहेत हे खोटे सांगितलेले आहे. गैरअर्जदार 3 हे वादग्रस्त Bisleri 500 ml या बॉटलचे उत्पादक नाहीत तसेच ते बिसलरी या ट्रेडमार्क / ब्रॉन्डनेम चे मालकही नाहीत त्यामुळे गैरअर्जदार यांची कुठलीही जबाबदारी नाही. सदरील तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती गैरअर्जदार 3 यांनी लेखी जबाबाद्वारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांनी तक्रार दाखल करतांना गैरअर्जदार यांच्याकडून बिसलरी कंपनीची पाण्याची बॉटल खरेदी केली आहे असे नमूद केलेले होते. अर्जदाराने दाखल केलेल्या बिलावरही बिसलरी 500 ml असे नमूद आहे. अर्जदार यांनी बिलावर बिसलरी 500 ml हे नांव नमूद असल्याने तक्रारीमध्येही 500 ml ही बॉटल खरेदी केली असे नमूद केलेले होते. परंतू प्रत्यक्षात खरेदी केलेली पाण्याची बॉटल ही बेली कंपनीची असल्याने अर्जदाराने तक्रारीमध्ये बिसलरी या शब्दाऐवजी बेली हा शब्द टाकण्यासाठी तक्रार दुरुस्तीचा अर्ज दिला त्यावर गैरअर्जदार यांनी आपले म्हणणे दिले. दोन्ही बाजुंचे म्हणणे वाचुन मंचाने अर्जदाराचा अर्ज मंजूर केला. त्यानुसार अर्जदाराने दुरुस्त तक्रार दाखल केली.
7. अर्जदाराच्या तक्रारीतील प्रमुख मागणी अशी आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडून बेली कंपनीची 500 ml पाण्याची बॉटल खरेदी केली. सदर बॉटल ही गैरअर्जदार 3 हे उत्पादित करीत असून गैरअर्जदार 2 हे अधिकृत विक्रेते आहेत. गैरअर्जदार 1 यांनी आपल्या लेखी युक्तीवादामध्ये व मंचासमोर केलेल्या तोंडी युक्तीवादामध्ये ही बाब मान्य केली आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्याकडून दिनांक 02/06/2012 रोजी इतर खादयपदार्थ व बेली कंपनीची 500 ml ची सिलबंद बॉटल खरेदी केलेली आहे. सदर बॉटलमध्ये मृत पाल आढळून आल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्याकडे तक्रार केलेली होती. गैरअर्जदार 1 हे अर्जदारास सदर बॉटल बदलून देण्यास तयार होते परंतू अर्जदार यांनी नकार दिला. यावरुन अर्जदाराने गैरअर्जदार 1 यांच्याकडून सदरील वादग्रस्त बॉटल खरेदी केलेली असल्याचे सिध्द होते व सदरील सिलबंद बॉटलमध्ये मृत पाल असल्याचेही गैरअर्जदार क्र. 1 यांनी मान्य केलेले आहे. सदर बॉटल युक्तीवादाच्या वेळी अर्जदाराने मंचासमोर दाखवली व मंचामध्ये जमा केलेली आहे. सदरील बॉटलचे अवलोकन केले असता बेली कंपनीची 500 ml ची बॉटल गैरअर्जदार 3 यांनी उत्पादित केलेली असल्याचे सदर बॉटलवर नमूद केलेले आहे त्यामुळे गैरअर्जदार 3 यांनी आपल्या लेखी जबाबामध्ये म्हटलेले कथन की, बिसलरी कंपनीची बॉटल आम्ही उत्पादित केलेली नाही हे म्हणणे ग्राहय धरता येत नाही कारण अर्जदाराने तक्रार दुरुस्ती केल्यानंतर गैरअर्जदार यांनी दुरुस्ती तक्रारीवर आपले म्हणणे दाखल केलेले नाही. यावरुन व सदरील बॉटलवर Manufactured by पुढे गैरअर्जदार 3 म्हणजेच पारले अग्रो प्रा. लि. हेच नांव नमूद केलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदार 3 यांनीच वादग्रस्त बॉटलचे उत्पादन केलेले आहे हे सिध्द होते. अर्जदाराने दिनांक 02/06/2012 रोजी खरेदी केलेल्या वादग्रस्त बॉटलमध्ये पाल असल्याचे गैरअर्जदार 1 यांनी मान्य केलेले आहे. सदरील वादग्रस्त बॉटल युक्तीवादाच्यावेळी अर्जदाराने मंचासमोर दाखवली. सदरील बॉटलचे निरीक्षण केले असता सदरील बॉटल ही सिलबंद असून बॉटलमध्ये पाल असल्याचे उघडया डोळयांनी दिसते. सदरील बॉटल सन 2012 मध्ये उत्पादित झालेली असून आज सन 2015 मध्ये सदर पालीचे तुकडे व सांगाडा त्यामध्ये दिसून येत आहे. सदरील बॉटलमधील पाणी पिल्यानंतर निश्चितच अर्जदार व त्याच्या कुटूंबावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती परंतू अर्जदार यांच्या जागरुकतेमुळे सदर गंभीर स्थिती टळलेली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार 1 यांच्याकडून गैरअर्जदार 3 यांनी उत्पादित केलेली पाण्याची बॉटल खरेदी केलेली असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीवरुन व कागदपत्र व पुराव्यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास पाल मिश्रीत, भेसळयुक्त पाण्याची बॉटल विक्री केलेली असल्याचे सिध्द होते.
तसेच Food safty and standards Act 2006 मधील खालील तरतुद.
Section 3 (zz) “unsafe food” means an article of food whose nature, substance or quality is so affected as to render it injurious to health;
(ii) by the article consisting, wholly or in part, of any filthy, putrid, rotten, decomposed or diseased animal substance or vegetable substance;
व यासाठी शिक्षा ही Food Safty and standards Act 2006 मधील कलम 59 मध्ये दिलेली आहे.
Section 59. Punishment for unsafe food.
Any person who, whether by himfelf or by any other person on his behalf, manufactures for sale or stores or sells or distributes or imports any article of food for human consumption which is unsafe, shall be punishable.
(i) where such failure or contravention does not result in injury, with imprisonment for a term which may etend to six months and also with fine which may extend to one lakh rupees;
(ii) where such failure or contravention results in a non-grevious injury, with imprisonment for a term which may extend to one year and also with fine which may extend to three lakh rupees;
(iii) where such failure or contravention results in a grievous injury, with imprisonment for a term which may extend to six years and also with fine which may extend to five lakh rupees;
(iv) where such failure contravention results in death, with imprisonment for a term which shall not be less than seven years but which which may extend to imprisonment for life and also with fine which shall not be less than ten lakh rupees.
अर्जदाराने आपली तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (c ) (v) (A) व (B) प्रमाणे गैरअर्जदार क्र. 3 यांनी धोकादायक वस्तुंची विक्री केलेली असल्याचे सिध्द केलेले आहे.
ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 14 (1) (जी) नुसार जिवीतास धोकादायक असणा-या वस्तुंची विक्री करण्यास बंदी घालण्याचा आदेश करण्याचा अधिकार ग्राहक मंचाला आहे. तसेच सदरील वस्तुंची विक्री केल्यानंतर दंडात्मक नुकसान भरपाईही देण्याचा अधिकार मंचास आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या बॉटलवरुन सदर बॉटल ही सिलबंद असून त्यात पाल मिश्रीत, भेसळयुक्त पाणी असल्याचे स्पष्ट होते. सदर पाणी हे मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. सदरील वस्तुंचे उत्पादन करुन विक्री केलेली असल्याने गैरअर्जदार 3 यांनी मानवाच्या जिवीतास धोकादायक उत्पादन विक्री करुन या कायदयातील तरतुदीचे उल्लंघन केलेले आहे.
Consumer Protection Act 1986 Sec-14 Finding of the District Forum- (1) If, after the proceeding conducted under section 13, the District Forum is satisfied that the goods complained against suffer from any of the defects specified in the complaint or that any of the allegations contained in the complaint about the services are proved, it shall receive an order to the opposite party directing him to Substituted by Act 50 of 1993, S.11 for “take”(w.r.e.f. 18-6-1993), one or more of the following things, namely-
Inserted by Act 62 of 2002, Provided that District Forum shall have the power to grant punitive damages in such circumstance as it deems fit;
(g) Do not offer the hazardous goods for sale.
(h) To withdrawn the hazardous goods from being offered for sale.
त्यामुळे मंच गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास दंडात्मक नुकसान भरपाई दयावी असा आदेश खालीलप्रमाणे देत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार 3 यांनी मानवाचे आरोग्य धोकादायक ठरेल अशा वस्तींची उत्पादन करुन विक्री केल्याबद्दल अर्जदारास दंडात्मक नुकसान भरपाईची रक्कम रु. 20,000/- आदेशा तारखेपासून 30 दिवसाच्या आत अदा करावेत.
3. गैरअर्जदार 3 यांनी अर्जदारास तकारीच्या खर्चाबाबत रक्कम रु. 2,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांचे आत अदा करावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.