निकाल
दिनांक- 05.08.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार दादाराव पाटीलबुवा चौरे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे मौजे जिवाची वाडी ता.केज येथील रहिवासी असून ते शेती व मजुरी करुन आपले पोट भरतात. सामनेवाले क्र.1 व 2 हे पती व पत्नी असून व्यवसायाने दोघेही डॉक्टर आहेत व केज येथे त्यांचा दवाखाना आहे. तक्रारदाराचा दुसरा मुलगा संतोष हा आजारी असल्यामुळे त्यांस अंबाजोगाईचे सरकारी दवाखान्यात दाखवले होते व तेथील डॉक्टरांनी इंजेक्शन कोर्स दिला होता. संतोष हा आजारी असल्यामुळे इंजेक्शन घेणेसाठी गावी आला होता त्यांस दि.24.12.2008 रोजी तक्रारदाराने सकाळी 11 वाजता केज येथील सामनेवाले यांचे दवाखान्यात आणले. सामनेवाले क्र.1 यांनी पेनिसिलीनचे इंजेक्शन घेऊन या म्हणून चिठठी दिली. तक्रारदाराने दवाखान्या समोरील शर्मा मेडीकलमधून इंजेक्शन विकत आणले. सामनेवाले क्र.1 यांनी सामनेवाले क्र.2 यांना सदर इंजेक्शन संतोष यांस देण्यास सागितले.सामनेवाले क्र.2 यांनी सदर इंजेक्शन टेस्ट न करता संतोषचे डावे मांडीचे खुब्यावर दिले व इंजेक्शन दिले बरोबर काही मिनिटांतच संतोषने तोंड वासले, हातपाय खोडले व तो जागेवरच मरण पावला. इंजेक्शन टेस्ट न करताच सामनेवाले यांनी संतोष ला इंजेक्शन दिल्यामुळे संतोषचा मृत्यू झाला. सामनेवाले यांनी तक्रारदार व संतोषचे शव बाहेर काढले, दवाखाना बंद केला व तेथून पळून गेले.
तक्रारदाराने पोलिस स्टेशन केज येथे धाव घेतली व सामनेवाले विरुध्द फौजदारी फिर्याद दाखल केली. सामनेवाले विरुध्द गु.र.नं.21/2008 कलम 304(अ) 34 प्रमाणे गुन्हा नोंदवला. प्रेताचा पंचनामा, घटनास्थळाचा पंचनामा केला व शव शवाविच्छेदना करीता पाठवले. सामनेवाले यांचे विरुध्द एस.सी.सी.क्र.502/2009 केज न्यायालयात दाखल केले. संतोषचा शवविच्छेदनानंतर व्हिसेरा फोरेसिंग प्रयोगशाळेत अंतिम अहवालाकरिता पाठविला आहे व अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. सामनेवाले यांचे निष्काळजीपणामुळे संतोष यांचा मृत्यू झाला आहे म्हणून सदरची तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, नुकसान भरपाई म्हणून रु.2,00,000/- मिळावा तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी त्यांचा लेखी जवाब दि.31.03.2011 रोजी दाखल केला. हे मान्य नाही की, सामनेवाले क्र.1 व 2 हे पती पत्नी आहेत. त्यांच्यामध्ये घटस्फोट झालेला आहे व ते सध्या विभक्त असून ते केज येथे दवाखाना चालवित नाहीत. संतोष यांस कोणत्या दवाखान्यात दाखवले होते व तेथील डॉक्टरांनी इंजेक्शनचा कोर्स दिला होता या बाबत माहीती नाही.संतोष यांस त्यांचे दवाखान्यात आणले होते हे म्हणणे चूक आहे. त्यांनी कोणतेही पेनसिलीनचे इंजेक्शन घेऊन येण्यास सांगितले नव्हते व संतोष यांस इंजेक्शन दिले नव्हते. सामनेवाले विरुध्द गून्हा नोंदविला आहे हे बरोबर आहे. चार्जशिट मधील मजकूर मान्य नाही.पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलेले आहे परंतु अद्याप गुन्हा सिध्द होणे बाकी आहे.प्रयोगशाळेच्या अहवाला बाबत सामनेवाला यांना माहीती नाही. संतोष हा त्यांचा पेंशट होता हे म्हणणे चूक आहे त्यामुळे सामनेवाले क्र.1 यांच्या सेवेत त्रूटी नाही. सामनेवाले क्र.1 यांनी कोणतीही त्रूटीची सेवा दिली नाही किंवा निष्काळजीपणा केलेला नाही. तक्रारी मधील मजकूरानुसार संतोष यांचा मृत्यू दि.24.12.2008 रोजी झालेला आहे. तक्रार दि.23.12.2010 रोजी दाखल आहे त्यामुळे तक्रार कालमर्यादत येत नाही. तक्रार खारीज करण्यात यावी.
सामनेवाले क्र.2 यांना जाहीर समन्स देऊनही ते गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचा आदेश झाला आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीच्या पृष्टयर्थ स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. दोषरोप/अंतिम अहवाल, घटनास्थळ पंचनामा,मरणोत्तर पंचनामा, शवपरिक्षेसाठी पाठविलेल्या प्रेताबरोबर शल्यचिकित्सकाकडे पाठवावयाचा अहवाल, फिर्याद, परिक्षण शाळेचा अहवाल, शवविच्छेदन अहवाल, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांचे पत्र, सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्द जाहीर समन्स काढलेले वृतपत्र, तक्रारदारांचा लेखी यूक्तीवाद, इत्यादी कागदपत्राच्या छायाकिंत प्रती दाखल केल्या आहेत. सामनेवाले क्र.1 यांनी लेखी जवाबासोबत रंजीत चंद्रकांत गुळभिले यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे,लेखी युक्तीवाद व सामनेवाले क्र.1 यांचा लेखी जवाब व पुरावा यांचे अवलोकन केले. तक्रारदारांचे वकीलांनी युक्तीवाद केला. न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददा उत्तर
1. तक्रारदार हे सिध्द करु शकतात की, सामनेवाले क्र.1 व 2
यांचे निष्काळजीपणामुळे संतोषचा मृत्यू झाला आहे काय ? होय.
2. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 4 ः-
तक्रारदार यांनी पुराव्या पृष्टयर्थ आपले स्वतःचे शपथपत्र, कागदपत्र दाखल केले आहे. तक्रारीतील कथन सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी दोषारोप पत्र, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, तक्रारदार यांनी पोलिस स्टेशन, केज येथे दाखल केलेली फिर्याद, एस.आर.टी.आर.मेडीकल कॉलेज अंबाजोगाई चा पॅथालॉली रिपोर्ट, व्हिसेरा अग्रेषित करताना वापरलेला नमुनला इत्यादी कागदपत्राच्या छायाकींत प्रती दाखल केलेल्या आहेत. वर नमूद केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकील श्री. नामलगांवकर यांनी यूक्तीवादांत सांगितले.
सामनेवाले क्र.1 हजर झाले, त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्या व्यतिरिक्त शपथपत्र अथवा पुरावा दाखल केलेला नाही. सामनेवाले क्र.1 यांनी आपले म्हणण्यात तक्रारदाराच्या तक्रारीतील मजकूर अमान्य केला आहे. तसेच सदर तक्रार मुदतीत नाही त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. सामनेवाले क्र.2 यांना हजर होण्यासाठी दि.8 सप्टेंबर 2012 च्या दैनिक पार्श्वभूमी या वृत्तपत्रामध्ये जाहीर समन्स देऊन देखील सामनेवाले क्र.2 हजर झाले नाही. मंचाची नोटीस बजावून सुध्दा व जाहीर प्रगटन देऊनही सामनेवाले क्र.2 हे हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश देण्यात आला आहे. सामनेवाले क्र.2 यांचे शपथपत्र अथवा पुरावा तक्रारीमध्ये दाखल नाही.
तक्रारदार यांनी त्यांचे पुराव्यात कथन केले आहे की, तक्रारदाराचा मुलगा संतोष यांस सरकारी दवाखान्यात दाखविले असता तेथील डॉक्टरांनी उपचार म्हणून इंजेक्शन कोर्स दिला होता. त्याप्रमाणे इंजेक्शन देण्यासाठी दि.24.12.2008 रोजी सकाळी 11 वाजता सामनेवाले क्र.1 व 2 यांचे दवाखान्यात आणले असता सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारास पेनिसिलनचे इंजेक्शन आणावयास सांगितले. त्यासाठी सामनेाले क्र.1 यांनी तक्रारदाराला चिठठी लिहून दिली. तक्रारदारांनी सदर इंजेक्शन खरेदी करुन आणले व सामनेवाले क्र.1 यांचेकडे दिले. सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाले क्र.2 यांना सदरचे इंजेक्शन मयत संतोष यांस देण्या सांगितले. सामनेवाले क्र.2 यांनी सदरचे इंजेक्शन टेंस्ट न करता संतोषचे डाव्या मांडीचे खोब्यावर दिले. इंजेक्शन दिल्यावर काही मिनीटांतच मयत संतोष हा जागेवरच मरण पावला.
तक्रारदाराचे पुराव्यातील कथन व दाखल कागदपत्र यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सामनेवाले क्र.2 यांनी मयत संतोष यांस इंजेक्शन देताना कोणताही विचार केला नाही. इंजेक्शन देण्या आधीची जी आवश्यकतेनुसार गरजेची टेस्ट असते अशी कोणतीही टेस्ट सामनेवाले क्र.2 यांनी केली नाही. सदर इंजेक्शन टेस्ट न करता सामनेवाले क्र.2 यांनी मयत संतोष यांस डाव्या मांडीच्या खोब्यावर इंजेक्शन दिले. सामनेवाले क्र.1 व 2 यांचे निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे दिलेल्या इंजेक्शन मुळे संतोष यांस रिअँक्शन झाले. सदर रिअँक्शन मुळे संतोष हा मरण पावला. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता, सामनेवाले क्र.1 व 2 यांचेवर पोलिस स्टेशन, केज येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टन नंबर 21/2008 कलम 304(अ) 34 प्रमाणे दाखल केलेला आहे. सदर गुन्हा दाखल असून मा.न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. तक्रारदारानी दाखल केलेल्या मरणोत्तर पंचनाम्याचे अवलोकन केले असता “ डाव्या मांडीवर खुब्यावर इंजेक्शन दिल्याचा ताजा वण आहे ” असे नमूद केले आहे. व्हिसेराच्या रिपोर्टमध्ये मयत संतोष यांचा मृत्यू “ Anaphylactic Shock Due to injection Penidura ” मुळे झाला स्पष्ट आहे. तक्रारदाराचे पुराव्याचे कथन व दाखल केलेली कागदपत्र यांचेवरुन असे निदर्शनास येते की, सामनेवाले क्र.1 व 2 यांनी मयत संतोष यांस इंजेक्शन देताना निष्काळजीपणा केला आहे ही बाब सिध्द होते.
मयत संतोष हा तक्रारदार यांचा 15 वर्षाचा तरुण मुलगा होता. शिक्षणाबरोबर तो दुधाचा व्यवसाय करुन घरास हातभार लावत होता. सामनेवाले क्र.1 व 2 यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांचा तरुण कमावता मुलगा मयत झाला आहे. त्यामुळे तक्रारदारास न भरुन निघणारा असा मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. सदर तक्रारी मध्ये संतोष मयत झाल्याची तारीख व तक्रार दाखल दिनांक पाहता सदर तक्रार ही मुदतीत दाखल केली आहे. मंचाचे मते तक्रारदार यांची तक्रार मुदतीत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार हा नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.2,00,000/- तसेच मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास
नुकसान भरपाई म्हणून रु.2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख
फक्त) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत व त्यावर
तक्रार दाखल दि.23.12.2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज पुर्ण
रक्कम मिळेपर्यत दयावे.
3. सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की,तक्रारदारास
झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.3,000/-(अक्षरी रुपये तिन हजार
फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार
फक्त) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.