(घोषित दि. 05.09.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार गट क्रमांक 535 मधील 1 हेक्टर 7 आर मौजे ताडहादगाव ता.अंबड जि.जालना या जमिनीचा मालक व कब्जेदार आहे. सदर शेतात ते डाळींबाचे पिक घेतात. या पिकासाठी पाणी उलब्ध व्हावे म्हणून त्यांनी गैरअर्जदार यांचेकडून शेतात 2109 चौ.मी.मध्ये शेततळे केले.
गैरअर्जदारांशी बोलणी झाल्यावर 77 रुपये प्रति चौ.मी. प्लाटीक फिल्मचा दर व 13 रुपये प्रति चौ.मी. अस्तरीकरण करण्याचा दर ठरला त्यानुसार रुपये 1,90,000/- तक्रारदारांनी गैरअर्जदारांना आगाऊ दिले. फिटींग झाल्यानंतर दिनांक 15.01.2013 पर्यंत 70 लाख लिटर पाणी शेत तळयात साठवले व कतला जातीचे मत्स्य बीज सोडले.
गैरअर्जदारांनी विश्वास दिल्या प्रमाणे फिल्म उत्कृष्ठ दर्जाची नसल्यामुळे शेततळयातून पाणी झिरपू लागले व पाण्याची पातळी खालावली व सुमारे 42 लाख लिटर पाणी वाया गेले. तक्रारदारांनी गैरअर्जदारांना दिनांक 25.04.2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. फिल्मची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे पिकांना पाणी कमी पडले व तक्रारदारांचे रुपये 10,00,000/- चे नुकसान झाले. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. त्या अंतर्गत ते डाळींब पिकाच्या नुकसानी पोटी रुपये 10,00,000/- व शारिरीक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रुपये 2,00,000/- मागणी करत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत त्याच्या शेताचा 7/12 चा उतारा, त्यांनी RTGS व्दारा गैरअर्जदारांना रक्कम पाठवल्याच्या पावत्या, आदी प्लास्टीकची बिले, नोटीसीची स्थळ प्रत, डाळींब विक्रीच्या पावत्या इत्यादि कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबानुसार तक्रारदारांनी नफा मिळवण्यासाठी शेततळे बनवले असल्यामुळे ते ग्राहक होवू शकत नाहीत. त्यांचा शेती-बियाणे विक्रीचा व्यवसाय आहे तसेच कामधेनु जिनिंग हा व्यवसाय आहे.
गैरअर्जदार हे भारतातील नामांकित प्लास्टीक फिल्मचे विक्रेते आहेत. त्यांना भारत सरकारने आय.एस.आय प्रमाणपत्र दिले असून त्याचा क्रमांक 15351/2008 असा आहे. त्यांनी उत्पादित केलेली फिल्म 500 मायक्रॉन जाडीची व उत्तम दर्जाची असते. त्यांच्या वॉरंटी पॉलीसी नुसार खरेदी तारखेपासून 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत तांत्रिक चुकांमुळे जर पाणी झिरपत असेल तर त्याची केवळ दुरुस्ती करण्याची हमी गैरअर्जदार देतात. शेततळयाच्या पाणी गळतीस अनेक कारणे असून शकतात उदा. चुकीची हताळणी, जनावरांपासून संरक्षण न करणे, तक्रारदारांनी फिल्मच्या दोषाबाबत तज्ञ व्यक्तींकडून तपासणी केलेली नाही. वॉरंटीच्या कलम 5 नुसार पाणी गळती बाबत 10 दिवसात गैरअर्जदार यांना कळवणे आवश्यक होते. वॉरंटीनुसार गैरअर्जदार नुकसान भरपाईस बांधिल नाहीत. त्यांच्या जबाबानुसार त्यांना तक्रारदारांना प्लास्टीक फिल्म 77 रुपये प्रति चौ.मी. दराने विक्री केल्याची बाब मान्य आहे. परंतु त्यात 70 लाख लिटर पाणी साठवल्याचे, मत्स्यबीज टाकल्याचे व 228 डाळींबाचे झाडे लावल्याचे त्यांना मान्य नाही. तक्रारदारांनी खोटी तक्रार दाखल केली असून ती नामंजूर करावी अशी विनंती गैरअर्जदारांनी केलेली आहे.
गैरअर्जदारांनी आपल्या जबाबासोबत वॉरंटी पॉलीसीची छायांकीत प्रत व शेततळयाचे फोटो दाखल केले आहेत. तक्रारीच्या दरम्यान तक्रारदार गैरअर्जदार यांनी संयुक्तपणे “तक्रारदार गैरअर्जदारांना सहकार्य करतील व गैरअर्जदार त्यांच्या खर्चाने फिल्मचा दोषयुक्त भाग बनवून देतील” अशी पुर्सीस दिली परंतु प्रत्यक्ष तडजोड होवू शकली नाही.
तक्रारदारांतर्फे विव्दान वकील श्री.विपुल देशपांडे व गैरअर्जदारांतर्फे विव्दान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला त्यावरुन खालील गोष्टी दिसतात.
- तक्रारदार म्हणतात की, फिल्म आय.एस.आय प्रमाणित असल्याचा कोणताही पुरावा गैरअर्जदारांनी दाखल केलेला नाही. परंतु तक्रारदारांनीच दाखल केलेल्या विक्रीच्या पावतीवर 500 मायक्रॉन जाडीची व आय.एस.आय प्रमाणित फिल्म रुपये 77 प्रति चौ.मी. ने दिल्याचा उल्लेख आहे.
- गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या वॉरंटी पॉलीसीवर निर्मिती दोषाबाबत 10 दिवसात गैरअर्जदारांना कळवणे आवश्यक आहे. तसेच तांत्रिक कारणाने पाणी झिरपत असल्यास खरेदी पासून एक वर्षाच्या आत गैरअर्जदार फिल्म केवळ दुरुस्त करुन देतील असा उल्लेख दिसतो. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी तळयाभोवती तारेचे कुंपण घालावे असेही नमूद केले आहे.
- वादग्रस्त शेततळयाच्या मंचात दाखल केलेल्या छायाचित्रांवरुन तळयाभोवती कुंपण घातलेले नव्हते असे दिसते. त्याच प्रमाणे छायाचित्रात शेततळयात पाणी शिल्लक असल्याचे दिसत आहे.
- तक्रारदारांनी अस्तरली गेलेली फिल्म सदोष आहे व त्यातून नेमके किती प्रमाणात व कोठून पाणी झिरपत आहे हे दर्शविण्यासाठी कोणत्याही तज्ञांचा पुरावा मंचात दाखल केलेला नाही. तसेच त्यांनी दाखल केलेल्या डाळींब विक्रीच्या पावत्यांवरुनही तक्रारदारांचे नेमके किती नुकसान झाले व ते शेततळयातील पाणी कमी झाल्यानेच झाले अथवा कसे याचा उलगडा होत नाही.
- वरील प्रमाणे परिस्थिती असली तरी गैरअर्जदारांच्या वकीलांनी युक्तीवादात सांगितले की, जर तक्रारदारांनी पाणी उपसा करुन तळे रिकामे करुन दिले तर गैरअर्जदार फिल्मची पाहणी करुन दोष आढळल्यास फिल्म दुरुस्त करुन द्यावयास तयार आहेत.
अशा परिस्थितीत तक्रारदारांनी स्वखर्चाने शेततळयातील पाणी काढून द्यावे व गैरअर्जदारांनी प्लास्टीक फिल्मची पाहणी करुन ती दुरुस्त करुन द्यावी असा आदेश देणे न्याय्य ठरेल असे मंचाला वाटते.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
- तक्रारदारांना आदेश येतो की, त्यांनी स्वखर्चाने पाणी उपसाकरुन शेततळे रिकामे करुन द्यावे.
- गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, उपसा झाल्यानंतर तीस दिवसात प्लास्टीक फिल्मची योग्य ती दुरुस्ती करुन द्यावी.