(घोषित दि. 30.05.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदाराचे पती गणेश संपत देशमाने हे शेतकरी होते. त्यांचे नावे मौजे वरुड ता.मंठा जि.जालना येथे जमीन होती. त्यांना दिनांक 08.09.2011 रोजी भोकरदन येथून औरंगाबादकडे येत असताना मोटारसायकल खड्यात स्लीप होवून अपघात झाला. त्यांना दवाखान्यात भरती केले गेले. परंतू डॉक्टरांनी त्यांना जगण्याची शक्यता नसल्याने घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. शेवटी त्या अपघातामुळे त्यांचे दिनांक 14.10.2011 रोजी निधन झाले. तक्रारदाराने विहीत मुदतीत उपलब्ध कागदपत्रांसह मा. तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दिनांक 12.04.2011 रोजी “शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अतंर्गत” विमा प्रस्ताव दाखल केला. सदर योजनेचा कालावधी दिनांक 15.08.2011 पासून 18.08.2012 पर्यंत होता व या कालावधीसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतक-यांच्या वतीने विमा उतरविलेला होता. परंतू तक्रारदार यांना सदर योजनेची अंमलबजावणी करणा-या यंत्रणेकडून काहीही कळविण्यात आले नाही. त्याबाबत तक्रारदाराने दिनांक 10.09.2012 रोजी मा.जिल्हा कृषी अधिकारी, जालना यांचेकडे तक्रार दाखल केली व काही कागदपत्रे नसताना पर्यायी कागदपत्रांच्या आधारे प्रस्ताव निकाली काढण्याची विनंती केली. परंतू त्याप्रमाणे कार्यवाही झाली नाही. म्हणून तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीसोबत शासन निर्णयाची प्रत, क्लेम फॉर्म, 7/12 चा उतारा, फेरफार उतारा, 6 – क-चा उतारा, प्रतिज्ञापत्र, शाळा सोडल्याचा उतारा, घटनास्थळ पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, दुनाखे हॉस्पीटची उपचाराबाबतची कागदपत्रे, अपघातात जखमी झाल्याबद्दल एम.एल.सी. इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत व शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- ऐवढी मागणी केलेली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे नोटीस मिळूनही मंचासमोर हजर झाले नाहीत. सबब त्यांचे विरुध्द एकतर्फा हुकूम करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 3 मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी निवेदन दाखल केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी प्रथम खबर, शवविच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. त्यामुळे कंपनीने विमा दावा नाकारला यात त्यांची सेवेतील त्रुटी नाही. म्हणून तक्रारदाराचा अर्ज नामंजूर करण्यात यावा.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.मयुरे यांचा लेखी युक्तवाद वाचला गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनी यांचे वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला त्यावरुन असे दिसते की,
- तक्रारदारांनी 7/12 चा उतारा, 6-अ-चा उतारा, फेरफार नक्कल इत्यादी सर्व कागदपत्रे दाखल केली आहेत. यावर मयताचे नाव आहे. त्यावरुन मयत हा शेतकरी होता व त्याचे नावे जालना जिल्हयात शेत जमीन होती ही गोष्ट सिध्द होते.
- मयताच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरुन मयताचे वय सुमारे 48 वर्ष होते.
- तक्रारदारांनी अपघात स्थळाबाबत घटनास्थळ पंचनामा हजर केला आहे. त्यावरुन अपघात दिनांक 08.09.2011 रोजी फुलंब्री गावाजवळ झाला व त्यात मयताला गंभीर दुखापत झाली असे म्हटले आहे. पोलीसांनी एम.एल.सी साठी पत्र दिले त्यानुसार मयताची तपासणी करण्यात आली व त्याला दुनाखे हॉस्पीटल, औरंगाबाद येथे भरती करण्यात आले. ती सर्व कागदपत्रे मंचासमोर दाखल आहेत. त्यावरुन मयताला पाठीच्या मणक्याला व डोक्याला गंभीर मार लागल्याचे दिसते. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे मयत जगण्याची शक्यता नसल्याने त्याला दिनांक 13.10.2011 रोजी डिस्चार्ज देण्यात आला व घरी आणल्यानंतर त्याचा दिनांक 14.10.2011 रोजी मृत्यू झाला. मृत्यूचे प्रमाणपत्र मंचासमोर दाखल आहे. गैरअर्जदारांच्या वकीलांच्या म्हणण्याप्रमाणे प्रथम खबर व शवविच्छेदन अहवाल दाखल नसल्यामुळे मयताचा मृत्यू अपघाती झाला हे सिध्द होत नाही. या दोनही गोष्टी विमा दावा मंजूरीसाठी आवश्यक आहेत. तर तक्रारदाराच्या वकीलांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना दाखल केल्या त्यात अपवादात्मक परिस्थितीत पर्यायी कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेण्यात यावा असे म्हटले आहे. त्यानी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठर्थ पुढील निकांलाचे दाखले दिले.
- सुनिल विरुध्द आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड (अपील क्रमांक 11/2007) यात मा.राज्य आयोगाने “शव विच्छेदन अहवाल नसला तरी मयत हिराबाई जळाल्याने मेली हे सिध्द होत आहे.” असे म्हणून अपील मंजूर करुन तक्रारदारांना विमा रक्कम दिली आहे.
- देवेंद्रनाथ वि न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी (III (2010)(PJ 319) यात मा.राष्ट्रीय अयोगाने “ग्राहक मंचानी Preponderance of Possibilities लक्षात घेऊन प्रश्न सोडवावा व अनावश्यक संशय उपस्थित करु नये” असे म्हटले आहे.
मयत अपघातानंतर काही दिवसांनी घरीच मृत्यू पावला अशा परिस्थितीत शव विच्छेदन झाले नाही, त्यामुळे शव-विच्छेदन अहवाल उपलब्ध नाही. प्रथम खबर दाखल झालेली नसली तरी एम.एल.सी. अंतर्गत घटनास्थळ पंचनामा झालेला आहे. तो पंचनामा, मयताचे Medico Legal Certificate, दुनाखे हॉस्पीटलची उपचारांची कागदपत्रे व मृत्यू प्रमाणपत्र या कागदपत्रांचा एकत्रित अभ्यास करता मयताचा मृत्यू हा रस्त्यावरील अपघातामुळेच झाला आहे असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मयत हा शेतकरी असून त्याचे वय सुमारे 48 वर्ष होते व त्याचा मृत्यू रस्त्यावरील अपघातामुळे झालेला आहे या गोष्टी तक्रारदाराने सिध्द केलेल्या आहेत. त्यामुळे तक्रारदार ही मयताची पत्नी म्हणून शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्यास पात्र आहे. असा निष्कर्ष मंच काढत आहे. सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्रमांक 3 न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी आदेश प्राप्त झाल्या पासून तीस दिवसांचे आत तक्रारदाराला विमा रक्कम रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) द्यावी.
- खर्चाबाबत आदेश नाही.