निकालपत्र
( दिनांक 23 -07 -2015 )
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
1. अर्जदार मिलींद नागनाथ कांबळे हे नांदेड येथील रहिवाशी असून गैरअर्जदार क्र. 1 यांचे ग्राहक आहेत. गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे अर्जदार ज्या पतसंस्थेचा सभासद आहे त्या पतसंस्थेचे खाते आहे. अर्जदाराने इंडीका कार खरेदी करण्याचा करार महिंद्रा फायनान्स यांचेशी केला होता व रु.50,000/- देवून बाकी रु.1,50,000/- नंतर दिनांक 05.11.2013 पर्यंत देण्याचे ठरले होते. कराराच्या दिवशी म्हणजेच दिनांक 01.10.2013 रोजी कारचा ताबा अर्जदारास दिलेला होता. अर्जदाराकडे एवढी रक्कम नसल्यामुळे त्यांनी आय.टी.आय. सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जि. बीड या पतसंस्थेकडून रक्कम रु. 2,25,000/- चे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला. सदर पतसंस्थेने अर्जदारास वैदयनाथ को ऑप. बँक शाखा बीड चा धनादेश क्र. 820483 रक्कम रु. 2,25,000/- चा दिनांक 18.10.2013 या तारखेचा दिला. अर्जदाराने सदर धनादेश लगेचच दिनांक 19.10.2013 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांच्या बँकेत स्वतःच्या खात्यात खाते क्र. 2532 मध्ये वटविण्यासाठी जमा केला. सदर धनादेश प्रतिवादी क्र. 1 बँकेने प्रतिवादी क्र. 2 बँकेकडे पाठवला. परंतू प्रतिवादी क्र. 2 यांनी तो धनादेश त्यांच्या बँकेचा नाही म्हणून (Not drawn on us) असा शेरा बँक मेमोवर लिहून प्रतिवादी क्र. 1 यांना परत केला. त्यानंतर प्रतिवादी क्र. 1 यांनी तो धनादेश
वैदयनाथ को ऑप. बँक शाखा बीड यांच्याकडे वटविला आणि शेवटी दिनांक 02.12.2013 रोजी सदर रक्कम रु. 2,25,000/- अर्जदाराच्या खात्यात जमा केली. अर्जदारास सदर रक्कम दिनांक 05.11.2013 च्या नंतर मिळाल्यामुळे अर्जदार महिंद्रा फायनान्स यांना वेळेवर रक्कम देवू शकलेला नाही त्यामुळे महिंद्रा फायनान्स कंपनीने अर्जदारास त्याची कार एक महिना मोफत वापरल्यामुळे रक्कम रु. 30,000/- अतिरिक्त घेतले. तसेच पतसंस्थेने देखील रक्कम रु. 2,25,000/- वर एक महिन्याचे व्याज रु. 3,750/- घेतले. हे सर्व बँकेने धनादेश वेळेवर न वटविल्यामुळे झालेले आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे सदर चेक वटविण्यासाठी अर्जदाराने अनेक चकरा मारल्या परंतू बँकेतील कर्मचारी यांनी अर्जदारास उडवाउडवीची उत्तरे दिली व अर्जदाराने शेवटी दिनांक 25.11.2013 रोजी धनादेश लवकर वटविण्यासाठी लेखी अर्ज दिला होता. हया सर्व प्रकारामुळे अर्जदारास रु.33,750/- जादा खर्च आला व जादा भूर्दंड बसला व अर्जदारास मानसिक त्रास झाला. म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार मंचात दाखल केलेली आहे व विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात यावा व गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा चेक वटविण्यासाठी तब्बल 44 दिवसांचा अवधी लावून अर्जदारास मानसिक त्रास दिल्याबद्दल रक्कम रु. 50,000/- व अर्जदारास बसलेला भूर्दंड रु.34,750/- असे एकत्रीत रु.83,750/- गैरअर्जदार यांच्याकडून वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या देण्याचा आदेश करावा तसेच दावा खर्चापोटी रु.5,000/- देण्याबाबत आदेश करावा, अशी मागणी तक्रारीद्वारे अर्जदाराने केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार 1 चे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
2. अर्जदाराने कोणतेही कारण नसतांना सदरील तक्रार गैरअर्जदाराविरुध्द दाखल केलेली आहे. सदरची तक्रार खोटी आहे त्यामुळे दंड लावून खारीज करावी. अर्जदाराने जो धनादेश दिला तो गैरअर्जदार 1 यांनी गैरअर्जदार 2 यांच्याकडे पाठवला. गैरअर्जदार 2 यांनी तो धनादेश बीड शाखेचा आहे असा शेरा मारुन गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे वापस केला. त्याप्रमाणे कुठलीही दिरंगाई न करता हा चेक वटविण्यासाठी बँकेच्या नियमाने दिनांक 22.10.2013 रोजी ओ.बी.सी. (आऊटवर्ड बिल कलेक्शन) असे नोंदवून पाठविला. बँकेच्या नियमाप्रमाणे शहराबाहेरील चेक हे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांना पाठविण्यात येतात. गैरअर्जदार क्र. 1 यांनी हा चेक एस.बी.एच. हैद्राबाद येथे पाठवला. बाहेरगावाचे चेक हे लागलीच वटविण्यात येत नाहीत. त्यासाठीचा कालावधी हा ठराविक नसतो. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचा चेक कोठेही दिरंगाई न करता पाठविलेला आहे. हया व्यतिरिक्त चेक जमा न होण्याबाबत अर्जदाराची तक्रार आल्याने गैरअर्जदार क्र. 1 यांनी रितसर फोन व पत्रव्यवहार हा संबंधीत बँकेशी केला. त्यामुळे तो चेक वटविण्यासाठी अर्जदारास मदत झाली. गैरअर्जदार 1 यांनी नियमाप्रमाणे चेक वटविण्यासाठी पाठविला. चेक जमा होण्याबाबत कोणतीही दिरंगाई झाली नाही. गैरअर्जदार 1 यांनी अर्जदारास या प्रकरणात संपूर्ण मदत केलेली आहे त्यामुळे सदर तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणे.
सदर तक्रार अर्ज अर्जदाराने निव्वळ गृहितकांवर आधारुन दाखल केलेला आहे. त्यात नमूद केलेली माहिती मागण्याचा कोणताही अधिकार नाही. करिता सदर अर्ज खारीज करण्यायोग्य आहे. गैरअर्जदार क्र. 2 विरुध्द अर्जदारास सदर तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. अर्जदाराने त्याचा चेक क्र. 2532 हा वटविण्यासाठी गैरअर्जदार 1 यांच्याकडे जमा केला. सदरील चेक गैरअर्जदार क्र. 1 यांनी वटविण्यासाठी दि वैदयनाथ को ऑप. बँक शाखा बीड येथे पाठविण्याऐवजी त्यांनी सदरील चेक वैदयनाथ अर्बन को ऑप. बँक शाखा नवा मोंढा येथे पाठवला. सदरील व्यवस्थापकानी चेक पाहताच लगेच त्यावर Not drawn on us असे इन्ड्रार्समेंट केले. प्रतिवादी क्र. 2 यांची बँक ही को ऑप. बँक आहे कोअर बॅक नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या चेकवर any where present असा काहीही उल्लेख नाही. अर्जदाराचा चेक हा बीड शाखेचा आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांना ऑनलाईन खाते नसल्यामुळे बीड शाखेच्या एखादया ग्राहकाचे अकाऊंट / बॅलेन्स नांदेडवरुन चेक करता येत नाही किंवा चेक पास करता येत नाही म्हणून शाखाधिकारी यांनी लगेच ‘दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बॅकेस तसे कळविले. अर्जदार यांना संपूर्ण माहिती आहे की, त्याला मिळालेला चेक हा सहकारी बँकेचा आहे कोअर बँकेचा नाही. तरी पण गैरअर्जदार क्र. 2 यांना त्रास देण्यासाठी व त्यांच्याकडून पैसे काढण्याच्या उद्देशाने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. असे करुन गैरअर्जदारास सदर प्रकरणात बचाव करण्यास भाग पाडले आहे त्याकरीता अर्जदाराचा अर्ज रु.20,000/- खर्चासह खारीज करण्यात यावा अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार 2 यांनी केलेली आहे.
4. गैरअर्जदार क्र. 3 यांनी मंचात हजर होवून आपले लेखी म्हणणे अनेक संधी देवूनही दाखल केलेले नाही त्यामुळे त्यांच्या विरुध्द दिनांक 14.7.2014 रोजी नो-सेचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
5. अर्जदार मिलींद नागनाथ कांबळे हा गैरअर्जदार क्र. 1 चा ग्राहक आहे. हे गैरअर्जदार क्र. 1 यांना मान्य आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे त्याच्या खात्यात जमा करण्यासाठी चेक दिला. सदर चेक चा क्र. 820483 असा असून रक्कम रु. 2,25,000/- चा होता व त्याची तारीख 18.10.2013 अशी होती. हे अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना पाठविलेल्या दिनांक 25.11.2013 च्या पत्रावरुन व दिनांक 21.10.2013 च्या वैदयनाथ अर्बन को ऑप. बँक लि. परळी शाखा नांदेड यांच्या चेक रिटर्न मेमोवरुन स्पष्ट आहे. सदर चेक रिटर्न मेमोचे अवलोकन केले असता गैरअर्जदार क्र. 2 वैदयनाथ अर्बन को ऑप. बँक लि. परळी शाखा नांदेड यांनी सदर चेक हा Not drawn us अशा शे-यासहीत गैरअर्जदार क्र. 1 यांना परत केला. यावरुन हे स्पष्ट आहे की, गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर चेक हा योग्य बँकेत वटविण्यासाठी पाठवलेला नाही. पण त्यानंतर लगेचच दिनांक 22.10.2013 रोजी ओ.बी.सी. अशी नोंद करुन वटविण्यासाठी एस.बी. ऑफ हैद्राबाद या बँकेकडे पाठवला व नंतर दिनांक 02.12.2013 रोजी सदर चेकची रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा झाली. गैरअर्जदार क्र. 1 यांचे म्हणणे आहे की, सदर चेक वटवण्यासाठी एस.बी. हैद्राबाद यांच्याकडे पाठवल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांचा पुढील प्रक्रियेवर प्रोसीजरवर नियंत्रण नाही. तरी पण त्यांनी फोन करुन अर्जदारास मदत केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांचे म्हणणे आहे की, चेक त्यांच्या बँकेसाठीचा नसल्यामुळे तो त्यांनी लगेचच परत केला. त्यांची बँक कोअर बँक नसल्यामुळे सदरचा चेक वटवता येत नाही.
6. गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिनांक 22.10.2013 रोजी सदर चेक एस.बी.ऑफ हैद्राबाद यांच्याकडे पाठवल्यानंतर सदर चेक वटन्यासाठी पुढे लागलेल्या विलंबास कोण जबाबदार आहेत याबद्दल कागदोपत्री पुरावा अर्जदाराने मंचासमक्ष दाखल केलेला नाही. त्यामुळे अर्जदार हा त्याची तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरलेला आहे, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.