निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 13/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 02/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 30/10/2012 कालावधी 07 महिने, 28 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रभारी अध्यक्षा – सौ.रेखा कापडिया.
सदस्या -- सौ.माधुरी विश्वरुपे.
---------------------------------------------------------------------------------------
बाबूराव पिता तुकाराम सोलव. अर्जदार
वय 30 वर्षे.धंदा.शेती. अड.एम.टी.पारवे.
रा.बरबडी.ता.पूर्णा जि.परभणी.
विरुध्द
1 व्यवस्थापक. अड.जी.एच.दोडीया.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.
मंडळ कार्यालय,क्र.2 अंबिका हाऊस शंकर नगर चौक,
नागपूर – 440 010.
2 व्यवस्थापक.
कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
विभागीय कार्यालय भास्करायन,
एच.डी.एफ.सी.होम बिल्डींग.
प्लॉट नं.7,सेक्टर इ.1 टाऊन सेंटर सिडको,औरंगाबाद.
3 मा.कृषी अधिकारी साहेब,पूर्णा.
ता.पूर्णा जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) सौ.रेखा कापडिया. अध्यक्षा.
2) सौ. माधुरी विश्वरुपे. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.रेखा कापडिया. प्र.अध्यक्षा.)
अर्जदाराचे पती शेतकरी असून वाहन अपघातात ते अपंग झाले.अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या विमा योजने अंतर्गत विमा रकमेची मागणी गैरअर्जदार यांच्याकडे केली. गैरअर्जदार यांनी रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारी नुसार त्यांची बरबडी, ता.पूर्णा येथे शेतजमिन आहे. दिनांक 30/05/2010 रोजी ते वाहन अपघातात जखमी झाले, व त्यांचा एक पाय काढून टाकावा लागला. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात योजने अंतर्गत दिनांक 31/01/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे विमा रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. गैरअर्जदार यांनी शासनाने दिलेल्या तीन महिन्याच्या मुदतीत विमा रक्कम दिली नाही, त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना अपघाता 75 % अपंगत्व आले आहे. गैरअर्जदार यांनी विमा रक्कम व नुकसान भरपाई देण्याची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत विमा प्रस्तावाची प्रत, 7/12, फेरफार, एफ.आय.आर., अपंगत्व प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मंचात दाखल केलेल्या जबाबानुसार अर्जदार यांच्या नावे विमा पॉलिसी नसल्यामुळे ते ग्राहक या संज्ञेत येत नाही.अर्जदाराने दाखल केलेली तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्राबाहेरची आहे. अर्जदाराने त्यांच्याकडे विमा रक्कम देण्याबाबतचा प्रस्ताव दाखल केलेला नाही, त्यामुळे त्यांना विमा रक्कम देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या जबाबानुसार महाराष्ट्र शासनाने त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या योजने अंतर्गत आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन संबंधित विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविण्याचे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. सदरील अर्जदाराने विमा रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेला प्रस्ताव त्यांना मिळालेला नाही.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी जबाब दाखल केलेला नसल्यामुळे त्यांच्या विरुध्द लेखी निवेदना शिवाय चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन असे दिसून येते की, अर्जदार यांच्या नावे बरबडी, ता.पूर्णा येथे शेतजमिन आहे. दिनांक 30/05/2010 रोजी त्यांच्या वाहनास अपघात होऊन ते जखमी झाले.या अपघाताची नोंद संबंधित पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आलेली दिसून येते. सिव्हिल हॉस्पिटल, परभणी यांच्याकडून अर्जदारास दिनांक 05/01/2011 रोजी 75 % अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्याचे दिसून येते.
अर्जदाराने दिनांक 31/01/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात विमा योजने अंतर्गत रक्कम मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या पत्राची पोचपावती अर्जाराने मंचात दाखल केलेली आहे. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांसोबत क्लेमफॉर्म भाग-2 जोडला आहे.तलाठी सज्जा यांच्या सहीचे अर्जदार यांच्या नावे शेतजमीन असून त्यांचा अपघात झाल्याचे तसेच वारसाची नावे असलेले प्रमाणपत्र देण्यात आलेले दिसून येते,परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी त्यांना संबंधित प्रस्ताव मिळाला नसल्याचे त्यांच्या जबाबात सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत 50 % अपंगत्व आलेल्या व्यक्तीस 50,000/- रुपये विमा रक्कम मिळू शकते. अर्जदारास सिव्हिल हॉस्पिटल, परभणी यांनी 75% अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिलेले आहे.त्यामुळे अर्जदाराने सदरील प्रस्ताव योग्य त्या कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे पाठवावा व गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी प्रस्ताव मिळाल्यानंतर 30 दिवसात अर्जदारास 50,000/- रुपये विमा रक्कम द्यावी.
आ दे श
1 अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव पाठवावा व गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी विमा प्रस्ताव मिळाल्यानंतर 30 दिवसात अर्जदारास 50,000/- रुपये द्यावे.
2 खर्चाबद्दल आदेश नाही.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.माधुरी विश्वरुपे. सौ.रेखा कापडिया.
सदस्या. प्रभारी अध्यक्षा.