जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 552/2010. तक्रार दाखल दिनांक: 16/09/2010. तक्रार आदेश दिनांक :29/04/2011. श्री. मोहन भगवान तळेकर, वय 55 वर्षे, व्यवसाय : शेती, मु.पो. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर; तक्रारदार विरुध्द 1. व्यवस्थापक, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पुष्पम प्लाझा, ग्राऊंड फ्लोअर, 135 बी, ताडीवाला रोड, पुणे – 411 001. 2. व्यवस्थापक, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., शाखा सोलापूर, सन प्लाझा, लकी चौक, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : श्री. व्ही.पी. सुरवसे विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : सौ. व्ही.आर. राव आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते व्यवसायाने शेतकरी असून त्यांनी दुग्धव्यवसायाकरिता घेतलेल्या गाईचा विरुध्द पक्ष (संक्षीप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे पॉलिसी क्र.1702-06-3012-000001/1598 अन्वये दि.23/1/07 ते 22/1/2010 कालावधीकरिता रु.20,000/- चा विमा उतरविलेला आहे. दि.1/10/2009 रोजी त्यांची गाय आजारी पडली आणि वैद्यकीय उपचार चालू असताना दि.5/10/2009 रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर गाईचे पोस्टमार्टेम करण्यात आले. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे क्लेम फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे सादर केली असता, विमा कंपनीने दि.10/11/2009 च्या पत्राद्वारे गाईच्या कानातील टॅग तुटलेला असल्यामुळे क्लेम नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विमा रु.20,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार खर्च रु.10,000/- मिळावा, अशी विनंती केलेली आहे. 2. विमा कंपनीने रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना प्राप्त झालेला टॅग हा तुटलेल्या स्थितीत असून पॉलिसीच्या अट क्र.3 प्रमाणे क्लेम देय होत नाही. त्याप्रमाणे तक्रारदार यांना कळविलेले आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या गाईचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आल्याचे व विमा कालावधीमध्ये गाय मृत्यू पावल्याचे विवादीत नाही. तसेच गाईच्या मृत्यूनंतर दाखल केलेला विमा क्लेम विमा कंपनीने नामंजूर केल्याचे विवादीत नाही. 5. विमा कंपनीच्या दि.10/11/2009 च्या पत्राचे अवलोकन करता, पॉलिसी अट क्र.3 चा आधार घेत 'टॅग नॉट इंटॅक्ट' असे कारण देऊन विमा रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्याचे निदर्शनास येते. वास्तविक पाहता, जनावराची ओळख पटविण्यासाठी संबंधीत जनावराच्या कानामध्ये टॅग बसविण्यात येतो. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडे दाखल केलेला टॅग हा सुस्थितीत नसला तरी, तो विमा कंपनीने दिलेल्या टॅगशी मिळता-जुळता नाही, असेही त्यांचे कथन नाही. तसेच त्यांनी संबंधीत टॅग मंचाच्या निदर्शनास आणून दिलेला नाही. जनावरांकडून झाडे किंवा इतर ठिकाणी मान व कान घासण्याच्या होणा-या क्रियेतून टॅग खराब होण्याची शक्यता असते, हे नाकारता येत नाही. 6. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर विमा पॉलिसी, क्लेम फॉर्म, पोस्टमार्टेम रिपोर्ट, वेटर्नरी सर्टिफिकेट, ट्रिटमेंट सर्टिफिकेट, दुध संस्थेचा दाखला, सरपंच दाखला, पंचनामा, इतर पत्रव्यवहार इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्या सर्व कागदपत्रांतील गाईचे वर्णन व टॅग नंबर हे विमा पॉलिसीतील वर्णनाशी मिळतेजुळते आहे. तसेच विमा संरक्षीत गाय मृत्यू पावलेले नाही, असेही विमा कंपनीचे म्हणणे नाही. 7. वरील विवेचनावरुन तक्रारदार यांचा विमा क्लेम तांत्रिक, अनुचित व तथ्यहीन कारणास्तव नाकारुन विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारदार विमा रक्कम रु.20,000/- क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास पात्र ठरतात, या मतास आम्ही आलो आहोत. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विमा रक्कम रु.20,000/- दि.10/11/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. उपरोक्त नमूद रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास तेथून पुढे विरुध्द पक्ष यांनी द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज द्यावे. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/21411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |