निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 08/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 02/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 15/06/2012
कालावधी 03 महिने 05 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - सदस्या
श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. श्रीमती सुवर्णा देशमुख.
---------------------------------------------------------------------------------------
मुंजाजी पिता अप्पाराव झटे. अर्जदार
वय 61 वर्ष.धंदा.शेती. अड.सुचिता गंगापूरकर.
रा.उखळी ता.औंढा जि.हिंगोली.
विरुध्द
1 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. गैरअर्जदार.
तर्फे जिल्हा व्यवस्थापक. अड.डि.यु.दराडे.
जिंतूर रोड.परभणी.
2 क्रांती कृषी सेवा केंद्र. अड.एस.ए.केकान.
स्टेशन रोड.परभणी.
3 कृषी अधिकारी. स्वतः
पंचायत समिती औंढा नागनाथ जि.हिंगोली.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) श्रीमती सुवर्णा देशमुख. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.)
सोयाबीन बियाणे उगवले नाहीत म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्तुतची तक्रार आहे.
तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत.
अर्जदार मौजे उखळी ता.औंढा जि.हिंगोली येथील रहिवासी शेतकरी आहे त्यांने जुन 2011 च्या खरीप हंगामात सोयाबीन पीक घेण्यासाठी तारीख 20/06/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या दुकानातून जे. एस. 335 वाणाचे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीन बियाणाच्या 9 पिशव्या एकुण रु.7,965/- ला खरेदी केलेल्या होत्या. अर्जदाराने त्याच्या मालकीच्या गट नं 464, 549,558 शेतात पुरेसा पाऊस पडल्यानंतर एकुण 9 एकर क्षेत्रात बियाणे पेरले मात्र ठराविक दिवस होवुन गेले तरी बियाणे उगवले नाहीत त्याबाबत गैरअर्जदार 1 व 2 कडे तोंडी तक्रार केली परंतु त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. म्हणून तारीख 12/07/2011 रोजी गैरअर्जदार 3 कडे लेखी अर्ज दिला त्यांनीही त्याबाबत कार्यवाही केली नाही त्यानंतर जिल्हाधिकारी हिंगोली यांचेकडे तारीख 16/08/2011 रोजी त्याबाबत अर्ज दिल्यावर त्याच्या आदेशावरुन गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी तारीख 10/09/2011 रोजी शेतात समक्ष भेट देवुन पिकाची पाहणी केली, परंतु अर्जदाराने पूर्वीच्या पेरलेल्या ठिकाणी दुबार पेरणी केलेली होती त्यामुळे पाहणीच्या वेळी त्या ठिकाणी सदोष बियाणे न उगवल्याचा पुरावा आढळला नाही अर्जदाराचे म्हणणे असे की, सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणी करावी लागली त्यामुळे बियाणे खरेदीची रक्कम पेरणीचा खर्च पिकाचे नुसार अशी एकुण रक्कम रु. 61,965/- गैरअर्जदारांकडून मिळावी म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि. 2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत एकूण 7 कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने तारीख 03/05/2012 आणि गैरअर्जदार क्रमांक 2 ने तारीख 14/05/2012 रोजी अनुक्रमे (नि.12) व (नि.14) वर आपले लेखी जबाब दाखल केलेले आहेत.गैरअर्जदार क्रमांक 3 ला नोटीस तामिल होवुनही नेमले तारखेस मंचापुढे हजर होवुन लेखी म्हणणे सादर न केल्यामुळे त्याच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपले लेखी जबाबात तक्रार अर्जातील अर्जदाराच्या शेत जमिनीच्या मालकी संबंधीची विधाने वैयक्तिक माहिती अभावी नाकारली आहेत.तसेच बियाणे खरेदी संबंधी पेरलेले बियाणे उगवले नाही म्हणून गैरअर्जदाराकडे केलेल्या तक्रार संबंधीचा मजकूरही त्याने साफ नाकारला आहे.त्यांचे म्हणणे असे की,तक्रार अर्जात अर्जदाराने काल्पनिक खर्च व उत्पन्न दाखवले आहे त्याने शेतात पेरलेल्या सोयाबीन बियाणाची उगवण चांगली झाली होती त्याला उत्पन्नही मिळाले होते केवळ गैरअर्जदाराकडून पैसे उकळण्यासाठी खोटी केस दाखल केलेली आहे ती रु. 10,000/- च्या खर्चासह खारीज करावी अशी शेवटी विनंती केली आहे.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 1 चे शपथपत्र (नि.12) दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने शपथपत्रावर लेखी जबाबात (नि 14) अर्जदाराने त्याच्या दुकानातून सोयाबीन बियाणेच्या पिशव्या खरेदी संबंधीचा मजकूर त्याना मान्य आहे. बियाणे पेरल्यानंतर त्याची उगवण झाली नसल्याबाबत अर्जदाराने त्यांच्याकडे कधीही तोंडी अथवा लेखी तक्रार केलेली नाही बियाणे उगवले नाही किंवा ते सदोष होते या संबंधीचा कोणताही सबळ पुरावा त्यांनी दिलेला नाही उलट तक्रार अर्जातील परिच्छेद 7 मध्ये म्हंटले प्रमाणे “ स्थळ पाहणीच्या वेळी अर्जदाराने दुबार पेरणी केलेली होती त्यामुळे बियाणे सदोष असल्याचा पुरावा मिळून आला नाही ” स्थळ पाहणीत बियाणे उगवले नसल्याचे सिध्द झालेले नव्हते.या कारणास्तव देखील तक्रार खारीज करण्यात यावी स्थळ पाहणी अहवाल शासनाच्या दिनांक 27/03/1992 च्या परिपत्रकातील निर्देशा प्रमाणे चौकशी समितीच्या सर्व सदस्यांकडून पाहणी केलेली दिसून येत नाही. फक्त कृषी अधिकारी औंढा यांचीच स्वाक्षरी आहे.व त्याच्याशी संगनमत करुन खोटा अहवाल तयार करण्यात आलेला आहे.सबब तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केलेली आहे.
प्रकरणाच्या अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड.श्रीमती गंगापूरकर गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड दराडे व गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे अड.केकान यानी युक्तिवाद केला.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या दुकानातून
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादित केलेले जे.एस. 335
वाणाचे खरेदी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे होते
व त्याची उगवण झाली नाही.हे अर्जदाराने शाबीत
केले आहे काय ? नाही
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? नाही.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 -
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 च्या दुकानातून तारीख 20/06/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कंपनीचे सोयाबीन 335 वाणाचे लॉट नंबर 3716 मधील 9 पिशव्या
( एकुण 30 किलो बियाणे) एकुण रु. 7,965/- ला खरेदी केले होते ही प्राथमिक बाब पुराव्यात नि.4/1 वर दाखल केलेल्या बियाणे खरेदीच्या पावतीवरुन शाबीत झाली आहे. अर्जदाराचे म्हणणे असे की, त्याने त्याच्या मालकीच्या उखळी येथील गट नंबर 464 , 549,558 मधील एकुण 9 एकर क्षेत्रात पुरेसा पाऊस पडल्यानंतर बियाणे पेरले होते, परंतु चार पाच दिवस होवुन गेले तरी त्याची उगवण झाली नाही म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे तोंडी तक्रार केली परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही म्हणून त्यानंतर 12/07/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे अर्ज केला, परंतु त्यानीही कार्यवाही केली नाही. अर्जदाराने वरील तारखेस कृषी अधिकारीकडे अर्ज केला असे नमुद केले आहे. परंतु संबंधीत अर्जाची स्थळप्रत दाखल केलेली नसल्यामुळे ते ग्राह्य धरता येणार नाही तसेच पुराव्यात गट नंबर 464, 449 व 558 चे 7/12 उतारे दाखल केले आहेत त्यातील फक्त गट नंबर 549 मध्येच सोयाबीन बियाणे पेरले होते हे 7/12 मधील पिका खालील क्षेत्र तपशिलात नोंद आहे.इतर गट नंबर मध्ये तशी नोंद नाही बियाणे उगवले नाही म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 कडे तक्रार करुनही त्यांनी शेताला भेट देवुन पंचनामा केला नाही, म्हणून 08/08/11 रोजी पुन्हा अर्ज दिला होता अर्जाची प्रत पुराव्यात नि.4/6 वर दाखल केलेली आहे, परंतु त्या अर्जामध्ये त्याने पूर्वी तक्रार केली होती या संबंधीचा कसलाही उल्लेख केलेला नसल्यामुळे 08/08/2011 पूर्वी 12/07/2011 रोजी लेखी तक्रार केली होती हे म्हणणे खोटे असल्याचेच अनुमान निघते. अर्जदाराने 08/08/2011 गैरअर्जदार क्रमांक 3 कडे लेखी अर्ज दिला होता त्या पूर्वी 4 दिवस अगोदर तारीख 04/08/2011 रोजी तहसिलदार औंढा यांनाही अर्ज दिला होता त्याची स्थळप्रत दाखल केलेली आहे, परंतु बियाणे उगवणी संबंधीच्या तक्रारी तहशिलदार यांचेकडे करता येत नाही. त्यामुळे तो पुरावा विचारात घेता येणार नाही अर्जदाराने 08/08/2011 रोजी कृषी अधिकारीकडे अर्ज दिल्यानंतर पुन्हा तारीख 09/09/2011 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती औंढा यांच्याकडे अर्ज दिला असल्याचेही पुराव्यात नि.4/7 वर दाखल केलेल्या स्थळ प्रती मधून दिसते.मात्र ही वस्तुस्थिती दडवुन अर्जदाराने तक्रार आर्जत 08/08/2011 रोजी कृषी अधिकारीकडे अर्ज दिल्यानंतर त्यांनी कार्यवाही केली नाही म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे त्याने तक्रार केली असे खोटे विधान तक्रार अर्जामध्ये केलेले आहे.कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना अर्ज दिल्यानंतर फक्त तालुका कृषी अधिकारी यांनीच तारीख 03/08/2011 रोजी अर्जदाराच्या शेतात समक्ष भेट देवुन पिकाची पाहणी केल्या संबंधीचा अहवाल पुराव्यात नि.4/5 वर दाखल केलेला आहे, परंतु शासनाच्या मार्गदशक सुचने प्रमाणे परिपूर्ण नसल्यामुळे पुराव्याच्या दृष्टीकोनातून तो कुचकामी ठरला आहे. कारण सदोष बियाणे बाबत शेतक-याची कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार आल्यावर राज्य कृषी संचालनालयाने जिल्हा स्तरावर 7 सदस्यांची समिती गठीत करुन त्या समितीने तक्रारदाराच्या शेतावर समक्ष भेट देवुन पिकाच्या पाहणी संबंधी अनुसरावयाच्या कार्यपध्दती बाबत मार्गदर्शक सुचनाचे शासकीय परिपत्रक 10 जून 82 रोजी प्रसिध्द केले होते त्यानंतर 2 जुन 84 आणि पुन्हा 27/03/1992 रोजी परिपत्रक प्रसिध्द केलेले होते त्यानंतर पुन्हा सुधारीत परिपत्रक गु नि यो/ बियाणे / स्था.ज./5/ 92/ का 66 तारीख 01/07/1998 रोजी प्रसिध्द केलेले आहे त्यामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे तक्रार अर्जात दाखल केलेला अहवाल दिसून येत नाही कारण पीक पाहणीच्या वेळी तक्रार निवारण समितीच्या सर्वच्या सर्व 7 सदस्यानी शेतात समक्ष भेट देणे बंधनकारक असतांना अर्जदाराच्या शेतात फक्त कृषी अधिकारी पंचायत समिती औंढा नागनाथ या एकट्यानेच भेट देवुन पाहणी केल्याचे दिसते. तसेच ज्या उत्पादक कंपनीचे बियाणा बद्दल अर्जदाराची तक्रार होती त्या बियाणे उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधीला कृषी अधिका-याने नोटीस देवुन पीक पाहणीची तारीख कळवुन त्याच्या समक्ष पाहणी करणे बंधन कारक असतांना त्याच्या अपरोक्ष फक्त एकट्याने पाहणी केलेली असल्यामुळे ती शकांस्पद असल्याचाच यातून निष्कर्ष निघतो. मुळातच तालुका कृषी अधिका-याने शेताची पाहाणी केली त्या तारखेस पेरलेल्या बियाणांच्या जागी अर्जदार शेतक-याने दुबार पेरणी केली होती त्यामुळे बियाणे उगवले नाही हा पुरावा दिसून आला नाही.असे अर्जदारानेच स्वतः तक्रार अर्जात कबुल केलेले आहे त्यामुळे पुराव्यात दाखल केलेल्या अहवालातील निष्कर्ष अथवा अभिप्राय हा प्रत्यक्ष पाहणीतील नसून अर्जदारच्या सांगण्यावरुन तयार केलेला असल्यामुळे कायदेशिर दृष्टीने अर्जदाराच्या तक्रारीच्या बाबतीत निरर्थक ठरला आहे वादा करता अर्जदाराचे म्हणणे प्रमाणे पेरलेली बियाणे उगवले नाही असे क्षणभर ग्राह्य धरले तरी कृषी अधिका-याने केलेल्या पाहिणीत पेरलेल्या बियाणेची उगवण झाली नाही असे कृषी अधिका-याचे मत झाले असेल तर आपल्या अभिप्रायाला अनुसरुन बियाणे उत्पादकाकडून किंवा विक्रेत्याकडून शेतक-याने खरेदी केलेल्या बियाण्याच्या लॉट मधील नमुने बियाणे पाकिटे ताब्यात घेवुन समुचित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली पाहिजे अशी ही परिपत्रकातील मार्गदर्शक सुचना आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्या प्रमाणे कार्यवाही केली होती असा कोणताही सबळ पुरावा अर्जदाराने दाखल केलेला नाही. अर्जदाराने प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 3 कृषी अधिकारी यांना सामिल केले आहे. मंचाने पाठविलेली नोटीस मिळूनही ते प्रकरणात हजर झालेले नाहीत व आपले म्हणणे सादर केलेले नसल्यामुळे त्यांच्याकडून कसलाही खुलासा प्रकरणात नसल्यामुळे तो अनुत्तरीतच राहिला आहे.त्यामुळे त्यांनी तो अहवाल शेतात समक्ष भेट देवुन केलेला असेल का ? याबाबत शंका आल्या वाचून राहात नाही.तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 कडून खरेदी केलेली सर्व बियाणे तिन्ही शेत जमिनीत पेरले परंतु उगवले नाहीत म्हणून दुबार पेरणी करावी लागली असे अर्जदाराने तक्रार अर्जात म्हंटलेले आहे मात्र दुबार पेरणीसाठी त्याने खरेदी केलेल्या बियाणांची पावती अगर त्यासंबंधीचा अन्य पुरावा दाखल केलेला नाही.व त्या बाबत तक्रार अर्जातही एका शब्दाचाही खुलासा केलेला नसल्यामुळे त्यासंबंधीचे कथन निश्चितपणे शंकास्पद वाटते.एवढेच नव्हेतर अर्जदाराने पेरलेली बियाणे उगवली नाहीत व गैरअर्जदाराने त्याची नुकसान भरपाई दिली नाही म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे, परंतु तक्रार दाखल केल्यानंतर ही त्याने खरेदी केलेल्या सोयाबीन जे.एस.335 वाणाचे बियाणे निकृष्ट होते हे शाबीत करण्यासाठी ते समुचित प्रयोगशाळेत पाठवावे असा ग्राहक संरक्षण कलम 13 (1) मधील तरतुदी प्रमाणे ग्राहक मंचातकडेही आजपर्यंत मागणी केलेली नाही.ही देखील मोठी कायदेशिर त्रुटी राहिलेली आहे. खरेदी केलेले बियाणे सदोष व उगवण क्षमता नसलेले होते हे कायदेशिररित्या शाबीत करण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे तसेच तथाकथीत बियाण्याच्या प्रयोगशाळेच्या तपासणी अहवाला खेरीज तथा निष्कर्षा खेरीज ते सदोष होते हे कायदेशिर मुळीच ग्राह्य धरता येणार नाही.या संबंधी खाली नमुद केलेल्या रिपोर्टेड केसेस मध्येही वरिष्ठ न्यायालयाने हेच मत व्यक्त केलेले आहे. अर्जदाराने खरेदी केलेले बियाणे निकृष्ट दर्जाचे होते म्हणून ते उगवले नाहीत हे त्याच्याकडून शाबीत झालेले नसल्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस तो मुळीच पात्र नाही.रिपोर्टेड केसेसचा संदर्भ खालील प्रमाणे.
1 रिपोर्टेड केस 2009 (2) सी.पी.जे.पान 414 ( महाराष्ट्र राज्य आयोग)
2 रिपोर्टेड केस 2008 (3) सी.पी.आर.पान 260 (महाराष्ट्र राज्य आयोग)
3(ए) रिपोर्टेड केस 2007 (2) सी.पी.जे.पान 148 ( राष्ट्रीय आयोग )
3(बी) रिपोर्टेड केस 2008 (2) सी.पी.आर.पान 193 (राष्ट्रीय आयोग)
4 रिपोर्टेड केस 2003 (3) सी.पी.जे. पान 628 (महाराष्ट्र राज्य आयोग)
5 रिपोर्टेड केस 2009 (1) सी.पी.आर.पान 182 ( राष्ट्रीय आयोग)
सबब,वरील सर्व रिपोर्टेड केसेस मध्ये वरिष्ठ न्यायालयानी व्यक्त केलेली मते विचारात घेवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1 तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा.
4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्रीमती.सुवर्णा देशमुख. श्री. सी.बी. पांढरपटटे
सदस्या अध्यक्ष.