निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 19/04/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 03/05/2012
तक्रार निकाल दिनांकः- 06/02/2014
कालावधी 01वर्ष. 09महिने. 03दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सोपान पिता शंकरराव वाघ. अर्जदार
वय 55 वर्षे. धंदा.शेती. अॅड.के.पी.मुडपे.
रा.पोखर्णी ( नृ. ) ता. जि.परभणी.
विरुध्द
1 एल अँड टी फायनान्स,लि. गैरअर्जदार.
एल अँड टी हाऊस,एन.एम.मार्ग अॅड.जी.एस.वैद्य.
बल्लार्ड इस्टेट, मुंबई.
2 एल अँड टी फायनान्स लि.
शाखा कार्यालय, एम.बी.चौक,
स्टेशन रोड, राज मोबाईलच्या वरचे बाजुस, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा पोखर्णी ता.जि.परभणी येथील रहिवाशी असून त्याने गैरअर्जदार क्रमांक 2 कडून कर्ज कराराव्दारे दिनांक 26/02/2009 रोजी जॉन डियर 5204 ट्रॅक्टर खरेदी केले होते, ज्या ट्रॅक्टरचा नंबर MH-22-H-6950 असा आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर ट्रॅक्टर खरेदी करतेवेळी त्याने गैरअर्जदाराकडून 4 लाख रुपयेचे कर्ज घेतले होते, सदरची कर्जफेड 9 हप्त्यामध्ये करायची ठरली होती, त्यात पहिला हप्ता 30,000/- व बाकीचे हप्ते प्रत्येकी 46,140/- रु. असे ठरले होते.
अर्जदाराचे म्हणणे की, करारा प्रमाणे त्याने गैरअर्जदाराकडे दिनांक 20/08/2009 रोजी 76,140/- चा हप्ता ( 30,000/- + 46,140/-) भरले होते, तसेच अर्जदाराने सदर ट्रॅक्टर खरेदी करते वेळी 1,25,000/- रु. नगदी गैरअर्जदाराकडे भरले होते, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे ( 1,25,000/- + 76,140/- ) 2,01,140/- रु. नगदी भरलेले आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे आदेशाने गैरअर्जदार क्रमांक 2 च्या गुंडानी अर्जदाराचे सदरचे ट्रॅक्टर धाक दाखवुन बळजबरीने ओढून नेले. अर्जदाराने हप्ता भरायची तयारी दर्शविली, परंतु गैरअर्जदाराच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले व अर्जदाराचे सदर ट्रॅक्टर कोणतेही पूर्व सुचना न देता ओढून नेले, ते बेकायदेशिर आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने सदर ट्रॅक्टर अर्जदाराच्या ताब्यातून नेल्यानंतर तो गैरअर्जदाराच्या कार्यालयात जावुन हप्ता भरुन घ्या व ट्रॅक्टर द्या, अशी विनंती केली, परंतु त्याने हप्ता भरुन घेतला नाही व ट्रॅक्टर परत देण्यास नकार दिला व अर्जदारास सांगीतले की, तुमचे ट्रॅक्टर गैरअर्जदाराने 3,35,000/- रु. ला विक्री केले आहे. गैरअर्जदाराचे हे कृत्य बेकायदेशिर आहे व गैरअर्जदाराने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अर्जदाराची फसवणुक केली.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने गैरअर्जदारास ट्रॅक्टर परत करण्याबाबत वेळोवेळी विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिला व अर्जदारास सांगीतले की, तुमचे आमच्याकडे 2,01,146/- रु. जमा आहेत व ट्रॅक्टर विक्री करुन 3,35,000/- आलेले आहेत, असे एकुण मिळून 5,36,000/- रक्कम आम्हांस दिनांक 13/09/2010 रोजी प्राप्त झालेली आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिलेल्या नोटीसी मध्ये 1,19,950/- रु.ची अर्जदारावर थकबाकी दाखविली आहे, तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराचे ट्रॅक्टर विक्री करुन अर्जदारावर अन्याय केलेला आहे व दाखविलेली थकबाकी खोटी आहे. म्हणून अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदाराना आदेश द्यावा की, त्याने अर्जदाराकडून थकीत हप्ते भरुन घ्यावेत व अर्जदारास त्याच्या मालकीचे ट्रॅक्टर वापस करावे व इतर योग्य आदेश अर्जदाराच्या हक्कात व्हावेत.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 5 वर 2 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये गैरअर्जदाराने अर्जदारास दिनाक 07/12/2011 रोजी दिलेल्या नोटीसीची प्रत, व Loan Offer, Terms and Condition ची प्रत दाखल केली आहे.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने केवळ ग्राहक संरक्षण कायद्याचा गैरफायदा घेवुन खोटी तक्रार दाखल केली आहे व ती खारीज होणे योग्य आहे. अर्जदाराने त्याच्या तक्रारीमध्ये कोठेही म्हंटले नाही की, गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, तसेच आमच्यात झालेल्या करारा प्रमाणे कराराच्या अटी नुसार अर्जदार हा ग्राहक होवु शकत नाही व तसेच कराराच्या नियम क्रंमांक 14 प्रमाणे अर्जदाराने हे मान्य केले आहे की, दोघांत कराराबाबत कोणताही वाद निर्माण झाला तर तक्रार मुंबर्इ येथे करायची, अर्जदाराने प्रस्तुत तक्रारी मध्ये कराराच्या अटीचे उल्लंघन बाबत कोठेही उल्लेख केलेला नाही, तसेच कराराच्या Clause-12 प्रमाणे प्रकरण Arbitrator कडे सोपवण्यात येईल.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदार हा Consumer Protection Act -1986 च्या कलम 2 (1) (d) प्रमाणे ग्राहक होवु शकत नाही, कारण अर्जदाराने सदर ट्रॅक्टर हे Commercial Purpose करता घेतले होते.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदार हा स्वतः त्यांच्याकडे आला व सदर ट्रॅक्टर खरेदी करते वेळी 4 लाखाचे लोन द्यावे अशी विनंती केली, त्यावेळी आम्ही त्यास कराराव्दारे 4 लाखाचे लोन अर्जदारास दिले. सदरचा करार हा दिनांक 27/02/2009 रोजी झाला.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, सदर कराराच्या Clause-11 मध्ये सरळ म्हंटले आहे की, अर्जदार जर हप्त्याची परतफेड करण्यास असमर्थ ठरला तर गैरअर्जदार अर्जदाराचे ट्रॅक्टर ताब्यात घेवु शकतो.
गैरअर्जदाराचे म्हंणणे की, करारा प्रमाणे अर्जदाराने सदर कर्जाची परतफेड 9 हप्त्यामध्ये करायची ठरली व पहिला हप्ता 30,000/- चा व दुसरा हप्ता 46,140/- रु.चा आणि उर्वरित सात हप्ते प्रत्येकी 76,140/- चा दिनांक 20/05/2009 पासून ते 20/02/2013 पर्यंत करायचे ठरले होते, परंतु अर्जदाराने सदर कर्जाची परतफेड केली नाही, अर्जदाराने फक्त दिनांक 03 जुन 2009 रोजी 30,000/- रु. व 46,150/- रु. दिनांक 14 जानेवारी 2010 रोजी भरले आहेत. अर्जदाराने कराराप्रमाणे हप्त्याची परतफेड केली नाही, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 1,25,000/- भरलेले नाहीत, अर्जदाराने सुरुवाती पासूनच हप्त्याची परतफेड वेळोवेळी केली नाही.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 07/12/2011 रोजी अर्जदारास 1,19,950/- थकबाकी भरावे म्हणून नोटीस पाठविली होती, गैरअर्जदाराचे म्हंणणे की, अर्जदाराने कराराप्रमाणे कर्जाच्या हप्त्याची परतफेड ठरल्याप्रमाणे केली नसल्यामुळे अर्जदारास वेळोवेळी कल्पना दिली, परंतु त्याचा उपयोग न झाल्यामुळे सदरचे प्रकरण Arbitrator नियुक्त करुन त्यांच्याकडे सोपवण्यात आले व अर्जदारास त्याचे म्हंणणे मांडण्याकरीता भरपूर संधी दिली, परंतु अर्जदाराने सदर Arbitrator कडे कोणतेही Objection केले नाही व Arbitrator ने ( M. Shankar Narayanan ) Clause No.Los/RPD/ARB/2295 मध्ये संबंधीत Arbitrator ने Award पास केला व सदर Award प्रमाणे अर्जदार हा गैरअर्जदाराचे 1,19,950/- रु. देणे लागते असे म्हंटले आहे व सदर Award प्रमाणे गैरअर्जदाराने जिल्हा न्यायालय परभणी येथे दरखास्त दाखल केली आहे, ज्याचा M.A. No. 276/13 असा आहे. व अर्जदार हा व्याजासह 2,09,032/- रु. देणे लागते. म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार 15,000/- रु. खर्च आकारुन खर्चासह खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 18 वर तिन कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये Arbitrator ने 13 फेब्रुवारी 2012 रोजी अर्जदारास पाठविलेली नोटीस, कराराची प्रत, गैरअर्जदाराने दिनांक 13 फेब्रुवारी 2012 रोजी Arbitrator ला लिहलेले पत्राच्या प्रती दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे अर्जदार
सिध्द करु शकतो काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने जॉन डियर ट्रॅक्टर क्रमांक MH-22-H-6950 खरेदी करते वेळी गैरअर्जदाराकडून ( हायपोथीकेशन ) 4 लाख रु. कराराव्दारे कर्ज घेतले होते व सदर कर्जाची परतफेड 9 हप्त्यामध्ये करायची ठरली होती, ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे. तसेच करारा प्रमाणे पहिला हप्ता 30,000/- व दुसरा हप्ता 46,140/- रु. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरले होती, ही बाब देखील अॅडमिटेड फॅक्ट आहे. तसेच अर्जदाराने करारा प्रमाणे उर्वरित 7 हप्त्यामध्ये प्रत्येकी 76,140/- रु. सदर कर्जाची परतफेड 20/02/013 पर्यंत करायची ठरली होती, ही बाब नि. क्रमांक 5/2 व 5/3 वरील दिनांक 26 फेब्रुवारी 2009 च्या Loan Offer Terms and Condition च्या प्रतीवरुन सिध्द होते. याबाबत अर्जदाराने ठरल्याप्रमाणे कराराच्या हप्ते गैरअर्जदाराकडे भरले होते, याबाबत अर्जदाराने कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही, याचाच अर्थ असा निघतो की, अर्जदाराने करारा प्रमाणे वेळोवेळी हप्त्याची परतफेड केली नाही, याबाबत गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 18/2 वरील कराराच्या प्रतीचे अवलोकन केले असता Clause 11.1 मध्ये असे स्पष्टपणे म्हंटले आहे की, जर अर्जदाराने हप्त्याची परतफेड वेळोवेळी केले नाही तर, गैरअर्जदार अर्जदाराचे वाहन ताब्यात घेवु शकतो असा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. याचाच अर्थ असा निघतो की, अर्जदाराने करारा प्रमाणे हप्त्याची परतफेड न केलेमुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचे ट्रॅक्टर ताब्यात घेतले व विक्री केली.
याबाबत माननीय राष्ट्रीय आयोग दिल्ली याने 2013 (1) CPR 558 (NC) रिव्हीजन पिटीशन नंबर 2164 of 2007 मध्ये अशोक विरुध्द टाटा फायनान्स प्रकरणामध्ये स्पष्टपणे म्हंटले आहे की,
Vehicle Can be repossed and sold in case of default in repayment of loan amount सदरचा निकाल प्रस्तुत प्रकरणास तंतोतंत लागु पडतो. तसेच गैरअर्जदाराने कराराच्या Clause 12 प्रमाणे अर्जदाराने कर्जाच्या हप्त्याची परतफेड वेळीच केली नाही, म्हणून हा वाद Arbitrator म्हणून M. Shankar Narayanan याना नियुक्त करुन त्यांच्याकडे दाखल केला होता, ही बाब नि.क्रमांक 18/1 व 18/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, सदरचा वाद Arbitrator कडे दिनांक 13 फेब्रुवारी 2012 रोजी दाखल केला होता ही बाब देखील नि.क्रमांक 18/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. व त्यानंतर अर्जदाराने 19/04/2012 रोजी विद्यमान मंचासमसोर ही तक्रार दाखल केली आहे, याचाच अर्थ असा होतो की, प्रकरण Arbitrator कडे प्रलंबीत असतांना अर्जदाराने परत नंतर दाखल केलेली आहे.
गैरअर्जदाराचे लेखी जबाबामध्ये म्हणणे की, संबंधीत Arbitrator ने Award Pass केला आहे, व त्याचे Execution जिल्हा न्यायालय परभणी येथे M.A. NO. 276/13 अर्जदारा विरुध्द प्रलंबीत आहे, याबाबत अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जामध्ये स्पष्टपणे कोठेही उल्लेख केला नाही, वा गैरअर्जदाराचे म्हंणणे खोटे आहे. याबाबत अर्जदाराने कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमसोर आणला नाही. व गैरअर्जदाराचे म्हणणे की, Arbitrator ने एकदा Award Pass केल्यानंतर अर्जदारास मंचासमोर परत केस दाखल करण्याचा अधिकार पोहचत नाही, याबाबत मा.राज्य आयोग आंध्र प्रदेश C.P.R. ( Page No.129 ) Reported केस मध्ये म्हंटले आहे की, After Award passed by Arbitrator consumer forum con not decide complaint.
तसेच अर्जदाराच्या प्रस्तुत संपूर्ण तक्रारीचे अवलोकन केले असता अर्जदाराने केवळ मोघमपणे गैरअर्जदाराने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन फसवणुक केली आहे, असे म्हंटले आहे. संपूर्ण तक्रारीत अर्जदाराने गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिली असा कोठेही उल्लेख केलेला नाही, करारा प्रमाणे प्रत्येक हप्ता वेळोवेळी गैरअर्जदाराकडे भरला असे कोठेही उल्लेख केलेला नाही.
अर्जदार आपली तक्रार सिध्द करणेस पूर्णपणे असमर्थ ठरला आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटी दिल्याचे कोठेही सिध्द होत नाही, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.