(निकालपत्र सदस्या श्रीमती. कविता जगपती यांनी पारित केले)
नि का ल प त्र
तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये, सामनेवाला यांनी सेवेत कमतरता केली आहे म्हणून दाखल केली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, सेवकराम नाना पाटील हे तक्रारदारचे पती होते. दि. 04/09/2009 रोजी त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांचे नावे मौजे लोणीसिम, ता.पारोळा, जि. जळगांव येथे शेतजमीन होती व ते शेती करत होते. महाराष्ट्र शासन निर्णय कृषी व पदुम विभाग क्र. एनएआयएस 1204/सीआर-166/11-अ दि.05/01/2005 चे निर्णयानुसार प्रपत्र-अ मध्ये शासनाने व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ दिलेले आहे. सदर योजनेत रस्त्यावरील अपघात, विज पडून मुत्यू किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांचा मुत्यू झाल्यास रू 1 लाख देण्याबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. तक्रारदार यांचे पती मयत झाल्यावर तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे विमा रक्कम मागणीसाठी आवश्यक त्याकागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी, पारोळा यांचेमार्फत फॉर्म भरुन पाठविला होता. सामनेवाला यांनी काही कागदपत्र पुरविण्याबदल कळविले असता तक्रारदार यांनी मागणी नुसार पुर्तता केल्यानंतर सुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव मंजूर केलेला नाही. शासन परिपत्रकाप्रमाणे सामनेवाला यांनी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एक महिन्यात विम्याची रक्कम देणे बंधनकारक आहे. मात्र सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे व सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे विमा रक्कमेचे रू. 1,00,000/-, द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह व मानसिक शारीरीक त्रासापोटी रू 25,000/- मिळावेत, अशी मागणी तक्रारदारांनी केलेली आहे.
03. तक्रारदार यांनी पुराव्याच्या पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि. 5 लगत, शाळासोडल्याचा दाखला प्रथम खबर,घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, वारस दाखला, ड पत्रक नोंद, 7/12 उतारा, अशी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
04. सामनेवाला क्र. 1 यांनी मंचाला पत्र पाठवून आपले म्हणणे दाखल केले त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दि.01/01/2010 रोजी त्यांनी संबंधीत शेतक-याच्या अपघाता बाबतचा विमा प्रस्ताव सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे रवाना केला आहे.
सामनेवाला क्र. 2 यांनी नि. 6 वर आपला खुलासा दाखल केला त्यांच्या खुलाष्यानुसार त्यांना वरील विमा प्रस्ताव दि.16/11/2010 रोजी प्राप्त झाला सदरील प्रस्ताव मुदती नंतर प्राप्त झाला म्हणुन त्यांनी वरील प्रस्ताव मुदतीअंती नंतर प्राप्त ‘या शे-यासह सामनेवाला क्र. 3 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे पाठविला तो कंपनीने दि. 28/06/2011 रोजी नामंजूर केला आहे.
सामनेवाला क्र. 3 यांनी नि. 11 वर आपला खुलासा दाखल केला त्यांच्या म्हणण्यानुसार दि. 04/09/2009 रोजी मयत सेवकराम नाना पाटील हे विमा धारक होते यासंबधीत कोणताच पुरावा तक्रारदार यांनी मंचासमोर दाखल केला नाही. तसेच तक्रारदार यांच्याकडून सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्याकडून सदरील दाव्या बाबतचे व त्यांच्या मागणी बाबतचे संपुर्ण दस्तऐवज विमा करारा मध्ये नमूद केल्याप्रमाणे मुदतीत दाखल केले नाही म्हणुन तक्रारदारास सामनेवाला हे विमा रक्कम देण्यास जबाबदार नाही. तसेच वारसाचे ड-पत्रक नोंद, 7/12 चा उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, रेशन कार्डची झेरॉक्स प्रत, घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, एफ.आय.आर, याबाबत कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाला यांनी आपल्या विनंती मध्ये तक्रारदाराची तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी तसेच नुकसान भरपाई म्हणुन रक्कम रु. 25,000/- व तक्रार खर्च म्हणुन रक्कम रु. 10,000/- तक्रारदार यांच्याकडून सामनेवाला यांना दयावे अशी मंचासमोर विनंती केली.
05. उभयपक्षांच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकण्यात आलेत.
06. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. सामनेवाल्यांनी तक्रारदारास सेवा देतांना कमतरता होय
2. आदेशा बाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र. 1 बाबत
07. तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्तऐवज व त्यांच्या वकीलांचा लेखी युक्तीवाद व तक्रारीत दाखल असलेले कागदपत्रांचे अवलोकन केले असता नि. 5/1 वर गांव न.नं. 6 हक्काचे पत्रक याची छायांकित प्रत यांचे अवलोकन केले असता खातेदार म्हणुन सेवकराम नाना पाटील यांचे नांव दिसत आहे. तसेच नि. 5/3 या दस्ताचे अवलोकन केले असता सदर मयत सेवकराम नाना पाटील यांचे नांव दिसत आहे व ते शेतकरी आहे ही बाब सिध्द होते. तसेच नि. 5/6 वर मयत सेवकराम नाना पाटील यांचे मृत्यू प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. नि. 5/10 लगत घटनास्थळ पंचनाम्याचे अवलोकन केले असता मयत सेवकराम नाना पाटील, उ.व. 52 हे त्यांच्या काळया रंगाची राजदुत मोटार सायकल क्र. जी.जे–5/3636 ने पारोळा येथून जळगांव कडे जात असतांना टाटा आयशर या गाडीने ओव्हरटेक करीत असतांना मोटार सायकला कट मारुन अपघात झाला व त्या अपघात तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यू झाला. तसेच मरणोत्तर पंचनामा याचे अवलोकन केले असता मयत सेवकराम नाना पाटील यांचा मृत्यू डोक्याला मार लागुन फॅक्चर झालेले व रक्त निघालेले दिसत आहे अशी नोंद केलेली दिसते. तसेच नि. 6 यावर सामनेवाला क्र. 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस यांनी तक्रारदार यांचा संपुर्ण क्लेम सामनेवाला क्र. 3 यांच्याकडे दाखल केलेला आहे हे मान्य केलेले आहे. पंरतु सदर क्लेम हा 90 दिवसानंतर प्राप्त झाल्यामुळे सामनेवाला क्र. 3 यांनी सदर क्लेम नाकारला पंरतु शासनाच्या परिपत्रकानुसार जर शेतकरी विमा प्रस्ताव काही कारणांस्तव उशिराने दाखल केला असेल तर या तांत्रिक अडचणी मुळे सदर क्लेम नाकारण्यात येवू नये असे म्हटलेले आहे याचा विचार करता सदर मयत सेवकराम नाना पाटील याच्या कुटूंबाला फक्त या अडचणी मुळे सामनेवाला क्र. 3 यांनी विमा रक्कम नाकारु नये असे मंचाचे मत आहे. म्हणुन सदर विमा रक्कम सामनेवाला क्र. 3 यांच्या तक्रारदार यांना मिळण्यास पात्र आहे असे मंचाला वाटते.
तसेच सामनेवाला क्र. 2 हे शासन व विमा कंपनी यांच्या मध्ये मध्यस्थ सल्लागार आहे म्हणुन सामनेवाला क्र. 2 यांना विमा क्लेम देण्यासाठी जबाबदार धरता येणार नाही. तसेच सामनेवाला क्र. 1 कृषी अधिकारी यांनाही विमा रक्कम देण्यास जबाबदार धरता येणार नाही असे मंचाला वाटते यास्तव मंच मुदा क्र. 1 चा निष्कर्ष मंच होकारार्थी देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र. 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास विमा रक्कम
रु.1,00,000/- आदेश दिनांका पासून 30 दिवसांच्या अदा करावेत.
3. सामनेवाला क्र. 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास शारिरीक व
मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- व अर्जा खर्चापोटी रु. 3,000/- अदा करावेत.
4. सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्या विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
5. आदेश क्र. 2 व 3 मधील रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास त्यावर देय दिनांकापासुन
तक्रारदारास रक्कम प्राप्त होईपर्यंत च्या कालावधीसाठी 9 टक्के व्याजदराने व्याज दयावे.
6. निकालाच्या प्रति उभयपक्षांस विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगांव.
दि. 18/06/2015
(श्रीमती. कविता जगपती) (श्री. विनायक रा.लोंढे)
सदस्या अध्यक्ष
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.