निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 04/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 04/02/2012
तक्रार निकाल दिनांकः-04/04/2014
कालावधी 1 वर्ष 2 महिने
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री प्रदीप निटुरकर, B.Com.LL.B.
सदस्या - सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
अनिता भ्र.महालिंग वकील अर्जदार
वय सज्ञान, धंदा घरकाम, अWड.ए.डी.खापरे
रा.गुलजारवाडी, मानवत,
ता.मानवत, जि.परभणी.
विरुध्द
1 कोटक महिंद्रा ओल्ड म्युचअल लाईफ इंशुरंस गैरअर्जदार
कं.लि., गोदरेज कोलिशियम, 8 मजला, अWड.आर.एम.कुमार
इन्वाराडन नगरच्या मागे, सायन(पू.), (गै.अ.क्र.1 व 3 करिता)
मुंबई – 400 022.
2 महिंद्रा अण्ड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिस लि. अWड.आर.बी.चव्हाण
वसमत रोड, संजिवनी पेट्रोल पंप समोर, परभणी,
3 शाखा व्यवस्थापक,
कोटक महिंद्रा लाईफ इंशुरंस कं.लि.
चौथा माळा, विनय भावे कॉम्प्लेक्स,
159ए, सी.एस.टी.रोड, कालीना, सांताक्रुज(पु.)
मुंबई 400098.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.प्रदीप निटुरकर, अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
(निकालपत्र पारित व्दारा – सौ.अनिता ओस्तवाल, सदस्या)
गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांनी ञुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
अर्जदाराचे पती नामे दत्ताञय वकील यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडुन करार क्र.1037761 अन्वये रुपये 3,00,000/- चे वाहन कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड 35 महिन्यात करावयाची होती. पहिला हप्ता दिनांक 15.10.2009 रोजी व शेवटचा हप्ता दिनांक 15.08.2012 रोजी भरावयाचा होता. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराच्या पतीकडुन फायनान्शियल चार्जेस म्हणुन रुपये 72,000/- घेतले होते. कर्ज घेतांना गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराला कोटक लाईफ इंशुरंसच्या रुपये 3,00,000/- ची पॉलिसी दिली होती. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराच्या पतीचा जिवन विमा उतरविला होता त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
Policy No. | : F1 | Product Name | KCCP |
Certificate Name | : F1011027456 | Loan Agreement No. | : 1037761 |
Customer Name | : Mahaling Dattatray Vakil | Age | : 29 |
Cover Amount | : Rs.3,00,000/- | Cover Commencement Date | : 12/10/2009 |
Amount Charge | : Rs.3093.00 | Cover Termination Date | : 11/09/2012 |
अर्जदाराच्या पतीचा मृत्यु दिनांक 31.10.2009 रोजी झाला. तदनंतर गैरअर्जदार क्र.2 चे वसुली अधिकारी अर्जदाराकडे येवुन थकीत कर्ज भरण्याची मागणी केली असता अर्जदाराने पॉलिसीप्रमाणे उपरोक्त रक्कम गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडुन वसूल करुन घेण्याची सुचना गैरअर्जदार क्र.2 यांना केली. पुढे गैरअर्जदार क्र.2 च्या अधिका-यांची अर्जदाराकडुन प्रपोझल फॉर्म व इतर आवश्यक कागदपञ जमा करुन घेतले. परंतु पॉलिसी रक्कम मिळण्याची वाट न पाहता अर्जदाराने कर्ज रक्कमेच्या हप्त्याचा भरणा नियमीत केला व दिनांक 31.01.2012 रोजी गैरअर्जदार क्र.2 चे अधिकारी अर्जदाराच्या घरी येवुन थकीत कर्ज रक्कम जमा केली नाही तर वाहन जप्त करण्यात येईल अशी धमकी अर्जदारास दिली. वास्तविक पाहता गैरअर्जदार क्र.2 ने गैरअर्जदार क्र.1 व 3 यांच्याकडुन अर्जदाराच्या पतीच्या विमा दाव्याची रक्कम मंजूर करुन घेवुन पॉलिसी रक्कम अर्जदाराच्या पतीच्या कर्ज खात्यामध्ये जमा करावयास हवी होती. परंतु गैरअर्जदारांनी ही जबाबदारी पार पाडली नाही. म्हणुन अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी अर्जदाराच्या पतीचा मृत्यु झाल्यामुळे विमा पॉलिसी अंतर्गत मिळणारी रक्कम रुपये 3,00,000/- अर्जदाराला द्यावी किंवा गैरअर्जदार क्र.2 ला द्यावी. तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराकडुन कर्ज हप्त्यापोटी वसूल केलेली रक्कम अर्जदारास परत द्यावी. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराचे वाहन जप्त करु नये, गैरअर्जदार क्र.2 यांनी करार क्र.1037761 बाबत बेबाकी प्रमाणपञ अर्जदारास द्यावे. तसेच गैरअर्जदारांनी मानसीक ञासापोटी रक्कम रुपये 15000/- व दावा खर्च रुपये 5000/- अर्जदारास द्यावेत अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपञ नि.2 वर व पुराव्यातील कागदपञ नि.6वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांना तामील झाल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी लेखी निवेदन नि.19 वर व गैरअर्जदार क्र.2 यांनी लेखी निवेदन नि.24 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 3 यांचे म्हणणे असे की, दिनांक 12.10.2009 रोजी अर्जदाराच्या पतीने वाहन कर्ज योजने अंतर्गत रक्कम रुपये 3,00,000/- चे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता. वाहन कर्ज पॉलिसी नं F1 अंतर्गत कर्जदार गटातील सभासदांना देण्यात आले होते. मयत हा कर्जदार असल्यामुळे या योजनेत त्याचाही समावेश करण्यात आला होता. अर्जदाराच्या पतीचा दिनांक 31.10.2009 रोजी नैसर्गिक कारणामुळे मृत्यु झाला. जोखीम तारीख दिनांक 12.10.2009 पासून 3 महिन्याच्या आत मृत्यु झाल्यामुळे मास्टर पॉलिसीच्या कलम 7 प्रमाणे रक्कम रुपये 10630/- विमादारास दिनांक 01.11.2010 रोजीच्या पञाव्दारे दिलेली आहे. त्यामुळे गैरअर्जदार अर्जदाराच्या मागणीप्रमाणे विमा दाव्याची रक्कम देण्यास बांधील नाही. सबब अर्जदाराची तक्रार दंड रक्कमेसह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदारांनी मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपञ नि.20 व पुराव्यातील कागदपञ नि.19/1 वर मंचासमोर दाखल केले.
गैरअर्जदार क्र.2 चे म्हणणे असे की, गैरअर्जदार क्र. 2 व गैरअर्जदार क्र. 1 व 3 या वेगळया कंपनीज आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांच्या कर्जदारच्या सुरक्षेची हमी म्हणुन Life Insurance cover note देण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 शी करार केला होता. प्रस्तुतच्या प्रकरणात गैरअर्जदार क्र.2 यांनी मयत साठी रुपये 3093/- प्रिमीयम भरला होता. जोखीम रक्कम रुपये 3,00,000/- ची होती. परंतु कर्जदाराचा मृत्यु जोखीम तारखेपासून 3 महिन्याच्या आत झाल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार विमा रक्कम देय झाली नाही. वास्तविक पाहता गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराच्या पतीचा मृत्यु दाव्याचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविला होता. परंतु कर्जदार हा जोखीम तारखेपासून 3 महिन्याच्या आत नैसर्गिक कारणामुळे मृत्यु पावल्यामुळे विमा दाव्याचा प्रस्ताव नामंजूर केला. परंतु पॉलिसीच्या क्लॉजप्रमाणे EMI रुपये 10630/- दिलेला आहे व कर्जदाराच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे ही बाब अर्जदाराने मंचापासून दडवून ठेवली आहे. गैरअर्जदार यांना कायदेशिररित्या अर्जदाराकडुन कर्ज रक्कमेची वसुली करण्याचा पुर्ण अधिकार आहे व थकीत कर्ज रक्कम न भरल्यास वाहन देखील जप्त करण्याचा अधिकार कर्ज करारानुसार गैरअर्जदारास मिळालेला आहे. तसेच दोन्ही पक्षामध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही पक्षात उदभवलेला वाद हा लवादासमोर चालण्यास पाञ असल्यामुळे मंचासमोर हा वाद चालविता येणार नाही. त्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदाराने लेखी निवेदनासोबत शपथपञ नि.25 वर व पुराव्यातील कागदपञ नि.28 वर मंचासमोर दाखल केले.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1 गैरअर्जदारांने अर्जदारास ञुटीची सेवा होय
दिली आहे काय ? गैरअर्जदार क्र.2 ने
2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पाञ आहे ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 -
अर्जदाराच्या पतीचे त्याच्या हयातीत गैरअर्जदार क्र.2 कडून वाहन खरेदीसाठी रक्कम रुपये 3,00,000/- चे कर्ज घेतले होते. त्याच वेळेस गैरअर्जदार क्र.2 व गैरअर्जदार क्र.1, 3 यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार गैरअर्जदार क्र.2 ने रक्कम रुपये 3,00,000/- ची जिवन विमा पॉलिसी अर्जदाराच्या पतीची उतरविली होती. अर्जदाराच्या पतीचा मृत्यु दिनांक 31.10.2009 रोजी झाला. तदनंतर गैरअर्जदार क्र.2 चे वसुली अधिकारी अर्जदाराकडे येवुन थकीत कर्जाच्या रक्कमेची मागणी करु लागले. वास्तविक पाहता अर्जदाराच्या पतीच्या पॉलिसीची रक्कम गैरअर्जदार क्र.1 व 3 यांच्याकडून वसूल करुन ती रक्कम अर्जदाराच्या पतीच्या कर्ज खात्यामध्ये भरणे गरजेचे असताना देखील अर्जदारास सर्व कर्ज रक्कमेची परतफेड स्वतः करावी लागली. गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराकडुन आवश्यक त्या सर्व कागदपञासह विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी गैरअर्जदाराकडे प्रस्ताव दाखल केला होता. परंतु विमा दाव्याची रक्कम अद्यापपावेतो मिळाली नाही अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदार क्र.1 चे म्हणणे असे पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार जोखीम तारखेपासून 3 महिन्याच्या आत नैसर्गिक कारणामुळे अर्जदाराच्या पतीचा मृत्यु झालेला असल्यामुळे अर्जदारास विमा दाव्याची रक्कम देता येणार नाही. त्यामुळे विमादारास दिनांक 1.11.2010 रोजी रक्कम रुपये 10630/- दिलेली आहे. गैरअर्जदार क्र.2 चे म्हणणे असे की अर्जदाराच्या पतीने त्यांच्याकडून वाहन कर्ज रक्कम रुपये 3,00,000/- घेतले होते व अर्जदारासाठी रक्कम रुपये 3,00,000/- ची पॉलिसी गैरअर्जदार क्र.1 कडून घेण्यात आली होती व ती विमा दाव्याची रक्कम कर्ज खात्यामध्ये जमा करता आली असती. परंतु गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव उपरोक्त कारणासाठी नामंजूर केला व फक्त रक्कम रुपये 10,360/- एवढीच रक्कम गैरअर्जदार क्र.2 ला मिळालेली आहे. त्यामुळे उर्वरीत कर्ज रक्कम वसूल करण्याचा पुर्ण अधिकार दोन्ही पक्षात झालेला करारानुसार गैरअर्जदार क्र.2 यांना मिळालेला आहे. निर्णयासाठी महत्वाचा मुददा असा की, अर्जदार ही विमा दाव्याची रक्कम पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार मिळण्यास पाञ आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी देण्यात येईल कारण अर्जदाराने नि.6/2 वर इंशुरंस प्रमाणपञाची झेरॉक्स प्रत मंचासमोर दाखल केली आहे. त्याचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात. ही पॉलिसी F1 योजने अंतर्गत गैरअर्जदार क्र.2 कडून ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे अशा कर्जदाराच्या गटातील सभासादासाठी गैरअर्जदार क्र.1 यांच्याशी करार करुन गैरअर्जदार क्र.2 ने उतरविली होती. अर्जदाराचा पती नामे महालिंग दत्ताञय वकील देखील कर्जदार सभासद असल्यामुळे त्यांचाही समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आला होता म्हणजे त्यांचाही विमा उतरविण्यात आला होता. त्यासाठी रक्कम रुपये 3093/- चा भरणा करण्यात आला होता व कव्हर लागू करण्यासाठीची तारीख दिनांक 12.10.2009 होती. त्या प्रमाणपञाच्या मागील बाजूस पॉलिसीच्या अटी व शर्तीचे विवरण थोडक्यात देण्यात आले आहे. त्यामधील Claim या शिर्षकाखाली ‘’No claim arising from death of a member due to any cause other than accident shall be payable where such death occurs within 90 days from the date of his/her commencement of cover here in stated’’ असे स्पष्टपणे नमूद केलेले निदर्शनास येते व हीच बाब नि.19/1 वर गैरअर्जदाराने दाखल केलेल्या पॉलिसी F1 च्या कागदपञावरुन देखील शाबीत होते. सदर प्रकरणात अर्जदाराच्या पतीचा मृत्यु दिनांक 31.10.2009 रोजी झालेला आहे. म्हणजे जोखीम तारखेपासून 90 दिवसाच्या आत झाल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीमधील क्लॉज क्र.7 प्रमाणे विमा दाव्याची रक्कम अर्जदारास मिळणार नाही. पुढे गैरअर्जदार क्र.1 ने पॉलिसीच्या अटी व शर्तीला बांधील राहुन कर्जदार सभासदाने त्याचा मृत्यु होईपर्यंत जेवढे EMI भरले तेवढीच रक्कम म्हणजे रक्कम रुपये 10630/- गैरअर्जदाराने विमादाराकडे जमा केल्याचे स्पष्ट होते. सबब गैरअर्जदार क्र.1 ने ञुटीची सेवा दिली किंवा अर्जदारावर अन्याय केला असे मानता येणार नाही. तसेच गैरअर्जदार क्र.2 ला दिनांक 08.01.2013 रोजी थकीत हप्त्याची रक्कम अर्जदाराकडून मिळालेली आहे व युक्तीवादाच्या वेळेस अर्जदाराने कर्ज रक्कमेची पुर्णपणे परतफेड केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कर्ज रक्कमेची पुर्णपणे परतफेड झाली असेल तर गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदारास बेबाकी प्रमाणपञ द्यावयास काहीच हरकत नव्हती. अर्जदारास बेबाकी प्रमाणपञ न देवुन गैरअर्जदार क्र.2 ने सेवाञुटी केली असे मंचाचे मत आहे. तसेच ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 3 नुसार सदरचा वाद चालविण्याचा पुर्ण अधिकार मंचास आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात येतो.
2 गैरअर्जदार क्र.2 यांनी निकाल कळाल्यापासुन 15 दिवसांच्या आत अर्जदारास वाहन नोंदणी क्रमांक एम.एच.22/एच-9200 चे बेबाकी प्रमाणपञ द्यावे.
3 गैरअर्जदार क्र.2 ने मानसीक ञासापोटी रक्कम रुपये 1000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- आदेश मुदतीत अर्जदारास द्यावी.
4 दोन्ही पक्षांना निकालाच्या प्रती मोफत पुरावाव्यात
सौ.अनिता ओस्तवाल श्री.प्रदीप निटुरकर
सदस्या अध्यक्ष