जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे
ग्राहक तक्रार क्रमांक – ९६/२०११
तक्रार दाखल दिनांक – १८/०५/२०११
तक्रार निकाली दिनांक – २५/०३/२०१४
श्री.साहेबराव दिनकर पाटील ----- तक्रारदार.
उ.व.सज्ञान, धंदा-शेती
रा.मु.पो.कापडणे, ता.जि.धुळे
विरुध्द
(१)खान्देश कृषी सेवा केंद्र,कापडणे ----- सामनेवाले.
मु.पो.कापडणे,ता.जि.धुळे
(२)वेस्टर्न अॅग्री सिड्स लि.,८०२/११,
वेस्टर्न हाऊस,जी.आय.डी.सी.(ईजि)
इस्टेट सेक्टर-२५,गांधी नगर,३८२०२८
(गुजरात)
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.वाय.खैरनार)
(सामनेवाले क्र.१ – गैरहजर)
(सामनेवाले क्र.२ तर्फे – वकील श्री.एस.एन.वेलणकर)
------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार यांना सदोष बियाण्याची विक्री करुन सेवा देण्यात कसूर केला आहे, म्हणून तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये सदर तक्रार या मंचात दाखल करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांच्या मालकीची गट नं.१११० क्षेत्र १ हेक्टर ०५ आर ही बागायती शेतजमिन मौजे कापडणे जि.धुळे येथे आहे. या शेत जमिनीत तक्रारदारांना उन्हाळी भुईमूगाचे पिकाचा पेरा करावयाचा असल्याने, त्यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून सामनेवाले क्र.२ यांनी उत्पादीत केलेले टॅग २४ हे उन्हाळी भुईमूग बियाणे लॉट नं.५४९ हे दि.२२-०१-२०११ रोजी खरेदी केले व उपरोक्त शेतात दि.२३-०१-२०११ रोजी पेरणी केली. परंतु त्यास योग्य ती काळजी घेवूनही उगवण क्षमता केवळ १० टक्के आढळून आली आहे. त्यामुळे कृषिविभाग धुळे यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्या प्रमाणे जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती धुळे यांनी दि.०५-०३-२०११ रोजी पिक परिस्थितीचा पंचनामा केला. या पंचनाम्याप्रमाणे सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडून याच लॉटच्या बियाण्याचा नमूना घेवून, उगवणशक्ती चाचणी करिता बियाणे हे चाचणी प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. परंतु सामनेवाले यांनी सदर बियाणे उपलब्ध करुन दिले नाही. त्या बाबत जिल्हा परिषद कृषिविभाग धुळे यांचेकडून पत्रव्यवहार केला.
तक्रारदार यांना बियाण्याकामी व इतर सर्व खर्च मिळून रु.१,०६,४६०/- इतक्या रकमेचे नुकसान झाले आहे. सदरचे नुकसान हे सामनेवाले यांनी निकृष्ट दर्जाचे दोषयुक्त बियाणे पुरविल्याने झाले आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसूर केला आहे. त्यामुळे ते नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. या कामी सामनेवाले यांना नोटीस पाठविली, परंतु त्या प्रमाणे पुर्तता न केल्याने सदरची तक्रार दाखल केली आहे.
सबब तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिक रित्या, झालेल्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.१,०६,४६०/- व्याजासह द्यावेत व तक्रार अर्जाचा खर्च रु.५,०००/- द्यावा.
तक्रारदार यांनी सदर तक्रारीसोबत नि.नं.३ वर शपथपत्र, नि.नं.५ वरील दस्त ऐवज यादी सोबत पंचनामा, ७/१२ उतारा व सामनेवालेंशी केलेला पत्रव्यवहार इत्यादी एकूण ९ कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत.
(३) सामनेवाले क्र.१ हे सदर तक्रार अर्जात हजर आहेत. परंतु त्यांनी मुदतीत जबाब दाखल न केल्याने त्यांचे विरुध्द “म्हणणे नाही” असा आदेश पारित करण्यात आला आहे.
(४) सामनेवाले क्र.२ यांनी नि.नं.९ वर लेखी खुलासा दाखल करुन सदर अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, सामनेवाले ही मान्यताप्राप्त कंपनी असून आय.एस.ओ. प्रमाणित व केंद्र शासनाने मान्यता प्रदान केलेली कंपनी आहे. सामनेवाले कंपनी ही, प्रयोग शाळेत तपासणी करुन अधिकृत विक्रेत्यामार्फत बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देते. निर्णय समितीने सामनेवाले क्र.२ यांना लेखी पत्र देवून नमूना बियाणे उपलब्ध करुन देण्याविषयी कळविले नव्हते. त्यांनी पाठविलेल्या पत्रात कुठेही बियाणे लॉट क्र.५४९ चा नमूना चाचणीसाठी पाठवा असे नमूद केलेले नाही. कंपनीने बियाणे उपलब्ध करुन दिलेले नाही, हे म्हणणे खोटे आहे. सामनेवाले हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. भुईमुग उगवण समस्या व कारणे या बाबत आवश्यक असलेले घटक यामध्ये हंगाम, वातावरण, तापमान, आद्रता, मशागत, पाणी, माती, इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे सामनेवाले यांनी सदोष बियाणे दिले हे म्हणणे योग्य नसून सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी नाही. त्यामुळे सदरचा अर्ज रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.२ यांनी नि.नं.१२ वर शपथपत्र, नि.नं.१३ वरील दस्त ऐवज यादी सोबत, तक्रार निवारण समितीशी केलेला पत्रव्यवहार, नोटीस उत्तर व मा.उच्च न्यायालयाचे काही न्यायनिवाडे छायांकीत स्वरुपात दाखल केले आहेत.
(५) तक्रारदारांची तक्रार, प्रतिज्ञापत्र व दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाले क्र.२ यांचा खुलासा, प्रतिज्ञापत्र व दाखल कागदपत्रे पाहता तसेच उभयपक्षाच्या विद्वान वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब)सामनेवाले क्र. २ यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | : होय |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ या कंपनीचे उत्पादीत भुईमूग टॅग २४ हे बियाणे सामनेवाले क्र.१ यांचेकडून खरेदी केले आहे. सदर पावती नि.नं.५/७ वर दाखल आहे. या पावतीचा विचार करता तक्रारदार हे सामनेवालेंचे “ग्राहक” असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी सदर बियाणे त्यांचे शेतामध्ये लागवड केली असता त्याची उगवण झालेली नाही. त्या बाबत त्यांनी कृषिविकास अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांचेकडे अर्ज दिलेला आहे. सदर अर्ज नि.नं.५/१ वर दाखल आहे. त्याप्रमाणे जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने दि.०५-०३-२०११ रोजी पिक परिस्थितीचा पंचनामा केलेला असून, सदर पंचनामा नि.नं.५/२ वर दाखल आहे. या पंचनाम्याचे निरीक्षण केले असता यामध्ये “....भूईमूग वाण टॅग २४ या पिकाची १ X १ मि.प्रक्षेत्रावर रॅण्डम पध्दतीने ५ ठिकाणी निरिक्षणे घेतली असता १ X १ मि.प्रक्षेत्रात सरासरी ५ झाडे उगवण झाल्याचे आढळून आले. सदर पिकाची लागवड ३० X १० से.मी.अंतरावर पेरणी केल्याचे शेतक-यांनी सांगितले. त्यानुसार सदरच्या प्रक्षेत्रात केवळ १७ टक्के उगवण झाल्याचे आढळून आले. प्रक्षेत्रात आढळून आलेली उगवणीची टक्केवारी अत्यंत कमी आहे. त्यामुळे तक्रारीत प्रक्षेत्रातून शेतक-यास भुईमूग पिकाचे उत्पन्न येणार नाही, असे समितीचे मत आहे. तसेच संबंधित बियाणे उत्पादक कंपनी वितरक कडून बियाणेचा याच लॉटच्या नमूना घेवून बियाणे चाचणी प्रयोगशाळा पुणे येथे उगवणशक्ती तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय समितीने घेतला.” असे नमूद आहे. या पंचनाम्याचा विचार करता यावरुन असे दिसते की, तक्रारदाराने पेरणी केलेल्या भुईमूगाच्या बियाण्याची उगवणक्षमता कमी आहे. त्यामुळे शेतक-यास केवळ १७ टक्के उत्पन्न मिळालेले आहे. त्यामुळे शेतक-यास पूर्ण उत्पन्न मिळणार नाही, असे समितीने मत व्यक्त केले आहे. परंतु सदर उगवण का कमी झाली ? या बाबत समितीने कोणतेही परिक्षण करुन निष्कर्ष दिलेला नाही, किंवा तसा कोणताही प्रयत्न केलेला नाही व तसे नमूद केलेले नाही. सदर तक्रार समिती मंडळामध्ये कृषि अधिकारी हे सदस्य असतात व ते कृषि विषयाचे तज्ज्ञ असल्याकारणाने त्यांनी वाद विषयी शेतातील उपलब्ध असलेल्या सर्व घटकांची माहिती म्हणजेच माती, पाणी, हवामान, खतांची मात्रा, मशागत, पेरणी पध्दत, इत्यादी सर्व घटकांचा सदर बियाण्यांवर काय परिणाम झाला आहे याचे परिक्षण करुन निष्कर्ष देणे आवश्यक होते. परंतु कृषि अधिकारी यांनी, असे केलेले दिसून येत नाही.
(८) तक्रार समितीचे असे मत आहे की, संबंधित उत्पादक किंवा वितरक यांच्याकडून बियाण्यांचा नमूना घेवून, उगवणशक्ती चाचणी करिता, बियाणे चाचणी प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णया प्रमाणे समितीने सदर बियाणे प्रयोगशाळेत पाठविणे हा निर्णय योग्य घेतलेला आहे. परंतु कृषिअधिकारी यांनी बियाणे कंपनी व वितरक यांचेकडे नमुना बियाणे, चाचणीसाठी उपलब्ध करुन द्यावे याकामी पत्रव्यवहार केला आहे. त्याप्रमाणे तसा पत्रव्यवहार नि.न.५/१ वर दाखल आहे. या पत्रामध्ये कृषिविकास अधिकारी यांनी कंपनी व वितरक यांचेशी संबंधित तक्रारीतील वाद विषयाबाबत पत्रव्यवहार केलेला दिसत आहे. त्यानंतर वितरक यांनी कंपनीस नमूना बियाणे पाठविण्याबाबत दि.२२-०३-२०११ रोजी पत्रव्यवहार केलेला आहे, सदर पत्र नि.नं.५/९ वर दाखल आहे.
त्याप्रमाणे सामनेवाले क्र.२ कंपनी यांनी दि.१६-०३-२०११ रोजी कृषि विकास अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला असून, तो नि.नं.५/१० वर दाखल आहे. या पत्रामध्ये सामनेवाले कंपनी यांनी सदर बियाण्याबाबत लायसन्स उपलब्ध आहे तसेच बियाण्यांच्या बाबत व विक्री बाबत सीड्स अॅनॅलिसीस रिपोर्ट दाखल केला आहे. या पत्राप्रमाणे असे दिसते की, सामनेवाले कंपनीने कृषि विकास अधिकारी यांच्या मागणी प्रमाणे माहितीची पुर्तता केलेली आहे. परंतु नमूना बियाणे हे चाचणीकामी उपलब्ध करुन दिलेले नाही. या बाबत कंपनीचे असे म्हणणे आहे की, कृषि विकास अधिकारी यांनी कंपनीकडे नमूना बियाण्यांच्या चाचणीकामी मागणी केलेली नाही. त्यामुळे त्याची पुर्तता केलेली नाही. परंतु सदरच्या म्हणण्यात तथ्य नाही असे आमचे मत आहे, कारण वितरक यांनी कंपनीशी बियाणे उपलब्ध करुन देण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच पंचायत समिती धुळे यांनी दि.३०-१२-२०११ रोजी कंपनीशी पत्रव्यवहार केलेला आहे. या पत्रातील विषय हा जिल्हा बियाणे तक्रार समितीकडील तक्रारीत आढळलेल्या सदोष बियाण्याबाबत, असा आहे व संदर्भ हा दि.०५-०३-२०११ रोजी जिल्हा तक्रार समितीने दिलेला अहवाल, असे नमूद आहे. याचा विचार होता सामनेवाले कंपनी यांना सदर पत्रान्वये, तक्रार समितीने सदर बियाणे हे चाचणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे व त्या बियाण्याची आवश्यकता आहे याचे ज्ञान झाले आहे हे स्पष्ट होत आहे. सदर पंचनाम्याप्रमाणे कंपनीने चाचणीकामी सदर नमूना बियाणे आवश्यक होते. परंतु कंपनीने त्याची पुर्तता न केल्याचे दिसत आहे.
तसेच कंपनीने पाठविलेल्या पत्रामध्ये सदर पंचनाम्याची प्रत व एकूण ७ शेतक-यांच्या तक्रारी सदर बियाण्याबाबत आलेल्या आहेत, या बाबत स्पष्टता झालेली आहे. अशी परिस्थिती असतांना कंपनीने सदर बियाणे स्वत:हून उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता होती किंवा तसे बियाणे तपासणी करुन, तपासणी अहवाल सादर करणे आवश्यक होते. कारण कंपनीचे असे म्हणणे आहे की, कंपनी ही एक नामांकीत कंपनी आहे. सर्व बियाणे तपासणी करुन त्या नंतर वितरकांमार्फत बाजारात उपलब्ध केले जातात. सदर उगवणशक्तीवर इतर सर्व घटकांचाही परिणाम होत असतो, त्यामुळे बियाण्यात दोष नाही. या कामी कंपनीने त्यांचे बियाणे सदोष आहे, परंतु कोणत्या दोषामुळे सदर बियाण्याची उगवण झाली नाही हे शोधुन काढणे आवश्यक होते. सदर बियाण्यावर वातावरण किंवा वितरकांमार्फत भेसळ होणे इत्यादी कोणते दोष आहेत हे शाधुन काढणे आवश्यक आहे. कारण दोष निराकरण करणे हे कंपनीच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने आवश्यक आहे. परंतु सदर कंपनीने असे काहीही केलेले नाही.
तसेच कंपनी ही सदर तक्रार अर्जामध्ये हजर झालेली आहे. सदरचा तक्रार अर्ज हा सन २०११ मध्ये मंचात दाखल केलेला आहे. त्यामुळे सदरचे बियाणे हे तपासणीकामी पाठविणे आवश्यक आहे व त्याची कंपनीने पुर्तता केलेली नाही, असे तक्रारदारांच्या तक्रारीतील कथन हे कंपनीला अवगत झालेले आहे. त्याप्रमाणे कंपनीने तपासणीकामी बियाणे हे कृषि विकास अधिका-यांकडे उपलब्ध करुन देणे किंवा मंचात सदर बियाणे तपासणी करुन मिळणेकामी कार्यवाही करणे आवश्यक होते. परंतु अशी कोणतीही पुर्तता सामनेवाले कंपनीने केलेली नाही. यावरुन सामनेवाले कंपनीच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते असे आमचे मत आहे.
(९) सदर भुईमूग लॉटचे बियाण्यात, कापडणे ता.जि.धुळे या गावातून एकूण ७ शेतक-यांच्या तक्रारी आहेत. सदर बियाण्यापासून तक्रारदार यांना उत्पन्न मिळालेले नाही ही बाब सत्य आहे. तसेच सदर बियाणे प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविणे हा तक्रार समितीने निर्णय घेतला आहे. परंतु त्याचा पाठपुरावा हा कृषिअधिकारी यांनी केलेला नाही. किंवा कंपनीने सदर बियाणे उपलब्ध करुन दिलेले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द पुढील कोणतीही कार्यवाही केलेली नाही असे दिसत आहे. तसेच कंपनीने त्यांच्यावर असलेल्या दोषाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. या सर्व परिस्थितीत शेतक-यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्ही सामनेवाले क्र.२ यांना सदर झालेल्या नुकसानीस जबाबदार धरत आहोत व सामनेवाले तक्रारदारांच्या नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत असे आमचे मत आहे.
तक्रारदार यांनी कृषि अधिकारी,धुळे यांना प्रश्नावली देवून शपथपत्राद्वारे त्यांची उत्तरे मागविली आहेत. यातील प्रश्नांचा व उत्तरांचा विचार करता, तक्रारदार यांना काय शाबीत करावयाचे आहे याचा बोध होत नाही. तसेच कृषि विकास अधिकारी यांनी जागेवर जावून सदर पंचनामा केलेला आहे. असे स्पष्ट होत आहे.
(१०) सामनेवाले यांनी वेळेत सर्व दोषांचे निराकरण केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सदर मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे. त्यामुळे त्यांना निश्चित मानसिक त्रास व अर्जाचा खर्च सहन करावा लागला आहे. याकामी सदर नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले क्र.२ जबाबदार आहेत.
तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये, त्यांच्या शेतजमिनीत एक एकरामध्ये १५ क्विंटल उत्पन्न येत असून त्याचा भाव ३,५००/- प्रति क्विंटल प्रमाणे ७८,७५०/- एवढे उत्पन्न मिळाले असते असे नमूद केले आहे. सदर उत्पन्नामधून तक्रारदारांना १७ टक्के उत्पन्न हे मिळालेले आहे. ते वजा जाता रक्कम ६५,३६३/- इतकी नुकसान भरपाई तक्रारदारांना मिळणे आवश्यक आहे. तसेच मानसिक त्रासापोटी २,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च १,०००/- सामनेवाले क्र.२ यांचेकडून मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(११) सामनेवाले क्र.१ हे बियाणे वितरक आहेत. सदर तक्रारीमध्ये बियाणे हे तपासणीकामी उत्पादक कंपनीने उपलब्ध करुन दिलेले नाही. किंवा तसा बियाणे तपासणी करुन त्या बाबतचा अहवाल दाखल केलेला नाही. सामनेवाले क्र.१ यांनी सामनेवाले क्र.२ यांचेकडून बियाणे जसे उपलब्ध झाले ते जसेच्या तसे विकलेले आहे. त्या बाबत तक्रारदार अथवा सामनेवाले क्र.२ यांची कोणतीही तक्रार नाही. याचा विचार करता सामनेवाले क्र.१ यांच्या सेवेत कोणतीही कमतरता आढळून येत नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.१ यांना तक्रारदारांचे नुकसान भरपाईस जबाबदार धरता येणार नाही असे आमचे मत आहे.
(१२) सामनेवाले क्र.२ यांनी, मा.वरीष्ठ आयोगाचे खाली नमूद न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
· 2011 (2) CPR 35 (N.C.)
Mahyco Seeds Ltd. Vs G.Venkata Subba Reddy & Ors.
(४) सामनेवाले क्र.१ यांचे विरुध्द कोणताही आदेश नाही.
धुळे.