(घोषित दि. 23.01.2013 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांचा मुलगा श्री कृष्णा सिताराम राठोड शेतकरी असून दूदैवाने दिनांक 19.10.2008 रोजी विहरीत पडून मृत्यू पावला.
तक्रारदारांनी मुलाच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव दिनांक 23.12.2008 रोजी गैरअर्जदार 1 व 2 यांचेकडे तहसील कार्यालया मार्फत पाठवला. तक्रारदारांनी यापूर्वी न्याय मंचात तक्रार क्रमांक 35/2009 दाखल केली होती. सदर केसच्या निकाला विरोधात राज्य आयोग मुंबई, परिक्रमा खंडपीठ, औरंगाबाद येथे दाखल केलेले अपील प्रस्तावातील अपूर्ण कागदपत्रे गैरअर्जदार विमा कंपनीकडे पाठवल्या नंतर प्रस्ताव 30 दिवसामध्ये निकाली काढण्याच्या अटीवर काढून घेतले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी दिनांक 15.04.2011 रोजी आवश्यक कागदपत्रासहीत प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीकडे पाठवला असून, प्रलंबत आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार 1 यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी 7/12 उतारा, फेरफार दाखल केलेला नाही.
गैरअर्जदार 2 यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांचा मूलगा कृष्णा राठोड यांच्या अपघाता संदर्भात पोलीस स्टेशनला एफ.आय.आर.ची नोंद नाही, पोलीसांनी अपघाता संदर्भात तपास काम केले नाही, पोस्ट मार्टम अहवाल दाखल नाही. तसेच 7/12 उतारा फेरफार वगैरे कागदपत्रे दाखल नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार 1 व 2 यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव व गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांचा मुलगा कृष्णा राठोड याचा मृत्यू विहीरीत पाय घसरुन पडल्यामूळे झाल्याबाबत सरपंचानी व पोलीस पाटलांनी पंचनामा केल्याचे दिसून येते. त्याच प्रमाणे गावातून वाहनाची सोय नसल्यामूळे पोस्ट मार्टम होवू शकले नाही. याबाबत शपथपत्र, दाखल केल्याचे दिसून येते.
तक्रारदारांनी समर्थनार्थ राष्ट्रीय आयोग रिव्हीजन पिटीशन 3329/07 (United India Insurance Company Ltd V/s Pallam reddy Arura) न्यायनिवाडा दाखल केला आहे.
पॉलीसीच्या अटी व शर्तीनूसार पोलीस पंचनामा व पोस्टमार्टम रिपोर्ट दाखल करणे आवश्यक आहे. परंतू सिव्हील हॉस्पीटल लांब असून मयताचे प्रेत नेण्याकरीता वाहनाची सोय नसल्यामूळे पोस्टमार्टम होवू शकले नाही असे पोलीस पाटील यांचे शपथपत्र न्याय मंचात दाखल केले आहे. सदर शपथपत्रानूसार मयत श्री कृष्णा सिताराम राठोड यांचे प्रेत विहीरीतून दिनांक 19.10.2008 रोजी सकाळी 11.00 वाजता गावातील सर्व ग्रामस्थ, मयताचे आई, वडील व पोलीस पाटील यांचे समक्ष बाहेर काढले. मयताचे आई व वडीलांनी त्यांचा मुलगा कृष्णा याला पोहता येत नव्हते म्हणून विहीरीत मृत्यू झाल्याचे सांगितले. वर नमूद केलेला न्यायनिवाडा सदर प्रकरणात लागू होतो असे न्याय मंच नम्रपणे नमूद करत आहे. पोलीस पाटील यांच्या शपथपत्रानूसार, पंचनाम्यानूसार तसेच सरपंचाचे पंचनाम्यानूसार मयत कृष्णा सिताराम राठोड यांचा मृत्यू विहीरीत पडून झाल्याने स्पष्ट होते. सदर प्रकरणात एफ.आय.आर. व पोष्ट मार्टम अहवाल उपलब्ध होवू शकत नसल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्या नूसार स्पष्ट होत असल्यामूळे या कागदपत्राच्या अभावी गैरअर्जदार विमा कंपनीला तक्रारदारांचा प्रस्ताव नाकारता येत नाही. असे वरील न्याय निवाडयानूसार स्पष्ट होते.
तक्रारदारांनी सदर योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे गैरअर्जदार विमा कंपनीकडे पाठविलेली आहेत. तक्रारीतील दाखल कागदपत्रानूसार तक्रारदार सदर योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना विमा पॉलीसीची देय रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश मिळाल्या पासून तीस दिवसात द्यावी.
- वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दारासहीत देण्यात यावी.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.