अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव
मा.अध्यक्ष - श्री.एम.एस.सोनवणे.
मा.सदस्य – श्री.सी.एम.येशीराव.
------------------------------- तक्रार अर्ज क्र. – 145/2012
तक्रार दाखल तारीख – 17/05/2012
तक्रार निकाली तारीख – 23/01/2014
1. संतोष तुकाराम न्हावी ------ तक्रारदार
वय- 40 वर्ष, धंदा – मजूरी, (अॅड.हेमंत एल.काकडे)
2. समाधान तुकाराम (जाधव)
उ.व. 37, धंदा – मजूरी
दोघे रा. तळेगांव, पो. शेलगांव,
ता. जामनेर, जि. जळगांव
विरुध्द
1. चेअरमन / सेक्रेटरी, ------ सामनेवाला
जय किसान तळेगांव विविध कार्यकारी संस्था, (क्र.1 स्वतः)
ता. जामनेर, जि. जळगांव,
2. म.चेअरमन / सेक्रेटरी, (क्र.2 तर्फे अॅड.बी.के.शिंदे)
दि जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
लि. जळगांव मुख्य कार्यालय – 27, रिंगरोड
जळगांव, ता.जि. जळगांव
3. ब्रँच मॅनेजर, (क्र. 3 तर्फे अॅड. डी.एन.पिंगळे)
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.
पुष्पम प्लाझा, तळमजला, 135 – ब
ताडीवाल रोड, पुणे – 1
कोरम –
श्री. एम. एस. सोनवणे, अध्यक्ष,
श्री. सी. एम. येशीराव. सदस्य ,
नि का ल प त्र
श्री.मिलिंद सा. सोनवणे,अध्यक्ष - तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 12 अन्वये, सेवेतील कमतरते पोटी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांचे म्हणणे थोडक्यात असे की, सामनेवाला क्र. 1 हे शेतक-यांसाठी विविध योजना राबवणारी संस्था आहे. सामनेवाला क्र. 2 शेतक-यांना कर्ज पुरवठा करणारी बँक आहे. सामनेवाला क्र. 1 यांच्या मार्फत सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदारांची आई सरस्वताबाई उर्फ साराबाई न्हावी (जाधव) यांना कर्ज मंजूर करतांना विमा हप्त्याची रक्कम रु. 168/- कपात करुन सामनेवाला क्र. 3 यांच्या विमा कंपनीचा जनता अपघात विमा घेतलेला होता. त्या विम्या अंतर्गत विमा काढलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यु झाल्यास रु. 1,00,000/- रक्कम वारसांना देण्या संदर्भात तरतूद होती.
3. तक्रारदारांचे असे ही म्हणणे आहे की, दि. 11/03/2010 रोजी त्यांची आई सरस्वताबाई उर्फ साराबाई न्हावी (जाधव) या तळेगांव येथून जामनेर येथे जात असतांना रिक्षा उलटून गंभीर जखमी झाल्या व उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. तक्रारदारांनी सामनेवाल्यांकडे विहीत नमून्यात विमा क्लेम सादर केला. मात्र सामनेवाला क्र. 3 यांनी त्यांच्या आईचे वय अपघात समयी 70 वर्ष होते, हे कारण दाखवून दि. 19/08/2011 रोजी त्यांचा विमा दावा फेटाळला. सदर बाब सेवेतील कमतरता आहे असा दावा करत, तक्रारदारांनी विम्याची रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी. तसेच, शारीरीक, मानसिक त्रासापोटी रु. 50,000/- व अर्ज खर्चापोटी रु. 15,000/- मिळावेत, अशी विनंती मंचाकडे केलेली आहे.
4. तक्रारदारांनी दाव्या पुष्ठयर्थ नि. 02 वर अॅफिडेव्हिट, व दस्तऐवज यादी नि. 4 वर फिर्याद, मृत्यूचे कारण असलेला दाखला, मृत्यू दाखला, तक्रारदारांनी केलेली प्रतिज्ञापत्रे, वारस दाखला, क्लेम फॉर्म, व विमा दावा नामंजूर केल्या बाबतचे पत्र, इ. कागदपत्रे जोडलेली आहेत.
5. सामनेवाला क्र. 1 यांनी जबाब नि. 09 दाखल केला. तक्रारदारांच्या आई त्यांच्या सभासद होत्या व दि. 11/03/2010 रोजी त्यांचा अपघाती मृत्यु झाला. त्यांनी जनता अपघात विमा अंतर्गत रु. 168/- भरलेली होती. त्यांच्या अपघाती मृत्यू नंतर विमा पॉलीसीचे पैसे मिळण्यासाठी त्यांनी सामनेवाला क्र. 2 यांच्या कडे दि. 09/05/2011 रोजी पाठविला होता, इ. बाबी त्यांनी मान्य केलेल्या आहे. मात्र विमा करार तक्रारदारांची आई व सामनेवाला क्र. 3 यांच्या मध्ये झालेला असल्याने विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी आपली नाही, असा बचाव सामनेवाला क्र. 1 यांनी घेतलेला आहे.
6. सामनेवाला क्र. 2 यांच्या विरुध्द मंचाने दि. 21/02/2013 रोजी जबाब देणे नाही असा हुकूम पारीत केलेला होता. हुकूम रदद करावा अशी विनंती सामनेवाला क्र. 2 यांनी अर्ज नि. 16 करुन केली. मात्र हे मंच स्वतःच्या आदेशांचा पुर्नविचार करु शकत नाही. त्यामुळे त्यांचा तो अर्ज फेटाळण्यात आला.
7. सामनेवाला क्र. 3 यांनी जबाब नि. 12 दाखल करुन प्रस्तुत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते तक्रारदारांच्या आईचे वय 70 वर्ष असल्याने तसेच, त्यांचे विमा पॉलीसी व अनुषंगीक कागदपत्रांमध्ये सरस्वताबाई तुकाराम न्हावी असे नांव असतांना अपघात संबंधी पोलीस कागदपत्रांमध्ये त्यांचे नांव साराबाई तुकाराम जाधव असे नमूद आहे. त्यामुळे तक्रारदारांचा विमा दावा त्यांनी योग्य रित्या फेटाळलेला आहे. त्यांनी सेवा देतांना कोणतीही कमतरता केलेली नाही. परिणामी तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
8. निष्कर्षा साठीचे मुददे व त्यावरील आमचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत.
मुद्ये निष्कर्ष
1. तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? होय
2. सामनेवाल्यांनी तक्रारदारास सेवा देतांना कमतरता सा.क्र. 3 च्या
केली काय ? बाबतीत होय
3. आदेशा बाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 बाबत
9. तक्रारदारांची आई सरस्वताबाई तुकाराम न्हावी यांनी सामनेवाला क्र. 1 मार्फत सामनेवाला क्र. 2 यांच्या कडून कर्ज घेतांना रु. 168/- इतका विमा हप्ता भरुन सामनेवाला क्र. 3 यांच्या कडून जनता अपघात विमा घेतलेला होता, असे तक्रारदारांनी शपथेवर सांगितलेले आहे. सामनेवाला क्र. 2 यांनी ही बाब त्यांचा जबाब नि. 09 मध्ये मान्य केलेली आहे. तक्रारदारांनी नि. 05/5 ला दाखल केलेली यादी स्पष्ट करते की, त्यांची आई हिचा सभासद क्र. 123 असा असून विमा रक्कम रु. 168/- कापण्यात आलेली आहे. सदर बाबी हे स्पष्ट करतात की, तक्रारदारांची आई सर्व सामनेवाल्यांची ग्राहक होती व तिचे वारस म्हणून ग्राहक संरक्षण कायदा,1986 कलम 2 (1) (ब) (v) अन्वये, तक्रारदार देखील त्यांच्या आईच्या मृत्यु पश्चात सामनेवाल्यांचे ग्राहक आहेत. यास्तव मुद्दा क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 बाबत
10. तक्रारदारांच्या आईचे नांव सभासद यादी तसेच, विम्यांशी अनुषंगीक कागदपत्रांमध्ये सरस्वताबाई तुकाराम न्हावी असे आहे, तर रिक्षा अपघात मयत झालेल्या व्यक्तीचे नांव साराबाई तुकाराम जाधव असे नमूद आहे. त्यामुळे मयत झालेली व्यक्ती तक्रारदारांची आईच आहे किंवा नाही, याबाबत ठोस असा पुरावा सादर न केल्यामुळे तक्रारदारांचा विमा दावा नाकारण्यात आलेला आहे, असा युक्तीवाद सामनेवाला क्र. 3 यांचे वकील अॅड. श्री. पिंगळे यांनी केला. मात्र तक्रारदारांचे वकील अॅड. श्री. काकडे यांचा या संदर्भात असा युक्तीवाद आहे की, सरस्वताबाई तुकाराम न्हावी व साराबाई तुकाराम जाधव या व्यक्ती दोन नसून एकच आहे. तसे प्रतिज्ञापत्र तक्रारदारांनी कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमक्ष दि. 03/04/2010 व 03/05/2011 रोजी करुन दिलेले आहेत व ते नि. 5/6 व 7 ला दाखल आहेत. अपघात समयी उपस्थित असलेल्या लोकांना त्यांच्या आईचे कागदोपत्री असलेले नांव माहीत नसल्यामुळे पोलीसांना साराबाई तुकाराम जाधव असे नांव सांगण्यात आले. परिणामी, अपघात कागदपत्रांमध्ये तेच नांव अखेर पर्यत लिहीण्यात आलेले आहे. मात्र साराबाई व सरस्वताबाई ही एकाच व्यक्तीचे दोन नांवे आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता ही बाब स्पष्टपणे समोर येते की, साराबाई व सरस्वताबाई या दोन नांव असलेल्या व्यक्तीचा रहिवास व पत्ता एकच आहे. सरस्वताबाई तुकाराम न्हावी या व्यक्तीचा मृत्यु दाखला नि. 5/4 यात देखील तिच्या मृत्युचा दि. 11/03/2010 म्हणजेच पोलीस रेकॉर्ड प्रमाणे अपघातात मयत झालेल्या साराबाई या व्यक्तीच्या मृत्युचा दिनांक म्हणूनच दर्शविण्यात आलेला आहे. याचाच अर्थ असा की, सरस्वताबाई उर्फ साराबाई तुकाराम न्हावी (जाधव) ही व्यक्ती तक्रारदारांची आई होती व तिचा दि. 11/03/2010 रोजी अपघातात मृत्यु झालेला आहे. आमच्या मते, तक्रारदारांनी नावात तफावत का झाली याचे सारासार व स्विकारार्ह कारण दिलेले आहे. त्यामुळे सामनेवाला क्र. 3 ने घेतलेला बचाव स्विकारला जावू शकत नाही.
11. सामनेवाला क्र. 3 यांनी घेतलेला दुसरा बचाव की, अपघाताच्या वेळी तक्रारदाराच्या आईचे वय 70 वर्ष होते व जनता अपघात विमा योजना ही 70 वर्षा पेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीसाठीची योजना आहे. मात्र तक्रारदारांच्या आईचे वय 70 वर्ष होते याबाबत त्यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही. एफ.आय.आर. नि. 5/2 व जिल्हा रुग्णालय जळगांव यांनी दिलेल्या प्रमाणपत्र नि. 05/3 मध्ये तक्रारदारांच्या आईचे वय 65 वर्ष दर्शविण्यात आलेले आहे. आमच्या मते, मृत्यु समयी त्यांचे वय 65 वर्ष होते ही बाब स्पष्ट होते. शिवाय जनता अपघात विमा योजने मध्ये विमा घेणा-या व्यक्तीचे वय विमा घेते समयी 70 पेक्षा जास्त नको अशी अट आहे. ती अट मृत्यु समयी त्यांचे वय 70 व त्यापेक्षा जास्त असता कामा नये, अशी ती अट नाही. त्यामुळे सामनेवाला क्र. 3 यांचा दुसरा बचाव देखील स्विकारता येणार नाही.
12. वर केलेल्या चर्चे वरुन ही बाब स्पष्ट होते की, मयत झालेली व्यक्ती तक्रारदारांची आईच आहे. तसेच, मृत्यु समयी त्यांच्या आईचे वय 70 नव्हे तर 65 वर्ष होते. त्यामुळे सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारांचा विमा दावा फेटाळून सेवेत कमतरता केलेली आहे. असा निष्कर्ष निघतो. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी विमा दाव्याची कागदपत्रे विना विलंब सामनेवाला क्र. 3 कडे पाठविलेली असल्याने, त्यांनी सेवेत कमतरता केली असे म्हणता येणार नाही. यास्तव मुद्दा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही सामनेवाला क्र. 3 च्या बाबतीत होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 बाबत
13. मुद्दा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष स्पष्ट करतात की, तक्रारदार यांची आई सामनेवाल्यांची ग्राहक होती. तिच्या मृत्यू पश्चात तक्रारदार देखील त्यांचे ग्राहक आहेत. सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदारांचा विमा दावा नाकारुन सेवेत कमतरता केलेली आहे. विमा दावा नाकारतांना त्यांनी दिलेली कारणे नीट तपासून घेणे ही जबाबदारी त्यांनी पार पाडलेली नाही. परिणामी त्यांनी, सामनेवाला क्र. 3 यांनी विमा दावा सबळ कारण नसतांना दि. 19/08/2011 रोजी फेटाळला. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र. 3 यांच्या कडून विमा रक्कम रु. 1,00,000/- त्या दिनांका पासून द.सा.द.शे 10 टक्के दराने मिळण्यास पात्र आहेत, असे आमचे मत आहे. त्याचप्रमाणे मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 10,000/- व अर्ज खर्चापोटी रु. 5,000/- मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहेत, असे आम्हांस वाटते. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांचा विमा दावा विना विलंब सामनेवाला क्र. 3 यांच्या कडे पाठविलेला असल्याने, त्यांनी सेवेत कमतरता केली असे म्हणता येणार नाही. यास्तव मुदा क्र. 3 च्या निष्कर्षा पोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. सामनेवाला क्र. 3 यांस आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/-, दि. 19/08/2011 रोजी पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळे पावेतो द.सा.द.शे. 10 टक्के व्याजाने अदा करावी.
2. सामनेवाला क्र. 3 यांस आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व अर्ज खर्चापोटी रु. 5,000/- अदा करावेत.
3. सामनेवाला क्र. 1 व 2 यांच्या विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
4. निकालपत्राच्या प्रती उभयपक्षांस विनामुल्य देण्यात याव्यात.
(चंद्रकांत एम.येशीराव) (मिलिंद सा.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष