निकाल
(घोषित दि. 03.10.2016 व्दारा श्री.सुहास एम आळशी, सदस्य)
अर्जदार हा मौजे कटखेडा ता.अंबड, जि.जालना येथील रहिवासी असून अर्जदार नं. 1 व 2 यांची मौजे काटखेडा ता. अंबड येथे गट नं. 59 मध्ये शेती आहे. तक्रारदार नं. 1 व 3 यांनी गैरअर्जदार नं. 2 कडुन शेततळयाची प्लॅस्टीक शीटची पन्नी शासकीय योजनेमध्ये जानेवारी 2014 मध्ये घेतली. तक्रारदार नं. 1 ते 3 हे सदर तळयातील पाण्याचा वापर सामुहिकरित्यात्यांचे शेतीसाठी व फळबागासाठी करतात. सदर प्लॅस्टीकची पन्नी विकत घेतेवेळी गैरअर्जदार नं. 1 याने प्लॅस्टीकच्या पन्नीची पाच वर्षाची वॉरंटी असल्याचे पत्र सोबत दिलेले आहे. सदर प्लॅस्टीकच्या पन्नीचे अस्तरीकरण गैरअर्जदार नं. 1 याचे पुणे येथील वितरक एस.व्ही.एंटरप्राईजेस म्हणजे गैरअर्जदार नं. 2 यांनी केले आहे. पन्नीचे अस्तरीकरणाचे चार्जेस गैरअर्जदार नं. 2 यांनी तक्रारदाराकडुन वेगळे वसुल केले आहेत. सदर रक्कम गैरअर्जदार नं. 1 यांना गैरअर्जदार नं. 3 यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा गेवराई बाजार यांचे मार्फत दि. 25.04.2014 रोजी पाठविली आहे.तक्रारदाराची पन्नी 1 वर्षाचे आत फाटल्यामुळे सदर तळयातील साठवण पाणी जमिनीत जिरुन गेले त्यामुळे तक्रारदार व इतर दोन यांच्या मोसंबीच्या बागांना पाण्याचा पुरवठा करता आला नाही. गैरअज्रदार नं. 1 यांना सदर पन्नी बदलुन मागितली असता त्यांनी ती बदलुन न दिल्यामुळे तक्रारदारांचे नुकसान झाले आहे व त्यांना सन सन 2014 व 2015 मध्ये त्यांचे एकुण 09,09,773/- रुपयांचे नुकसान झाले आहे. तक्रारदार याने पन्नीची रक्कम रु. 1,57,311/-, अस्तरीकरणाचा खर्च रु. 36,774/- व सन 2015 मध्ये झालेले पिकाचे नुकसान रु. 9,10,000/- व शारीरीक, मानसिक नुकसान भरपाई मिळुन एकुण रु. 14,14,085/- ची मागणी केली आहे. तक्रारदाराने त्याचे तक्रार अर्जासोबत शपथपत्र, भगवान ज-हाड व रंजना भ. ज-हाड यांचा मौजे काटखेडा येथील शेतीचा गट नं. 59 चा सन 2014-15 चा 7/12 चा उतारा, कृष्णा भगवान ज-हाड यांचा मौजे काटखेडा येथील गट नं. 54 चा उतारा, शेत तळयाकरीता पन्नी घेतल्याचे देयक रु. 1,57,311/-, प्लॅस्टीक पन्नी अस्तरीकरणाचा खर्च रु. 36,774/- चे देयक, 5 वर्ष वॉरंटी असल्याबाबत गै.अ.नं. 1 चे पत्र, प्रपत्र 9ब, तालुका कृषी अधिकारी अंबड यांचे पत्र,जिल्हा कृषी अधिकारी जालना यांचे पत्र जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पावत्या, बॅंकेचे बचत खाते पुस्तक, गै.अ.नं. 1 ला दिलेल्या नोटीसेस, तालुका जिल्हा कृषी अधिकारी यांचे पंचनामे, फोटोग्राफ्स ई.सामुहिक शेततळयाचे प्रमाणपत्र दाखल केलेले आहेत.
सदर प्रकरणाबाबत नोटीसची बजावणी होऊनही गैरअर्जदार नं. 1 व 2 मंचा समक्ष हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला गैरअर्जदार नं. 3 यांचे विरुध्द नो से आदेश पारीत झाला होता परंतु त्यांनी राज्य आयोग खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेशानुसार रु. 5000/- दंड भरुन प्रकरणात त्यांचे म्हणणे मांडले.
सदर प्रकरणात गैरअर्जदार नं. 1 व 2 यांना नोटीसेस मिळुनही ते प्रकरणात हजर झाले नाही अथवा त्यांनी कोणताही जबाब दाखल केला नाही यावरुन त्यांना तक्रारदाराने केलेल्या तक्रारीबाबत काहीही म्हणावयाचे नाही असे गृहीत धरण्यात येते. गैरअर्जदार नं. 3 याने त्यांचे लेखी जबाबानुसार व लेखी युक्तीवादानुसार गैरअर्जदार नं. 3 याला विनाकारण प्रकरणात समाविष्ट करण्यात आले, तो गैरअर्जदार नं. 1 यांचा प्रतिनिधी नाही, त्याचेवर कोणतीही जबाबादारी निश्चित होत नाही असे त्याचे म्हणणे आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, व गैरअर्जदार नं. 3 यांनी प्रकरणात दाखल केलेले लेखी जबाब यानुसार खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
१) प्रतिपक्षाने तक्रारदाराना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ः- तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, तक्रारदार नं. 1 भगवान ज-हाड यांची मौजे काटखेडा, ता. अंबड जि. जालना येथील गट नं. 59 मध्ये 2 हे 51 आर शेतजमीन तर तक्रारदार नं. 2 यांची त्याच गटात 2.00 आर शेतजमीन आहे. तक्रारदार नं. 3 यांची गट नं. 54 मध्ये 1.हे 70 आर अशी शेतजमीन आहे. तक्रारदार यांनी सामुहिक शेततळयाकरीता गैरअर्जदार नं. 1 याचेकडुन मौजे काटखेडा, येथील गट नं. 59 मधील वरील शेतजमीनीत HOPE GEO-MEMBRANE 500 MICRON FOR WATER FPOOF LINING IS NO 15351 ही प्लॅस्टीकची पन्नी शेततळयाकरीता बसविली. त्यांची किंमत 157311/- रुपये होती, ही बाब त्यांनी दाखल केलेल्या दिनांक 08/01/2014 च्या बीलांवरुन दिसुन येते. तक्रारदाराचे उपरोक्त शेतातील गैरअर्जदार नं. 1 याने केलेल्या अस्तरीकरणाचा खर्च 36,737/- रुपये झालेला आहे ही बाब तक्रारदारांने दाखल केलेल्या दि. 10/01/2014 च्या बीलावरुन दिसुन येते. उपरोक्त प्लॅस्टीकच्या पन्नीची वॉरंटी 5 वर्षाची आहे, ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या गैरअर्जदार नं. 1 यांच्या दि. 07/11/2009 च्या वॉरंटी पत्रावरुन स्पष्ट होते. तक्रारदार याने सदर पन्नी शेततळयाकरीता बसविल्यावर ती जागोजागी फाटल्याबाबत सदर प्रकरणामध्ये तालुका कृषी अधिकारी अंबड जि. जालना यांचा पंचनामा प्रकरणात दाखल आहे. सदर प्रकरणामध्ये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांनी प्रकल्प व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे यांना तक्रारदारास पन्नी बदलुन देण्याबाबतचे दि. 26/5/15 रोजीचे शिफारसपत्र दाखल आहे.
प्रकरणासोबत जोडलेल्या दस्तांवरुन असे दिसुन येते की, गैरअर्जदार नं. 1 तक्रारदाराचे शेतात HOPE GEO-MEMBRANE 500 MICRON FOR WATER FPOOF LINING IS NO 15351 ही प्लॅस्टीकची पन्नी शेततळयाकरीता बसविली,त्याची वॉरंटी 5 वर्षाची आहे, ती 1 वर्षाचे आत जागोजागी फाटली व त्यातुन पाणी वाहुन गेले. तक्रारदारांनी ज्या उद्देशाने शेततळयाकरीता पन्नी घेतली तो उद्देश गैरअर्जदार नं. 1 यांनी चुकीची सेवा दिल्यामुळे सफल झाला नाही. त्यामुळे तक्रारदाराने सदर पन्नीचे अस्तरीकरणाचा खर्चसुध्दा वाया गेलेला आहे. तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांना नोटीसेस पाठवूनसुध्दा त्यांनी तक्रारदारास सदर पन्नी बदलुन दिलेली नाही. गैरअर्जदार नं. 3 हा गैरअर्जदार नं. 1 यांचा अधिकृत प्रतिनिधी असल्याची बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाही. त्यामुळे गैरअर्जदार नं. 3 वर कोणतीही जबाबादारी निश्चित होत नाही. तक्रारदार याने त्याच्या तक्रार अर्जामध्ये पिक नुकसान भरपाईची मागणी केली आहे, तक्रारदाराने या प्रकरणात जिल्हा कृषी अधिकारी व इतर यांचे जे पंचनामे दखल केले त्यामध्ये मोसंबी पिकाचा कोठेही उल्लेख् नाही.सदर नुकसान किती झाले व कसे झाले या बाबत कोणताही ठोस पुरावा तक्रारदार मंचामध्ये दाखल करु शकला नाही. तक्रारदाराने इतर कास्तकाराचे शपथपत्र दाखल केले त्यावर विसंबुन राहता येणार नाही.
प्रकरणात तक्रारदार व गैरअर्जदार नं. 3 यांनी दाखल केलेले दस्तऐवज, शपथपत्र व लेखी युक्तीवादावरुन असे दिसुन येते की, गैरअर्जदार नं. 1 यांनी तक्रारदारास मौजे काटखेडा, ता. अंबड जि. जालना येथील गट नं. 59 मध्ये HOPE GEO-MEMBRANE 500 MICRON FOR WATER FPOOF LINING IS NO 15351 ही प्लॅस्टीकची पन्नी शेततळयाकरीता दिली ती सदोष व निकृष्ट दर्जाची होती त्यामुळे ती बदलुन देण्याची व त्याचे अस्तरीकरण करुन देण्याची जबाबदारी पुर्णपणे गैरअर्जदार नं. 1 यांची आहे, परंतु गैरअर्जदार नं.1 यांनी ती जबाबदारी त्यांनी पार न पाडुन ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(जी नुसार )ग्राहकास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहे. म्हणुन मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देऊन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार नं.1 यांनी तक्रारदार नं. 1 याचे मौजे काटखेडा, ता. अंबड जि. जालना येथील गट यास नं. 59 मध्ये HOPE GEO-MEMBRANE 500 MICRON FOR WATER FPOOF LINING IS NO 15351 ही नवीन प्लॅस्टीकची पन्नी द्यावी व त्याचे अस्तरीकरणाचा खर्च गैरअर्जदार नं. 1 यांनी द्यावा.
- गैरअर्जदार नं. 1 यांनी सदर प्लॅस्टीकची पन्नी बदलुन दिल्या तारखेपासुन त्या पन्नीकरिता 5 वर्षाची वॉरंटी द्यावी.
- गैरअर्जदार नं. 1 यांनी तक्रारदार नं. 1 यास मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईचे रु.3,000/- व प्रकरणाचा खर्च रु.1500/- द्यावा.
- वरील आदेशाचे पालन आदेश दिनांकापासून 45 दिवसाचे आत करण्यात यावे.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना