निकाल
(घोषित दि. 29.06.2016 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराने गैरअर्जदार सुपर सीडस कंपनीकडून चवळीच्या शेंगाचे बियाणे घेतले होते. बियाणे दोषयुक्त असल्यामुळे त्यास फुले व शेंगा लागल्या नाहीत. गैरअर्जदार यांनी दोषयुक्त बियाणे विकल्यामुळे अर्जदाराने नुकसान भरपाईसाठी ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत गैरअर्जदाराविरुध्द तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे.
अर्जदार यांची मौजे सिंधी पिंपळगाव ता.बदनापूर येथे गट क्र.62 मध्ये .78 आर. शेतजमीन आहे. अर्जदाराने दि.05.06.2014 रोजी सुपर सीडस कंपनीचे चवळी प्रिया नावाची (लॉट नं.पी.आर. 33)250 ग्रॅमची चार पाकीटे गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून विकत घेतली. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांच्या मार्गदर्शनानुसार चवळीच्या बियाणाची लागवड केली व ठिबक सिंचन पध्दतीने पाणी दिले व गैरअर्जदार क्र.1 यांच्या मार्गदर्शनानुसार खताची मात्रा दिली व किटकनाशकाची फवारणी केली. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार जूनच्या दुस-या आठवडयात लागवड केल्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवडयात ही फुले व शेंगा आल्या नाहीत. चवळीच्या शेंगास साधारणतः दिड महिन्यात फुले येऊन शेंगाच्या उत्पादनास सुरुवात होते परंतू सदरील बियाणास शेंगा न आल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे तक्रार केली, वारंवार तक्रार करुनही गैरअर्जदार क्र.2 यांनी दखल घेतली नाही. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ही त्यांनी तक्रार केली आहे. कृषी अधिका-याने पिकाची पाहणी करुन पंचनामा केला, अर्जदाराने सदरील पंचनाम्याची प्रत गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे दिली परंतू गैरअर्जदार क्र.1 यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून गेरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दोषयुक्त बियाणे विकल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून रु.4,25,000/- ची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत 7/12 चा उतारा, बियाणाची पावती, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केलेली तक्रार, पंचनामा, फोटो कॉपी, राज कृषी सेवा यांच्याकडून घेतलेल्या मालाच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र.1 यांनी लेखी जबाब दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा बियाणे, किटकनाशक व खते विक्रीचा व्यवसाय आहे. चवळी प्रिया या वाणाचे बियाणे ते 7/8 वर्षापासून विकत आहे व त्याबददल आजपर्यंत कोणाचीही तक्रार आलेली नाही. गैरअर्जदार यांनी त्यांच्याकडून बियाणे विकत घेतल्याचे त्यांना मान्य आहे. अर्जदार यांनी दाखल केलेला पंचनामा अधिकृत नाही व या पंचनाम्यासंबंधी त्यांना अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही व ते हजरही नव्हते. सदरील तक्रार खोटी असून ती खारीज करण्याची विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांनी चवळी प्रिया वाण एस.एम.दरक यांच्याकडून घेतल्याची पावती मंचात दाखल केली आहे.
गैरअर्जदार क्र.2 यांनी दाखल केलेल्या जबाबानुसार अर्जदाराची तक्रार खोटी व चुकीची आहे. अर्जदाराने दाखल केलेला पंचनामा खोटा आहे. महाराष्ट्र शासनाच्या बियाणे तक्रार निवारण समितीकडे तक्रार देणे आवश्यक होते. कृषी अधिका-याने पंचनामा करताना सीडस सर्टिफिकेशन ऑफीसर, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, अधिकृत वितरक, विक्रेता, कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांच्या समक्ष पंचनामा करुन त्यांच्या स्वाक्ष-या असणे आवश्यक होते. अर्जदाराने दाखल केलेला पंचनामा कायदेशीर नाही. पीक चांगले येण्यासाठी पोषक वातावरण, पिकातील अंतर, पीक लावणी/पेरणीची योग्य वेळ, खतांची योग्य मात्रा, योग्य किटकनाशक, अंतर मशागत, तापमान, सुर्यप्रकाश या सर्व बाबी महत्वाच्या असतात. त्यांची कंपनी नामांकित असून आजपर्यंत अशी तक्रार आलेली नाही. अर्जदाराची तक्रार खोटी असून ती नामंजूर करण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदाराने मे.एस.एम.दरक अॅंड सन्स यांना प्रतिवादी करण्यासाठी अर्ज दाखल केला, मंचाने तो मान्य केला व मे.एस.एम.दरक अॅंड सन्स यांना गैरअर्जदार क्र.3 करण्यात आले. गैरअर्जदार क्र.3 यांनी लेखी पत्र दाखल केले असून त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सुपर अॅग्रो सीडस प्रा.लि. हैद्राबाद या कंपनीचे बियाणे (बिल नंबर Veg/Feb-063/14) 28 Feb 2014 रोजी खरेदी केले व त्याची विक्री केली. बियाणे कंपनी पॅकींगमध्ये येते व त्याची तशीच विक्री केली जाते त्यात काहीही बदल करता येत नाही. सदरील तक्रारीची जबाबदारी कंपनीची आहे त्याबददल त्यांची कोणतीही जबाबदारी नाही.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की,
1) अर्जदार श्रीमंत उत्तमराव जिगे हे शेतकरी असून त्यांची सिंधी पिंपळगाव ता.बदनापूर येथे गट क्र.62 मध्ये 78 आर इतकी शेतजमीन आहे. अर्जदाराने 7/12 चा उतारा मंचामध्ये दाखल केला आहे.
2) अर्जदाराने दि.05.06.2014 रोजी सुपर सीडस कंपनीचे, चवळी प्रिया जातीचे बियाणे गैरअर्जदार क्र.2 गौरी कृपा कृषी उद्योग केंद्र, यांच्याकडू विकत घेतल्याचे मंचामध्ये दाखल केलेल्या पावतीवरुन दिसून येते व गैरअर्जदार यांनाही ते मान्य आहे.
3) अर्जदाराच्या म्हणण्यानुसार चवळीच्या बियाणाची लागवड करुन त्याचे रोप झाल्यानंतर त्याची पुन्हा लागवड केली व ठिबक सिंचनाद्वारे त्यास पाणी दिले परंतू दिड महिना होऊनही त्यास फूले व शेंगा आल्या नाहीत. त्याबददल अर्जदाराने कृषी अधिका-यास दिलेली तक्रार व दि.10.10.2014 रोजी केलेल्या पंचनाम्याची प्रत दाखल केली आहे. या पत्राचे निरीक्षण केले असता त्यामध्ये चवळीच्या पिकाची शाकीय (Vegetative) वाढ झाली असून वेल जास्त लांबीची आल्यामुळे त्यास फुले व शेंगा आल्या नसल्याचे म्हटले असून शेतक-यांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यावर श्रीमंत जिगे, नंदू गायकवाड, अर्जुन जिगे, राजेंद्र गायकवाड व कृषी अधिका-यांची सही आहे. वास्तविक कृषी अधिका-यास तक्रार केली असता त्यांनी बियाणे तक्रार निवारण समिती मार्फत स्थळपाहणी करुन त्याचा अहवाल व निष्कर्ष देणे आवश्यक आहे. या स्थळ पाहणीमध्ये जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी, अधिकृत विक्रेता या सगळया समक्ष पाहणी करुन त्याचा अहवाल देणे आवश्यक आहे, तसा अहवाल मंचात दाखल केलेला नाही. या अहवालामध्ये लागवडीची पध्दत, खताची मात्रा, मशागत, पाणी, हवामान इत्यादी पूर्ण माहिती दिली जाते व नंतर निष्कर्ष दिला जातो. सदरील अहवाल उपलब्ध नसल्यामुळे पिकांचे नुकसान किती झाले व कशामुळे झाले याचा पुरावा नाही. अर्जदाराने कृषी अधिका-यांची साक्ष मंचामध्ये घेतली असली तरी त्यामध्ये केवळ पंचनामा केला असून तो खरा असल्याचे म्हटले आहे, पाहणी समितीच्या अहवालाबाबत उल्लेख केलेला नाही.
4) अर्जदाराने दाखल केलेला पंचनामा दि.10.10.2014 रोजीचा आहे. अर्जदाराने स्वतः म्हटले आहे की, पेरणी नंतर दिड महिन्यात शेंगा लागण्यास सुरुवात होते, अर्जदाराने जून महिन्यात पेरणी केल्याचे म्हटले आहे. पंचनामा किती दिवसात करावयास हवा याबददल देखील कालमर्यादा आहेत. सदरील पंचनामा 4 महिन्यानंतर केलेला आहे.
5) अर्जदाराने शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासासाठी नुकसान भरपाई म्हणून रु.4,25,000/- ची मागणी केली आहे परंतू त्याचे योग्य ते विश्लेषण दाखल केलेले नाही. अर्जदाराने दाखल केलेली खताची व किटकनाशकांची बिले ही चवळीसाठीच वापरल्याचा पुरावा नाही. अर्जदाराच्या 7/12 वर डाळींबाचा पीक पेरा आहे. अर्जदाराने कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार भावही दिलेला नाही.
वरील सर्व निरीक्षणावरुन सबळ पुराव्याअभावी मंच सदरील तक्रार खारीज करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
श्री. सुहास एम.आळशी श्रीमती रेखा कापडिया श्री. के.एन.तुंगार
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना