(घोषित दि. 30.03.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून, त्यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. वीज वापर नसताना गैरअर्जदार यांनी त्यांना सरासरीवर अधारीत वीज बिलाची आकारणी केली. याच चुकीच्या वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे काद्राबाद, जालना येथे घर असून, त्यांनी गैरअर्जदार यांचेकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. सदरील घराची दुरुस्ती सुरु असल्यामुळे अर्जदार तेथे राहत नाहीत. फेब्रूवारी 2012 पर्यंत गैरअर्जदार यांनी आकारलेल्या वीज बिलाचा भरणा त्यांनी केला आहे. गैरअर्जदार यांनी आकारलेली वीज बिले मीटर रिडींग प्रमाणे नसून सरासरीवर अधारीत असल्यामुळे त्यांनी दिनांक 05.03.2012 रोजी तसेच 08.10.2012 व 29.10.2012 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे अर्ज देऊन सुधारीत वीज बिल देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून गैरअर्जदार यांनी वीज पुरवठा खंडीत न करण्याची तसेच सुधारीत वीज बिल देण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत वीज बिल, गैरअर्जदार यांच्याकडे केलेल्या तक्रारीची प्रत इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
चुकीच्या वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत न करण्याबाबत अंतरीम आदेश देण्याचा अर्ज देखील अर्जदाराने तक्रारी सोबत दाखल केला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या तर्फे संयुक्तपणे दाखल करण्यात आलेल्या जवाबानुसार अर्जदाराचे घर बंद असून ते वीजेचा वापर करीत नसल्याचे म्हणणे त्यांना मान्य नाही. अर्जदाराच्या मीटरची रिडींग उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना सरासरीवर आधारीत वीज बिल देण्यात येत होते पण नंतरच्या वीज बिलात रिडींग उपलब्ध झाल्यानंतर त्यांना वीज बिल कमी करुन देण्यात आले आहे. वीज बिलचा भरणा टाळण्यासाठी अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत अर्जदाराचे सी.पी.एल. दाखल केले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या तर्फे दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 310030019545 असा आहे. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबासोबत अर्जदाराचे 12 जानेवारी ते 12 डिसेंबर या कालावधीचे सी.पी.एल. दाखल केले आहे. या सी.पी.एल चे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, 12 जानेवारी ते 12 जुलै या कालावधीत अर्जदाराकडे 01787589 या क्रमांकाचे मीटर बसविण्यात आले होते. हे मीटर ऑगस्ट 2012 मध्ये बदलण्यात आले व त्याजागी 00133314 या कमांकाचे मीटर बसविण्यात आलेले दिसून येते. गैरअर्जदार यांनी मीटर बदली अहवाल तसेच तक्रार दाखल केल्यानंतर स्थळ पाहणी अहवाल मंचात दाखल केलेला नाही. 12 मार्च ते 12 जुलै (जुने मीटर) तसेच 12 ऑगस्ट ते 12 डिसेंबर व पुढील काळात मीटरचे रिडींग घेण्यात आलेले नसल्यामुळे अर्जदारास सरासरीवर आधारीत वीज बिल देण्यात आल्याचे सी.पी.एल. वरुन स्पष्टपणे दिसून येते.
अर्जदाराने दिनांक 08.10.2012 तसेच 29.10.2012 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे लेखी तक्रार करुन मीटर वरील रिडींग प्रमाणे बिल देण्याची विनंती केली आहे. अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केल्यानंतर देखील गैरअर्जदार यांनी मीटरची स्थळ पाहणी केलेली दिसून येत नाही. यावरुन गैरअर्जदार यांचा निष्काळजीपणा व सेवेतील त्रुटी स्पष्टपणे दिसून येते. गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात अर्जदाराचे घर बंद असून ते वीज वापर करीत नसल्याचे त्यांना मान्य नसल्याचे म्हटले आहे. परंतू याबाबत कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही.
वरील सर्व निरीक्षणावरुन तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदार हे वीज वापरत असल्याबाबतचा कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नसल्यामुळे मंच अर्जदाराची तक्रार मान्य करीत आहे. अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
आदेश
1. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेली 12 जानेवारी नंतरची सर्व वीज बिले रद्द करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास वरील काळात फक्त स्थिर आकाराचे बिल आकारावे व अर्जदारास 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.