(निकालपत्र अध्यक्षा, श्रीमती. नीलीमा संत, यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तुत तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये सामनेवाल्याने सेवेत कमतरता केली म्हणून दाखल केली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, तो सामनेवाला यांचा ग्राहक आहे.
त्यांचा ग्राहक क्र. 110018175151 असा आहे. तक्रारदारांनी त्यांची वरील जागा सन 2003 मध्ये डॉ.पराग चौधरी यांना भाडयाने दिली होती. दि.01/06/2003 रोजी डॉ.चौधरी यांनी तक्रारदारास वरील जागा रिकामी करुन दिली. त्यांनी जुन 2003 पर्यंत वीज देयक देखील भरले पंरतु सामनेवाला यांनी वरील जागा रिकामी झाल्यावर देखील डोअर लॉक असे म्हणुन रु.12,844/- मीटर वाचन दाखविले व रु. 5,660/- चे विदयुत देयक तक्रारदारांना दिले तक्रारदारांनी याबाबत सामनेवाला यांच्याकडे लेखी तक्रार दिली पंरतु त्याची कोणतीही दखल सामनेवाला यांनी घेतली नाही वरील जागेचा वापर दि.01/06/2003 पासून झालेला नाही.
03. सामनेवाला यांनी दि. 22/12/2005 मध्ये तक्रारदारांचे मीटर जमा करुन घेतले त्यावेळी त्यावरील वाचन 13032 असे होते. त्याच्यानंतर आता मीटर नसल्यामुळे तक्रारदारांना वीज बिल पाठविण्याचा सामनेवाला यांना हक्क उरला नाही असे असतांना सामनेवाला यांनी दि.22/03/12 रोजी पुन्हा तक्रारदारांना रक्कम रु. 1,60,950/- एवढे वीज बिल पाठविले त्यात चालु महिन्याचे वीज बिल देखील दिले आहे. तक्रारदारांकडे वीज मिटर नसतांना देखील सामनेवाला तक्रारदारांकडे रक्कमेची मागणी करीत आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस देखील पाठविली पंरतु त्याची सामनेवाला यांनी दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीअंतर्गत त्यांनी दि.01/06/2003 ते दि.27/12/2005 चे वीज बिल व त्या अनुषंगाने आलेले दि. 22/03/2012 चे वीज बिल दुरुस्त करुन मागितले आहे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी व तक्रारखर्च रु. 25,000/- मिळावा अशी विनंती मंचाकडे केली आहे.
04. सामनेवाल्यांनी आपला खुलासा नि. 9 वर दाखल करुन प्रस्तुत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, तक्रारदारांचा अर्ज हा मुदत बाहय आहे. कारण तक्रारदार सन 2003 ते 2005 या काळातील विदयुत देयके दुरुस्त करुन मागत आहे. तसेच तक्रारदारांनी प्रस्तुत वीज पुरवठा व्यावसायिक प्रयोजनासाठी घेतलेला होता त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2 (1) डी अंतर्गत ते ग्राहक या संज्ञेत बसत नाही. डॉ. चौधरी यांनी दि. 01/06/2003 रोजी तक्रारदारांची जागा खाली करुन दिली आहे. याबाबत कोणताही पुरावा मंचात नाही सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या वीज बिलात योग्य वेळी योग्य ती दुरुस्ती करुन दिलेली आहे व त्यांना नेहमीच विदयुत वापरानुसार देयके दिली आहे. त्यामुळे तक्रारदारांचा तक्रार अर्ज नांमजूर करण्यात यावा अशी प्रार्थना सामनेवाला यांनी मंचाकडे केलेली आहे.
05. उपलब्ध कागदपत्रे व सामनेवालांच्या वकीलांचा युक्तीवाद यावरुन मंचाने खालील मुदे विचारात घेतले.
06. तक्रारदार व त्यांचे वकील सातत्याने मंचासमोर गैरहजर आहेत. प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्यात आले.
07. निष्कर्षासाठींचे मुद्दे व त्यावरील मंचाचे निष्कर्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार यांची तक्रार मुदतीत आहे काय ? नाही
2. तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ? नाही
3. आदेशाबाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
08. तक्रारदारांच्या तक्रारीत म्हणतात की, सामनेवाला यांनी त्यांना दिलेले दि.01/06/2003 पासून दि.27/12/2005 पर्यंतचे विदयुत देयक दुरुस्त करुन मिळावे व त्या अनुषंगाने दिलेले दि.22/03/12 चे विदयुत देयक रदद करण्यात यावे म्हणजेच तक्रारदारांची मुळ तक्रार दि.01/06/2003 ते दि.27/12/2005 या देयकांबाबतची आहे. सामनेवाला यांनी दि.22/12/2005 मध्येच तक्रारदारांचे वीज मीटर काढुन घेतलेले आहे. असे असतांना तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार सन 2012 साली मंचात दाखल केली आहे. ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 24 अ नुसार ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यास दोन वर्षाचा अवधी देण्यात आला आहे व तक्रारदारांची तक्रार तक्रारीस कारण घडलयापासून दोन वर्षाच्या आत केली तरच मंचाला ती तक्रार गुणवत्तेवर चालविण्याचा अधिकार आहे. प्रस्तुत तक्रार तक्रारीस कारण घडल्यापासुन सुमारे 7 वर्ष उशिराने दाखल केलेली असल्यामुळे तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे. यास्तव मुदा क्र. 2 चे उत्तर मंच नकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 बाबतः
09. तक्रारदारांनी तक्रारीत त्यांची वरील जागा डॉ. पराग चौधरी यांना दवाखाना चालविण्यासाठी भाडयाने दिल्याचे नमूद केले आहे. तक्रारदारांच्या विदयुत देयकांवर देखील प्रस्तुत वीज जोडणी व्यापारी हेतुने सामनेवाला यांच्याकडून घेतल्याचे नमूद केलेले दिसते. अशा परिस्थितीत ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 2 (1) (डी) नुसार तक्रारदार ग्राहक या संज्ञेत बसत नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र मंचाला नाही, असा निष्कर्ष मंच काढत आहे. यास्तव मुद्दा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही नकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3 बाबतः
10. मुद्दा क्र.1 व 2 च्या निष्कर्षा वरुन असे दिसते की, तक्रारदारांची तक्रार मुदत बाहय आहे. त्याचप्रमाणे वीज वापर हा व्यापारी हेतुने केला जात असल्यामुळे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदया नुसार ग्राहक या संज्ञेत बसत नाही म्हणुन तक्रारदारांची तक्रार नामंजुर करणे न्यायोचित ठरेल असे मंचाला वाटते, यास्तव आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. उभयपक्षकारांनी ज्याचा त्याचा खर्च सोसावा.
4. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगाव
दिनांक – 24/12/2014
(श्रीमती. कविता जगपती) (श्रीमती. नीलिमा संत)
सदस्या अध्यक्षा