(घोषित दि. 09.02.2015 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार वीज कंपनीचे ग्राहक आहेत. गैरअर्जदार यांनी दिलेल्या वाढीव व सरासरी वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल न घेतली गेल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी दिलेल्या वीज बिलाचा भरणा ते नियमितपणे करतात. गैरअर्जदार यांनी अर्जदारास एप्रिल महिन्याचे 2549 युनिट वीज वापराचे 28,970/- रुपयाचे बिल आकारले. सदरील बिल चुकीचे असल्याबद्दल अर्जदाराने अनेक वेळेस तक्रार केली व त्याप्रमाणे मीटर बदलून देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे व गैरअर्जदार यांनी आकारलेले 28,970/- रुपयाचे वीज बिल रद्द करण्याची व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत वीज बिलाच्या प्रती, गैरअर्जदार यांना केलेल्या तक्रारीची प्रत मंचात दाखल केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित केलेला वीज पुरवठा पुनरजोडणी करुन देण्याबाबत अंतरिम अर्ज दाखल केला आहे. अर्जदाराच्या सदरील अर्जावर दिनांक 01.09.2014 रोजी सुनावणी घेण्यात आली व अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे 5,000/- रुपये भरल्यास वीज पुरवठा पुनरजोडणी करुन द्यावा व वादग्रस्त वीज बिल वगळता इतर वीज बिल नियमितपणे भरण्याचा अंतरिम आदेश पारित करण्यात आला.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदार हे त्यांचे ग्राहक असल्याचे त्यांना मान्य आहे. अर्जदारास आकारलेले वीज बिल हे त्यांच्या वीज वापराप्रमाणे असून ते योग्य असल्याचे गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात म्हटले आहे. अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत अर्जदाराचे नोव्हेंबर 2013 ते जून 2014 या कालावधीचे सी.पी.एल जोडले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे व त्यांच्या ग्राहक क्रमांक 514010120741 असा आहे. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या सी.पी.एल वरुन असे दिसुन येते की, अर्जदारास दिनांक 10.10.2013 रोजी वीज पुरवठा देण्यात आला असुन त्यांच्या मीटरचा क्रमांक 58/02224115 असा आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास नोव्हेंबर 2013 ते फेब्रूवारी 2014 या तीन महिन्यात वीज वापरासाठीची नोंद न घेता चालू रिडींग व मागील रिडींग 1 दर्शवून 100 युनिट वापराची बिल आकारणी केली आहे.
मार्च 2014 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास मागील रिडींग 101 व चालू रिडींग 2650 दर्शवून 2549 युनिट वीज वापराचे 28,970/- रुपयाचे वीज बिल आकारले. या वीज बिलाबाबत अर्जदाराची मूळ तक्रार आहे.
एप्रिल 2014 मध्ये पुन्हा रिडींग न घेता मागील व चालू रिडींग 2650 दर्शवून सरासरीवर आधारीत 530 युनिट वीज वापराचे बिल देण्यात आले जे चुकीचे असल्याचे मंचाचे मत आहे. मे 2014 मध्ये अर्जदाराचे मीटर (क्रमांक 58/02224115) बदलून त्या जागी नवीन मीटर (क्रमांक 98/01843007) बसविण्यात आले व त्यावरील नोंदी प्रमाणे वीज बिल अर्जदारास देण्यात येत असल्याचे दिसुन येते.
अर्जदाराने दिनांक 14.03.2014 रोजी देण्यात आलेल्या 2549 युनिट वीज वापराबद्दलची तक्रार गैरअर्जदार यांच्याकडे केलेली दिसुन येते. परंतु गैरअर्जदार यांनी त्याची कोणतीही दखल घेतलेली दिसुन येत नाही. सदरील मीटर (क्रमांक 58/02224115) मे 2014 मध्ये बदलण्यात आले. परंतु त्याचा मीटर बदली अहवाल तसेच वादग्रस्त मीटरचा चाचणी अहवाल मंचात दाखल केलेला नाही. त्याच प्रमाणे फेब्रूवारी 2014 व मार्च 2014 या दोन महिन्यात देण्यात आलेल्या वीज बिलाची नोंद सी.पी.एल मध्ये घेण्यात आलेली नाही. अर्जदारास ऑक्टोबर 2013 मध्ये वीज पुरवठा केल्यानंतर फेब्रूवारी 2014 पर्यंत त्याच्या वीज मीटरचे वाचन न करता त्यांना सरासरीवर आधारीत वीज बिलाची आकारणी करण्यात आलेली दिसुन येते. वरील सर्व बाबीवरुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेल्या सेवेत त्रुटी असल्याचे स्पष्टपणे दिसुन येते.
मे 2014 मध्ये गैरअर्जदार यांनी जुने मीटर बदलून त्या जागी नवीन मिटर बसविले आहे. मे 2014 ते नोव्हेंबर 2014 या सात महिन्याच्या कालावधीत अर्जदाराचा एकुण वीज वापर 167 युनिट म्हणजेच 24 युनिट प्रतिमाह असल्याचे दिसुन येते. ऑक्टोबर 2013 ते एप्रिल 2014 या कालावधीत मीटरचे नियमित वाचन झालेले नाही. त्याच प्रमाणे मार्च 2014 मध्ये 3649 युनिट बिल आकारताना मीटर वरील फोटो/मीटर निरीक्षण अहवाल/मीटर तपासणी अहवाल इत्यादी पुरावा मंचात दाखल केलेला नसल्यामुळे हे रिडींग ग्राहय मानता येत नाही. अर्जदारास मे 2014 ते नोव्हेंबर 2014 या कालावधीत वापरलेल्या सरासरीवर आधारीत 24 युनिट प्रमाणे ऑक्टोबर 2013 ते एप्रिल 2014 या कालावधीत वीज बिलाची आकारणी करणे योग्य राहील असे मंचाचे मत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास ऑक्टोबर 2013 ते एप्रिल 2014 या कालावधीत दिलेली वीज बिले रद्द करण्यात येत आहेत.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास मे 2014 ते नोव्हेंबर 2014 या कालावधीत वीज वापराच्या सरासरीवर आधारीत 24 युनिट प्रतिमाह या प्रमाणे आकारणीकरुन अर्जदारास 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चा बद्दल रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) 30 दिवसात द्यावे.