(घोषित दि. 07.07.2014 व्दारा श्रीमती. माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडून ग्राहक क्रमांक 510030019545 अन्वये विद्युत पुरवठा घेतला असून ते नियमितपणे विद्युत देयकांचा भरणा करतात. तक्रारदारांचे सदर घर जुने झाल्यामुळे व त्याची दुरुस्ती करावयाची असल्यामुळे मागील दोन वर्षा पासून बंद आहे. तक्रारदारांनी ब-याच वर्षापूर्वी घरातील मीटर बाहेरच्या बाजूला लावले आहे त्यामुळे रिडींग घेणे सहजपणे शक्य होते.
तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे तक्रारदारांनी यापूर्वी मा.मंचामध्ये तक्रार क्रमांक 131/2012 सरासरी 100 युनिट प्रमाणे बील येत असल्यामुळे दाखल केली होती. सदर तक्रारीच्या निकाला नुसार मा. मंचाने सरसरीची विद्युत देयके रद्द केली होती.
तक्रारदाराचे मीटर जून 2013 मध्ये बदलले असून जुलै 2013 पासून पुन्हा 100 युनिट वापराचे सरासरी देयक गैरअर्जदार यांनी दिले आहे. सदर देयकावर (R.N.A) मीटर रिडींग उपलब्ध नसल्याचे नमूद केले आहे. तक्रारदाराचे सदर घर बंद असल्यामुळे 100 युनिट वापराचे विद्युत देयक चुकीचे आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
तक्रारदारांनी जुलै 2013 चे विद्युत देयक दुरुस्त करण्याबाबत दिनांक 28.08.2013 रोजी गैरअर्जदार यांचेकडे अर्जाव्दारे विनंती केली. परंतू गैरअर्जदार यांनी जुलै 2013 पासून सप्टेबर 2013 पर्यंतची देयके सरासरी युनिटची व चुकीची दिली आहेत.
गैरअर्जदार यांचे लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांना कोणतेही जास्त रकमेचे वीज देयक देण्यात आले नाहीत, चुकीची व्याजाची रक्कम आकारली नाही. तक्रारदारांनी वापर केलेल्या विजे नुसारच विद्युत देयके दिली आहेत.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विव्दान वकील श्री.विपुल देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार यांचे विव्दान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकला.
गैरअर्जदार यांनी सदर प्रकरणात तक्रारदारांचे विद्युत पुरवठया बाबतचे सी.पी.एल (Consumer Personal Ledger) दाखल केले आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना जुलै 2013 ते सप्टेबर 2013 पर्यंतचे बील सरसरी 100 युनिटचे विद्युत देयक दिल्याचे स्पष्ट होते. त्यानंतरची विद्युत देयके मीटर रिडींग प्रमाणे घेतली असता फक्त 15, 19, 21 अशा युनिटची दिल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारदारांचे घर बंद असल्यामुळे विजेचा वापर कमी होत असूनही गैरअर्जदार यांनी 100 युनिटची आकारणी जास्तीची केल्याचे स्पष्ट होते.
परंतू गैरअर्जदार यांनी जुलै 2013 मध्ये रुपये 388.79 चे व ऑक्टोबर 2013 रुपये 790.21 एवढया रकमेचे क्रेडीट तक्रारदारांच्या बिलात केल्याचे दिसून येते. त्याच प्रमाणे नोव्हेंबर 2013 मध्ये व्याजाची आकरणी रुपये 184.14 कमी केल्याचे सी.पी.एल वरुन दिसून येते.
वरील परिस्थितीत गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना सरासरी आकारणी केलेल्या विद्युत देयकाची दुरुस्ती करुन विजेच्या वापरानुसार देयकाची रक्कम आकारली आहे. त्यामुळे तक्रारदारांना सदर तक्रार करण्यास कोणतेही कारण राहीले नाही असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.