निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 28/08/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 28/08/2012
तक्रार निकाल दिनांकः- 12 /08/2013
कालावधी 11 महिने. 15 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
शेख आय्युब पिता शेख अमीर. अर्जदार
वय 55 वर्षे. धंदा.निरंक. अड.ए.एम.राउत.
रा.हिदायत नगर,जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 विभागीय व्यवस्थापक, गैरअर्जदार.
न्यु इंडीया अशुरन्स कं.लि. अड.जी.एच.दोडीया.
विभागीय कार्यालय,क्रं, 153400 सावरकर भवन,
शिवाजी नगर,कॉंग्रेस हाऊस रोड,पुणे 422005.
2 विभागीय व्यवस्थापक,
डेक्कन इन्शुरन्स अँड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
हारकडे भवन भानुदास नगर, बिग बाजाराच्या पाठीमागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद 431003.
3 तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी कार्यालय,जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी.
4 शाखा व्यवस्थापक,
न्यु इंडीया अशुरन्स कं.लि.
अड शर्मा यांचा वरचा मजला, नानलपेठ, परभणी 431401.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा नाकारुन सेवेत ञुटी दिल्या बद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा अपघातग्रस्त शेतकरी असून तो हिदायत नगर जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी आहे.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, शासनातर्फे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्यासाठी विमा सल्लागार म्हणून डेक्कन इन्शुरन्स अँड रिइन्शुरन्स ब्रोकर्स, प्रा.लि.कंपनीची नेमणुक करुन सन 2010-2011 साठी करण्यात आली होती. अर्जदाराच्या नावे मौजे पुंगळा, तलाठी सज्जा अंबरवाडी,ता.जिंतूर जि.परभणी येथे शेत गट क्रमांक 112 (3 ) मध्ये क्षेञ 1 हेक्टर 61 आर शेत जमीन आहे.याबद्दलची नोंद 7/12 8-अ, 6-ड प्रमाणपञा मध्ये नोंद आलेली आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 14/09/2010 रोजी अपघातग्रस्त शेतकरी अर्जदार हा परभणी येथे ईद निमित्त नातेवाईकांला भेटण्यासाठी आला व नाते वाईकांची भेट घेवुन परत जिंतूरला ऑटो मध्ये बसून जात असतांना राञी 8 वाजण्याच्या सुमारास पांगरी पाटी जवळ ऑटो चालक भरधाव वेगात ऑटो चालवत असतांना ऑटो वरील ताबा सुटल्याने ऑटो पलटी झाला व त्यामुळे अर्जदार यांस जोरात मार लागल्यामुळे खाली पडला व त्याच्या डोक्याला, पायाला मार लागुन डावा पाय चिरला व तो गंभीर जखमी झाला व त्याच्या सोबत सदर अपघातात मिञ देखील जखमी झाले. सदर घटने नंतर अर्जदारास तात्काळ ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे प्रथामोपचार करुन सामान्य रुग्णालय परभणी येथे अडमिट केले तेथे आठ – दहा दिवस राहून नंतर शेठ नंदलाल धुत हॉस्पीटल औरंगाबाद येथे गेले असता डॉक्टरांनी उपचार करुन ऑपरेशन केले व डावा पाय कंबरे पासून खाली पुर्णत: निकामी झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. त्याचा डावा पाय कंबरे पासून खाली तुटल्यामुळे अर्जदारास कायमचे अपंगत्व आले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने शेतकरी जनता अपघात विमा योजनेसाठी संपूर्ण कागदपञासंह दिनांक 27/07/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे विमा दावा दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 3 ने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्याकडे पाठविला.व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी क्लेम प्रस्ताव सादर केला, सदर प्रस्ताव दाखल केल्यानंतर अर्जदाराने चौकशी करण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे गेला असता त्यांनी असे सांगीतले की, तुम्हाला सदरचा विम्याचा लाभ मिळू शकत नाही, तुमचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. नामंजूर करण्याचे कारण अर्जदाराचे वय 75 पेक्षा जास्त असल्याने त्यास विमा दावा मंजूर करता येत नाही, म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या लाभा पासून वंचित ठेवले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा अशिक्षीत व अडाणी आहे त्यास लिहिता वाचता येत नाही, व अर्जदाराचे वय देखील सामान्य रुग्णालय परभणी यांनी अंपगत्वाचे प्रमाणपत्रा वर 55 वर्षे असल्याचे नमुद केले आहे. तसेच समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद परभणी यांनी सुध्दा अर्जदाराचे वय 55 असल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे. अर्जदाराने मतदानाच्या ओळखपञा मध्ये छापून आलेले चुकीचे वय दुरुस्त करुन देण्याबाबत निवडणुक विभाग तहसिल कार्यालय जिंतूर यांना तोंडी विनंती केली होती, परंतु अद्याप त्यांनी मतदानाच्या ओळखपञा मध्ये चुकीचे वय दुरुस्त करुन दिलेले नाही.
शेतकरी अपघात विमा योजनेची अंमल बजावणी तालुका कृषी अधिकारी, व डेक्कन इन्शुरन्स विमा कंपनी अशा असल्यामुळे अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे नेहमी संपर्क साधलेला आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने क्लेम 27/07/2011 रोजी दाखल केलेला आहे. आज पर्यंत गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी क्लेम मंजूर केलेला नाही, तसेच अर्जदारास शेतकरी जनता योजने अंतर्गत मिळणारी रक्कम आजपर्यंत दिलेली नाही,म्हणून सदरची तक्रार गैरअर्जदारां विरुध्द अर्जदाराने दाखल केलेली आहे, म्हणून अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना असा आदेश करावा की, अर्जदाराला 50,000/- रुपये किंवा 1,00.000/- रुपये अपघात तारखे पासून पूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 15 टक्के व्याजदरासह शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द्यावेत.व तसेच गैरअर्जदारांना असा आदेश व्हावा की, मानसिकञासापोटी अर्जदारास 25,000/- रुपये द्यावेत, व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रुपये 5,000/- देण्याचा हुकूम व्हावा.अशी विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपञ दाखल केलेले आहे, व नि.क्रमांक 5 वर 16 कागदपञांच्या यादीसह 16 कागदपञे दाखल केलेली आहेत. ज्या मध्ये 5/1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नामंजूर केल्याची यादी, 5/2 वर क्लेमफॉर्म कॉपी 1, 5/3 वर 7/12 उतारा, 5/4 वर होल्डींग प्रमाणपञ, 5/5 वर 8 अ चा उतारा, 5/6 वर अधिकार अभिलेख यांचे प्रमाणपञ, 5/7 वर तलाठ्याचे प्रमाणपञ, 5/8 वर अर्जदाराचे शपथपञ, 5/9 वर अर्जदाराचे ओळखपत्र, 5/10 वर सिव्हील हॉस्पीटल परभणी यांनी अर्जदारास दिलेले डिसअबीलीटी प्रमाणपत्र, 5/11 वर ओळखपत्र, 5/12 वर फिर्यादीची नक्कल, 5/13 वर एफ.आय.आर.ची कॉपी, 5/14 शेठ नंदलाल धुद हॉस्पीटलचे डिस्चार्ज कार्ड, 5/15 वर इन्जुरी सर्टीफिकेट, 5/16 वर अभ्युदय कॉ-ऑप.बँक लि.चे पासबुक, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारांना त्याचे लेखी जबाब दाखल करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 16 वर आपला लेखी जबाब सादर केला त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे व त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार कंपनीचा ग्राहक नाही. त्यामुळे सदरची तक्रार मंचास चालवण्याचा काही एक अधिकार नाही व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने विमा कंपनीकडे 1/- रुपया देखील हप्त्याच्या स्वरुपात पैशे भरलेले नाही, त्यामुळे तो सदरच्या कंपनीचा ग्राहक होवु शकत नाही व त्यांचे असे म्हणणे आहे की, ट्रायपार्टी अग्रीमेंट प्रमाणे शेतक-याला सदरच्या विमा कंपनी विरुध्द तक्रार दाखल करता येत नाही व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने कोणत्याही प्रकारे अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली नाही, त्यामुळे सदरची तक्रार ही चालवणे योग्य नाही व कायद्याच्या विरुध्द आहे व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरचा अर्जदार हा 75 वर्षांचे वर आहे व सदरचे वय हे शासनाने अर्जदाराच्या हक्का मध्ये दिलेले वोटर आय.डी.प्रुफ मध्ये असे लिहिलेले आहे की, सनवर्ष 2006 मध्ये अर्जदाराचे वय 63 वर्ष होते त्यामुळे 11/04/2012 रोजी अर्जदाराचे वय 79 असल्यामुळे विमा कंपनीने 75 वर्षांच्या वर वय असल्या कारणाने अर्जदाराचा विमादावा नाकारला आहे व ते योग्यच केले आहे. म्हणून या कारणावर अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांनी लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 17 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 8 वर आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व त्यात अर्जदारास गैरअर्जदाराने कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही.सदरची गैरअर्जदार ही फक्त विमा प्रस्ताव स्वीकारुन विमा कंपनीकडे तो दाखल करते एवढेच त्यांचे रोल आहे. म्हणून गैरअर्जदाराच्या विमा प्रस्ताव नाकारण्यात आमाचा काही एक संबंध नाही, म्हणून सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी,अशी मंचास विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी नि.क्रमांक 9 वर आपले शपथत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांस मंचाची नोटीस तामिल होवुन मंचासमोर गैरहजर त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियती वरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांनी अर्जदाराचा विमादावा
नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होता ही बाब नि.क्रमांक 5/1 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते तसेच अर्जदार हा मौजे पुंगळा तलाठी सज्जा अंबरवाडी,ता.जिंतूर जि.परभणी येथील गट क्रमांक 112 (3) मधील 1 हेक्टर 61 आर जमिनीचा मालक आहे ही बाब नि.क्रमांक 5/3 वरील 7/12 वरुन सिध्द होते.अर्जदाराचा दिनांक 14/09/2010 रोजी पांगरी पाटी जवळ ऑटो पलटी होवुन अपघात झाला होता ही बाब नि.क्रमांक 5/12 वरील फिर्याद व तसेच 5/13 वरील एफ.आय.आर.वरुन सिध्द होते तसेच सदरच्या अपघाता मध्ये अर्जदाराचा डावा पाय निकामी झाला व सदरचे प्रमाणपत्र 85 टक्के डिसब्लीटी ही बाब 5/10 वरील सिव्हील हॉस्पीटल परभणी यांनी दिलेले प्रमाणपत्रा वरुन सिध्द होते तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदरच्या अपघात विमा दावा दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 5/2 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते व अर्जदाराचा अपघात विमादावा गैरअर्जदार विमा कंपनी क्रमांक 1 ने अर्जदाराचा विमादावा नाकारला ही बाब नि.क्रमांक 5/1 व 13/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते सदरच्या अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराचे वय 75 वर्षां पेक्षा जास्त असल्यामुळे देता येवु शकत नाही हे कारण दाखवुन अर्जदाराचा विमा दावा फेटाळला.नि.क्रमांक 13/5 वरील दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रत मध्ये डेफिनेशन अंतर्गत 4 क्लॉज मध्ये पाहिले असता सदरची पॉलिसी ही 10 वर्ष ते 75 वर्ष वया पर्यंतच लागु असल्याचे पॉलिसी मध्ये उल्लेख केलेले आहे.व अर्जदाराचे वय हे नि.क्रमांक 5/9 वरील एडेंटीटीकार्ड( इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया) यांनी जारी केलेले 01/01/1994 रोजी अर्जदाराचे वय 63 होते हे सिध्द होते याचाच अर्थ सन 2010 मध्ये अर्जदार हा 75 वर्षे पेक्षा जास्त होते हे सदरील कागदपत्रांवरुन सिध्द होते तसेच अर्जदाराने त्याचे वय कमी आहे याबाबत कोणताही कायदेशिर विश्वासार्ह ठोस पुरावा / वया बाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र मंचासमोर आणला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा 75 वर्षां पेक्षा वय जास्त असे कारण दाखवुन विमा देण्याचे नाकारले हे योग्यच आहे.अर्जदारास गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिली नाही,असे मंचास वाटते, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष