(घोषित दि. 21.08.2014 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून त्यांनी नियमितपणे वीज बिल भरले आहे. गैरअर्जदार यांनी दुस-या मीटरची थकबाकी वीज बिलामध्ये समाविष्ट केली व याबाबत केलेल्या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी परतूर येथे घरगुती वापरासाठी गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे सध्या त्यांच्याकडे दोन वीज मीटर असून ते त्याचे नियमितपणे वीज बिल भरत असतात. 1991 साली त्यांच्याकडे असलेले जुने मीटर (ग्राहक क्रमांक 524010022052) त्यांनी कायम स्वरुपी बंद करण्याबाबत गैरअर्जदार यांना कळविले होते व त्या ग्राहक क्रमांकावर असलेली वीज बिलाची रक्कम देखील भरली होती. गैरअर्जदार यांनी ऑगस्ट 2012 मध्ये देण्यात आलेल्या वीज बिलात 1991 साली कायम स्वरुपी बंद केलेल्या वीज बिलाची थकबाकी दाखविली. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार ही थकबाकी चुकीची आहे. याबाबत केलेल्या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून सदरील वीज बिल रद्द करण्याबाबत आदेश देण्याची विनंती मंचास केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार यांच्या सोबत झालेला पत्रव्यवहार, वीज बिलाच्या प्रती जोडल्या आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने दिनांक 24.08.1991 रोजी शिवाजी नगर, मोंढा परतूर या ठिकाणी व्यवसायासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 524010022061 असा आहे. अर्जदारास या ग्राहक क्रमांकवर देण्यात आलेले वीज बिल हे त्यांच्या वापरानुसार असून ते योग्य असल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. अर्जदाराने याच जागेवर दुसरा वीज पुरवठा घेतला असून त्याचा ग्राहक क्रमांक 524010022052 असा आहे. या ग्राहक क्रमांकावर देण्यात आलेल्या वीज बिलाचा भरणा केलेला नसल्यामुळे तो कायम स्वरुपी बंद करण्यात आला. या ग्राहक क्रमांकवर 21109 = 51 + 3221 = 47 अशी रक्कम येणे बाकी असल्यामुळे त्यांनी ही थकबाकी रक्कम अर्जदारास देण्यात येणा-या (ग्राहक क्रमांक 524010022061) वीज बिलात समाविष्ट केली जी विद्युत नियामक आयोगाच्या विनीयम 2005 नुसार आहे. अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती गैरअर्जदार यांनी केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की, अर्जदार हे परतूर येथील निवासी असून त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी दिनांक 24.08.1991 रोजी दोन मीटरव्दारे वीज पुरवठा दिलेला होता. ज्याचा ग्राहक क्रमांक अनुक्रमे 5240100220061 व 524010022052 असा असल्याचे दिसून येते.
अर्जदाराने तक्रारी सोबत मार्च 1997 ते जून 1997 या कालावधीची दोनही ग्राहक क्रमांकावर देण्यात आलेली वीज बिलांचे निरीक्षण केले असता या दोनही ग्राहक क्रमांकावरुन घरगुती वापरासाठी वीज पुरवठा दिलेला दिसून येतो. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही त्यामुळे अर्जदाराने व्यवसायासाठी वीज पुरवठा घेतला आहे हे गैरअर्जदार यांचे म्हणणे मान्य करता येत नाही.
अर्जदारास देण्यात आलेल्या दोन ग्राहक क्रमांका पैकी ग्राहक क्रमांक 524010022061 यावर सप्टेबर 2013 पर्यंत वीज बिल आकारणी चालू असून ग्राहक क्रमांक 524010022052 यावर नोंद घेतली जात नसून वीज बिल आकारणी केली जात नसल्याचे CPL वरुन स्पष्ट होते. अर्जदाराची तक्रार ग्राहक क्रमांक 524010022052 या वरील थकबाकी बाबत असून सदरील थकबाकीची रक्कम गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या नावे असलेल्या ग्राहक क्रमांक 524010022061 या वीज बिलात समाविष्ट केलेली असल्यामुळे दाखल केलेली आहे.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या नावे असलेल्या दोनही ग्राहक क्रमांकाच्या CPL चे अवलोकन केल्यावर अर्जदाराकडे बसविण्यात आलेल्या मीटरचा क्रमांक 90/00400773 असा असल्याचे दिसून येते. जूलै 2012 पर्यंत अर्जदाराकडे थकबाकी रक्कम 2960.88 अशी असून ऑगस्ट 2012 मध्ये देण्यात आलेल्या वीज बिलात समायोजित रक्कम (adjustment) 24330/- रुपये दाखविण्यात आलेली असून गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडे एकुण 27083.52 रकमेची मागणी केलेली दिसून येते. अर्जदाराने या वीज बिलाबाबत आक्षेप घेत गैरअर्जदार यांच्याशी पत्रव्यवहार केलेला दिसून येतो. अर्जदाराने वीज बिलाची रक्कम न भरल्यामुळे ऑक्टोबर 2013 मध्ये त्यांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद करण्यात आल्याची नोंद CPL मध्ये दिसून येते.
गैरअर्जदार यांनी ग्राहक क्रमांक 524010022052 याचे डिसेंबर 2008 ते मे 2012 पर्यंतचे CPL मंचात दाखल केलेले आहे. या CPL चे निरीक्षण केल्यावर अर्जदाराचा वीज पुरवठा जून 2009 पर्यंत चालू असल्याचे CPL मध्ये घेतलेल्या वीज मीटरच्या नोंदी वरुन स्पष्ट होते. जुलै 2009 मध्ये या ग्राहक क्रमांक वरील वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आल्याची नोंद CPL मध्ये दिसून येते. जून 2009 पर्यंत अर्जदाराकडे 24330 = 98 रुपये थकबाकी असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी या ग्राहक क्रमांकाचा वीज पुरवठा खंडित करताना अर्जदारास वीज कायद्यातील तरतुदी प्रमाणे नोटीस दिली नसल्याचे दिसून येते.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडे असलेली (ग्राहक क्रमांक 524010022052) थकबाकीची रक्कम तीन वर्षाच्या कालावधीनंतर अर्जदाराच्या नावे असलेल्या दुस-या मीटर वरील (ग्राहक क्रमाक 524010022061) वीज बिलामध्ये समाविष्ट करताना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या अटी विनियम 2005 याचा संदर्भ घेतला. सदरील वीज नियामक आयोगाचा विनियम (10.5) हा नावात बदल किंवा हस्तांतरण या बाबीशी संबंधित आहे. त्यामुळे तो या प्रकरणामध्ये लागू होत नाही.
वीज कायद्यातील कलम 56/2 थकबाकी व वीज पुरवठा खंडित करण्याशी संबंधित आहे. जे खालील प्रमाणे आहे.
“Not withstanding anything contained in any other law for the time being inforce, no same due from any Consumer, under the section, shall be recoverable after the period of two years from the date when such sum became first due unless such sum has been shown continuously as recoverable as arrears of charges for electricity supplied and the licencee shall not cut off the supply of electricity.
वीज कायद्यातील या तरतुदीनुसार अर्जदाराकडे जून 2009 मध्ये असलेल्या थकबाकी बाबत गैरअर्जदार यांनी वसूली दावा दाखल करणे अपेक्षित होते किंवा ही थकबाकी रक्कम दोन वर्षाच्या आत अर्जदाराच्या नावे असलेल्या दुस-या वीज बिलात मागणी करणे अपेक्षित होते. गैरअर्जदार यांना झालेल्या नुकसानीस ते स्वत:च जवाबदार असल्याचे दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
- गैरअर्जदार यांनी ग्राहक क्रमांक 524010022061 मधी दर्शविलेली समायोजित रक्कम रुपये 24330.98 रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी 24330.98 रुपये वजा करुन अर्जदारास 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
- खर्चा बद्दल आदेश नाही.