(घोषित दि. 21.10.2014 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
अर्जदार पंचफुलाबाई संजय सोनवणे रा.पिंपळगाव थोटे ता.भोकरदन जि.जालना येथील रहिवासी असून शेती व घरकाम करुन आपली व कुटूंबाची उपजीविका चालवितात. अर्जदाराचे पती संजय माणिकराव सोनवणे यांचा दिनांक 12.11.2012 रोजी प्रवासा दरम्यान अपघाती मृत्यू झाला आहे. सदर घटनेची नोंद भोकरदन पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू क्रमांक 59/2012 मध्ये करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी एम.एल.सी, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, तपास टिपन, अकस्मात मृत्यूच्या अखेरच्या रिपोर्ट बाबत कार्यवाही केली. अर्जदार हिचे पती संजय माणिकराव सोनवणे हे शेतकरी असल्याने त्यांनी शासनाचा शेतकरी अपघात विमा काढला होता. अर्जदार हिचे पती मयत झाल्या नंतर अर्जदार हिने प्रतिवादी यांचेकडे रितसर सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन अर्ज दाखल केला आहे. सदर अर्ज गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे पाठविला आहे. सदर अर्ज गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडे दाखल झाला नाही. दोन महिन्याच्या आत त्यांनी सदर अर्जावर कार्यवाही करणे बंधकारक आहे. परंतू दिनांक 12.04.2013 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी शासनाच्या निष्कर्षा नुसार शेतक-यांचा मृत्यू हा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावा ग्राह्रय होवू शकत होता. दावेदाराने सादर केलेल्या कागदपत्रा नुसार शेतक-याचा मृत्यू हा ह्दयविकाराने झाल्याचे निष्पन्न होते. सबब कंपनी सदरचा दावा ग्राह्य धरु शकत नाही असे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदार यांना कळविले आहे. तसेच दिनांक 03.02.2014 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांना कंपनीकडून दावा नामंजूर केल्याचे कळविल्यामुळे अपघाता बद्दल काही कागदपत्र असल्यास अथवा अपघात झाल्या नंतर ह्दयविकार आला असल्यास तसे डॉक्टराचे प्रमाणपत्र आणण्या बाबत अर्जदाराला सुचविले. या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी ह्दयविकार या शब्दावर विसंबून राहून अर्जदार हिचा दावा फेटाळलेला आहे. तसेच शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या संक्षिप्त माहितीपत्रकात विम्यात समाविष्ट नसलेल्या अपघाती मृत्यू ह्दयविकार (Heart Attack) बाबत कोठेही उल्लेख नाही अथवा पोस्ट मार्टम रिपोर्ट मध्ये, प्रमाणपत्र अथवा पोलीस तपासातील दस्तऐवजावर नैसर्गिक मृत्यू असा उल्लेख नाही. अर्जदार हिच्या म्हणण्या नुसार दिनांक 12.11.2012 रोजी सायंकाळी 05.00 वाजेच्या सुमारास अर्जदाराचे पती संजय व त्यांचे नातेवाईक वडोद बाजार ते भोकरदन येथे टेम्पो मध्ये बसून प्रवास करीत असतांना मृत्यूची घटना घडली. त्यांना भोकरदन येथे सरकारी दवाखान्यात दाखल केले गेले व तपासाअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर दिनांक 12.11.2012 रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याचा क्रमांक 59/12 असून मृत्यूचा दिनांक 12.11.2012 रोजी वेळ 17.30 अशी दर्शविण्यात आली आहे. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करण्यात आला त्याचा दिनांक 13.12.2012 रोजी सकाळी 06.30 ते 07.00 पर्यंत असे दर्शविण्यात आले आहे. मरणोत्तर पंचनामा करण्यात आला. मयताच्या नातेवाईकांनी दिनांक 19.11.2012 रोजी मृत्यू प्रमाणपत्र हस्तगत केले. त्यामध्ये मृत्यूचे कारण लिहण्यात आलेले नव्हते. दिनांक 26.11.2012 रोजी भोकरदन पोलीसांनी मयताच्या नातेवाईकांकडे चौकशी करुन तपास टिपण नोंदविले व दिनांक 08.12.2012 रोजी सरकारी दवाखाना भोकरदन यांनी पी.एम. नोट्स तयार केल्या, त्यानंतर अकस्मात मृत्यूचा अंतिम अहवाल क्रमांक 04/2013 दिनांक 03.03.2013 रोजी तयार करण्यात आला. त्यामध्ये मृत्यूची वेळ 17.30 दर्शविण्यात आली आहे.
यावरुन अर्जदाराचे पती यांचा मृत्यू प्रवासा दरम्यान झालेला असून, ज्याला ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू असे संबोधण्यात आले. म्हणून अर्जदाराच्या पतीचा मृत्यू नैसर्गिक नसून अपघाती झालेला आहे असे निदर्शनास येते. त्यामुळे अर्जदार हिच्या पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अपघाती असल्यामुळे तिला शेतकरी विमा अपघाताची रक्कम रुपये 1,00,000/- ही गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी विमा दावा फेटाळल्या तारखे पासून 12 टक्के द.सा.द.शे. व्याज दराने देण्यात यावी. तसेच शारिरीक व मानसिक त्रासा पोटी रुपये 10,000/-, पर्यायी व्यवस्थेपोटी रुपये 10,000/- व तक्रार अर्ज खर्च रुपये 5,000/- अशी मागणी केलेली आहे.
या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना नोटीस काढली. त्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी प्रकरणात त्यांचे म्हणणे दाखल केले. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 विरुध्द Ex Party आदेश करण्यात आले.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता विद्यमान मंचाच्या विचारार्थ खालील मुद्दे येतात.
मुद्दे निष्कर्ष
1.गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमिमांसा
अर्जदार हिच्या दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, अर्जदार हिच्या पतीचा मृत्यू दिनांक 12.11.2012 रोजी प्रवासाच्या दरम्यान अॅटोरिक्षा मध्ये झालेला आहे. त्यानंतर अर्जदार हिने गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडे व त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिनांक 13.03.2013 रोजी अर्जदार हिचा अर्ज गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे दाखल केला. परंतू विमा कंपनीने “अर्जदार हिच्या पतीचा मृत्यू हा अपघाती नसून ह्दयविकाराच्या झटक्याने झाला असे निष्पन्न झाले, त्यामुळे सदरचा दावा कंपनी ग्राह्य धरु शकत नाही” असे पत्र अर्जदार हिला दिनांक 12.04.2013 रोजी पाठविले. त्या बाबतचे दस्त नि.3/1 वर दाखल आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या माहितीपत्रकाचे अवलोकन केले असता ज्या अपघता-बाबत शासना-मार्फत विमा काढला जातो त्यामध्ये ह्दयविकार हया आजाराचा समावेश नाही व शेतक-याला नैसर्गिक मृत्यू आला असल्यास विम्याची रक्कम दिली जात नाही. थोडक्यात जर अपघात झाला तरच अथवा शासना मार्फत माहिती पत्रकात दिलेल्या कारणामुळे शेतक-याचा मृत्यू झाला तरच विमा दावा देण्यात येतो. त्यामुळे ह्दयविकार हा नैसर्गिक मृत्यू असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदार हिचा विमा दावा फेटाळल्याचे दिसते.
अर्जदार हिने तिच्या अर्जात परिच्छेद क्रमांक 12 मध्ये अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दिनांक 12.11.2012 रोजी झाला व त्या बाबत क्रमांक 59/12 नुसार नोंद करण्यात आली. त्याच प्रमाणे पोलीसांनी सदर घटनेचा पंचनामा दिनांक 13.11.2012 रोजी केला असल्याचे म्हटले आहे व त्यांची वेळ 06.30 ते 07.00 दर्शविण्यात आल्याचे दिसते. सदर दस्त निशाणी क्रमांक 3/7 वर आहे. त्याचे अवलोकन केले असता त्यातील कलम 11 मधील दिनांक 13.11.2012 ही तारीख प्रथमदर्शनी Over writing चा प्रकार वाटत आहे.
त्याच प्रमाणे अर्जदार हिचे दुसरे म्हणणे निशाणी क्रमांक 3/11 वरील जिल्हा शल्य चिकीत्सक रिपोर्ट बाबत आहे. या बाबत मंचाने सदर दस्ताचे अवलोकन केले असता दिनांक 08.12.2012 ही तारीख Post mortem झाल्याची कळविली आहे. ती तारीख Post mortem झाल्याची नसून Post mortem Report ज्या दिवशी निर्गमीत करण्यात आला त्या दिवशीची आहे. तसेच सदर दस्तातील कलम 4 मध्ये मृत्यूची तारीख ही 12.11.2012 ही असून सदर मृत्यू 05.00 वाजता झाल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे या बाबीला फारशे महत्व नाही. यात अर्जदाराच्या पतीचा मृत्यू अपघाती झाला अथवा नाही एवढाच मूळ मुद्दा आहे. अर्जदाराने निशाणी क्रमांक 03/11 वर जे दस्त दाखल केले आहे त्यामध्ये अर्जदाराच्या पतीचा मृत्यू “The Probable cause of death is the cardiorespi ratosy arrest due to myocardical infarction”. मुळे झालेला आहे म्हणजेच अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा ह्दयामध्ये बिघाड झाल्याने झालेला असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या Post mortem Report वरुन दिसुन येते व छातीमध्ये आपोआप बिघाड होवून मृत्यू होणे ही बाब अपघाती नसून नैसर्गिक आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच निशाणी क्रमांक 3/12 वरील समधान साबळे, अमोल सोनवणे (मुलगा), बाजीराव राऊत, ज्ञानेश्वर सोनवणे व स्वत: अर्जदार, आप्पासाहेब सोनवणे (मुलगा) यांनी दिलेल्या तपासणी टिपणाचे अवलोकन केले असता, अर्जदाराच्या पतीला यापुर्वीही ह्दयविकाराचा झटका येऊन गेलेला होता असे दिसते. तसेच निशाणी क्रमांक 3/14 वर अर्जदार व तिची दोन मुले नामे आप्पासाहेब व अमोल यांनी दिनांक 11.07.2014 रोजी नोटरी समक्ष जे सम्मतीपत्रक केले आहे त्यामध्ये सुध्दा अर्जदाराचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाला आहे असे स्पष्ट नमुद केले आहे. त्यामुळे अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा ह्दयविकाराने म्हणजेच नैसर्गिक रितीने झाल्याने व तो अपघात नसून नैसर्गिक मृत्यूच आहे. म्हणून अर्जदारास सदरचा विमा दावा रक्कम मिळू शकणार नाही व गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवून विद्यमान मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.