निकाल
(घोषित दि. 21.07.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार हा मासेगाव तालुका घनसावंगी येथील रहिवाशी आहे. त्याची पत्नी चंद्रकलाबाई हिचा मृत्यू दि.15.11.2005 रोजी सर्पदंशाने झाला. घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये सदर मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी नियमानुसार आवश्यक ते सोपस्कार करुन मयताचे प्रेत तक्रारदार यांच्याकडे अंत्यसंस्काराकरीता दिले. मृत्यूच्या वेळेस तक्रारदाराची पत्नी चंद्रकलाबाई ही शेतकरी होती. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांसाठी सार्वजनीक कल्याणकारी योजना सुरु केली त्याचे नाव शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना असे आहे. तक्रारदाराची पत्नी मयत असून चंद्रकलाबाई ही सदर योजनेअंतर्गत लाभधारक आहे. तिच्या मृत्यूनंतर तक्रारदार पतीने तहसिलदार घनसावंगी यांच्यामार्फत गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे दि.12.12.2005 रोजी विमा दावा दाखल केला. मयत स्त्री शेतकरी असल्याबाबत गट क्र.214 चा 7/12, 8अ, 6क, तलाठी प्रमाणपत्र, तहसिलदाराचे प्रमाणपत्र, व फेरफारची नक्कल सादर केलेली आहे. सदर विमादावा विहीत मुदतीच्या आत सादर करण्यात आला परंतू कबाल ब्रोकिंग अॅण्ड सर्विसेस कंपनीच्या यादी नुसार सदर दावा गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे योग्य तो निर्णय घेण्याकरता प्रलंबित आहे, सदर दाव्याची नोंद कबाल ब्रोकिंग इन्शुरन्स कंपनीच्या यादीतील अनुक्रमांक 175 वर आहे. सदर विमा पॉलीसीचा कालावधी दि.10 एप्रिल 2005 ते 09 एप्रिल 2006 असा आहे. विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे मिळाल्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय एक महिन्यात घेणे विमा कंपनीवर बंधनकारक आहे, त्याप्रमाणे विमा कंपनीने कारवाई केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी हा तक्रार अर्ज ग्राहक मंचासमोर दाखल केला आहे. तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा अर्ज मागणीप्रमाणे मंजूर करावा.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत जोडलेल्या यादीप्रमाणे आवश्यक कागदपत्राच्या नकला सादर केलेल्या आहेत. त्यामध्ये कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्विसेस यांनी बनविलेल्या प्रलंबित विमा प्रस्तावांच्या यादीची नक्कल आहे. तसेच संबंधित तलाठी यांनी तहसिलदार घनसावंगी यांना दि. 12.12.2005 रोजी पाठविलेल्या पत्राची नक्कल, भाग 2 मधील तलाठयाचे प्रमाणपत्र, भाग 3 मधील तहसिलदाराचे प्रमाणपत्र, प्रपत्र - म ची नक्कल, बॅंकेच्या पासबुकचा उतारा, एकूण जमिनीचा दाखला, पोलीस पाटलाने दिलेले प्रमाणपत्र, मृत्यूचे महानगर पालिकेने दिलेले प्रमाणपत्र, नमुना 6क ची नक्कल, पोलीस तपासात बनविलेल्या कागदपत्राच्या नकला, इत्यादी कागदपत्र दाखल आहेत.
गैरअर्जदार क्र.1 हजर झाले त्यांनी लेखी जबाब दाखल केला त्यांनी तक्रारदार यांनी केलेले सर्व कथन फेटाळलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांच्या म्हणण्याप्रमाणे मृतक ही मृत्यूच्या वेळेस शेतकरी होती हे दाखविण्याची संपूर्ण जबाबदारी तक्रारदार यांच्यावर आहे, त्याबाबत ठोस कागदोपत्री पुरावा दाखल करणे आवश्यक होते. तक्रारदाराचा तक्रार अर्ज मुदतबाहय दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी योग्य रितीने व पध्दतशीरपणे त्यांचा विमा प्रस्ताव दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांच्यावर विमा रक्कम देण्याची जबाबदारी राहात नाही. आवश्यक ती कागदपत्रे विमा प्रस्तावासोबत जोडणे जरुरी होते परंतू त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे दाखल करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेली आहे.
गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीसची बजावणी झाली परंतू त्यांनी मिळालेल्या नोटीस वरुन प्रकरण कोणत्या संदर्भात आहे याचा बोध होत नाही. तरी त्या बाबत माहिती दिल्यास योग्य तो लेखी जबाब देता येईल असे कळविले, परंतू त्यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांच्या तर्फे कोणीही हजर न झाल्यामुळे प्रकरण गैरअर्जदार क्र.2 यांच्या विरुध्द लेखी जबाबा शिवाय चालविण्याचा आज आदेश केला.
गैरअर्जदार क्र.3 यांना पाठविलेली नोटीस न बजावता परत आली. त्यानंतर तक्रारदार यांनी गेरअर्जदार क्र.3 यांच्या विरुध्द परत नोटीस काढण्याकरता उचित कार्यवाही केली नाही त्यामुळे गैरअर्जदार क्र.3 यांच्या विरुध्दचे प्रकरण आज खारीज करण्यात आले.
आम्ही तक्रारदाराचा तक्रार अर्ज व गैरअर्जदार क्र.1 यांच्या लेखी जबाबाचे काळजीपूर्वक वाचन केले, ग्राहक मंचासमोर दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे काळजीपूर्वक परिक्षण केले, तसेच दोन्ही बाजुच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकला. त्यावरुन मंचाचे असे मत झाले आहे की, तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल आहे. मयत चंद्रकलाबाई हिचा मृत्यू दि.15.11.2005 रोजी झाला. त्या नंतर विमा रक्कम मागणीचा प्रस्ताव संबंधित तलाठयामार्फत दि.12.12.2005 रोजी दाखल केल्याचे दिसून येते. त्या संदर्भातील एका पत्राची झेरॉक्स प्रत तक्रारदार यांनी अवलोकनार्थ दाखल केली आहे. या मुद्यावर कबाल इन्शुरन्स कंपनी यांनी प्रलंबित विमा दाव्यांच्या यादीची नक्कल बनविली आहे, सदर यादीची झेरॉक्स प्रत तक्रारदार यांनी ग्राहक मंचाच्या अवलोकनार्थ दाखल केलेली आहे. सदर यादीमध्ये अनुक्रमांक 175 वर मयत चंद्रकलाबाई हीचे नाव दिसून येत आहे. तिचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याबददल उल्लेख आहे, सदर नक्कल दि.14.01.2014 रोजी कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्विसेस यांनी जारी केल्याचे दिसून येते. याचाच अर्थ, तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव विहीत मुदतीच्या आत संबंधित तहसिल कार्यालयात दाखल असून त्यानंतर तो कबाल इन्शुरन्स अॅंड ब्रोकिंग सर्विसेस यांच्याकडे पाठवल्याचे दिसून येते. परंतू त्या नंतर सदर प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे पाठविला अथवा नाही या बददल ग्राहक मंचासमोर कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. आमच्या मताने तक्रारदार यांनी सदर प्रस्ताव संबंधित तहसिलदार यांच्याकडे मुदतीत सादर करणे अत्यावश्यक होते व ती गोष्ट तक्रारदार याने केलेली असल्यामुळे तक्रारदाराचा विमा प्रस्ताव मुदतबाहय आहे असे आता म्हणता येणार नाही.
कबाल इन्शुरन्स अॅण्ड ब्रोकिंग सर्विसेस यांनी बनविलेल्या यादीमध्ये एफ.आय.आर., पोस्टमार्टम नोटस, स्पॉट इन्क्वेस्ट पंचनामा आणि डेथ सर्टिफिकेट या कागदपत्रांची त्रुटी असल्याबददल लिहीलेले आहे. आज आमच्या समोर सदर विमा प्रस्तावाबाबत तक्रार दाखल असल्यामुळे आम्ही खरोखरच तक्रारदार यांनी विमा प्रस्तावासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे योग्य रितीने जोडलेली आहेत अथवा नाही. हे तपासणे जरुरीचे समजतो. आमच्या मताने तक्रारदार यांनी ग्राहक मंचासमोरील कागदपत्रात अनुक्रमांक 13 वर भाग 2 ची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे त्यावर तलाठयाची सही आहे पण सही खाली संबंधित तलाठयाचे नाव नाही व तारीख लिहीलेली नाही. त्यामुळे सदर कागद हा खरोखरच अस्सल आहे अथवा बनावट आहे हे समजण्यास मार्ग नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राच्या गठयात अनुक्रमांक 16 वर चंद्रकलाबाईच्या एकूण जमिनीच्या दाखल्याचा उतारा दाखल केला आहे परंतू सदर दाखल्यावर तो कोणत्या तारखेस सदर दाखला जारी केला हे समजून येत नाही. तसेच जारी करणा-या व्यक्तीचे नांव ही सही खाली लिहीले नाही. त्या नावाखाली पदाचा शिक्का पण नाही. चंद्रकलाबाई हिच्या नावाचा 7/12 चा उतारा दाखल केलेला नाही. त्यामुळे मृत्यूच्या वेळी चंद्रकलाबाई शेतकरी होती असा निष्कर्ष काढणे ग्राहक मंचास अवघड वाटते. सद्याच्या परिस्थितीत चंद्रकलाबाईचा मृत्यू होऊन अंदाजे 11 वर्षांचा कालावधी उलटला आहे त्यामुळे आम्ही अशा मता पर्यंत पोहोचलो आहोत की, आवश्यक त्या कागदपत्रांच्या वाचता येण्यासारख्या स्पष्ट व साक्षांकित केलेल्या नकला तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीस द्याव्यात. त्या नकला मिळाल्यानंतर 60 दिवसात विमा कंपनीने त्यावर नियमानुसार योग्य तो निर्णय घ्यावा.
वरील कारणास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे या आदेशापासून 60 दिवसाच्या आत तक्रारदार
यांनी विमा प्रस्तावासोबत आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्राच्या सुवाच्च
व साक्षांकित सत्यप्रती सादर कराव्यात. सदर कागदपत्रांचा संच मिळाल्यानंतर
नियमानुसार सर्व कागदपत्रांचा अभ्यास करुन विमा कंपनीने त्यावर 30
दिवसांचे आत उचित निर्णय घ्यावा.
श्री. सुहास एम.आळशी श्रीमती रेखा कापडिया श्री. के.एन.तुंगार
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना