निकाल
(घोषित दि. 10.04.2017 व्दारा श्रीमती एम.एम.चितलांगे, सदस्य)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे. तक्रारदार हा गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे दि.20.06.2012 पासून क्रेडीट रिलेशनशीप असोसिएट म्हणून कार्यरत होता. तक्रारदाराचा कोड नं.12918 असा आहे. गैरअर्जदार क्र.1 हा एचडीबी फायनान्सियल सर्व्हीस आहे. गैरअर्जदार क्र.2 ही विमा कंपनी आहे. गैरअर्जदार क्र.1 याने गेरअर्जदार क्र.2 कडून ग्रुप इन्शुरन्स पॉलीसी घेतली होती, सदर पॉलीसीचा कालावधी हा दि.14.02.2014 ते 13.02.2015 असा आहे. सदर पॉलीसीमध्ये तक्रारदार याचे नाव समाविष्ट आहे. तक्रारदाराने सदरील विमा पॉलीसीमध्ये स्वतःच्या पत्नीचे नाव समाविष्ट केले आहे. तक्रारदार व त्याच्या पत्नीचे नाव मेडीक्लेम यादीमध्ये अनुक्रमे नं.535 व 536 वर नमुद केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये सेवा पुरविणारे नाते असून तक्रारदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे.
तक्रारदार याचे पत्नीला मातृत्व या कारणासाठी एम.आय.टी.हॉस्पीटल औरंगाबाद येथे शरीक केले होते. त्यासाठी तक्रारदारास एकूण रु.1,22,760/- एवढा खर्च झाला होता. तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 यांच्यातर्फे गैरअर्जदार क्र. 2 कडे सदरील मेडीक्लेमसाठी विमा प्रस्ताव सादर केला होता. अद्याप पर्यंत गैरअर्जदार यांनी तक्रारदारास विमा रक्कम न देऊन तक्रारदाराचा विमा प्रस्ताव नाकारलेला आहे. तक्रारदार याने सप्टेंबर 2014 मध्ये गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे करत असलेल्या नोकरीचा राजीनामा दिला. तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन गैरअर्जदार क्र.2 यांच्या सेवेतील निष्काळजीपणा दिसून येतो. गैरअर्जदार क्र.2 याने तक्रारदाराचा विमा प्रस्ताव नाकारल्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. तदनंतर तक्रारदार याने विधिज्ञामार्फत गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस दिली. गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.04.02.2015 रोजी सदर नोटीसचे उत्तर देऊन सदरील विमा प्रस्ताव नाकारल्याबाबत कळविले होते. तक्रारदार याने पॉलीसीच्या शर्ती व अटींचा भंग केल्यामुळे तक्रारदाराचा विमा प्रस्ताव नाकारला आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी तांत्रीक कारणास्तव तक्रारदाराचा विमा प्रस्ताव नाकारुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून तक्रारदारास सदरील तक्रार दाखल करण्याचे कारण घडले. तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून रु.1,22,760/- व्याजासह मिळण्याची विनंती केली आहे. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.15,000/- मिळण्याची विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस बजावण्यात आली. नोटीस मिळूनही गैरअर्जदार क्र.1 हा मंचासमोर हजर झाला नाही. त्यामुळे सदरील प्रकरण गैरअर्जदार क्र.1 विरुध्द एकतर्फा चालविण्यात येते.
गैरअर्जदार क्र.2 यांनी आपले लेखी निवेदन नि.क्र.9 अन्वये दाखल केले. लेखी निवेदनासोबत नि.क्र.10 अन्वये धिरेंद्रकुमार बिनोद मिश्रा याचे शपथपत्र दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 याने तक्रारीतील संपूर्ण मजकुर हा स्पष्टपणे नाकारला आहे. गैरअर्जदार क्र.2 याचे कथन असे की, गैरअर्जदार क्र.1 याने विमा पॉलीसी घेतली होती त्याचा कालावधी दि.14.02.2014 ते 13.02.2015 असा होता. सदरील पॉलीसीमध्ये तक्रारदाराचे नाव समाविष्ट आहे. तक्रारदार याचा विवाह दि.05.01.2013 रोजी झाला. यावरुन असे दिसून येते की, तक्रारदाराचे लग्न सदर विमा पॉलीसीचा कालावधी सुरु होण्याआधी झाले होते. तक्रारदाराचा विवाह दि.05.01.2013 रोजी झाला असून तक्रारदार याने मे.2014 मध्ये त्याचे पत्नीचे नाव सदर विमा पॉलीसीमध्ये समाविष्ट करण्याची विनंती गैरअर्जदार क्र.1 यास केली. गैरअर्जदार क्र.2 याने तक्रारदाराची विनंती अमान्य केली होती, तरी सुध्दा गैरअर्जदार क्र.1 यांच्या वारंवार विनंतीवरुन गैरअर्जदार क्र.2 याने अपवादात्मक स्थितीत तक्रारदाराच्या पत्नीचे नाव विमा पॉलीसीमध्ये ऑगस्ट 2014 पासून समाविष्ट करण्याचे कबूल केले होते. म्हणून सदर पॉलीसी अंतर्गत असलेले सर्व अधिकार व जबाबदा-या ऑगस्ट 2014 नंतरच अंमलात येतात. तक्रारदाराने एप्रिल 2014 च्या मातृत्व उपचाराकरता विमा रकमेची मागणी केली असल्याचे दिसते. सदर कालावधी हा तक्रारदाराच्या पत्नीचे नाव पॉलीसीमध्ये समाविष्ट करण्याआधीचे आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचे पुढील कथन असे की, तक्रारदाराने विमा प्रस्ताव दाखल केला नाही. तसेच सदर विमा प्रस्तावाची कोणतीही प्रत दाखल केलेली नाही. गैरअर्जदार क्र.2 याने तक्रारदारास अद्याप पर्यंत विमा प्रस्ताव नाकारल्याची कळविले नाही. त्यामुळे तक्रारदारास गैरअर्जदार क्र.2 विरुध्द सदर तक्रार दाखल करण्यास काणतेही कारण घडलेले नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरुध्द खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याकामीचे शपथपत्र यांचे वाचन केले. तसेच गैरअर्जदार क्र.2 याचे लेखी जबाब व लेखी युक्तीवादाचे वाचन केले. तक्रारदार यांच्या वकीलाचा युक्तीवाद ऐकला. त्यावरुन न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? नाही.
2) तक्रारदार हा तक्रारीतील मागणी मिळण्यास पात्र
आहे काय ? अंतिम आदेशानुसार
कारणमीमांसा
मुददा क्र.1 व 2ः- आम्ही तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याकामीच्या शपथपत्राचे वाचन केले. गैरअर्जदार क्र.2 याने दाखल केलेल्या लेखी युक्तीवादाचे वाचन केले. त्यावरुन गैरअर्जदार क्र.2 यास गैरअर्जदार क्र.1 याने घेतलेली विमा पॉलीसी मान्य आहे. तसेच सदर पॉलीसीमध्ये तक्रारदाराचे नाव समाविष्ट आहे ही बाब सुध्दा मान्य आहे. तक्रारदार हा गैरअर्जदार क्र.1 कडे नोकरीस असताना त्यांनी गैरअर्जदार क्र.1 तर्फे ग्रुप इन्शुरन्स पॉलीसी घेतली होती, सदर पॉलीसीमध्ये तक्रारदाराचे नाव समाविष्ट होते. तक्रारदार याने दाखल केलेल्या विमा धारकांची नावे असलेल्या यादीचे अवलोकन केले असता, सदर यादीमध्ये तक्रारदाराचे नाव अनुक्रमांक 535 व तक्रारदाराच्या पत्नीचे नाव अनुक्रमांक 536 वर आहे. तक्रारदार याचे लग्न सदर पॉलीसीचा कालावधी सुरु होण्याआधी झालेले आहे. तक्रारदार याच्या पत्नीला मातृत्व उपचाराकरता एम.आय.टी.हॉस्पीटल येथे शरीक केले होते. त्याकरिता तक्रारदारास लागलेल्या खर्चाकामी तक्रारदार याने सदर पॉलीसी अंतर्गत गैरअर्जदाराकडे विमा प्रस्ताव दाखल केला होता. परंतू त्याबाबतचे कोणतेही कागदपत्र ग्राहक मंचासमोर दाखल केलेले नाहीत. तक्रारदाराने गैरअर्जदार याचेशी वेळोवेळी संपर्क करुन विमा प्रस्तावाबाबत विचाराणा केली असता गैरअर्जदार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून तक्रारदार याने विधिज्ञामार्फत गैरअर्जदार क्र.1 यास नोटीस दिली होती. गैरअर्जदार क्र.1 यांनी पाठवलेल्या नोटीसच्या उत्तराचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने सादर केलेला विमा प्रस्ताव हा गैरअर्जदार क्र.1 व गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडून अद्याप नामंजूर झाला नाही असे दिसून येते. गैरअर्जदार क्र.2 यांचे युक्तीवादाचे अवलोकन केले असता, तक्रारदाराचा विमा प्रस्ताव नाकारल्याबाबत कळविले नाही असे नमुद केले आहे. सदरील प्रकरणात तक्रारदाराचा विमा प्रस्ताव नाकारल्याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल नाही. यावरुन तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा गैरअर्जदार क्र.2 यांनी नामंजूर केला नाही असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदारास पॉलीसी अंतर्गत उपलब्ध असलेला लाभ पुर्णपणे घेता आला नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी विमा प्रस्ताव निकाली न काढल्यामुळे त्यांनी सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढणे उचित होणार नाही.
वरील सर्व कारणावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा गैरअर्जदार क्र.2 याचेकडे प्रलंबित आहे. म्हणून गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्तावावर योग्य कार्यवाही करुन निकाली काढावा. वरील कारणास्तव मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन, मुददा क्र.2 चे उत्तर अंतिम आदेशानुसार देण्यात येऊन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) गैरअर्जदार क्र.2 यांना निर्देश देण्यात येतो की, त्याने तक्रारदाराचा विमा
प्रस्ताव सदर निकाल कळाल्यापासून 60 दिवसाच्या आत योग्य कार्यवाही
करुन निकाली काढावा.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना