निकाल
(घोषित दि. 09.11.2016 व्दारा श्रीमती एम.एम.चितलांगे, सदस्य)
तक्रारदार हिने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्याकरता दाखल केलेली आहे.
तक्रारदार ही राणी उचेगाव ता.घनसावगी जिल्हा जालना येथील रहिवाशी आहे. ती शेती व्यवसाय करते. तक्रारदार हिचा पती बाबासाहेब भिमराव काटे याचा मृत्यू दि.17.05.2005 रोजी अपघाताने झाला. सदर घटनेची तक्रारदार यांनी घनसावंगी पोलीस स्टेशनला माहिती दिली, पोलीसांनी मयत व्यक्तीचा मरणोत्तर पंचनामा केला व घटनेची नोंद केली. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या हितासाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना राबविली आहे. तक्रारदार हिने पतीच्या मृत्यूनंतर दि.12.11.2005 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे रितसर अर्ज दाखल केला आहे. तक्रारीमध्ये मयत व्यक्ती हा शेतकरी असल्याबाबतचा पुरावा म्हणून 7/12 व 8 अ चा उतारा दाखल केलेला आहे. तक्रारदार हिचे कथन की, तिने पतीच्या निधनानंतर गैरअर्जदार यांच्याकडे विमा रक्कम मिळण्याकामी दि.12.11.2005 रोजी रितसर अर्ज केला. तसेच 2005 ते 2006 वर्षामध्ये प्रलंबित असलेलया विमा प्रकरणाची यादी दाखल केलेली आहे, सदरील यादीमध्ये तक्रारदार यांच्या मयत पतीचा अनुक्रमांक 125 वर नाव आहे. सदरील विमा पॉलीसीचा कालावधी हा दि.10 एप्रिल 2005 ते 09 एप्रिल 2006 असा आहे. विमा कंपनीने विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एक महिन्यात सदरील विमा दाव्यावर योग्य निर्णय घेणे बंधनकारक आहे परंतू अद्यापपावेतो गैरअर्जदार यांनी विमा दावा निकाली काढला नाही. विमा दावा निकाली न काढून सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदार यांची विनंती की, विमा अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- विमा प्रस्ताव दाखल केल्यापासून व्याजासहीत देण्यात यावे. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.5000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2000/- देण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे.
गैरअर्जदार क्र.1 हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी निवेदन नि.क्र.7 अन्वये दाखल केले आहे. लेखी निवेदनासोबत नि.क्र.8 अन्वये स्वप्नील पिंपळखरे व्यवस्थापक आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्शुरन्स यांचे शपथपत्र दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या कथनेनुसार तक्रारदार यांनी सदरील तक्रार ही मुदतबाहय दाखल केलेली आहे. तसेच मयत हा शेतकरी होता व त्याचे नावे मृत्यूसमयी शेतजमीन होती ही बाब दर्शविण्यासाठी योग्य तो कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. अपघात झाल्याबददलचे कोणतेही पोलीस पेपर दाखल केलेले नाही. सदीरल विमा प्रस्तावाकरता विमा पॉलीसीचा कालावधी हा दि.10.04.2005 ते 09.04.2006 असा होता. तक्रारदार यांनी विमा प्रस्ताव हा योग्य त्या आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल केला नाही. म्हणून गैरअर्जदार हे नुकसान भरपाई देण्यास पात्र नाही. तसेच कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी सोबत त्यावेळेस कोणताही करार झालेला नव्हता. तक्रारदार यानी दाखल केलेली तक्रार ही मुदतबाहय असल्याकारणाने सदरील तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांच्या विनंतीवरुन गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना सदर प्रकरणातून वगळण्यात आलेले आहे.
तक्रारदार यांनी नि.क्र.4 अन्वये कागदपत्रे दाखल केली आहे. त्यामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागितलेली माहिती अर्ज तसेच कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्विसेस कंपनीची यादी प्रत, तक्रारदार यांचे आधार कार्ड, मयत यांचे ओळखपत्र व मृत्यू प्रमाणपत्र, 7/12 उतारा आणि 8 अ नमुना दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या शपथपत्रांचे अवलोकन केले. तसेच दोन्ही बाजुंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) तक्रारदार ही तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहे काय? आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.ः- 1 तक्रारदार यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी पतीच्या निधनानंतर गैरअर्जदार यांच्याकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळणेकामी दि.12.11.2005 रोजी रितसर अर्ज केला होता परंतू गैरअर्जदार क्र.1 यांनी अद्यापपावेतो तक्रारदाराचा विमा दावा निकाली काढला नाही. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या हितासाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना राबविलेली आहे. सदरील विमा योजनेचा लाभ हा शेतक-यांच्या वारसांना मिळावा असा उददेश आहे. तक्रारदार यांनी कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्विस कंपनीची विमा यादीची छायांकित प्रत दाखल केलेली आहे, त्यामध्ये तक्रारदार यांच्या मयत पतीचे नाव नमुद आहे. तसेच महाराष्ट्र राज्य विरुध्द आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड कंपनी या प्रकरणात सुध्दा तक्रारदार यांच्या विमा दाव्याचा समावेश आहे. त्यामुळे तक्रारदार यानी विमा दावा दाखल करण्यास विलंब केला आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदाराचा विमा दावा निकाली न काढून गैरअर्जदार यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी सदर तक्रार ही मुदतबाहय दाखल केलेली आहे. तक्रारदार यांच्या मयत पतीचा मृत्यू हा अपघाताने झाला तसेच मृत्यूसमयी तो शेतकरी होता व शेती व्यवसाय करत होता ही बाब सिध्द करण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी सदरील विमा प्रस्ताव हा आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर केला नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याकामी शपथपत्रांचे आम्ही अवलोकन केले. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार हिचे पती बाबासाहेब भिमराव काटे हे दि.17.05.2005 रोजी अपघाताने मयत झाले आहे. तदनंतर तक्रारदाराने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळणेकामी दि.12.11.2005 रोजी संबंधित तहसिलदाराकडे विमा दावा दाखल केला. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्विसेसच्या छायांकित यादीच्या प्रतीचे अवलोकन केले असता तक्रारदार हिचे मयत पती याचा दि.17.05.2005 रोजी प्राणी चावल्याने (अॅनिमल बाईट) मृत्यू झाला असे दिसते. दि.12.11.2005 रोजी तक्रारदार हिने सदरील विमा प्रस्ताव दाखल केला असे निदर्शनास येते. कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्विसेस कंपनीच्या यादीमध्ये तक्रारदार हिच्या मयत पतीचे नाव अनुक्रमांक 125 मध्ये नमुद आहे. त्यामध्ये मयत यांच्या वयाचा पुरावा, एफ.आय.आर, पंचनामा व 6 क इत्यादी कागदपत्रांची त्रुटी असल्याचे निदर्शनास येते. सदरील कागदपत्रांची तक्रारदार याने पुर्तता केली किंवा नाही याबाबतही स्पष्ट खुलासा केला नाही. तसेच सदरील विमा प्रस्ताव हा गैरअर्जदार क्र.1 यांना प्राप्त झाल्याबाबतचाही पुरावा मंचासमोर दाखल नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या 7/12 उता-याचे अवलोकन केले असता सदरील 7/12 मध्ये तक्रारदार यांच्या मयत पती बाबासाहेब भिमराव काटे यांच्या नावे शेतजमिनीचा मालकी हक्क असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे मृत्यूसमयी तक्रारदार यांचे मयत पती हा शेतकरी होता असा निष्कर्ष काढणे या मंचास अवघड वाटते. बाबासाहेब भिमराव काटे याचा मृत्यू हा दि.17.05.2005 मध्ये झाला आहे सदरील गोष्टीस 11 वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार याने मयत बाबासाहेब भिमराव काटे हे मृत्यूसमयी शेतकरी होते त्याबाबतचा योग्य तो पुरावा व सदरील विमा प्रस्तावाकरता आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्पष्ट व वाचण्यासारख्या प्रती साक्षांकित करुन सदरील विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे सादर करावा. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदरील विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर 60 दिवसात योग्य ती कार्यवाही करावी.
वरील कारणास्तव खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो.
आदेश
1) तक्रारदार यांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी हा निकाल कळाल्यापासून
60 दिवसाच्या आत आवश्यक असलेली कागदपत्रे साक्षांकित करुन विमा
प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे सादर करावा.
2) गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनी यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार
याचा विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत योग्य ती कार्यवाही
करावी.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना