(घोषित दि. 03.04.2014 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने वैयक्तिक अपघात विमा रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्यांचे पती निंबाजी विठ्ठल जगताप दिनांक 05.11.2011 रोजी जालना येथून इंडिका गाडीने (एम.एच.21 व्ही.0662) शिरपूरकडे जात असताना नरडाणा गावाजवळ अपघात झाला व या अपघातात निंबाजी विठ्ठल जगताप यांना गंभीर दुखापत होऊन उपचारा दरम्यान दवाखान्यामध्ये मृत्यू झाला. सदरील अपघाताची नोंद संबंधित पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली असून मोटार अपघात कायद्यानुसार आरोपी विरुध्द गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे व मरणोत्तर पंचनामाही करण्यात आला आहे. सदरील वाहनाचा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी शाखा जालना यांच्याकडे विमा उतरविला असून विमा कालावधी दिनांक 09.05.2011 ते 08.05.2012 असा आहे. सदरील पॉलीसी अंतर्गत वाहनामध्ये बसलेले 4+1 प्रवासी अपघाती विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे. अर्जदाराने विमा प्राधिकरणाकडे थर्डपार्ट विमा दावा दाखल केला असून विद्यामान न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिनांक 15.04.2013 रोजी वैयक्तिक अपघात विमा रक्कम मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे रजिस्टर पोस्टाने पाठविले. सत्र न्यायालयात दावा दाखल असल्यामुळे विमा कंपनीस सुचना प्राप्त झालेली आहे. परंतु अद्यापही गैरअर्जदार विमा कंपनीने दावा मंजूर अथवा नामंजूर केलेला नाही. अर्जदाराने विमा दाव्याची रक्कम व्याजासह देण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार कंपनीस पाठविलेले पत्र, एफ.आय.आर ची प्रत, इन्क्वेस्ट पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, मृत्यू दाखला, गाडीचे आर.सी.बुक, इन्शुरन्स पॉलीसी इत्यादि कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने त्यांच्या पतीच्या अपघाती मृत्यूचा योग्य पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदाराने जिल्हा न्यायालयातील दाव्याची साक्षांकीत प्रत दाखल केलेली नाही. सदरील दावा हा अपरिपक्व अवस्थेत आहे व त्या आधी तक्रार दाखल करता येऊ शकत नाही. गाडी मालकाने त्यांच्याकडे सदरील घटनेची माहिती दिलेली नाही. गाडी मालकाने ज्या वाहन चालकाला गाडी चालविण्यास दिली, त्याच्या जवळ वैध वाहन परवाना नाही. खाजगी वाहनात प्रवासी नेणे हे पॉलीसीच्या नियमा विरुध्द आहे. त्यामुळे सदरील तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांना त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंदविल्याचे मान्य आहे. परंतु सदरील फिर्याद खोटया फिर्यादीवरुन नोंदविण्यात आल्याचे म्हटले आहे. सदरील तक्रार इंडिका (एम.एच. 21 व्ही. 0662) गाडी संदर्भात असल्याचे त्यांना मान्य असून त्यांच्याकडे वैध वाहन परवाना आहे. सदरील गाडीचा विमा उतरविला असल्यामुळे संपूर्ण जवाबदारी विमा कंपनीची आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसून येते की,
अर्जदार यांचे पती निंबाजी विठ्ठल जगताप यांचा दिनांक 05.11.2011 रोजी इंडिका गाडीने (एम.एच. 21 व्ही. 0662) जालन्याहून शिरपूर येथे जात असताना अपघात होऊन मृत्यू झाला.
सदरील इंडिका गाडी विनोदकुमार पांडे यांच्या नावे असून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून गाडीचा विमा उतरविला आहे व विमा कालावधी दिनांक 09.05.2011 ते 08.05.2012 पर्यंत होता हे पॉलीसीच्या कागदपत्रांवरुन दिसून येते.
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे दिनांक 15.04.2013 रोजी वैयक्तिक अपघात विमा रक्कम मिळण्यासाठी विमा प्रस्ताव पाठविला असल्याचे कागदपत्रांवरुन दिसून येते.
गैरअर्जदार यांनी सदरील गाडी चालविण्या-या चालकाकडे वैध वाहन परवाना नसून खाजगी गाडीमध्ये प्रवासी बसविले असल्यामुळे अर्जदार विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही असे त्यांच्या जवाबात म्हटले आहे. अर्जदाराची मागणी वैयक्तिक अपघात विमा रकमेची आहे. त्यामुळे वाहन चालका जवळ वैध वाहन परवाना होता की नाही हे गौण आहे. सदरील वाहनामध्ये मयत निंबाजी जगताप यांनी भाडयाने गाडी घेतल्या बद्दलचा उल्लेख कोणत्याही कागदपत्रांमध्ये नाही.
अर्जदाराचा प्रस्ताव विमा कंपनीने अद्याप पर्यंत मंजूर अथवा नामंजूर केलेला नाही त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दिनांक 05.11.2011 रोजी झाला असून त्यांनी दिनांक 15.04.2013 रोजी विमा दावा पाठविला आहे. वैयक्तिक विमा दावा दाखल करताना इतका वेळ लागणे स्वाभाविक आहे कारण या पॉलीसीची माहिती गाडीचा मूळ मालक वेगळा असल्यामुळे उशिरा मिळू शकते. पॉलीसीच्या अटी व शर्ती मध्ये किती दिवसात प्रस्ताव दाखल करावा याचा नेमका कालावधी दिलेला नाही. त्यामुळे दिनांक 15.04.2013 रोजी अर्जदाराने पाठविलेला प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीने स्विकारावा व 30 दिवसात अर्जदारास विमा रक्कम द्यावी.
मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास 30 दिवसात वैयक्तिक अपघात विमा रक्कम अदा करावी.
- खर्चा बाबत आदेश नाही.