(घोषित दि. 28.02.2014 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचे पती श्री.संजय नागोराव तेरकर हे पशूवैद्यकीय हॉस्पीटल येथील कर्मचारी होते. त्यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे पॉलीसी क्रमांक 980979773 रुपये 50,000/- एवढया रकमेची दिनांक 28.10.1995 रोजी घेतली होती. सदर पॉलीसीचा विमा हप्ता पगारपत्रकातून सॅलरी सेव्हिंग योजने अंतर्गत दरमहा रुपये 72/- जमा केला होता. दूदैवाने दिनांक 30.05.2012 रोजी झालेल्या वाहन अपघातात मृत्यू पावले. तक्रारदारांनी सदर घटनेची माहिती पोलीसांना दिल्यानंतर संबंधित पोलीस अधिका-यांनी वरील घटनेचे तपासकाम करुन एफ.आय.आर ची नोंद केली, आरोपी विरुध्द गुन्हा नोंदवला, साक्षीदारांचे जबाब नोंदले, मयत व्यक्तीचा मरणोत्तर पंचनामा केला. तसेच प्रेत पोस्ट मार्टमसाठी वैद्यकीय अधिका-यांकडे पाठवले. तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसहीत गैरअर्जदार यांचेकडे दाखल केला.
गैरअर्जदार विमा कंपनीच्या सदर विमा पॉलीसी अंतर्गत विमा धारकाच्या अपघाती मृत्यू नंतर विमा रक्कम रुपये 50,000/- / 2 + बोनस अशा पध्दतीने विमा लाभ रक्कम देय असूनही अद्याप पर्यंत दिलेली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांनी विमा प्रस्तावा सोबत ड्रायव्हिंग लायसन्स, पोलीसांचा अंतीम अहवाल तसेच इनक्वेस्ट पंचनामा वगैरे कागदपत्रे दाखल केले नाही. तक्रारदारांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला असल्याबाबतची कागदपत्रे सदर प्रस्तावा सोबत दाखल नाहीत. त्यामुळे गैरअर्जदार यांनी “Death Claim” बाबत कार्यवाही केली नाही. परंतू नियमाप्रमाणे बेसिक क्लेमची रक्कम रुपये 52,860/- चेक क्रमांक 534833 दिनांक 21.09.2013 व्दारे तक्रारदारांना अदा केली. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना अपघाती मृत्यू बाबतची विमा लाभ रक्कम नाकारलेली नाही. तक्रारदारांनी वर नमूद केलेली कागदपत्रे दाखल केलेली नसल्यामुळे या संदर्भात गैरअर्जदार यांनी निर्णय घेतला नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांची सेवेतील त्रूटी स्पष्ट होत नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 प्रतिनिधी मार्फत दिनांक 21.09.2013 रोजी न्यायमंचात हजर झाले असून तक्रारदारांचे पती श्री.संजय तेरकर यांची एल.पी.सी व माहे मे 2012 चे वेतन देयकाची सत्यप्रत दाखल केली आहे.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव व गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे विद्वान वकील श्री.एम.आर.देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील गोष्टी स्पष्ट होतात.
- तक्रारदारांचे पती श्री.संजय तेरकर यांनी गैरअर्जदार यांचेकडून विमा पॉलीसी घेतल्याची बाब मान्य असून गैरअर्जदार यांनी तक्रारदारांचा सॅलरी सेव्हींग योजने अंतर्गत विमा पॉलीसीची मूळ देय (Basic Claim) रक्कम रुपये 52,860/- दिनांक 21.09.2013 रोजी प्रस्तुत प्रकरणाची नोटीस मिळाल्यानंतर दिल्याचे तक्रारीत दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते.
- गैअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार अपघाती मृत्यू बाबतचा विमा प्रस्तावा बाबत (Accidental death Claim Benefit) अद्याप पर्यंत, अपूर्ण कागदपत्रांच्या अभावी कार्यवाही केली नाही. सदरचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तक्रारदारांना या कारणास्तव ड्रायव्हिंग लायसन्स, पोलीसांचा अंतीम अहवाल, इनक्वेस्ट पंचनामा कागदपत्रे दाखल करणे आवश्यक आहे.
- तक्रारातील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी घटनास्थळ पंचनामा, इनक्वेस्ट पंचनामा, एफ.आय.आर पोस्ट मार्टम रिपोर्ट, मयताचे ड्रायव्हिंग लायसन्स दाखल केल्याचे दिसून येते. सदर कागदपत्रानुसार तक्रारदारांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सदर योजने अंतर्गत अपघाती मृत्यूची विमा लाभ रक्कम तक्रारदारांना देय असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना सदर पॉलीसी अंतर्गत मूळ दाव्याची (Basic Claim) रक्कम अदा केलेली असून पॉलीसीतील अटी व शर्तीनुसार अपघाती मृत्यूबाबतची विमा (Accidental death Claim Benefit) लाभ रक्कम तक्रारदारांना अदा करणे न्यायोचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना विमा पॉलीसी क्रमांक 980979773 अंतर्गत देय असलेली अपघाती मृत्यूची विमा लाभ रक्कम पॉलीसीतील अटी व शर्तीनुसार नियमानुसार आदेश मिळाल्या पासून 60 दिवसात द्यावी.
- विहित मुदतीत रक्कम अदा न केल्यास 9 टक्के व्याज दरासहीत वरील रक्कम अदा करावी.
- खर्चा बाबत आदेश नाही.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच अर्जदाराला परत करावेत.