जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –187/2010 तक्रार दाखल तारीख –31/12/2010
रामप्रसाद पि.बापूराव आगे
वय 40 वर्षे,धंदा शेती ..तक्रारदार
रा.देवडी ता.वडवणी,बीड, जि.बीड
विरुध्द
1. मा.सहायक अभिंयता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
उपविभागीय कार्यालय, तेलगांव ता.वडवणी जि.बीड.
2. मा.कार्यकारी अभिंयता
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
संचलन व सुव्यवस्था विभाग, अंबाजोगाई
ता.अंबाजोगाई जि.बीड ...सामनेवाला
3. मा.विद्युत निरिक्षक
विद्युत निरिक्षण विभाग
उ.उ.का.खाते अन्सारी बिल्डींग विद्या नगर, बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.के.बी.टाकसाळ
सामनेवाले क्र.1 व 2 तर्फे :- अँड.एस.एन.तांदळे
सामनेवाले क्र.3 तर्फे ः- स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार देवडी ता.वडवणी येथील रहिवासी असून त्यांचा शेती व्यवसाय आहे. त्यावर त्यांची उपजिविका अवलंबून आहे. तक्रारदारांची देवडी शिवारात गट नंबर 91 मध्ये शेत जमिन असून सदर शेती जमिन तक्रारदार व त्यांचे भावाचे मालकीचे ताब्यात आहे. दरवर्षी सदर जमिनीतून तक्रारदारांना पिकाची लागवड करुन चांगले उत्पन्न होते.सदर गटामध्ये सामनेवाला यांचा विज पूरवठयाचा डि.पी.संच बसवलेला आहे.
गट नंबर 91 मध्ये तक्रारदाराने 30 गुटटे जमिनीमध्ये दि.11.11.2009 रोजी सन 2010-11 च्या हंगामासाठी ऊसाची लागवड केली होती. त्यासाठी लागणारे पाणी तक्रारदार व सख्खा भाऊ गंगाधर बापुराव आगे यांनी मिळून तळयावरुन सामाईक पाईपलाईन केली आहे. विज जोडणी ही देखील सामाईक आहे. परंतु विज जोडणी ही तक्रारदाराचे भावाचे नांवे आहे. त्यांचा नंबर 586640275256 एजी 132 असा आहे. विज देयके तक्रारदार व त्यांचे भाऊ अधेअर्धे भरतात.वरील ऊस पिक मिळण्यासाठी अहोरात्र मेहनत करुन ऊस पिक अंतिम टप्प्यात व इतर खर्चासाठीरक्कम रु.30,000/- अर्जदाराने खर्च केलेला होता. दि.3.10.2010 रोजी अंदाजे सूमारे 4 वाजता तारा ढिल्या झाल्याने एल.टी.लाईनच्या तारा एकमेकांस स्पर्श होऊन स्पार्कीग होऊन त्यांच्या ठिणग्या ऊसावर पडल्याने आग लागून ऊस जळून खाक झाला. घटनेची सुचना तक्रारदाराने दि.4.10.2010 रोजी तहसिलदार वडवणी व सामनेवाला यांना दिली.तहसीलदार यांच्या अहवालानुसार संबंधीत घटनेचा पंचनामा करण्यात आला. ऊस पिक जळाल्याने त्यांचे फोटो काढण्यात आले. सदर ऊस उत्पादन अंदाजे एकरी 100 टनाचे म्हणजे 30 गूठठे मधील उत्पादन ऊसाचे 75 टन तक्रारदारांना आले असते. त्यावेळी प्रति टन रक्कम रु.1500/- दराने 75 टनाची रक्कम रु.1,12,500/- चे उत्पन्न मिळाले असते. तलाठयाने पंचनामा करुन नूकसान भरपाईची रक्कम दाखवलेली आहे ती त्यापेक्षा जास्त नूकसान झालेले आहे. सामनेवाला यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदाराचे झालेले नूकसान खालील प्रमाणे,
1. ऊस लागवड व इतर मशागती खर्च रु.30,000/-
2. जळीत ऊस सरासरी 75 टन रु.1,12,500/-3. मानसिक त्रासापोटी रु.30,000/-4. अर्ज दाखल करण्यासाठी खर्च व वकील फि रु.15,000/-
एकूण रु.1,87,500/-
भारतीय विज कायदा 2003नुसार सामनेवाला नंबर 1 यांनाही घटनेची माहीती देऊन कायदेशीर नोटीस पाठवून नूकसान भरपाईच्या रक्कमेची मागणी केली परंतु सामनेवाला यांनी नोटीसची दखल घेतली नाही. नूकसान भरपाई रक्कम अदा केली नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केला आहे. त्यामुळे तक्रारदारांना आर्थिक शारीरिक त्रास झालेला आहे. विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे एकूण रक्कम रु.1,87,500/- सामनेवालाकडून तक्रारदारांना देण्याबाबत आदेश व्हावेत. त्यावर द.सा.द.शे 18 टक्के व्याज दराने तक्रार दाखल केल्यापासून रक्कम वसूल होईपर्यत व्याज देण्याचा सामनेवाला यांना आदेश व्हावा.
सामनेवाला नंबर 1 व2 यांनी एकत्रित खूलासा दि.10.03.2011रोजी दाखल केला. खूलाशात तक्रारीतील त्यांचे विरुध्दचे सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत. सेवा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सेवा देण्यास कसूर केला हे म्हणणे चूकीचे आहे.सामनेवाला तक्रारदारांना कोणतीही नूकसान भरपाई अथवा खर्च देण्यास जबाबदार नाहीत. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
सामनेवाला नंबर 3 यांनी त्यांचा खुलासा दि..11.2.2011 रोजी त्यांचे अहवालासह दाखल केला. खुलासा थोडक्यात की,तक्रारदार हे कार्यालयाचे ग्राहक नाहीत, या कार्यालयामार्फत विज पुरवठा करण्यात येत नाही.नूकसान भरपाई देण्याचा संबंध येत नाही.
विजेची निर्मीती,पारेषण,व्यवस्थापन व उपयोग या दरम्यान अपघात घडल्यास व विद्यूत कायदा 2003 चे कलम 161 ला अनुसरुन त्यांची सुचना विहीत मुदतीत या कार्यालयास प्राप्त झाल्यावर विद्यूत निरिक्षक कार्यालयामार्फत चौकशी करुन चौकशी अहवाल शासनास सादर करणे या कार्यालयाचे काम आहे.
दि.4.10.2010 रोजी मौजे देवडी ता.वडवणी येथे श्री रामप्रसाद बापुराव आगे यांचे ऊसाचे शेतात झालेले ऊस जळीत प्रकरणी चौकशी सहायक विद्युत निरिक्षक बीड यांनी करुन या कार्यालयास सादर केलेले आहे. चौकशी अहवालाची सत्यप्रत सादर करण्यात येत आहे. तरी सदर प्रकरणी विद्युत निरिक्षक बीड यांचे नांव वगळण्यात यावे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 व2 यांचा खुलासा,दाखल कागदपत्र, शपथपत्र,सामनेवाला क्र.3 यांचा खुलासा यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्ववान वकील श्री.टाकसाळ आणि सामनेवाला क्र. 1 व2 चे विद्ववान वकील श्री.तांदळे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदार आणि त्यांचा भाऊ गंगाधर आगे व तसेच ग्यानाभाऊ बापुराव यांचे गट नंबर 91 मध्ये शेत जमिन असल्याचे 7/12
उता-यावरुन स्पष्ट होते. तसेच सन 2009-10 मध्ये ऊस लागवड केल्याचे पिक पाहणी नोंदीवरुन स्पष्ट होते. तक्रारदाराच्या नांवावर विज जोडणी नाही ती त्यांचे भावाचे नांवावर आहे. या संदर्भात तक्रारदार ग्राहक नाहीत अशी जोरदार हरकत सामनेवाला यांनी घेतली आहे. या संदर्भात तक्रारदारांनी त्यांचे भावाचे शपथपत्रनि.16 दाखल केलेले आहे. त्यांस सामनेवाला यांनी उलट तपासणी घेतली नाही त्यामूळे सदरचे शपथपत्र हे आव्हानासाठी असल्याने सदरचे शपथपत्र हे ग्राहय धरणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी त्यांचे बंधूने एकत्रित पाईपलाईन केली आहे व एकत्रित विज जोडणी घेतली आहे व सदरची विज जोडणी ही त्यांचे भावाचे नांवे आहे. विज देयकाची रक्कम तक्रारदार व त्यांचे भाऊ भरीत असतात. हे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या संदर्भात सामनेवाला यांनी केवळ तक्रारदाराचे नांवावर त्यांची विज जोडणी नसल्याकारणाने सदरची हरकत घेतली आहे.परंतु वरील सर्व विधाने सामनेवाला यांनी काटेकोरपणे नाकारलेले नाहीत. जरी तक्रारदाराचे नांवाने विज जोडणी नसली तरी तक्रारदार सदर विज जोडणीचे संदर्भात लाभार्थी आहेत ही वस्तूस्थिती लक्षात घेता सामनेवाला यांचे सदरचे विधन याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी गट नंबर 91 मध्ये त्यांचे शेत जमिनीमध्ये ऊस लागवड केली होती व सदरचा ऊस अंतिम टप्प्यात आला असताना सदर शेत जमिनीवरुन गेलेल्या तारामध्ये स्पार्कीग होऊन ऊसास आग लागली आहे. या संदर्भात विज निरिक्षक यांचा अहवाल स्पष्ट आहे व त्यांनी या संदर्भात सामनेवाला क्र.1 व 2 यांना जबाबदार धरले आहे. ऊस जळाल्याने तक्रारदाराचे नूकसान झालेले आहे.
एकरी 100 टनाप्रमाणे 30 आर मध्ये 75 टनाचे तक्रारदाराचे नूकसान झाल्याचे तक्रारदाराची तक्रार आहे,परंतु या संदर्भात सामनेवाला यांचा यूक्तीवाद लक्षात घेता 30 आर क्षेत्रात साधारण 22.5 टन ते 25 टन उत्पादन मराठवाडयातील शेत जमिनीचा विचार करता, करता येईल. तक्रारदारांनी यापूर्वी घेतलेल्या ऊस संदर्भातील पावत्या दाखल केलेल्या नाहीत.त्यामुळे सामनेवाला यांचे म्हणण्यानुसार 22.5टन ते 25 टन उत्पादन याठिकाणी ग्राहय धरल्यास त्या सदर प्रतिटन भाव रु.1500/- यानुसार 25 टन 1500 रु.37,500/- नुकसान भरपाई सामनेवाला यांनी तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने मानसिक त्रासाचे रु.5,000/- व दावा खर्च रु.,2500/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी जळीत ऊस
नूकसान भरपाई रक्कम रु.37,500/- आदेश प्राप्तीपासून 30 दिवसाचे
आंत तक्रारदारांना दयावेत.
3. सामनेवाला क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, वरील रक्कम
वरील मूदतीत अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास सामनेवाले क्र. 1 व 2 जबाबदार राहतील.
4. सामनेवाला क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु,2500/- तक्रारदारांना आदेश प्राप्तीपासून 30 दिवसाचे आंत दयावेत.
5. सामनेवाला क्र.3 चे विरुध्दची तक्रार रदद करण्यात येते.
6. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड