जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 200/2012
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-14/08/2012.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 10/02/2014.
श्रीमती ज्योती देवेंद्र पवार,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.मु.तामसवाडी, ता.पारोळा, जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. कृषी अधिकारी,
तालुका कृषी कार्यालय,चाळीसगांव,
ता.चाळीसगांव,जि.जळगांव.
2. व्यवस्थापक,
कबाल इंन्शुरन्स प्रायव्हेट लि,
4 अ, देहमंदीर सोसायटी,श्रीरंगनगर,
माईलेले श्रवण विकास महाविद्यालयाजवळ,
पंपींग स्टेशन रोड,नाशिक.
2. ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी लि,
तर्फे शाखाधिकारी,
सेंट्रल फुले मार्केट, 3 रा माळा, जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.सतीश तुकाराम पवार वकील.
विरुध्द पक्ष क्र.1 एकतर्फा.
विरुध्द पक्ष क्र.2 तर्फे म्हणणे दाखल.
विरुध्द पक्ष क्र.3 तर्फे सौ.आर.जी.कोचुरे वकील.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमाधारक मृत्यु झाल्यानंतर त्याचा विमा क्लेम देण्याचे नाकारुन दिलेल्या सेवेतील त्रृटी दाखल प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराचे पती मयत देवेंद्र विलास पवार यांचे दि.11/09/2007 रोजी अपघाती निधन झाले. मयत देवेंद्र यांचे नांवे मौजे तामसवाडी,ता.पारोळा,जि.जळगांव येथे शेतजमीन आहे व ते शेती वहीवाटत असल्यामुळे शेतकरी या संज्ञेत येतात. तक्रारदार ही मयताची पत्नी असुन वारस या नात्याने कृषी अधिकारी,पारोळा मार्फत विरुध्द पक्ष कडे शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर विरुध्द पक्षाचे मागणीप्रमाणे योग्य ते सर्व कागदपत्रही पुरवले असता आजतागायत तक्रारदाराला विमा क्लेम प्रमाणे रक्कम रु.1,00,000/- अदा न करुन सदोष व त्रृटीयुक्त सेवा प्रदान केलेली आहे. सबब तक्रारदार हिला विरुध्द पक्षाकडुन रु.1,00,000/- विमा क्लेम रक्कम, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- तसेच मंजुर रक्कमेवर द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे व्याज मिळावे व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 हे या मंचाची रजि.नोटीस स्विकारुनही गैरहजर राहील्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
4. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक होऊ शकत नाहीत. विरुध्द पक्ष विमा कंपनी ही बिमा नियामक आणि विकास प्राधिकरण, भारत सरकार यांची अनुज्ञप्ती प्राप्त विमा सल्लागार कंपनी असुन महाराष्ट्र राज्य शासनाला विमा योजना राबविण्यासाठी विना मोबदला सहाय करते व त्यापोटी शेतकरी तसेच राज्य शासनाकडुन कोणताही मोबदला घेत नाही. मयत देवेंद्र विलास पवार, गांव तामसवाडी, ता.पारोळा,जि.जळगांव याचा अपघात दि.11/9/2007 रोजी झाला व सदरचा प्रस्ताव दि.02/01/2008 रोजी प्राप्त झाला त्यानंतर त्याची छाननी करुन सदरचा प्रस्ताव दि.08/01/2008 रोजी ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी, नागपुर यांना पाठविण्यात आला. वारंवार चौकशी करुनही सदरचा प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबीत आहे असे विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी लेखी म्हणण्यात नमुद केलेले आहे. प्रस्तुत तक्रारीकामी कोणतेही कारण नसतांना सामोरे जावे लागल्यामुळे तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- देण्याचे तक्रारदारास आदेश व्हावेत अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी केलेली आहे.
5. विरुध्द पक्ष क्र. 2 विमा कंपनीने तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराने विम्याचे देय रक्कमेच्या वादासंबंधी कमेटीकडे प्रकरण सादर करणे आवश्यक होते. तक्रारदार हिने शेतकरी अपघात योजनेनुसार कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचासमोर दाखल केलेला नाही. तक्रार अर्ज करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. महाराष्ट्र शासन व विमा कंपनी यांचेत झालेल्या विमा कराराप्रमाणे कोणत्याही वादाचे निवारण करण्याचे क्षेत्र मुंबई येथील कोर्टास आहे सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज या मंचासमोर चालण्यास पात्र नाही. तक्रारदाराने विमा हप्त्याची रक्कम भरल्याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. तक्रारदाराने तिचा विमा दावा विमा कंपनीकडे दाखल केलेला नाही त्यामुळे विमा कंपनी कोणतीही रक्कम देण्यास जबाबदार नाही. मयत देवेंद्र पवार अगर तक्रारदाराबरोबर विमा कंपनीचे कोणतेही ग्राहक व विक्रेता असे संबंध नव्हते. तक्रारदार यांनी ते विमाधारक होते व मयत देवेंद्र पवार यांचे एकमेव वारस आहे हे सक्तपणे शाबीत करावे. तक्रारदार हिने विमा दावा दाखल करतांना कोणतेही कागदपत्रे सोबत दाखल केलेले नव्हते. तक्रारदारास नुकसान भरपाई मागण्याचा कोणताही अधिकार व हक्क नाही. सबब वरील सर्व कारणांचा विचार होऊन तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा व तक्रारदार हिने खोटी तक्रार दाखल केली म्हणुन तक्रारदाराकडुन रु.25,000/- नुकसानी दाखल व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.10,000/- मिळावेत अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी केलेली आहे.
6. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, व तक्रारदार तसेच विरुध्द पक्ष क्र. 3 चे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. तक्रारदार हे विरुध्द पक्षांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली
आहे काय ? असल्यास कोणी ? होय, विरुध्द पक्ष क्र.2 यांनी
3. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
7. मुद्या क्र. 1 - तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक होतात काय, याबाबत तक्रारदाराने तक्रार अर्जातुन ती मयत देवेंद्र विलास पवार यांची पत्नी असल्याचे कथन केलेले असुन तक्रार अर्जासोबत दाखल नि.क्र.3 चे कागदपत्रात तहसिलदार, पारोळा यांनी दिलेला वारस दाखला दाखल केलेला असुन त्यावरुन मयत देवेंद्र ची पत्नी ज्योती देवेंद्र पवार वारस असल्याचे स्पष्ट होते. यास्तव तक्रारदाराचे पती हे विरुध्द पक्षाचे ग्राहक होते व ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्या कलम 2(1)(ब)(v) च्या तरतुदीनुसार मयत ग्राहकाचे वारस म्हणुन तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक ठरतात. यास्तव मुद्या क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
8. मुद्या क्र. 2 - विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी याकामी हजर होऊन विरुध्द पक्ष विमा कंपनी ही बिमा नियामक आणि विकास प्राधिकरण, भारत सरकार यांची अनुज्ञप्ती प्राप्त विमा सल्लागार कंपनी असुन महाराष्ट्र राज्य शासनाला विमा योजना राबविण्यासाठी विना मोबदला सहाय करते व त्यापोटी शेतकरी तसेच राज्य शासनाकडुन कोणताही मोबदला घेत नाही. मयत देवेंद्र विलास पवार, गांव तामसवाडी, ता.पारोळा,जि.जळगांव याचा अपघात दि.11/9/2007 रोजी झाला व सदरचा प्रस्ताव दि.02/01/2008 रोजी प्राप्त झाला त्यानंतर त्याची छाननी करुन सदरचा प्रस्ताव दि.08/01/2008 रोजी ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी, नागपुर यांना पाठविण्यात आला. वारंवार चौकशी करुनही सदरचा प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबीत आहे असे लेखी खुलाश्यातुन नमुद केलेले आहे. विरुध्द पक्ष क्र. 3 विमा कंपनीने तक्रारदार अगर मयत हे त्यांचे ग्राहक नव्हते व त्यांचेत ग्राहक व विक्रेता असे संबंध नव्हते. तसेच तक्रारदार हिने दाखल केलेल्या विमा क्लेम सोबत कोणतेही कागदपत्रे दाखल न केल्याने तक्रारदाराचा विमा क्लेम देण्यास ते जबाबदार नाहीत असे कथन लेखी म्हणणे व युक्तीवादातुन केलेले आहे.
9. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत नि.क्र.3 लगत खबर, फीर्याद, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, चार्जशीट, डेथ सर्टीफीकेट, वारस दाखला, तामसवाडी,ता.पारोळा येथील गट क्र.98/3 तसेच गट क्र.786/1 चा 7/12 उतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. मयत देवेंद्र विलास पवार यांचे नांवे मौजे तामसवाडी येथे गट नंबर 98/3 मध्ये 1 हेक्टर 20 आर व गट नंबर 786/1 मध्ये 0 हेक्टर 61 आर एवढी शेत जमीन असल्याचे दाखल 7/12 उता-यावरुन स्पष्ट होते. तसेच मरणोत्तर पंचनामा चे अवलोकन करता मयतास मोटार अपघातात झालेल्या गंभीर दुखापतींमुळे मरण आले असल्याचे नमुद केलेले आहे. यावरुन मयत शेतकरी देवेंद्र विलास प्रवार हे अपघातात मयत झाल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी वैध वाहन चालविण्याचा परवाना नव्हता म्हणुन विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने क्लेम नाकारल्याचे लेखी म्हणण्यात नमुद केले आहे तर याउलट विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम त्यांनी कोणत्याही कागदपत्राशिवाय दाखल केल्यामुळे देता येत नसल्याचे कथन केलेले असल्याने दोन्ही विरुध्द पक्षाचे लेखी म्हणण्यात देखील कमालीची विसंगती दिसुन येते. केवळ तक्रारदाराचा क्लेम नाकारण्याचे हेतुने दोघा विरुध्द पक्षांनी परस्परविरोधी विधाने करुन क्लेम देण्याचे हेतुपुरस्सरपणे टाळल्याचे येथे नमुद करावेसे वाटते.
10. विरुध्द पक्ष क्र. 3 विमा कंपनीने केवळ तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारण्याचे हेतुने कोणत्याही कागदोपत्री पुराव्याची शहानिशा न करता तसेच संबंधीत प्रकरणी सखोल तपास न करता तक्रारदारा सारख्या खेडयात राहणा-या विधवा महीलेचा विमा क्लेम देण्याचे नाकारुन सेवेत अक्षम्य दिरंगाई व सेवा त्रृटी केल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सामनेवाला क्र. 1 व 2 यांची प्रस्तृत प्रकरणात मर्यादीत व केवळ फॉरर्वडींग एजन्सी म्हणुन भुमिका असल्यामुळे त्यांनी सेवेत कमतरता केली असे म्हणता येणार नाही. यास्तव मुद्दा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही सामनेवाला क्र. 3 च्या पुरता होकारार्थी देत आहोत.
11. मुद्या क्र. 3 - तक्रारदाराने याकामी तक्रार अर्जातुन विमा रक्कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- अशी एकुण रक्कम रु.1,25,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावेत व तक्रार अर्जाचा संपुर्ण खर्च मिळावा अशी विनंती केलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारुन सेवेत त्रृटी केलेली आहे. परिणामी शासन निर्णयाप्रमाणे रु.1,00,000/- विमा रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र ठरतात. कोणतेही संयुक्तीक कारणाशिवाय विमा दावा नाकारल्यामुळे रक्कम रु.1,00,000/- वर विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकडे विमा क्लेम दाखल केल्याची दि.08/01/2008 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे. तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मागणी केली आहे तथापी आमचे मते तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीकडुन मिळणेस पात्र आहेत. सबब वरिल विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. विरुध्द पक्ष क्र.3 ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी लि यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रक्कम रु.एक लाख मात्र) विमा क्लेम दाखल दि.08/01/2008 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष क्र.3 ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी लि यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासा दाखल रु.20,000/- (अक्षरी रक्कम रु.वीस हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (अक्षरी रु.पाच हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 10/02/2014.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.