निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 15/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 05/12/2013
कालावधी 01वर्ष. 11महिने. 20 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
गोलेच्छा जिनींग प्रेसिंग फॅक्ट्री. अर्जदार
वसमत रोड, परभणी अॅड.एस.एन.वेलणकर.
तर्फे कार्यकारी भागीदार अनिता प्रदिप गोलेच्छा
वय 45 व्यवसाय –व्यापार व घरकाम रा.कारेगाव ता.जि.परभणी.
विरुध्द
1 अधिक्षक अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. अॅड.एस.एस.देशपांडे.
मंडळ कार्यालय, जिंतुर रोड, परभणी.
2 कार्यकारी अभियंता.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.
मंडळ कार्यालय, जिंतुर रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराकडून नियमबाह्य विद्युत शुल्क रक्कम वसुल करुन व ते परत न करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा व इतर भागीदार मिळून भागीदारी तत्वावर गोलेच्छा जिनींग प्रेसिंग फॅक्ट्री चालवते, ज्यामध्ये भागीदार म्हणून 1) अनिता प्रदीप गोलेच्छा 2) आदर्श प्रदीप गोलेच्छा 3) प्रेमा कांतीचंद गोलेच्छा 4) संगीता राजेंद्र गोलेच्छा आहेत. या सर्वांनी सदरील उद्योगाचे सर्व कार्यकारी अधिकारी अनिता प्रदीप गोलेच्छा यांना असून त्या अधिकारानेच सदरची तक्रार अर्जदार दाखल करत आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने सदरची जिनींग प्रेसिंग फॅक्ट्री 2006 मध्ये उभे करण्याचे ठरवले व त्यानुसार सदर उद्योगासाठी त्याने गैरअर्जदाराकडून उच्चदाबाची विज जोडणी घेण्यासाठी कोटेशन भरले. त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सदरील उद्योगास 100 K.W. मंजूर भरानुसार ग्राहक क्रमांक 530019004120 अन्वये अर्जदाराचा विद्युत पुरवठा चालू केला.
अर्जदाराचे म्हणणे की, जानेवारी 2007 पासून सदरील उद्योगाच्या विद्युत देयकामध्ये गैरअर्जदाराने Electric Duty आकारण्यास सुरुवात केली, वस्तुतः नियमानुसार मराठवाडा विभागासाठी Electric Duty माफ आहे. गैरअर्जदाराने Electric Duty 30/01/2007 पासून 22/01/2008 पर्यंत बिलामध्ये नमुद करुन वसूल करुन घेतली अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 29/10/2009 रोजी लेखी अर्ज करुन सदरची रक्कम परत देण्याची मागणी केली, परंतु गैरअर्जदाराने अर्जदारास तोंडी सांगीतले की, सदरील विद्युत जोडणी ज्यावेळी कायमची बंद करण्यात येईल त्यावेळी अर्जदारास सदर रक्कम परत करण्यात येईल.
अर्जदाराचे म्हणणे की, 2009 मध्ये सदर उद्योगाच्या ठिकाणी लक्ष्मी जिनींग फॅक्ट्री या नावाने उद्योग सुरु करण्यात आला. सदर उद्योगासाठी गैरअर्जदाराकडून अर्जदाराने उच्च्ादाबाची विद्युत जोडणी घेतली. ज्याचा ग्राहक क्रमांक 530019004690 आहे व सदर विद्युत पुरवठा दिनांक 25/12/2009 पासून चालू झाला. सदरचा विद्युत पुरवठा चालू झाल्यामुळे गोलेच्छा जिनींग प्रेसिंगच्या नावाने असलेला ग्राहक क्रमांक 530019001920 अन्वये असलेला एल.टी. विद्युत पुरवठा कायमचा बंद करण्यात आला.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 22/01/2010 रोजी लेखी अर्ज केला व त्यात गोलेच्छा जिनींगची 30/01/2007 पर्यंतचा Electric Duty 97412/- परंत मागीतली, परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराकडून नियम बाहय वसुल केलेली Electric Duty रु.97,412/- अर्जदारास परत केले नाही, तसेच अर्जदाराने सदरची रक्कम अर्जदाराच्या लक्ष्मी जिनींग फॅक्ट्रीच्या बिला मध्ये समायोजित करण्यात यावी अशी विनंती केली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश करावा की, ग्राहक क्रमांक 530019004120 अन्वये गैरअर्जदाराने अर्जदाराकडून नियमबाहय विद्युत शुल्क 97,412/- वसुल केलेले अर्जदारास द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह परत करावे. व तसेच मानसिक त्रासाबद्दल व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराने अर्जदारास 2500/- म्हणून देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्यासाठी नि.क्रमांक 4 वर 5 कागदपत्रांच्या यादीसह 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये उर्जा मंत्रालय यांचे गैरअर्जदारस पत्र, मुख्य अभियंताने गैरअर्जदारास लिहिलेले पत्र, अर्जदाराचे विद्युत शुल्क परत मागणीचा केलेला अर्ज, सहायक अभियंताचे गैरअर्जदार क्रमांक 1 यास पत्र, अर्जदाराचे गैरअर्जदाराना शुल्क परत मागणीसाठी केलेला अर्ज प्रती दाखल केले आहे.
तक्रार अर्जास लेखी जबाब सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, गैरअर्जदारास लेखी निवेदन सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी निवेदन सादर न केले मुळे त्यांचे विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराच्या तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब नि. क्रमांक 4/2 वरील गैरअर्जदाराचे मुंबई कार्यालयातून परभणी येथील कार्यालयास पाठविलेल्या पत्रावरुन दिसून येते. अर्जदाराचा ग्राहक क्रमांक 530019004120 आहे हे देखील नि.क्रमांक 4/2 वरील कागदपत्रावरुन दिसून येते. अर्जदार हा गोलेच्छा जिनींग प्रेसिंग फॅक्ट्री भागीदारी मध्ये व्यवसाय करत होता ही बाब नि.क्रमांक 14/1 वरील भागीदार पत्रावरुन सिध्द होते, तसेच सदरच्या भागीदारी मध्ये कामकाज पहाण्याकरीता अर्जदार अनिता प्रदिप गोलेच्छा यांना सर्वाधिकार पत्र दिले होते ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या 14/2 वरील सर्वाधिकार पत्रावरुन दिसून येते.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने सदरील ग्राहक क्रमांक अन्वये अर्जदाराकडून दिनांक 30/01/2007 ते 22/01/2008 पर्यंत Electric Duty
रु. 97,412/ वसुल केले होते ही बाब नि. क्रिमांक 4/2 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते व सदरची रक्कम Govt. Notification No. ELD- 2009/C R 213/ Urja-1 Dated 26/05/2009 अन्वये गैरअर्जदाराने अर्जदारास समायोजनाव्दारे परत करण्याचे आदेश गैरअर्जदाराच्या मुंबई येथील कार्यालयाने गैरअर्जदारास आदेश दिले होते ही बाब नि. क्रमांक 4/2 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते व या बाबतचा सारखाच आदेश उद्योग उर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई याने गैरअर्जदाराच्या मुंबई येथील कार्यालयात दिनांक 29 ऑगस्ट 2009 रोजी दिला होता ही बाब देखील नि.क्रमांक 4/1 वरील कागदपत्रा वरुन सिध्द होते. तसेच सदरची रक्कम रु.97,412/- रु. परत करावे म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 29/10/2009 रोजी अर्ज केला होता ही बाब नि. क्रमांक 4/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.
तसेच सदरची रक्कम अर्जदारास ग्राहक क्रमांक 530019004120 अन्वये परत करावे सदरचे विद्युत पुरवठा कायमचा खंडीत केला आहे ही बाब नि. क्रमांक 4/4 वरील दिनांक 06/05/2010 रोजीच्या गैरअर्जदाराच्या सहायक अभियंताने अधिक्षक अभियंता यांना लिहिलेल्या पत्रावरुन सिध्द होते. सदरची रक्कम रु.97,412/- आजपर्यंत गैरअर्जदाराने अर्जदारास परत केली या बाबत गैरअर्जदाराने मंचा समोर कोणताही कागदोपत्री पुरावा आणला नाही, यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदारास निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचास वाटते. याबाबत अर्जदाराच्या विव्दान विधीज्ञाने दाखल केलेला केस लॉ 2009 (2) CPR 222 राज्य आयोग आगरताला यानी F.A.No.23/2008 त्रिपुरा स्टेट इलेक्ट्रीसीटी कॉरपोरेशन लि, विरुध्द मोहमंद जमाल हुसेन मध्ये मा.राज्य आयोगाने म्हंटले आहे की, “ Delay in refund of the security amount of a consumer on part of state electricity corporation amounts to deficiency in service ” सदरचे मा. राज्य आयोगाचे मत या तक्रारीस लागु पडते. तसेच अर्जदाराचे म्हणणे की, सदरची रक्कम आजपर्यंत गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली नाही व ती रक्कम परत करावी किंवा अर्जदाराने नवीन चालू केलेले लक्ष्मी जिनींग फॅक्ट्रीच्या विद्युत कनेक्शन ग्राहक क्रमांक 530019004690 च्या बिला मध्ये सदर रक्कम समायोजित करावे, म्हणून अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 22/09/2011 रोजी अर्ज केला होता ही बाब नि. क्रमांक 4/5 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते गैरअर्जदाराने तसे कोठेही केल्याचे दिसून येत नाही. वा याबाबत गैरअर्जदाराने मंचासमोर कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणला नाही गैरअर्जदाराने अर्जदारास तसे न करुन निश्चित सेवेत त्रुटी दिली आहे असे मंचास वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदाराचे ग्राहक क्रमांक 530019004120 अन्वये 30/01/2007
ते 22/01/2008 पर्यंतचे Electric Duty अंतर्गत रु. 97,412/- फक्त (अक्षरी
रु.सत्त्यान्न्व हजार चारशे बारा फक्त) जमा असलेली रक्कम अर्जदाराच्या
लक्ष्मी जिनींग फॅक्ट्रीच्या ग्राहक क्रमांक 530019004690 च्या पुढील विद्युत
बिलात आदेशा तारखे पासून 30 दिवसांच्या आत समायोजित करावी.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास तक्रार अर्ज खर्चापोटी रु. 2,000/- फक्त ( अक्षरी रु.
दोनहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.