निकालपत्र
निकाल दिनांक – २५/०२/२०२१
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
__________________________________________________________
१. तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अंतर्गत सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, सामनेवाले पतसंस्थेच्या भोरवाडी ता.जि. अहमदनगर या शाखेमध्ये मुदत ठेवी ठेवलेल्या होत्या. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे .
अ.नं. | मुदतठेव पावती दिनांक व क्रमांक | शाखा | मुदत ठेव रक्कम रूपये | व्याज | देय दिनांक |
१ | क्र.१०४९४ दि.०३.०७.२०१८ | भोरवाडी | २,४७,७२८/- | दि.०३.०७.२०१८ पासून दसादशे १२% प्रमाणे होणारे व्याज | २८.०८.२०१८ |
२ | बचत खाते क्र.००७४३ | भोरवाडी | ५६३८७/-दि.१६.०८.१८ रोजी जमा | दि.१६.०८.२०१८पासुन नियमपाप्रमाणे होणारे व्याज | मागणी केल्यावर त्वरीत |
३. तक्रारदाराने सामनेवाले पतसंस्थेचे व्यवस्थापक/ सचिव व चेअरमन यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन रकमेची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अशा प्रकारे सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली व सदोष सेवा दिली. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवालेकडुन वर नमुद ठेवींमधील व बचत खातेमधील रक्कम व्याजासह मिळणेसाठी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अन्वये सदर आयोगाकडे दाखल केलेली आहे.
४. सामनेवाले सदर तक्रारीबाबत नोटीस घेऊनही प्रकरणात हजर झाले नाही. सबब निशाणी १ वर सामनेवाले क्रमांक १ व २ यांचेविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविणेचा आदेश पारीत करण्यात आला होता. तक्रारदाराने तक्रारीसोबत मुदत ठेव पावतीची व बचत खाते पुस्तकाची छायांकीत प्रत दाखल केली आहे. तसेच निशाणी ५ वर सरतपासाचे शपथपत्र व निशाणी ६ वर युक्तिवाद दाखल केला आहे.
५ तक्रारदाराने दाखल केलेले वर नमुद दस्तऐवज, तक्रार व शपथपत्रावरून असे दिसुन येत आहे की, तक्रारदाराने सामनेवालेकडे मुदत ठेव पावतीमध्ये वर नमुद कालाधीकरीता रक्कम ठेवली होती. त्या अनुषंगाने त्याची मागणी केली होती. परंतु सामनेवालेनी तक्रारदाराला त्याची रक्कम दिली नाही. सामनेवालेची सदर बाब तक्रारदाराप्रती अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब आहे, असे सिध्द होते. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
१. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे. २. सामनेवालेने तक्रारदाराकडुन घेतलेल्या मुदत ठेवीची रक्कम रूपये २,४७,७२८/-(अक्षरी रूपये दोन लाख सत्तेचाळीस हजार चारशे सातशे अठ्ठावीस ) व बचत खाते मधील रक्कम रूपये ५६,३८७/- (रूपये छप्पन्न हजार तीनशे सत्याऐंशी) तक्रारदाराला सामनेवालेने दिनांक ११-०४-२०१९ दिनांक पासुन द.सा.द.शे. ११ टक्के व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत द्यावे. ३. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना शारीरीक मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रूपये १०,०००/- (अक्षरी रूपये दहा हजार) व तक्रारीचा खर्च रूपये ५,०००/- (अक्षरी रूपये पाच हजार) द्यावे. ४. वर नमुद आदेशाची पुर्तता सामनेवालेने आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ३० दिवसांचे आत करावी. ५. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी. ६. सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्यात यावी. |