जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,नंदुरबार.
ग्राहक तक्रार क्रमांक-44/2010
निकालाची ता.20.06.2012
श्री.भानुदास भिमराव अहिरे
वय-35,धंदा-मजुरी,
रा.म्हसावद,ता.शहादा,
जि.नंदुरबार........................................................तक्रारदार.
----विरुध्द----
1. रेखा इंण्डेन सर्व्हीस,
इण्डेन (एल.पी.जी.)
वितरक प्रो.प्रा.प्रेमलता रघुसिंग वळवी,
वय-65,धंदा-व्यापार,
रा.वसंत नगर, शहादा,ता.शहादा,
जिल्हा-नंदुरबार.
2. म.एरिया मॅनेजर,
इंण्डेन एरिया ऑफीस,
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.,
ऑफीस नं.4 व 5 अदिती कॉमर्स सेंटर,
5 वा माळा, 2406, इस्ट स्ट्रीट पुणे,
कॉन्टामेंट पुणे-411 001................................सामनेवाला.
कोरम-
श्री.डी.डी.मडके.-.अध्यक्ष,
सौ.एन.एन.देसाई.-सदस्या,
तक्रारदारातर्फे वकील-श्री.डी.एस.पटेल
सामनेवाला 1 तर्फे वकील-श्री.के.ए.एम.काझी/श्री.साळूंखे.
सामनेवाला 2 तर्फे वकील-श्री.मोहन एस. बोडस
---- निकालपत्र ----
1. सौ.निता एन.देसाई, मा.सदस्या– तक्रारदार यांनी सदरील तक्रार सामनेवाला यांनी दयावयाच्या सेवेत त्रुटी निर्माण केल्याने ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-12 अन्वये या न्याय मंचात दाखल केलेली आहे त्याबाबतची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. सामनेवाला नं.1 हे गॅस कंपनीचे वितरक असुन सामनेवाला नं.2 हे एरियाचे मुख्य म्हणून आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला नं.1 कडून गॅस सिलेंडरचे कनेक्शन घेतले आहे त्याचा ग्राहक क्र.15999 असा असुन त्यांचे गॅस कार्ड आय.ओ.सी.नं.830396 , एस.यु.नं. आणि ता.3355376/17/01/2002 सिलेंडर संख्या 1 , रेग्युलेटर संख्या 1 असे असुन तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचे ता.17.01.02 पासुन ग्राहक झाले आहेत. सामनेवाला नं.1 यांनी माहे जुन-2009 चे सुमारास कंपनीचे नियमाप्रमाणे तक्रारदार यांना गॅस कनेक्शन अधिकृत असले बाबत लागणारे संपुर्ण कागदपत्र म्हणजे रेशनकार्ड, कायमचा पत्ता बाबत पुरावा तसेच एस.व्ही.असे संपुर्ण कागदपत्र मागणी करण्यात आली त्याप्रमाणे तक्रारदार यांनी रेशनकार्ड, कायमचा पत्ता बाबत पुरावा तसेच एस.व्ही.सापडले नाही म्हणून ता.04.06.2009 रोजीचा Indemnity Bond कंपनीला करुन दिला. अशा प्रकारे संपुर्ण कागदपत्र ता.17.06.09 रोजी सामनेवाला नं.1 कडे तक्रारदार यांनी जमा केले आणि सदरहू कागदपत्रांप्रमाणे तक्रारदार हे गॅस कनेक्शनचे अधिकृत ग्राहक असल्याचे सामनेवाला नं.1 यांनी ग्राहय धरुन ता.09.09.09 पावेतो गॅस सिलेंडरचा पुरवठा केलेला आहे.
3. ता.02.10.2009 रोजी तक्रारदार हे सामनेवाला नं.1 यांचेकडे गॅस सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी गेले असता सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदाराचे नावावर दोन गॅस कनेक्शन असल्याचे सांगितले आणि गॅस सिलेंडर नोंदणी करण्यासाठी नकार दिला. तसेच दोन गॅस कनेक्शन असतील तर एक जमा करण्याबाबत सुचनापत्र ता.02.10.09 रोजी देऊन कळविले. परंतु तक्रारदार यांचे नावावर सामनेवाला नं.1 यांचेकडून एकच कनेक्शन घेतल्याचे खात्रीशीर चौकशी करुन सांगितले. तक्रारदार यांच्या नावावर दोन कनेक्शन सामनेवाला नं.1 यांचे रेकॉर्डवर दिसत असल्याचे सांगुन तक्रारदार यांना गॅस सिलेंडर भरुन देणे बंद केले आहे. वास्तविक तक्रारदार यांचे नावाचे दुसरे कनेक्शन कोणाला दिले याबाबतची चौकशी करण्याची जबाबदारी सामनेवाला नं.1 यांचे असुन त्याबाबतचा चौकशी अहवाल सामनेवाला नं.2 यांचेकडे पाठविण्याची जबाबदारी देखिल सामनेवाला नं.1 यांची असुन त्याची प्रत तक्रारदारास पुरविण्याची जबाबदारी देखिल सामनेवाला नं.1 यांची आहे. परंतु सामनेवाला नं.1 यांनी तसेच केलेले नाही आणि असेलेली जबाबदारी टाळण्याचे पुरेपुर प्रयत्न करीत आहेत. तसेच तक्रारदार यांची कोणतीही चुक नसतांना गेल्या 10 महिन्यांपासुन गॅस सिलेंडर भरुन देत नाही. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास व आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. आणि त्यामुळे तक्रारदाराचे रु.15,000/- चे आर्थिक नुकसान झाले आहे. सामनेवाला नं.1 व 2 यांना ता.10.07.2010 रोजी कायदेशिर नोटीस पाठविली. सदरची नोटीस सामनेवाला यांना मिळाली असता सामनेवाला नं.1 यांनी ता.21.07.10 रोजी उत्तर पाठविले असुन तक्रारदाराची नोटीस खोटी असल्याचे कथन केले आहे.
4. वास्तवीक पाहता तक्रारदाराचे नावावर असलेले अधिकृत गॅस कनेक्शन नं.15999 असे एकमेव कनेकशन असुन सामनेवाला सांगतात त्याप्रमाणे गॅस कनेकशन नंबर-18127 तक्रारदार यांनी घेतलेले नसतांना सामनेवाला नं.1 बेकायदेशीर कृत्य करीत असुन काहीएक कारण नसतांना तक्रारदाराचे गॅस ग्राहक क्र.15999 बेकायदेशीररित्या बंद करुन ठेवलेले आहे. सबब तक्रारदार यांनी विनंती केली की, सामनेवाला यांनी तक्रारदारास ग्राहक म्हणून सेवा देण्यास कसुर केला असे घोषीत होऊन मिळावे, तक्रारदाराचे गॅस कनेक्शन क्र.15999 सामनेवाला नं.1 व 2 यांनी सुरळीत करुन द्यावेत असे आदेश तक्रारदाराचे लाभात व्हावेत, तक्रारदारास सामनेवाला यांनी विनाकारण मानसिक त्रास व आर्थिक नुकसान केले त्याची नुकसानीची रक्कम रु.15,000/- सामनेवाला यांचेकडून देववावी, तसेच अर्जाचा खर्च तक्रारदारास सामनेवाला यांचेकडून देववावा.
5. तक्रारदार यांनी निशाणी-3 वर तक्रारीच्या पृष्टयार्थ एकूण-10 कागदपत्रे दाखल केलेली असुन त्यामध्ये तक्रारदाराचे गॅस कनेक्शनचे कार्ड, रेशनकार्ड, सामनेवाला नं.1 व 2 यांना पाठविलेल्या नोटीसची स्थळप्रत, नोटीस उत्तर, पोच पावती वगैरे दाखल केलेले आहे. तसेच निशाणी-4 वर श्री.भानुदास भिमराव अहिरे यांचे शपथपत्र ता.29.07.2010 चे दाखल केलेले आहे.
6. सामनेवाला यांना या न्याय मंचाने नोटीस काढली असता सामनेवाला हे या न्याय मंचात हजर झाले व त्यांनी त्यांची कैफीयत दाखल केलेली आहे.
7. सामनेवाला यांनी त्यांची सविस्तर कैफीयत निशाणी-15 वर दाखल केलेली असुन सामनेवाला नं.1 चे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खोटा व बनावटी आहे. तक्रारदाराच्या आजीच्या केसरबाई फकीरा अहिरे हिचे नावावर दोन रेशनकार्ड आहेत त्या रेशनकार्डचा नंबर-539788 व 761324 असा आहे. दोन्ही रेशनकार्डवर तक्रारदाराचे नांव अ.नं.7 वर आहे. तक्रारदार यांच्या आजीने शासनाची फसवणूक करुन दोन रेशनकार्ड करुन घेतले व रेखा इंण्डेनकडे दोन वेगवेगळया रेशनकार्डच्या छायांकिंत प्रतिसोबत तक्रारदाराने स्वतःचे इलेक्शन कार्ड दिले व एस.व्ही फॉर्मवर बी.बी.अहिरे म्हणून सहया केल्या. रेशनकार्ड नं.539788 वर तक्रारदारास गॅस ग्राहक नं.15999 चे कनेकशन देण्यात आले व रेशनकार्ड 761324 वर गॅस ग्राहक क्र.18127 चे कनेक्शन देण्यात आले.
8. मल्टीपल कनेक्शन हे पुणे येथील अधिका-यांनी ओळखून काढले व रेखा इंण्डेन यांना मल्टीपल कनेकशन पैंकी एक कनेक्शन बंद करण्याबददल कळविले. त्यानुसार तक्रारदारास रेखा इंण्डेनने नोटीस पाठवली व सार्वजनिक वितरण प्रणालीखाली असेलेले गॅस देणे बंद केले. तक्रारदारास गॅस सिलेंडर देणे बंद केल्यापासुन दुस-या ग्राहक क्रमांक-18127 वर आजतागायत दुसरा कोणताही ग्राहक गॅस सिलेंडर घेणेसाठी आलेला नाही. त्याचाच अर्थ ग्राहक क्रमांक-18127 वर दुसरा ग्राहक नसुन तक्रारदार हाच ग्राहक आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांस दयावयाच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केलेली नसुन तक्रार काढून टाकणेच उचित आहे.
9. सामनेवाला नं.2 यांनी त्यांचा सविस्तर खुलासा निशाणी-30 वर दाखल केलेला असुन सामनेवाला यांचे म्हणणे की, तक्रारदार हा मंचाकडे स्वच्छ हाताने आलेला नाही. तक्रारदार याने गॅस कनेक्शन नं.18127 घेतांना 761324 या नंबरचे रेशनकार्ड कंपनीकडे जमा केले होते. तसेच गॅस कनेक्शन नं.15999 घेतांना 539788 या नंबरचे रेशनकार्ड जमा केले होते. वास्तवीक ही दोन्ही रेशनकार्ड एकाच नावाची असल्याने व गॅस कनेक्शन 18127 व 15999 हे एकाच नावाने म्हणजे तक्रारदार यांच्या नावाने आहेत. कंपनीच्या नियमाप्रमाणे एकाच नावावर जर दोन कनेकशन असतील तर त्यापैंकी एक जमा करणे आवश्यक असते.
10. सामनेवाला यांनी तक्रारदारास दुसरे कनेक्शन जमा करण्यास पुरेपुर संधी दिली होती. सामनेवाला हे तक्रारदारास गॅस सिलेंडरचा सप्लाय परत सुरु करण्यास तयार आहे पण त्यासाठी तक्रारदार यांनी दुसरे कनेक्शन कंपनीकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार ही रदद होण्यास पात्र आहे.
11. तक्रारदार यांची तक्रार दाखल कागदपत्रे तसेच शपथपत्र, सामनेवाला यांचा लेखीखुलासा , शपथपत्र व दोन्ही बाजुंचा युक्तीवाद यासर्वांचे अवलोकन केले असता न्याय मंचापुढे खालील मुददे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
(1) सामनेवाला यांनी तक्रारदारास
दयावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे
काय ? नाही .
(2) अंतिम आदेश काय आहे ? शेवटी दिल्याप्रमाणे.
विवेचन
12. मुद्या क्र. 1 – तक्रारदार यांचा आक्षेप असा आहे की,सामनेवाला नं.1 यांच्याकडून तक्रारदार यांनी सन-2002 मध्ये गॅस कनेक्शन घेतले होते व त्यांचा गॅस क्रमांक-15999 आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक होते व आहे त्यामुळे ता.09.09.09 पर्यंत त्यांना सिलेंडरचा पुरवठा नियमीत करण्यात येत होता. परंतु ता.02.10.09 रोजी तक्रारदार यांना त्यांच्या नावावर दोन कनेक्शन आहेत असे सांगण्यात आले तसेच दुस-या गॅस कनेक्शनचा नं.18127 असा असुन कंपनीच्या नियमा प्रमाणे एकाच नावावर दोन कनेक्शन असतील तर एक कनेक्शन जमा करावे असे सांगण्यात आले. तक्रारदार यांच्याकडे 18127 या ग्राहक क्रमांकाचे गॅस कनेक्शन नव्हते व नाही त्यामुळे तक्रारदार ते कनेक्शन जमा करुन शकत नाही व कनेक्शन जमा करु न शकल्याने तक्रारदार यांचा ग्राहक क्रमांक-15999 या कनेक्शन वरील सिलेंडरचा पुरवठाही बंद करण्यात आलेला आहे. तक्रारदार यांनी दुसरे कनेक्शन घेतलेले नसतांना सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे अधिकृत गॅस कनेक्शन क्रमांक-15999 हे सिल करुन सेवेत त्रुटी केलेली आहे.
13. तक्रारदार यांचा आक्षेपावर सामनेवाला नं.1 व 2 यांनी आपला लेखी खुलासा दाखल केलेला आहे. सामनेवाला यांचे म्हणणे की, तक्रारदार यांचे नावावर दोन कनेक्शन पुणे येथील अधिका-यांनी ओळखुन काढले आणि तक्रारदाराच्या नांवे दोन कनेक्शन असल्यामुळे त्याला एक कनेक्शन सरेंडर करण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली. आणि त्यानंतरही तक्रारदार यांनी कनेकशन जमा न केल्यामुळे सामनेवाला यांना तक्रारदाराचे ग्राहक क्रमांक-15999 हे गॅस कनेक्शनही बंद करावे लागले. सामनेवाला यांनी तक्रारदारास दुसरे कनेक्शन जमा करण्यास पुरेपुर संधी दिली होती. सामनेवाला तक्रारदारास गॅस सिलेंडरचा सप्लाय परत सुरु करण्यास तयार आहे परंतु तक्रारदार यांनी दुसरे कनेक्शन कंपनीकडे जमा करणे आवश्यक आहे.
14. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे फक्त एकच म्हणजे ग्राहक क्रमांक - 15999 हे गॅस कनेक्शन आहे आणि ते घेतांना त्यांनी क्रमांक-पी.जी.539788 ही शिधापत्रीका दाखल केलेली होती. त्यामुळे गॅस कनेक्शन 18127 हे त्यांच्या नावावर कोणी घेतले याबाबत त्याला माहिती नाही तसेच गॅस क्रमांक - 18127 वरील गॅस सिलेंडरचा वापर कधीही केलेला नाही. त्यामुळे ते कनेक्शन कोण वापरत होते याबाबत तक्रारदारास काहीही माहित नाही आणि ते कनेक्शन तक्रारदाराकडे नसल्यामुळे तक्रारदार ते जमा करु शकत नाही.
15. वरील परिस्थीतीत सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराची गॅस क्रमांक-15999 चे कनेक्शन बंद केले आहे ते योग्य आहे का ? हे पाहणे आवश्यक ठरते आम्ही सामनेवाला यांनी दाखल केलेल्या इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या Circular 31 व Circular 60 चे अवलोकन केले त्यामध्ये स्पष्टपणे नमुद केले आहे की, एखादया ग्राहकाकडे जर एकाच नावावर Multiple Connection असतील तर त्यापैंकी एक कनेक्शन जमा करुन सिक्युरीटी डिपॉझीट हे परत न्यावेत व दुसरे कनेक्शन चालु ठेवावे आणि ग्राहकांनी जर एक कनेक्शन जमा केले नाही तर गॅस कंपनीने दुस-या कनेक्शन वरील गॅस पुरवठा सुध्दा बंद करावा.
दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तक्रारदार यांचे नावावर दोन रेशनकार्ड असल्याचे दिसुन येते व दोन्ही रेशन कार्डचे क्रमांकही वेगवेगळे आहेत. तसेच दोन वेगळया नंबरचे रेशनकार्ड देऊन तक्रारदार यांनी एकाच नावावर दोन गॅस कनेक्शन घेतल्याचे दिसून येते.
16. दाखल कागदपत्रांचे अवलोकन करुन इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या निर्देशांनुसार सामनेवाला नं.1 व 2 यांनी तक्रारदार यांनी दोन कनेक्शनपैकी एक कनेक्शन जमा न केल्यामुळे तक्रारदाराचे दुसरे ( ग्राहक क्रमांक-15999) या कनेक्शनवर देखिल गॅस पुरवठा देणे बंद केले. त्यामुळे सामनेवाला नं.1 व 2 यांनी तक्रारदाराचा गॅस पुरवठा बंद केला, तो इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या निर्देशानुसार केला आहे हे स्पष्ट होते.
17. वरील परिस्थितीत सामनेवाला नं.1 व 2 यांनी तक्रारदाराचा गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करुन सेवेत त्रुटी केली आहे असे म्हणता येणार नाही त्यामुळे आम्ही मुददा क्रमांक-1 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
18. मुद्या क्र. 2 – वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आदेश
(1) तक्रारदार यांची तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
(2) तक्रारदार व सामनेवाला यांनी आपआपला खर्च सोसावा.
ठिकाण- नंदुरबार.
दिनांक- 20/06/2012.
सौ.निता एन.देसाई डी.डी.मडके
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,नंदुरबार