निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 22/04/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/05/2013
तक्रार निकाल दिनांकः- 18/02/2014
कालावधी 09 महिने. 16 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
श्रीमती सविता भ्र.भगवानराव ढाले, अर्जदार
वय 38 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.चोखट व्हि.पी.
रा. मोरेगाव ता.सेलु जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषि अधिकारी, गैरअर्जदार.
कृषी कार्यालय, सेलु,ता.सेलु जि.परभणी. स्वतः
2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः
डेक्कन इन्शुरन्स अँड रि इन्शुरन्स ब्रोकर प्रा.लि.
6, फरकडे भवन, भानुदास नगर,बीग बाजारच्या पाठीमागे,
आकाशवाणी चौक, जालना रोड, औरंगाबाद.
3 मा.विभागीय व्यवस्थापक, अॅड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडीया अॅशुरन्स कं.लि.
प्रधान कार्यालय, दि. इंडीया अॅशुरन्स बिल्डींग 87,
महात्मा गांधी मार्ग, फोर्ड मुंबई 400 001.
4 मा.शाखा व्यवस्थापक,
न्यु इंडीया अॅशुरन्स कं.लि.
यशोदिप बिल्डींग, नानलपेठ, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत पतीचा विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तिचे पती नामे भगवानराव ढाले हे दिनांक 28/04/2011 रोजी स्वतःच्या मोटार सायकलवर बसले असता ट्रक नं.MP 09 K 9576 च्या चालकाने सदरची ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन अर्जदाराच्या पतीस जोरदार धडक दिली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सेलु येथील सरकारी दवाखान्यात पी.एम. करण्यात आले. व मरणोत्तर पंचनामा करण्यात आला, सदर अपघाताच्या घटनेबाबत पोलीसांनी सदर ट्रकच्या चालकावर 304 A IPC प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला, ज्याचा गुन्हा क्रमांक 55/11 असा आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तिचे पती हयात असतांना मौजे मोरेगाव ता.सेलु येथील गट नं. 50 मधील त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये शेती कसून खात होते. याबद्दल तिच्या पतीचे नाव 7/12, 8 अ, 6 ड, व 6 क प्रमाणपत्रावर आलेली आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीच्या अपघाती मृत्यू नंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा, म्हणून तिच्या मयत पतीचा विमादावा सर्व कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केला व त्यांनी तो विमादावा जिल्हा कृषी अधिक्षकाकडे पाठविला. व त्यानी तो गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठविला. व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी कागदपत्राची छाननी करुन तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठविला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरच्या विम्यादाव्या बाबत तिने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विचारणा केली असता, त्यावेळीस गैरअर्जदार क्रमांक 1 ने उत्तर दिले की, तुमचा विमादावा मंजुरीसाठी पाठविला आहे, मंजूर झाल्यानंतर तुम्हास कळवु.
अर्जदाराचे म्हणणे की, परत एकदा त्यानी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना विमा दाव्याबाबत चौकशी केली असता, त्याने तुमचा विमादावा विमा कंपनीने नामंजूर केला, असे उत्तर दिले. व त्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने “ अर्जदाराचा विमादावा वैध वाहन चालक परवाना नसल्यामुळे तुमचा विमादावा नामंजूर केल्याचे अर्जदारास पत्र दिले ” सदरचे विमा कंपनीचे कारण योग्य नाही व सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करण्यात यावी, व गैरअर्जदाराना आदेश करावा की, त्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत गैरअर्जदाराने तिच्या मयत पतीच्या विमादाव्यापोटी 1,00,000/- रु. अर्जदारास तिचे पती मृत्यू झाल्या तारखे पासून द.सा.द .शे. 18 टक्के दराने द्यावेत व तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी 25,000/- रु. व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश करावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 13 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये Repudiation Letter, क्लेमफॉर्म भाग 1, 2 व 3, अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र, 7/12 उतारा, होल्डींग, 8 अ, फेरफारची नक्कल, गाव नमुना, 6 क, ओळखपत्र, मयताचे ओळखपत्र, घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर., मृत्यू दाखला प्रमाणपत्र, बँक पासबुक इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 16 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, कै.भगवान शंकरराव ढाले यांचा दिनाक 28/04/2011 रोजी ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला व त्याचा अपघात विमादावा अर्जदाराने आमच्याकडे दाखल केला व त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी कडे पाठविला, त्यानंतर जिल्हा अधिक्षकांनी वाहन चालविण्याचा परवाना फेरफार, व मरणोत्तर पंचनामा, विमा दाव्यासोबत जोडलेला नाही, असे कळविले. त्याप्रमाणे आम्ही अर्जदारास दिनांक 23/09/2011 रोजी सदर कागदपत्राची पुर्तता करा म्हणून कळविले व त्याप्रमाणे अर्जदाराने फेरफार नक्कल तिन प्रतीत कार्यालयास सादर केले वाहन चालक परवाना नुतनीकरण न केलेमुळे सदर विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला आहे असे माहितीस्तव.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 7 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, आमची संस्था ही विनीयामक आणि विकास प्राधीकरण मान्यता प्राप्त विमा सेवा देणारी संस्था आहे. आमच्या अशिलास विमा सेवा पुरविणे आणि विमा कंपनी आणि आमचे आशील यांचेत मध्यस्थ म्हणून काम करणे. एवढेच मर्यादित काम आमची संस्था करते या नेमणुकीसाठी आम्ही शासनातर्फे कोणत्याही प्रकारची फी घेतलेंली नाही आम्ही आमचे कार्य केलेले आहे. अर्जदारास आम्ही कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. म्हणून सदर तक्रारीतून आम्हांस जबाबदार धरण्यात येवु नये.
गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 वकीला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 10 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. अर्जदार ही आमची ग्राहक नाही व तीने हप्त्यापोटी आमच्याकडे रक्कम भरलेली नाही. व ग्राहक संरक्षण कायद्या प्रमाणे सदरची तक्रार मंचासमोर चालु शकत नाही. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही
अर्जदाराचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 कडून त्यांच्याकडे प्राप्त झाला, त्यानंतर सदर विमा प्रस्तावाच्या कागदपत्राची पहाणी केली असता त्यांना असे निदर्शनास आले की, मयताचे अपघतावेळी Valid Driving License नव्हते व अपघातावेळी अर्जदाराचे मयत पती मोटार सायकल नं. MH – 22 J-5573 हे वाहन चालवत होते. व अर्जदाराचे मयत पती हे लायसेन्स नसतांना वाहन चालवत होते व पॉलिसीच्या नियम व अटी प्रमाणे Valid Driving License आवश्यक आहे व ते नसलेमुळे विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला व सदरचा विमादावा निकाली काढण्यापूर्वी अर्जदारास मयत पतीचे Driving License दाखल करा म्हणून अनेक वेळा कळविले होते, परंतु त्याने ते दाखल केले नाही, म्हणून शेवटी दिनांक 17/11/2011 रोजीच्या पत्राव्दारे गैरअर्जदार क्रमांक 2 यास विमादावा नामंजूर केल्याचे कळविले. विमा कंपनीने योग्यच कारण देवुन अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला आहे व अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 11 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
विमा कंपनीने पुराव्याबाबत नि.क्रमांक 14 वर पॉलिसीची प्रत दाखल केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 विमा कंपनीने शेतकरी अपघात
योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत पतीचा विमादावा मंजूर
करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे मयत पतीस नामे भगवान शंकर ढाले यास मौजे मोरेगाव ता.सेलु येथे गट नं. 50 मध्ये त्यांच्या मालकीची 2 हेक्टर शेतजमीन होती व शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत ते लाभार्थी होते. ही बाब नि.क्रमांक 4/6 वरील 7/12 उतारा, नि.क्रमांक 4/7 वरील गाव नमुना नं. 8 (अ) नि.क्रमांक 4/9 वरील फेर क्रमांक 1115 च्या फेरफार नकलेच्या प्रतीवरुन सिध्द होते.
अर्जदार ही मयत भगवान शंकर ढाले यांची पत्नी व वारसदार आहे, ही बाब नि.क्रमांक 4/10 वरील गाव नमुना नं. 6 क च्या प्रतीवरुन दिसून येते.
अर्जदाराच्या मयत पतीचा दिनांक 28/04/2011 रोजी सेलुहून गावाकडे MH-22-J 5573 या मोटार सायकलने जात असतांना ट्रक नं. MP 09 K 9576 च्या चालकाने भरधाव निष्काळजीपणाने वाहन चालवुन अर्जदाराच्या मयत पतीच्या गाडीच्या डाव्या बाजुला धडक देवुन गंभीर जखमी केले व त्यात अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाला, ही बाब नि.क्रमांक 19/1 वर दाखल केलेल्या एससीसी नं. 99/2011 JMFC सेलू State V/s Shaik Afsar प्रकरणातील बळीराम मगरच्या फिर्यादीच्या प्रतीवरुन सिध्द होते. व तसेच सदरची बाब नि.क्रमांक 19/2 वरील गुन्हा नं. 62/11 JMFC सेलुच्या Charge Sheet च्या प्रतीवरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराच्या पतीचा मृत्यू सदर अपघातामुळेच झाला होता, ही बाब नि.क्रमांक 4/14/1 वरील P. M. Report वरुन सिध्द होते.
अर्जदाराने तिच्या पतीच्या अपघाती मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावा लाभ मिळावा म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमादावा दाखल केला होता, ही बाब नि.क्रमांक 4/4 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग -3 व तसेच नि.क्रमांक 4/3 वरील क्लेमफॉर्म भाग -2 व नि.क्रमांक 4/2 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग -1 वरुन सिध्द होते.
अर्जदाराचा सदर विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 विमा कंपनीने Invalid Driving License चे कारण दाखवुन फेटाळला होता, ही बाब नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या Repudiation Letter वरुन सिध्द होते.
याबाबत विमा कंपनीचे म्हणणे की, सदर अपघाताच्या वेळी मयताजवळ Valid Driving License नव्हतें व याबाबत अर्जदारास त्यानी अनेक वेळा सदरचे कागदपत्र मागणी करुनही दाखल केले नाही, त्यामुळे विमा कंपनीने पॉलिसीच्या नियमा प्रमाणे अर्जदाराचा विमादावा फेटाळला आहे. याबाबत विमा कंपनीने पॉलिसीची प्रत नि. क्रमांक 14 वर दाखल केलेली आहे. सदर पॉलिसीच्या नियमाचे अवलोकन केले असता ते खालील प्रमाणे दिसून आले.
(VI) Other documents required for specific kinds or accident.
( A) Road Accident / Railway Accident.
1) First information Report (F I R)
2) Spot Panchnama
3) Inquest Panchnama
4) Post Mortem Report
5) Valid driving license
Considering the motor vehicle facilities in the area in which the farmers are staying, claims arising due to some accidents as stated in (1) to (3) below will be considered as payable in case the documents stated above are submitted.
1. Accidents occurring due to carrying of passenger in excess of the capacity of vehicles.
All farmers except the one who is driving should be eligible for the claim.
2. Accidents occurring where the driver does not have
a valid driving license.
All Farmers except the one who is driving should be
eligible for the claim.
3. Accidents occurring where the motor vehicle does
not have proper permit.
All farmers except the one who is driving without
holding proper permit should be eligible for claim.
प्रस्तुत प्रकरणात अपघाता वेळी अर्जदाराचे मयत पती हे मोटार सायकल क्रमांक MH-22-J 5573 ने सेलुहून गावाकडे जात असता ट्रक अपघात झाला व मयत झाले, ही बाब नि.क्रमांक 19/1 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते. सदर कागदपत्रा वरुन एक बाब निश्चित दिसते की, अपघातावेळी अर्जदाराचे मयत पती गाडी चालवत होते.
गैरअर्जदार विमा कंपनीच्या मागणी नुसार अर्जदाराने मयताचे ड्रायव्हींग लायसेन्स विमा कंपनीकडे दाखल केले होते, आपल्या तक्रारीत कोठेही नमुद केले नाही व या बाबत अर्जदाराने मंचासमोर कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा आणला नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या केसलॉ मधील वस्तुस्थिती व प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थिती वेगळी आहे.
मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये. या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे.
विमा कंपनीने पॉलिसीच्या नियमा प्रमाणे अर्जदाराने मयताचे D/L दाखल न केल्यामुळे विमादावा फेटाळल्याचे दिसून येते.
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे कोठेही दिसून येत नाही, तरी पण अर्जदारास तिच्या मयत पतीचे Driving License विमा कंपनीकडे सादर करण्यासाठी नैसर्गिक न्यायतत्वा प्रमाणे परत एकदा संधी देणे योग्य व न्यायाचे
वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 अर्जदाराने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत मयत भगवान
ढाले यांचे वैध Driving License गैरअर्जदार क्रमांक 4 मार्फत गैरअर्जदार
क्रमांक 3 विमा कंपनीकडे सादर करावा, व गैरअर्जदार विमा कंपनीने सदरचे
Driving License अर्जदाराकडून प्राप्त झाल्या तारखे पासून 15 दिवसाच्या
आत अर्जदाराचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा
विमादावा निकाली काढावा.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.