जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 182/2022. तक्रार दाखल दिनांक : 15/06/2022. तक्रार निर्णय दिनांक : 01/06/2023.
कालावधी : 00 वर्षे 11 महिने 17 दिवस
गजानन पि. श्रीराम वडमिले, वय 35 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. धानोरा (बु.), ता. अहमदपूर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) हेमानी इंटरप्राईजेस प्रा. लि., 501 अपलम स्प्रिंग प्लाझा, गोल्फ
कोर्स रोड, सेक्टर 54, गुरुग्राम, गुडगाव, हरियाणा - 122 002.
(2) स्नॅपडील प्रायव्हेट लिमिटेड, सहावा मजला, सायबर स्केप, गोल्फ
कोर्स एक्स्टेंशन रोड, सेक्टर 59, गुरुग्राम, गुडगाव, हरियाणा-122 002. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- सलीम आय. शेख
विरुध्द पक्ष :- अनुपस्थित / एकतर्फा चौकशी
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या स्नॅपडील ॲपद्वारे 'पतंजली गिलोय घनवटी' च्या 2 नग-वस्तू 50 टक्के सवलतीमध्ये म्हणजेच रु.499/- ऐवजी रु.249/- मुल्यामध्ये विक्रीस ठेवलेल्या होत्या. दि.20/1/2022 रोजी तक्रारकर्ता यांनी 'पतंजली गिलोय घनवटी' 2 नग-वस्तू खरेदी केल्या आणि त्याचा ऑर्डर आय.डी. 44139498076 होता. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना 'पतंजली गिलोय घनवटी' वस्तू पाठवून दिल्या आणि त्याकरिता रु.249/- मुल्य तक्रारकर्ता यांनी अदा केले. 'पतंजली गिलोय घनवटी' प्राप्त झाल्यानंतर वस्तू पाहणीअंती त्यावर प्रतिवस्तू रु.100/- एम.आर.पी. दिसून आली. मात्र विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी रु.49/- अतिरिक्त वसूल केले आणि त्यांची फसवणूक केली. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे नमूद करुन रु.49/- व्याजासह परत करण्याचा; शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- नुकसान भरपाई देण्याचा व रु.10,000/- ग्राहक तक्रार खर्च देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, त्यांनी अभिलेखावर दाखल केलेल्या कागदपत्रे व लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले.
(4) तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर 'पतंजली गिलोय घनवटी' खरेदी केल्यासंबंधी पावती व 'पतंजली गिलोय घनवटी' वस्तुच्या छायाप्रती दाखल केल्या आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले आणि तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व दाखल पुराव्यांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला नाही. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्रांना विरोधी पुरावा नाही.
(5) वाद-तथ्ये व अभिलेखावर दाखल कागदपत्रांची दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी 'पतंजली गिलोय घनवटी' वस्तू खरेदी केल्याचे निदर्शनास येते. असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 यांच्या ई-कॉमर्स संकेतस्थळाचा वापर करुन विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून 'पतंजली गिलोय घनवटी' वस्तू खरेदी केल्या आहेत. 'पतंजली गिलोय घनवटी' वस्तुच्या विक्री जाहिरातीनुसार 2 नगाकरिता रु.499/- मुल्य नमूद करुन 50 टक्के सवलत दिल्यानंतर रु.249/- विक्री मुल्य दर्शविलेले आहे. मात्र 'पतंजली गिलोय घनवटी' 1 नग-वस्तुचे कमाल मुल्य रु.100/- दिसून येते. तसेच पावतीनुसार 2 नगाकरिता मुल्य रु.211.02 पैसे व IGST रु.37.98/- असे एकूण रु.249/- मुल्य दर्शविलेले आहे. उक्त बाबी पाहता 'पतंजली गिलोय घनवटी' च्या 1 नग-वस्तुचे मुल्य कमाल मुल्य रु.100/- असताना विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ई-कॉमर्स संकेतस्थळावर 2 नग-वस्तुकरिता रु.499/- दर्शवून अनुचित विक्री पध्दतीचा अवलंब केल्याचे निदर्शनास येते. शिवाय, 'पतंजली गिलोय घनवटी' च्या 1 नग-वस्तुचे मुल्य कमाल मुल्य रु.100/- असताना विरुध्द पक्ष क्र.1 यांनी 2 नग-वस्तुकरिता रु.249/- म्हणजेच रु.49/- अतिरिक्त वसूल केल्याचे निदर्शनास येते.
(6) मुख्यत: विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन फसवणूक केली, असा तक्रारकर्ता यांचा वाद आहे. वाद-तथ्ये व कागदोपत्री पुरावे पाहता 'पतंजली गिलोय घनवटी' विक्री करताना कमाल विक्री मुल्यपेक्षा अतिरिक्त रक्कम वसूल करुन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सेवेमध्ये त्रुटी व अनुचित प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते.
(7) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून रु.49/- व्याजासह परत मिळावेत, अशी तक्रारकर्ता यांची विनंती उचित असल्यामुळे रु.49/- दि.20/1/2022 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने परत करण्याचा आदेश करणे न्याय्य आहे.
(8) तक्रारकर्ता यांनी आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. नुकसान भरपाईच्या रकमेची निश्चिती त्या–त्या परिस्थितीजन्य गृहीतकावर अवलंबून असते. असे दिसते की, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वस्तुच्या मुळ मुल्यापेक्षा अतिरिक्त रक्कम वसूल केल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि त्यामुळे तक्रारकर्ता यांना त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.3,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- मंजूर करणे न्याय्य ठरेल, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(9) उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना रु.49/- परत करावेत.
तसेच, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी रु.49/- वर दि.20/1/2022 पासून उक्त रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-