Dated the 17 Nov 2015
न्यायनिर्णय
द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य.
1. सामनेवाले नं.1 ते 3 मध्य रेल्वे, भारत सरकार या संस्थेचे पदाधिकारी आहेत. तक्रारदार हे अंबरनाथ येथील वयोवृध्द गृहस्थ आहेत. तक्रारदारांनी आरक्षण केलेल्या तिकीटानुसार त्यांना आरक्षण सुविधा प्राप्त न झाल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2. तक्रारदार यांच्या तक्रारीमधील कथनानुसार, त्यांनी ता.08.02.2011 रोजी गाडी क्रमांक-14313 मधुन ता.02.05.2011 रोजी प्रवास करण्यासाठी, अंबरनाथ रेल्वे स्थानकामधुन ता.06.02.2011 रोजी आरक्षण केले. त्यानुसार, त्यांना पी.एन.आर.नं.853-9514367 हे कल्याण ते बरेली पर्यंतचे आरक्षण तिकीट देण्यात आले. सदर तिकीटानुसार तक्रारदार, 3 ए या वातानुकुलीत डब्यामधुन सीट/स्लीपर क्रमांक-बी/2, 60 एल बी, कल्याण ते बरेली पर्यंत प्रवास करण्यास पात्र होते. ता.02.05.2011 रोजी तक्रारदार कल्याण स्टेशन येथे गेले असता बी-2 हा डबा रेल्वे इंजिनपासुन 14 वा असल्याबाबत व बी-1 हा डबा रद्द करण्यात आल्याची घोषणा सातत्याने करत असल्याचे तक्रारदाराच्या ध्यानात आले. त्याप्रमाणे तक्रारदार इंजिनपासुन 14 व्या क्रमांकावर असलेल्या बोगीमधील आसन क्रमांक-60 वर स्थानापन्न झाले. तथापि, सदर गाडी मनमाड स्टेशनवर आल्यानंतर सामनेवाले यांच्या अधिका-याने तक्रारदारास सदर सीटवरुन उठण्यास सांगितले व सदर सीट ही जसदीप कौर यांचे नांवे असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदार यांची सोय बोगी क्रमांक-बी-1 मध्ये, सीट क्रमांक-36 (द्वितिय श्रेणी शयनकक्ष) वर केली असल्याचे सांगण्यात आले. कल्याण स्टेशनवर होत असलेल्या उद्घोषणेनुसार बी-1 बोगी रद्द झाल्याची बाब तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे निदर्शनास आणुन सुध्दा त्यांनी तक्रारदारांचे म्हणणे न ऐकता, त्यांना सीटवरुन उठविले. परिणामतः तक्रारदारांना, बरेली पर्यंतचा प्रवास बोगीच्या दरवाजामध्ये बसुन करावा लागला. तक्रारदार हे वरिष्ठ नागरीक असल्याने, तसेच डायबेटीस व हृदयरोगी असल्याने त्यांना झालेल्या असुविधेमुळे तक्रारदारांना शारिरीक त्रास झाला. परिणामतः 5 दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्यापोटी रु.8,710/- इतका खर्च करावा लागला. शिवाय तक्रारदार जमीन व्यवहारासाठी गांवी जात असल्याने सामनेवाले यांचे गलथान कारभारामुळे त्यांना तो व्यवहार रद्द करावा लागला. यासर्व बाबींसंबंधी तक्रारदारांनी ता.23.11.2011 रोजी सामनेवाले यांना नोटीस दिली. तथापि, सामनेवाले यांना नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन तिकीटाचे पैसे रु.843/- परत मिळावेत, कायदेशीर भरपाईसाठी रु.50,000/-, इस्पितळाचे बील रु.8,710/-, कायदेशीर खर्चाबाबत रु.20,000/- व तक्रार खर्चाबाबत रु.10,000/- मिळावेत अशा मागण्या तक्रारदारांनी केल्या आहेत.
3. सामनेवाले यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांचे सर्व आक्षेप फेटाळतांना असे नमुद केले आहे की, तक्रारदारांना ट्रेन नं.14313 मधील (थर्डएसी) आसन क्रमांक बर्थ 60, कोच क्रमांक-बी/2, मध्ये ता.08.02.2011 रोजीच्या रिझर्वेशन प्रमाणे आसन देण्यात आले होते. तथापि, वातानुकुलीत बोगीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, बी-2 III AC, रद्द करुन त्याऐवजी शयनकक्ष (स्लिपर क्लास) II व्दितीय वर्ग बोगी जोडण्यात आली होती. व बी/2 वतानुकुलीत कोचमधील प्रवाशांची सोय सदर द्वितियवर्ग शयनकक्ष बोगीमध्ये करण्यात आली होती. तथापि, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला येथील कर्मचा-यांनी अनवधानाने, बी/2 थर्ड एसीबोगी रद्द झाल्याचे जाहिर करण्या ऐवजी बी/1 बोगी रद्द केल्याचे जाहिर केले व त्यानुसार चुकीची घोषणा देण्यात आली, व सदर घोषणा कल्याण स्टेशनवरुन सुध्दा करण्यात येत होती. तथापि, तक्रारदार यांची सोय बी/1 या द्वितिय श्रेणी बोगीमध्ये आसन/स्लिपर क्रमांक-36 वर करण्यात आली होती. सदर बाब तिकीट तपासनीस यांनी तक्रारदार यांना अनेकवेळा सांगुन सुध्दा, तक्रारदार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सामनेवाले यांची कोणतीही चुक नसल्याने, तक्रार फेटाळण्यात यावी.
4. तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद दाखल केला. सामनेवाले यांनी लेखी कैफीयत व पुरावा शपथपत्र दाखल केल्यानंतर त्यांना दिर्घकाळ लेखी युक्तीवाद दाखल करण्यास संधी दिली. परंतु त्यांनी ते दाखल न केल्यामुळे, सामनेवाले यांचे लेखी युक्तीवादाशिवाय तक्रार पुढे चालविण्यात आली. तोंडी युक्तीवादासाठीही सामनेवाले यांना संधी देण्यात आली. परंतु ते गैरहजर राहिल्याने तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. तक्रारदारांची शपथवरील कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाले यांची लेखी कैफीयत, व पुरावा शपथपत्र यांचे वाचन मंचाने केले. तसेच तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन प्रकरणात खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ. तक्रारदार यांनी ता.06.02.2011 रोजी अंबरनाथ स्टेशनवरुन ता.02.05.2011 रोजी कल्याण ते बरेली हा प्रवास करण्या करीता तिकीट क्रमांक- पी.एन.आर.नं.853-9514367 काढले होते व सदर तिकीटानुसार 3 एसी कोच क्रमांक-बी/2 सीट/ बर्थ क्रमांक 60 एलबी हे तक्रारदारांना देण्यात आले होते व त्या प्रीत्यार्थ तक्रारदारांनी सामनेवाले यांना रु.843/- ही रक्कम दिली होती, याबाबी अविवादित आहेत.
ब. ता.02.05.2011 रोजी सदरील गाडी क्रमांक-14313 ची बोगी क्रमांक-III AC , बी/2 इंजिनपासुन 14 व्या ठिकाणी असल्याची तसेच बोगी क्रमांक-बी/1 रद्द करण्यात आल्याची अनौन्समेंट वारंवार कल्याण स्थानकावर केली जात होती. तक्रारदार त्यानुसार इंजिन पासुन 14 व्या असलेल्या बोगीमध्ये जाऊन सीट क्रमांक-60 वर आसनस्थ झाले. सदर गाडीचा मनमाड पर्यंत प्रवास झाल्यानंतर, मनमाड स्टेशनमध्ये जसदिप कौर यांची बी/2 सीट आसन क्रमांक-60 असल्याचे कारण देऊन तिकीट तपासनीसाने तक्रारदारांना उठविले व एसी बी/2 ही बोगी रद्द झाली असुन त्या ऐवजी दुस-या वर्गाची बी/1 बोगी जोडण्यात आली असुन, त्या बोगीमध्ये सीट/आसन क्रमांक-36 ही तक्रारदारांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तथापि कल्याण स्टेशनमधील ध्वनी क्षेपणानुसार बी/1 ही बोगी रद्द झाल्याची बाब तक्रारदारांनी सामनेवाले यांना वारंवार सांगितली. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामतः तक्रारदारांचे थर्ड एसी स्लिपरचे कन्फर्म तिकीट असतांना त्यांना ती सीट सोडावी लागली व त्यांना दरवाजामध्ये खाली बसुन प्रवास करावा लागला.
क. सामनेवाले यांनी लेखी कैफीयतीमध्ये असे नमुद केले आहे की, थर्ड एसी बोगी क्रमांक बी/2 काही तांत्रिक कारणामुळे रद्द करावी लागली व त्या ऐवजी एक सेकंड क्लास स्लिपर कोच जोडण्यात आला. त्यामध्ये थर्ड एसी बी/2 कोच मधील प्रवाशांची सोय करण्यात आली. तथापि, लोकमान्य टिळक टर्मिनल मधील संबंधीत कर्मचा-यांच्या चुकीमुळे बी/2 ही बोगी रद्द झाल्याचे ध्वनिक्षेपण न करता बी/1 बोगी रद्द झाल्याचे ध्वनिक्षेपण केले जात होते. ही बाब कल्याण स्टेशनवर तसेच इतर सर्व स्टेशनवर सुध्दा पुकारली जात होती. एवढेच नव्हेतर, कल्याण स्टेशन तसेच इतर स्टेशन वरील ध्वनी क्षेपकांना ही चुकीची माहिती लेखी कळविण्यात आली होती ही बाब सामनेवाले यांनी मान्य केली आहेच. याशिवाय तक्रारदारांनी माहिती अधिकारा अंतर्गत प्राप्त केलेल्या माहितीवरुन देखील ही बाब स्पष्ट होते. म्हणजेच बी 1 बोगी रद्द झाल्याची उदघोषणा तिकीट तपासनिसांना तक्रारदार सांगण्याचा प्रयत्न करीत होते. तथापि, सदर टीटींनी तक्रारदारांचे म्हणणे न ऐकता त्यांनी तक्रारदारांना थर्ड एसी बोगीमधील आसनावरुन उठविले. त्यामुळे वयोवृध्द तक्रारदारांना नाहक त्रास सोसावा लागला. एवढेच नव्हेतर प्रवासात झालेल्या हाल अपेष्टांमुळे तक्रारदार आजारी पडले, व उपचारार्थ त्यांना बराच खर्च करावा लागला.
ड. वर नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी थर्ड एसीचे कन्फर्म रिझर्वेशन 80 पेक्षा जास्त दिवस अगोदर काढून सुध्दा, रिझर्वड बोगी रद्द केल्याची उद्घोषणा न करता चुकीची घोषणा केल्याने, तसेच,वयोवृध्द तक्रारदारांना आसनाची पर्यायी समकक्ष व्यवस्था न करुन देण्यास सामनेवाले यांची सदोष सेवा कारणीभुत ठरते ही बाब स्वयंस्पष्ट होते.
इ. आर.पी नं.2792 /2008 नॉर्थ वेस्टर्न रेल्वे विरुध्द कृष्ण गोयल 2008 (4)CPJ 210 या प्रकरणामध्ये तक्रारदराने प्रवासापुर्वी कन्फर्म तिकीट काढून सुध्दा त्यांचे आसन असलेली बोगी नसल्याने, तक्रारदारांसाठी पर्यायी आसन व्यवस्था केली नसल्याने त्यांना टॅक्सीने प्रवास करावा लागला. सदर बाब ही सामनेवाले यांची सदोष सेवा होत असल्याने मा.राष्ट्रीय आयोगाने तक्रारदारास नुकसानभरपाई देण्याचे आदेश केले.
युनियन ऑफ इंडिया विरुध्द महेंद्रकुमार अगरवाल 2008(4) CPJ 212 या प्रकरणामध्ये तक्रारदारांचे प्रथम श्रेणीचे आरक्षित तिकीट असतांना प्रथमवर्गातुन प्रवास करण्यास तक्रारदारांना नकार देऊन, त्यांना व्दितिय वर्गातुन प्रवास करण्यास भाग पाडल्याने, तक्रारदारास रु.10,000/- नुकसानभरपाई देण्याचे आदेश मा.राष्ट्रीय आयोगाने केले.
विजय त्रिपाठी विरुध्द डिव्हीजनल मॅनेजर, नॉर्थ रेल्वे प्रथम अपील क्रमांकः32/2013 निकाल ता.23.01.2013, या प्रकरणामध्ये तक्रारदाराने व्दितिय वर्ग वातानुकुलीत आसनाचे कन्फर्म तिकीट आरक्षित केले होते. तथापि, प्रवासाचे वेळी व्दितिय वर्ग वातानुकूलीत बोगीच नसल्याने त्यांना व्दितिय वर्गाने प्रवास करावा लागला. तक्रारदारांकडे झोपण्यासाठी आवश्यक वस्तु नसल्याने, व विशेषतः हिवाळयाचे दिवस असल्याने त्यांना प्रवासामध्ये त्रास झाला. त्यामुळे मा.उत्तराखंड राज्य आयोगाने तक्रारदारांना नुकसानभरपाई दिली.
6. उपरोक्त न्यायनिर्णयामधील तथ्यांश विचारात घेतल्यास, तक्रारदारांनी प्रवासापुर्वी 80 दिवस अगोदर कन्फर्मड रिझर्वेशन करुनही सामनेवाले यांनी बोगीच्या झालेल्या बदलाबाबतची कोणतीही पुर्वसुचना दिली नाही व कल्याण स्थानकावर चुकीची उद्घोषणा सातत्याने केल्याने, शिवाय, तक्रारदारांचे वय व आरक्षित वातानुकुलीत श्रेणीचे तिकीट विचारात न घेता, त्यांची पर्यायी व योग्य व्यवस्था न करता त्यांची गैरसोय केली ही बाब स्पष्ट होते.
7. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
8. “ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
आदेश
1. तक्रार क्रमांक-197/2012 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी आरक्षित तिकीटधारक तक्रारदार यांना प्रवासामध्ये सेवा सुविधा
देण्यामध्ये कसुर केल्याचे जाहिर करण्यात येते.
3. तक्रारदारांचे थर्ड एसी बर्थ क्र. 60 एल.बी. हे कन्फमर्ड तिकिट असतांनाही त्यांची समकक्ष आसनव्यवस्था न केल्याने सामनेवाले यांनी तिकिटाची 50% रक्कम म्हणजे रु. 422/- ही तक्रारदारांना दि. 32/12/2015 पूर्वी अदा करावी. अन्यथा दि.01/01/2016 पासून आदेशपूर्ती होईपर्यंत 6% व्याजासह संपूर्ण रक्कम अदा करावी.
3. सामनेवाले यांनी ता.31.12.2015 पुर्वी तक्रारदारांना नुकसानभरपाईसाठी, रक्कम
रु.10,000/- तसेच (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) तक्रार व इतर खर्चाबाबत रु.10,000/-
(अक्षरी रुपये दहा हजार) अशी एकूण रक्कम रु.20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार)
दयावी. आदेशपुर्ती विहीत मुदतीमध्ये न केल्यास ता.01.01.2016 पासुन आदेशपुर्ती
होईपर्यंत दरसाल दर शेकडा 9 टकके व्याजासह संपुर्ण रक्कम अदा करावी.
4. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
5. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.