जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 268/2012
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-06/12/2012.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 14/02/2014.
मे.हितेश प्लॅस्टीक्स प्रा.लि.,
प्लॉट नं.जे-59, अडीशनल एम.आय.डी.सी एरिया,
जळगांव,ता.जि.जळगांव तर्फे प्राधिकृत व्यक्ती,
श्री.संदीप एम.सोनवणे,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.जळगांव, ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
सन्डीज एलीव्हेटर्स प्रा.लि.,
1) रजिस्ट्रर्ड ऑफीस 83/19, संत ज्ञानेश्वर कॉलनी,
शास्त्री नगर, विठठल मंदीराशेजारी,कोथरुड, पुणे 38.
2) 57/3, मोर्य विहार, सहजानंद सोसायटी,क्यू बिल्डींग,
कोथरुड, पुणे 38. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.पी.जी.मुंधडा वकील.
विरुध्द पक्ष तर्फे श्री.संभाजी गायकवाड वकील.(नो-से)
निकालपत्र
श्री.विश्वास दौ.ढवळे,अध्यक्षः तक्रारदाराकडुन रक्कम स्विकारुनही त्याचे ऑर्डर प्रमाणे लिफट बसवुन न देऊन केलेल्या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार ही कंपनी कायदा,1956 नुसार नोंदलेली खाजगी कंपनी असुन जळगांव येथे विविध प्रकारचे झाकणे उत्पादन करण्याचा उद्योग करते. तक्रारदार कंपनीस तळमजल्यावरील उत्पादीत केलेला तयार माल पहील्या मजल्यावर ठेवण्याकरिता लिफटची तातडीने आवश्यकता होती त्यामुळे तक्रारदाराने इंटरनेटव्दारे गुडस होईस्ट लिफट बाबत माहिती मिळवली असता विरुध्द पक्ष कंपनी सदरचे लिफटचे उत्पादन करुन विक्री करण्याचे काम करते असे तक्रारदाराला समजले. तक्रारदाराने विरुध्द पक्ष कंपनीशी केलेल्या संपर्कानुसार विरुध्द पक्ष कंपनीचे डायरेक्टर श्री.संदीप शिंदे यांनी दि.30/07/2010 रोजी जळगांव येथे गुडस होईस्ट लिफटच्या बाबत संपुर्ण माहिती तक्रारदारास दिली व टेक्नीकल डाटाशिट तक्रारदारास देऊन तक्रारदाराच्या कंपनीची पाहणी केली व त्यानंतर सदर लिफटचे उभारणीकरता व बसविण्याकरिता लागणारा एकुण खर्च रु.5,25,000/- चे कोटेशन तक्रारदार कंपनीस दिले. त्यानुसार तक्रारदार कंपनीने त्याच दिवशी रक्कम रु.1,50,000/- एच.डी.एफ.सी.बँक,जळगांव चा चेक क्र.003350 दि.30/07/2010 अन्वये विरुध्द पक्ष कंपनीस दिला त्यानंतर सहा आठवडयात एक गुडस होईस्ट लिफट बसवुन द्यावयाची असे ठरले परंतु दि.30/07/2010 पासुन दिड महीना पावेतो गुडस हॉईस्ट लिफट बसविण्याकरिता व तिचे फ्रेंमिंगचे काम करण्याकरिता विफध्द पक्ष कंपनीचे इंजिनिअर आले नाहीत व लिफटचा मालही विरुध्द पक्षाने पाठविला नाही. तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे वेळोवेळी चौकशी केली असता विरुध्द पक्ष कंपनीने तक्रारदाराकडे आणखी अडव्हान्स रक्कमेची मागणी केली व त्यानुसार तक्रारदार कंपनीने दि.16/09/2010 या तारखेचा चेक क्रमांक 301512 रक्कम रु.1,50,000/- भारतीय स्टेट बँक, मुंबई शाखेचा दिला. त्यानंतर एक महीन्यानंतर दि.14/10/2010 रोजी विरुध्द पक्ष कंपनीकडुन लिफट बसविण्यासंबंधीचा अंशतः माल तक्रारदार कंपनीस प्राप्त झाला व त्यासाठी अतिरिक्त खर्च रु.8,000/- विरुध्द पक्ष कंपनीच्या वतीने तक्रारदार कंपनीस द्यावे लागले. त्यानंतर दि.26/10/2010 रोजी विरुध्द पक्ष कंपनीचे इंजिनिअर श्री.कोल्हे व विक्रेता प्रतिनिधी श्री.मिथून यांनी तक्रारदार कंपनीस भेट दिली व लिफट बसविण्याचे ठिकाण निश्चित केले. त्यानंतर दि.5/11/2011 रोजी विरुध्द पक्ष कंपनीचे संचालक श्री.संदीप शिंदे व त्यांचे सहयोगी लिफट बसविण्यासाठी तक्रारदार कंपनीत दाखल झाले आणि दोन ते तीन दिवसानंतर लिफट न बसविताच आजारपणाचे कारण सांगुन निघुन गेले. तक्रारदाराने वेळोवेळी संपर्क केला असता विरुध्द पक्ष कंपनीने काहीएक प्रतिसाद दिला नाही.
3. विरुध्द पक्ष कंपनीला एकुण रु.3,08,000/- आगाऊ देऊनही त्यांनी लिफटचे काम न केल्याने तक्रारदार कंपनीचे आर्थिक नुकसान होऊन गैरसोय झाली. शेवटी तक्रारदार कंपनीस लिफटची गरज असल्याने त्यांनी नाईलाजास्तव दि.23/12/2010 रोजी प्रॅक्टीकल एलिव्हेटर्स या दुस-या कंपनीस लिफट बसविण्याचे काम दिले. विरुध्द पक्ष कंपनीकडुन तक्रारदारास लिफट बसविण्यासाठी आलेल्या मालाची किंमत रु.1,41,000/- इतकी आहे त्याव्यतिरिक्त काहीएक खर्च लागलेला नाही. त्यामुळे तक्रारदार कंपनीस आगाऊ दिलेल्या रक्कमेतुन आलेल्या मालाची किंमत वजा जाता राहीलेली रक्कम रु.1,67,000/- घेणे आहे. अशा रितीने तक्रारदार कंपनीने विरुध्द पक्ष कंपनीस दिलेल्या ऑर्डरप्रमाणे त्यांनी लिफटही बसुवन दिली नाही अगर तक्रारदार कंपनीने दिलेले पैसेही परत केले नाहीत. सबब विरुध्द पक्ष कंपनी यांनी तक्रारदार कंपनीस रु.1,67,000/-, मानसिक व इतर त्रासापोटी रु.1,00,000/-अशी एकुण रक्कम रु.2,67,000/- तक्रार दाखल तारखेपासुन तक्रारदार कंपनीस मिळेपावेतो द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी, तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.33,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदार कंपनीने केलेली आहे.
4. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष हे वकीलामार्फत या मंचासमोर हजर झाले तथापी मुदतीत लेखी म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द नो-से आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
5. तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र, दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता तसेच तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार कंपनीस सदोष सेवा
दिलेली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
6. मुद्या क्र.1 - तक्रारदार कंपनी ही विविध प्रकारचे झाकणे तयार करण्याचा उद्योग जळगांव येथे करते. कंपनीचे तळमजल्यावरील उत्पादीत माल पहील्या मजल्यावर चढवणेकामी लिफटची आवश्यकता असल्याने तक्रारदार कंपनीने इंटरनेटवरुन केलेल्या पाहणी नुसार विरुध्द पक्ष यांचेशी संपर्क साधुन दिलेल्या ऑर्डरप्रमाणे कंपनीचे प्रतिनिधी डायरेक्टर श्री.संदीप शिंदे यांनी दि.30/07/2010 रोजी जळगांव येथे गुडस होईस्ट लिफटच्या बाबत संपुर्ण माहिती तक्रारदारास दिली व टेक्नीकल डाटाशिट तक्रारदारास देऊन तक्रारदाराच्या कंपनीची पाहणी केली व त्यानंतर सदर लिफटचे उभारणीकरता व बसविण्याकरिता लागणारा एकुण खर्च रु.5,25,000/- चे कोटेशन तक्रारदार कंपनीस दिले,सदरचे कोटेशन तक्रार अर्जासोबत नि.क्र.3/2 ला दाखल आहे. तक्रारदार कंपनीकडुन वेळोवेळी रक्कमा स्विकारुनही त्यांनी तक्रारदाराच्या आवारात गुडस होईस्ट लिफट बसवुन दिलेली नाही अशी तक्रारदाराची प्रमुख तक्रार आहे. तक्रारदाराची गरज व आवश्यकता लक्षात घेऊन तक्रारदार कंपनीने सरतेशेवटी अन्य दुस-या कंपनीशी संपर्क साधुन लिफट बसवुन घेतल्याचे तक्रारदाराचे विधिज्ञांनी या मंचासमोरील युक्तीवादाचे वेळी प्रतिपादन केले. तक्रारदाराने विरुध्द पक्ष कंपनीला अनुक्रमे दि.30/07/2010 रोजी एच.डी.एफ.सी.बँक,जळगांव खाते क्र.00600330008583 व्हाऊचर नंबर एम.बी.पी.व्ही/607 व्दारे रक्कम रु.1,50,000/-, दि.16/09/2010 रोजी एस.बी.आय.मुंबई खाते क्रमांक 30644341548 व्हाऊचर नंबर एम.बी.पी.व्ही/190 अन्वये रक्कम रु.1,50,000/- तसेच दि.14/10/2010 रोजी एच.डी.एफ.सी.बँक खाते क्रमांक 00600330008530 व्हाऊचर नंबर एम.बी.पी.व्ही/1014 अन्वये रक्कम रु.8,000/- अशी एकुण रक्कम रु.3,08,000/- अदा केलेली असल्याचे नि.क्र.3/14 लगत दाखल कागदपत्राचे तपशिलावरुन स्पष्ट होते. तसेच विरुध्द पक्ष कंपनीने लिफटचा अंशतः माल तक्रारदाराकडे पाठवुनही त्याचेकडे लिफट उभारणीचे काम न केल्याने सरतेशेवटी तक्रारदार कंपनीने प्रॅक्टीकल एलिव्हेटरर्स, ए-2, जुनी एम.आय.डी.सी, अजंता चौक जवळ,जळगांव यांचेकडुन एकुण रक्कम रु.8,88,750/- या किंमतीस दोन लिफट बसवण्याची ऑर्डर दिल्याचे नि.क्र.3/15 चे परचेस ऑर्डरवरुन स्पष्ट होते. तक्रारदाराचे आवारात विरुध्द पक्षाने लिफटचा माल पाठविला त्याचे व्हॅल्युएशन प्रॅक्टीकल एलिव्हेटर्स यांनी केलेले असुन ते एकुण रक्कम रु.1,41,000/- इतके असल्याचे व तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे दिलेली एकुण रक्कम रु.3,08,000/- मधुन सदरची रक्कम वजा जाता रक्कम रु.1,67,000/- तक्रारदारास विरुध्द पक्षाकडुन मिळणेस पात्र असल्याचे तक्रारदाराचे वकीलांनी या मंचासमोरील युक्तीवादात नमुद करुन मंचाचे लक्ष प्रॅक्टीकल एलिव्हेटर्स यांनी तक्रारदाराच्या आवारात विरुध्द पक्षाने पुरवलेल्या मटेरियलच्या व्हॅल्युएशन रिपोर्ट कडे वेधले सदरचे मटेरियलचे व्हॅल्युएशन एकुण रक्कम रु.1,41,000/- असल्याचे नमुद आहे.
7. विरुध्द पक्ष यांनी याकामी वकीलामार्फत केवळ हजर झाले तथापी त्यांचे तक्रार अर्जास कोणतेही लेखी म्हणणे व हरकत उपस्थित केली नाही. युक्तीवादाचे वेळेसही ते गैरहजर होते. त्यामुळे वरील एकंदर विवेचनाचा विचार करता विरुध्द पक्ष कंपनीने तक्रारदार कंपनीकडुन गुडस होईस्ट लिफट बसवुन देणेची ऑर्डर स्विकारुन व त्यापोटी तक्रारदार कंपनीकडुन वेळोवेळी रक्कमा स्विकारुन प्रत्यक्षात लिफट तक्रारदार कंपनीचे आवारात बसवुन न देऊन सदोष व त्रृटीयुक्त सेवा दिल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
8. मुद्या क्र. 2 – तक्रारदार कंपनीस रु.1,67,000/-, मानसिक व इतर त्रासापोटी रु.1,00,000/-अशी एकुण रक्कम रु.2,67,000/- तक्रार दाखल तारखेपासुन तक्रारदार कंपनीस मिळेपावेतो द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी, तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.33,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदार कंपनीने तक्रार अर्जातुन केलेली आहे. आमचे मते तक्रारदार कंपनीने विरुध्द पक्षास एकुण रक्कम रु.3,08,000/-अदा केलेले असुन त्यातुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार कंपनीस पुरवठा केलेल्या मालाची मे.प्रॅक्टीकल इलेव्हेटर्स यांनी निश्चित केलेली रक्कम रु.1,41,000/- वजा जाता तक्रारदार कंपनी ही विरुध्द पक्षाकडुन तक्रार अर्जात नमुद केलेप्रमाणे एकुण रक्कम रु.1,67,000/-( अक्षरी रु.एक लाख सदुसष्ट हजार मात्र) मिळण्यास पात्र असुन मानसिक त्रासाचे नुकसानी दाखल रु.25,000/-(अक्षरी रु.पंचवीस हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार मात्र ) मिळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) विरुध्द पक्ष सॅन्डीज एलीव्हेटर्स प्रा.लि. यांना असे आदेशीत करण्यात
येते की, त्यांनी तक्रारदार कंपनीस एकुण रक्कम रु. 1,67,000/-
( अक्षरी रु.एक लाख सदुसष्ट हजार मात्र) या आदेशाची प्रत प्राप्त
झाल्यापासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( ब ) विरुध्द पक्ष सॅन्डीज एलीव्हेटर्स प्रा.लि. यांना असे आदेशीत करण्यात
येते की, त्यांनी तक्रारदार कंपनीस मानसिक त्रासाचे नुकसानी दाखल
रु.25,000/-(अक्षरी रु.पंचवीस हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार मात्र ) या आदेशाची प्रत प्राप्त
झाल्यापासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 14/02/2014. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.