::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य ) (पारीत दिनांक –31 ऑगस्ट, 2013 ) 1. विरुध्दपक्षा कडून सदनीकेचे विक्रीपत्र वा सदनीकेपोटी भरलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी तक्रारकर्ती तर्फे पॉवर ऑफ अटर्नी म्हणून तिचे पती यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारर्तीचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे-
यातील विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 हे जमीनीचे मालक आहेत. वि.प.क्रं 1 ते 6 यांनी, वि.प.क्रं 7 साईश्री असोसिएटस तर्फे भागीदार वि.प.क्रं-7(ब) सुरेश कृष्णराव निघोट यांना नोंदणीकृत पॉवर ऑफ अटर्नी करुन दिलेली आहे तसेच वि.प.क्रं 8 हा हा सदर साईश्री असोसिटस मध्ये नौकरदार आहे. वि.प.क्रं 1 ते 6 यांनी, वि.प.क्रं 7 यांना त्यांचे मालकीचे जमीनीची नोंदणीकृत पॉवर ऑफ अटर्नी म्हणून नेमणूक केली, त्या जमीनचे वर्णन मौजा हिंगणा, भूमापन क्रं 215, खाते क्रं 25, प.ह.नं.49, भोगवटदार वर्ग क्रं 1, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर असे आहे. वि.प.क्रं 7 साईश्री असोसिएटस फर्म यांनी सदर शेतजमीनीची अकृषक परवानगी प्राप्त करुन ले आऊट तयार केले व त्यावरील बांधकामाचा नकाशा तयार केला. प्लॉट क्रं-8 ते 15, लेआऊट खसरा क्रं 215, प.ह.नं.49 मौजा हिंगणा, जिल्हा नागपूर या जमीनीवरील प्रस्तावित राधाकृष्ण गृह निर्माण योजनेतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रं-बी-102, बांधकाम क्षेत्रफळ 44.60 स्क्वेअर मीटर व त्यासोबत अविभक्त भागातील हिस्सा- 1.967 विक्री संबधाने तक्रारकर्त्या सोबत दि.14.05.2008 रोजी नोंदणीकृत विक्री करार केला. नोंदणीकृत विक्री करारा नुसार सदर मालमत्तेचे संपूर्ण मुल्य हे रुपये-2,55,000/- निश्चीत करण्यात आले. ठराविक मुदतीत बांधकाम पूर्ण करुन देऊन फ्लॅटचा ताबा देऊन विक्रीपत्र करुन देण्यात येईल असेही ठरले. नोंदणीकृत विक्री करारा नुसार तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाला रुपये-1,37,156/- एवढी रक्कम दिली व या व्यतिरिक्त नोंदणीसाठी तक्रारकर्तीस रुपये-15,000/- खर्च आला. परंतु विरुध्दपक्षाने बांधकाम अपूर्णावस्थेत ठेऊन तक्रारकर्त्याचे नावे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही
त्यामुळे तक्रारकर्त्याची फसवणूक केली. म्हणून तक्रारकर्त्याने वकीला मार्फत दि.24.05.2012 रोजी विरुध्दपक्षास नोटीस पाठविल्यात परंतु विरुध्दपक्षाने घेण्यास नकार या पोस्टाचे शे-यासह संपूर्ण नोटीसेस परत आल्यात. तक्रारकर्ती ही करारातील अटी व शर्ती पूर्ण करण्यास तयार आहे परंतु विरुध्दपक्षा कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विरुध्दपक्षाने तक्रारकर्ती सोबत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष साईश्री असोशिएट, हिंगणा, जिल्हा नागपूर यांना प्रस्तावित फ्लॅटपोटी रोख रकमा दिल्यात, त्याचा तपशिल खालील विवरणपत्रा प्रमाणे-
अक्रं | पावती क्रमांक | पावती दिनांक | नगदी भरलेली रक्कम रुपये | 01 | 075 | 21.03.2006 | 11,000/- | 02 | 02 | 17.04.2006 | 25,000/- | 03 | 110 | 17.04.2006 | 44,000/- | 04 | 16 | 28.06.2006 | 4,500/- | | | एकूण रक्कम | 84,500/- |
तक्रारकर्तीचे असेही म्हणणे आहे की, उपरोक्त एकूण रक्कम ही करारापूर्वीच विरुध्दपक्षा कडे अदा केली व करार नोंदणीसाठीचा खर्च रुपये-15,000/- तक्रारकर्तीने स्वतः केला. या व्यतिरिक्त तक्रारकर्तीचे नावावर दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नागपूर यांनी दि.14.04.2008 रोजी गृहकर्जापोटी मंजूर केलेली रक्कम रुपये-35,000/- विरुध्दपक्षाने उचल केली. तक्रारकर्तीस सदर रुपये-35,000/- कर्जाची रक्कम व्याजासह एकूण रुपये-52,653/- सह बँकेला परत करावी लागली. परंतु विरुध्दपक्षाने करारा नुसार तक्रारकर्तीस फ्लॅटचे विक्रीपत्र करुन ताबा दिलेला नाही. म्हणून तक्रारकर्ती गीता संजय अरखेल तर्फे आममुखत्यात म्हणून तिचे पती संजय छोटेलाल अरखेल यांनी प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्याद्वारे विरुध्दपक्षास फ्लॅट क्रं-बी-102 चे विक्रीपत्र तक्रारकर्तीचे नावे करुन देऊन ताबा देण्याचे आदेशित व्हावे वा हे शक्य नसल्यास विरुध्दपक्षाने तक्रारीत नमुद केल्या नुसार रक्कम रुपये-1,52,156/- 18% दराने व्याजासह तक्रारकर्तीस परत देण्याचे आदेशित व्हावे. विरुध्दपक्षाने नोटीस खर्च म्हणून रुपये-1000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- देण्याचे आदेशित व्हावे. तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक त्रासा पोटी व घराचे वाढलेल्या किंमतीपोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये-1,00,000/- विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे, अशा मागण्या केल्यात. 3. मंचा तर्फे प्रस्तुत तक्रार प्रकरणात यामधील विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 आणि क्रं-7(अ) व 7 (ब) तसेच विरुध्दपक्ष क्रं-8 यांना नोंदणीकृत डाकेने नोटीसेस पाठविण्यात आल्यात. विरुध्दपक्ष क्रं -1 ते 6 यांना पाठविलेल्या नोटीसेस घेण्यास इन्कार, सेंडरला परत-22/01/2013 या पोस्टाचे शे-यासह मंचात परत आल्यात व त्या अभिलेखावर दाखल आहेत. विरुध्दपक्ष क्रं-7(अ) आणि वि.प.क्रं 7(ब) तसेच विरुध्दपक्ष क्रं-8 यांना नोटीस तामील झाल्या बाबतचा पोस्टाचा अहवाल निशाणी क्रं 07 ते 09 वर अभिलेखावर दाखल आहे परंतु विरुध्दपक्ष क्रं- 1 ते 6 आणि विरुध्दपक्ष क्रं- 7(अ) व 7(ब) तसेच विरुध्दपक्ष क्रं-8 हे न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी आपले लेखी निवेदनही प्रकरणात सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 आणि वि.प. क्रं-7(अ) व 7(ब) तसेच विरुध्दपक्ष क्रं-8 यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि.06 जुलै, 2013 रोजी प्रकरणात पारीत केला. 4. तक्रारकर्तीने निशाणी-2 वरील यादी नुसार एकूण 10 दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये विरुध्दपक्ष साईश्री असोशिएटस यांनी दिलेल्या पावत्यांच्या प्रती, विक्रीचा करारनामा, कर्ज मंजूरी पत्र व बँकेचे कर्जाचे दस्तऐवज, तक्रारकर्तीने दिलेली नोटीस पोस्टाची पावती, वि.प.कडून स्विकृत न होता परत आलेल्या नोटीसच्या लिफाफयाची झेरॉक्स प्रती, पॉवर आफ अटर्नी इत्यादी प्रतीचा समावेश आहे. 5. तक्रारकर्ती तर्फे त्यांचे वकीलांचा मौखीक युक्तीवादही ऐकण्यात आला. अभिलेखावर दाखल दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले.
6. प्रस्तुत प्रकरणात न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे नोंदविलेले आहेत. मुद्दा उत्तर
(1) विरुध्दपक्षकाराने, तक्रारकर्तीस करारा नुसार फ्लॅटचा ताबा व विक्रीपत्र करुन न देऊन त.क.ला दिलेल्या सेवेत कमतरता सिध्द होते काय ? ……… होय.
(2) काय आदेश? ………………………………….... अंतीम आदेशा प्रमाणे :: कारण मीमांसा :: मुद्दा क्रं 1 व 2- 7. तक्रारकर्ती श्रीमती गीता संजय अरखेल तर्फे तिचे पती संजय छोटेलाल अरखेल यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार मंचा समक्ष दाखल केली आहे. या करीता तक्रारकर्तीने तिचे वतीने, तिचे पती संजय छोटूलाल अरखेल यांना न्यायालयातील संपूर्ण कार्यवाही पार पाडण्या करीता पॉवर ऑफ अटर्नीचा नोंदणीकृत लेख नोटरी यांचेकडे दि.20.12.2012 रोजी नोंदवून दिला व पॉवर ऑफ अटर्नीची मूळ प्रत प्रकरणातील पान क्रं 46 ते 49 वर दाखल केली, त्याचे अवलोकन करण्यात आले. 8. तक्रारकर्तीने पान क्रं 13 ते 31 वर विरुध्दपक्ष साईश्री असोसिएटस तर्फे तक्रारकर्तीचे नावे दि.14.05.2008 रोजी नोंदवून दिलेल्या “एग्रीमेन्ट टू सेल” (निकालपत्रात एग्रीमेंट टू सेल याचा उल्लेख नोंदणीकृत विक्री करार असा करण्यात येईल) ची प्रत दाखल केली. सदर नोंदणीकृत विक्री करारामध्ये विरुध्दपक्ष क्रं (1) ते (6) यांची नावे नमुद करुन त्यांचे वतीने वि.प.क्रं 1 सुरेश कृष्णराव निघोट यांना मालकी आणि विक्री संबधाने आममुखत्यार म्हणून नेमल्याचे नमुद केले आहे. तसेच पुढे सदरचे नोंदणीकृत विक्री करारामध्ये साई श्री असोसिएटस या नोंदणीकृत भागीदारी फर्म, पंचवटी पार्क, हिंगणा, जिल्हा नागपूरचे वतीने तिचे भागीदार वि.प.क्रं-7(अ) संजय वसंतराव अटाळकर व वि.प.क्रं-7(ब) सुरेश कृष्णराव निघोट यांचे नाव नमुद केलेले आहे व त्यांना “बिल्डर्स व डेव्हलपर्स” म्हणून संबोधित केले आहे. यातील विरुध्दपक्ष क्रं-7(ब) सुरेश कृष्णराव निघोट आणि वि.प.क्रं- (1) सुरेश कृष्णराव निघोट ही एकच व्यक्ती असल्याचे दिसून येते. 9. नोंदणीकृत विक्री करारात असेही नमुद आहे की, लेआऊट खसरा क्रं 215, प.ह.नं.49 मौजा हिंगणा, जिल्हा नागपूर क्षेत्रफळ 1.46 हेक्टर आर या जमीनीस शासना कडून अकृषक परवानगी प्राप्त झालेली आहे. सदर जमीनी वरील प्लॉट क्रं-8 ते 15 वरील प्रस्तावित राधाकृष्ण अपार्टमेंट यामधील पहिल्या मजल्या वरील फ्लॅट क्रं- “बी-102”, बिल्टअप एरीया 44.60 स्क्वेअर मीटर व अनडिव्हाईडेड शेअर 1.967% तक्रारकर्तीस विकण्याचे करारात नमुद केले आहे. सदर करारातील मालमत्तेचे एकूण शुल्क हे रुपये-2,55,000/- असल्याचे त्यात नमुद आहे. सदर करारा सोबत लावलेल्या दस्तऐवजां मध्ये
तलाठी साझा क्रं 49 भूमापन क्रं 215, हिंगणा या मालमत्तेचा 7/12 चा उतारा दाखल केला असून त्यामध्ये विरुध्दपक्ष सुरेश कृष्णराव निघोट, प्रकाश कृष्णराव निघोट, जितेंद्र कृष्णराव निघोट, ताराचंद कृष्णराव निघोट, सौ.पुष्पा नामदेव देशमुख, राधीका वि.कृष्णराव निघोट रा. किन्ही अशी नावे नमुद आहेत. तसेच सदर जमीनीस जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कडून अकृषक वापर परवानगी दि.22.08.2003 ची प्रत दाखल केली. 10. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष साईश्री असोशिएट, हिंगणा, जिल्हा नागपूर यांना प्रस्तावित बी-102 या फ्लॅट पोटी रोख रकमा दिल्यात, सदर पावत्यांच्या प्रती अभिलेखावर पान क्रं-10 ते 12 वर दाखल आहेत, त्याचा तपशिल खालील विवरणपत्रा प्रमाणे-
अक्रं | पावती क्रमांक | पावती दिनांक | नगदी भरलेली रक्कम रुपये | 01 | 075 | 21.03.2006 | 11,000/- | 02 | 02 | 17.04.2006 | 25,000/- | 03 | 110 | 17.04.2006 | 44,000/- | 04 | 16 | 28.06.2006 | 4,500/- | | | एकूण रक्कम | 84,500/- |
11. या व्यतिरिक्त तक्रारकर्तीचे नावावर दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नागपूर यांनी दि.14.04.2008 रोजी गृहकर्जापोटी मंजूर केलेली रक्कम रुपये-35,000/- विरुध्दपक्षाने उचल केल्याचे आणि तक्रारकर्तीस सदर रुपये-35,000/- कर्जाची रक्कम व्याजासह एकूण रुपये-52,653/- सह बँकेला परत करावी लागली असल्याचे तक्रारकर्तीने नमुद केले. या संबधात तक्रारकर्तीने फ्लॅट नं.”बी-102”, राधाकृष्णा अपार्टमेंट, राधाकृष्णा नगर, हिंगणा, जिल्हा नागपूर या मालमत्ते संबधाने दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन यांचे कडून दि.04.07.2008 रोजी डिसबर्समेंट झालेल्या रुपये-35,000/- एवढया रकमेचे कर्जा संबधीचे दस्तऐवज पान क्रं-32 ते 37 अभिलेखावर दाखल केले. तक्रारकर्तीने नमुद केले की, तक्रारकर्तीचे नावावर दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नागपूर यांनी दि.14.04.2008 रोजी गृहकर्जापोटी मंजूर केलेली रक्कम रुपये-35,000/- विरुध्दपक्षाने परस्पर उचल केली परंतु या संबधी विरुध्दपक्ष साई श्री असोसिएटस यांना रुपये-35,000/- रक्कम परस्पर दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन यांचे कडून मिळाल्या बद्दल दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन, नागपूर यांचे प्रमाणपत्र प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्तीने दाखल केले नाही, परंतु तक्रारकर्तीची तक्रार तिचे वतीने तिचे पती संजय छोटेलाल अरखेल यांनी प्रतिज्ञालेखावर दाखल केली असल्याने व विरुध्दपक्षा विरुध्द एकतर्फी आदेश पारीत झाल्याने तक्रारकर्तीचे म्हणणे की, तिला दिवाण हाऊसिंग कॉर्पोरेशन कडून प्राप्त झालेल्या कर्जाची रक्कम रुपये-35,000/- परस्पर विरुध्दपक्षाने उचल केल्याची बाब मंच ग्राहय धरते. 12. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष साई श्री असोसिएटस यांना नगदी दिलेली एकूण रक्कम रुपये-84,500/- (+) दिवाण हाऊसिंग कॉर्पोरेशन नागपूर यांनी तक्रारकर्तीस मंजूर केलेली कर्जाची रक्कम रुपये-35,000/-असे मिळून एकूण रुपये-1,19,500/- एवढी रक्कम “विरुध्दपक्ष साई श्री असोसिएटस हिंगणा, जिल्हा नागपूर ”यांना मिळाल्याची बाब मंच ग्राहय धरते.
13. तक्रारकर्तीने आपले तक्रार अर्जात दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर यांचे कडून प्राप्त कर्जाची रक्कम रुपये-35,000/- अधिक कर्जाचे रकमेवरील व्याज याची मागणी विरुध्दपक्षा कडून केली आहे तसेच नोंदणीकृत विक्री करार नोंदविण्यासाठी तक्रारकर्तीस आलेला खर्च रुपये-15,000/- तो विरुध्दपक्षा कडून मिळण्याची प्रार्थना केली आहे. परंतु तक्रारकर्तीची मुख्य मागणी ही एक तर करारातील फ्लॅट -“बी-102” ची नोंदणीकृत खरेदी व ताबा मिळावा किंवा तक्रारकर्तीने भरलेली. रक्कम व्याजासह मिळावी अशी असल्याने व सदरच्या नमुद दोन्ही मागण्या या त्यातच म्हणजे मुख्य मागणीमध्ये अंर्तभूत असल्याचे मंचाचे स्पष्ट मत असल्याने कर्जाचे रकमेवरील व्याज व नोंदणीकृत विक्री करार नोंदविण्यासाठी आलेला खर्च या मागण्यांचा वेगळयाने विचार करण्याची आवश्यकता नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 14. विरुध्दपक्ष साईश्री असोसिएटस तर्फे तक्रारकर्तीचे नावे दि.14.05.2008 रोजी नोंदवून दिलेल्या “एग्रीमेन्ट टू सेल” (नोंदणीकृत विक्री करार) प्रमाणे मालमत्ता फ्लॅट -“बी-102” चा ताबा आणि विक्रीपत्र तक्रारकर्तीचे नावे करुन दिलेले नाही. विरुध्दपक्ष साईश्री असोसिएटस यांनी तक्रारकर्तीस दि.14.05.2008 रोजी नोंदवून दिलेल्या “एग्रीमेन्ट टू सेल” (नोंदणीकृत विक्री करार) या दस्तऐवजा मधील मालमत्तेशी (ज्या जमीनीवर प्रस्तावित राधाकृष्ण अपार्टमेंट उभारल्या जात आहे) संबधीत विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (6) हे शेतजमीनीचे “मालक” असल्याने आणि विरुध्दपक्ष क्रं-7(अ) आणि 7(ब) हे
“साई श्री असोसिएटस” या भागीदारी फर्मचे “भागीदार” असल्याचे त्यामध्ये नमुद आहे. विरुध्दपक्ष क्रं- (1) सुरेश कृष्णराव निघोट व विरुध्दपक्ष क्रं-7 (ब) सुरेश कृष्णराव निघोट ही एकच व्यक्ती असल्याचे दिसून येते, याचे कारण विरुध्दपक्ष क्रं-1 सुरेश निघोट हे मालमत्तेचे “मालक” म्हणून आणि विरुध्दपक्ष क्रं-7 (ब) सुरेश निघोट हे साईश्री असोसिएटचे “भागीदार” म्हणून असे दोन वेगवेगळे कार्य करीत असल्यामुळे त्यांना विरुध्दपक्ष म्हणून तक्रारीत 02 दा तक्रारकर्तीने प्रतिपक्ष म्हणून समाविष्ठ केल्याचे दिसून येते. त्यामुळे सोईसाठी विरुध्दपक्ष सुरेश कृष्णराव निघोट यांना “विरुध्दपक्ष क्रं-1/7(ब)” असे निकालपत्रात संबोधण्यात येईल. तक्रारकर्तीस विरुध्दपक्ष साईश्री असोसिएटस या भागीदारी फर्म तर्फे, “भागीदार” विरुध्दपक्ष क्रं-7(अ) संजय वसंतराव अटाळकर आणि विरुध्दपक्ष क्रं-1/7(ब) सुरेश कृष्णराव निघोट यांनी नोंदणीकृत करारनामा दि.14.05.2008 रोजी नोंदवून दिला आणि तक्रारकर्तीने करारातील फ्लॅट क्रं- “बी-102” संबधाने रकमा या “साईश्री असोसिएटस, हिंगणा, जिल्हा नागपूर” या फर्मच्या नावाने दिल्याचे दिसून येते. परंतु या फ्लॅट क्रं-“बी-102” संबधाने विरुध्दपक्ष क्रं-1 ते 6 हे संबधित फ्लॅट ज्या जमीनीवर उभारल्या जात आहे, त्याचे “मालक” असल्यामुळे आणि विरुध्दपक्ष क्रं-7(अ) व क्रं-7(ब) हे साईश्री असोसिएटसचे “भागीदार” असल्यामुळे आम्ही विरुध्दपक्ष क्रं-2 ते 6 आणि विरुध्दपक्ष क्रं-7(अ) व विरुध्दपक्ष क्रं-1/7(ब) यांना, तक्रारकर्तीस, करारा प्रमाणे फ्लॅटचे विक्रीपत्र न करुन दिल्यामुळे वा तक्रारकर्तीने फ्लॅटपोटी जमा केलेली रक्कम, तक्रारकर्तीस परत न केल्यामुळे जबाबदार धरीत आहोत. अशाप्रकारे सदर विरुध्दपक्षानीं तक्रारकर्तीस करारा प्रमाणे रक्कम स्विकारुन मालमत्तेचा ताबा व विक्रीपत्र करुन न दिल्यामुळे दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. 15. तक्रारकर्तीने करारा नुसार फ्लॅटचे नोंदणीकृत विक्रीपत्र व ताबा न मिळाल्यामुळे विरुध्दपक्षांना दि.24/05/2012 रोजी वकिला मार्फत रजिस्टर नोटीस पाठविल्या बद्दल पोस्टाच्या पावत्या तसेच सदर नोटीस विरुध्दपक्षांनी न स्विकारता “Unclaimed” या पोस्टाचे शे-यासह परत आल्या बद्दल लिफाफाच्या मुखपृष्ठाच्या झेरॉक्स प्रती अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत. 16. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीचे मागणीत करारा नुसार फ्लॅट क्रं-बी-102 चे तक्रारकर्तीचे नावे नोंदणीकृत विक्रीपत्र व ताबा, विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे वा विरुध्दपक्षास असे करणे शक्य नसल्यास तक्रारकर्तीने फ्लॅट पोटी, विरुध्दपक्षा कडे जमा केलेली रक्कम वार्षिक 18% दराने व्याजास परत मिळण्याची विनंती केली आहे. उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे, विरुध्दपक्षा पैकी, कोणीही, न्यायमंचा उपस्थित होऊन, बाजू न मांडल्याने आणि विरुध्दपक्षा विरुध्द प्रकरणात एकतर्फी आदेश पारीत झालेला असल्याने, आजचे स्थितीस फ्लॅट संबधी काय स्थिती आहे? ही बाब न्यायमंचा समोर आलेली नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 ते 6 आणि विरुध्दपक्ष क्रं-7(अ) व विरुध्दपक्ष क्रं-1/7 (ब) यांचे कडून, तक्रारकर्तीने सदर फ्लॅटचे पोटी विरुध्दपक्ष साईश्री असोसिएटस यांचेकडे जमा केलेली एकूण रक्कम रुपये-1,19,500/- कर्ज डिसबर्समेंट डेट दि.04.07.2008 पासून द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह परत मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे. तसेच तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-2000/- नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. यातील विरुध्दपक्ष क्रं-8 विजय वसंतराव अटाळकर हे विरुध्दपक्ष साईश्री असोसिएटस या भागीदारी फर्म मध्ये नौकरदार म्हणून कार्य करीत असल्याने त्यांचे विरुध्द कोणताही आदेश पारीत करणे न्यायोचित होणार नाही असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 17. वरील वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत- ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-2 ते 6 व विरुध्दपक्ष क्रं-1/7(ब) व 7(अ) विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्ष क्रं-2 ते 6 व विरुध्दपक्ष क्रं-1/7(ब) व 7(अ) यांना निर्देशित करण्यात येते की, तक्रारकर्तीने फ्लॅट क्रं- “बी-102 पोटी जमा केलेली रक्कम रुपये-1,19,500/-(अक्षरी रु. एक लक्ष एकोणीस हजार पाचशे फक्त) दि.04.07.2008 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह तक्रारकर्तीस परत करावी.
3) विरुध्दपक्ष क्रं-2 ते 6 व विरुध्दपक्ष क्रं-1/7(ब) व 7(अ) यांनी तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्यल रु.-5000/- (अक्षरी रु. पाच हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रु.-2000/- (अक्षरी रु. दोन हजार फक्त) द्दावेत. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-2 ते 6 व विरुध्दपक्ष क्रं- 1/7(ब) व 7(अ) यांनी प्रस्तुत निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे. 5) विरुध्दपक्ष क्रं-8 हे साईश्री असोसिएटस या फर्मचे नौकरदार असल्याने त्यांना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात येते. 6) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी.
| [HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde] MEMBER[HON'ABLE MR. Amogh Shyamkant Kaloti] PRESIDENT | |