तक्रारदार स्वत: हजर.
जाबदेणारंतर्फे प्रतिनिधी हजर
द्वारा मा. श्री. मोहन एन. पाटणकर, सदस्य
निकालपत्र
05/07/2014
तक्रारदार यांची प्रस्तुतची तक्रार जाबदेणार “द्रोण बनविण्याचे” मशिन विकणार्या संस्थेविरुद्ध सेवेतील त्रुटीबाबत ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार संक्षिप्तपणे अशी आहे की,
1] तक्रारदार यांनी दि. 06/07/2012 रोजी जाबदेणार यांचेकडून ‘ऑटोमॅटिक पेपर द्रोण’ मशिन रु. 72,000/- किंमतीस खरेदी केले. यापैकी रक्कम रु.55,000/- जाबदेणार यांना रोख देऊन उर्वरीत रु. 17,000/- रकमेचा धनादेश दिला. सदरच्या मशिनला अडचणी येवू लागल्यामुळे तक्रारदारांनी जाबदेणार यांचेकडे तक्रार दिली. त्यानुसार जाबदेणार यांचे सर्व्हिस इंजिनिअर यांनी दि. 22/10/2012 रोजी मशिनची पाहणी करुन मशिन सदोष असल्याचा अहवाल दिल्यावर, जाबदेणार यांनी सदोष मशिन बदलून दिले. बदलून दिलेल्या मशिनबाबतही अडचणी येत असल्याने तक्रारदार यांनी मशिनसाठी दिलेले रक्कम रु. 55,000/- परत करुन मशिन परत घेण्याची जाबदेणार यांचेकडे मागणी केली. तसेच बाकी रक्कम रु. 17,000/- च धनादेश न वठविण्याबाबत बँकेस कळविले. सदोष मशिन परत घेण्याबाबत तक्रारदार यांनी जाबदेणार यांना दि. 17/08/2012, 07/09/2012 आणि दि. 12/11/2012 रोजी पत्र पाठविले. तथापी, जाबदेणार यांनी ती स्विकारली नाहीत. अशा परिस्थितीत झालेले आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासामुळे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 14 अन्वये भरपाई मिळण्यासाठी तक्रारदार यांनी ही तक्रार मंचापुढे केलेली आहे.
2] जाबदेणार यांनी आपले म्हणणे सादर केले असून, तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने फेटाळली आहेत. जाबदेणार यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार मशिन सदोष असल्याचा धादांत खोटा आरोप करीत आहेत. जाबदेणार यांच्या लौकिकास धक्का लागू नये म्हणून एकदा मशिन बदलून दिलेले आहे. तक्रारदार यांनी बाकी रक्कम टाळण्यासाठी सदरची तक्रार दाखल केली आहे. बदलून दिलेले मशिन तक्रारदाराने स्वत: कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना उघडून त्यामध्ये फेरफार केले, त्यामुळे त्यामध्ये दोष उत्पन्न झाले. तक्रारदार यांना या मशिनद्वारे कोणतेहे काम करण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी मशिन परत घेवून रक्कम रु.55,000/- परत करण्याची, सोबत भरपाईची केलेली मागणी फेटाळावी, असे नमुद केले आहे.
3] तक्रारदारांची तक्रार, सादर केलेली कागदपत्रे, दोन्ही पक्षांची कथने आणि शपथपत्रे अभ्यासता पुढील मुद्दे या मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | जाबदेणार यांचे सेवेमध्ये त्रुटी असल्याचे तक्रारदार यांनी सिद्ध केले आहे काय? | होय |
2. | जाबदेणार हे सेवेतील त्रुटीबद्दल तक्रारदार यांना नुकसान भरपाई आणि खर्च देण्यास जबाबदार आहेत काय? | होय |
3. | अंतिम आदेश ? | तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने खालील कारण मिमांसा नमुद करण्यात येते.
4] तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून कागदी द्रोण बनविण्याचे मशिन स्वत:च्या निर्वाहासाठी विकत घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणात ‘ग्राहक-विक्रेता’ असे नाते प्रस्थापित आहे. जाबदेणार यांनी विकलेल्या मशिनमध्ये दोष असल्याची खातरजमा जाबदेणार यांच्या सर्व्हिस इंजिनिअर यांनी समक्ष पाहणी करुन केलेली आहे. त्यामुळे जाबदेणार यांनी सदोष मशिन बदलून दिले. परंतु या बदलून दिलेल्या मशिनमध्येसुद्धा दोष असल्याने, तक्रारदारांनी वारंवार कळवूनही जाबदेणार यांनी त्याची दखल घेतली नाही. जाबदेणार यांचे म्हणण्याप्रमाणे बदललेल्या मशिनमध्ये तक्रारदार यांनी स्वत: अज्ञानामुळे फेरफार केल्याने दोष उद्भवले आहेत. जाबदेणार यांनी यासाठी कोणताही तांत्रिक अहवाल अथवा अन्य पुरावा दिलेला नाही. तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून सदोष सेवा मिळाल्याचे सिद्ध केलेले आहे. जाबदेणार यांनी त्यांच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे, असे या मंचाचे मत आहे. वरील कारणमिमांसेद्वारे नमुद निष्कर्ष मान्य करुन खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1.
येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सदोष मशिन देऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे, असे जाहीर करण्यात येते.
3. जाबदेणार यांना असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांकडील सदोष मशिन ताब्यात घेऊन स्विकारलेली रक्कम रु. 55,000/- (रु. पंचावन्न हजार फक्त), तसेच सेवेतील त्रुटी आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रु. पाच हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
5. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.