(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर पी. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 10 फेब्रुवारी 2017)
1. सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये, ही तक्रार विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याने घेतलेल्या प्लॉटचे विक्रीपञ करुन दिले नाही या कारणास्तव दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याची थोडक्यात अशाप्रकारे आहे की, विरुध्दपक्ष क्र.3 ही एक फर्म असून तिचे विरुध्दपक्ष क्र.1 व 2 हे मालक आहे. विरुध्दपक्ष क्र.1 चे पती श्री माणिकराव वैद्य यांनी जी फर्म सुरु केली होती, त्यांचा शेती विकत घेऊन प्लॉट बनविण्याचा व्यवसाय होता. श्री माणिकराव वैद्य यांचेकडे मौजा – वेळाहरी , प.ह.क्र. 38, शेत सर्व्हे नंबर 62/1, 63/1 येथे त्यांचे मालकीची जमीन होती. त्यावरील प्लॉट क्रमांक 30 आणि 31 विकत घेण्याचा तक्रारकर्त्याने करारनामा श्री माणिकराव वैद्य सोबत केला. त्याप्रमाणे दिनांक 18.8.2003 रोजी तक्रारकर्त्याने श्री माणिकराव वैद्य यांना रुपये 33,042/- देवून प्लॉटची खरेदी केली. रकमेचा पूर्ण भरणा केल्यानंतर तक्रारकर्त्याने श्री माणिकराव वैद्य यांना वेळोवेळी विक्रीपञ करुन देण्याची विनंती केली, परंतु श्री माणिकराव वैद्य यांनी या ना त्या कारणास्तव टाळाटाळ केली. शेवटी दिनांक 18.8.2003 ला श्री माणिकराव वैद्य यांनी तक्रारकर्त्यास प्लॉट क्रमांक 30 आणि 31 चा करारनामा व कब्जापञ करुन दिले. त्यानंतर, तक्रारकर्त्याने त्या प्लॉटवर कुंपन घालून बांधकामाची सुरुवात केली. दिनांक 11.3.2008 ला विनयकुमार गोवर्धन नावाच्या इसमाने भूखंडावर जावून त्याचेकडून बळजबरीने भूखंडाचा ताबा घेतला, त्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली आहे. याबद्दल तक्रारकर्त्याने श्री माणिकराव वैद्य यांना विचारणा केला त्यावेळी त्यांनी असे सांगितले की, त्यांनी मुळ शेत मालक चिंधुजी ठाकरे यांच्या वारसदारांकडून सन 2002 ला ती शेत जमीन विकत घेतली होती. तसेच, तक्रारकर्त्याला हे सुध्दा सांगितले की, शेतीचा मुळ मालक चिंधुजी ठाकरे यांनी त्यापूर्वी म्हणजेच दिनांक 14.11.1991 मध्ये ती शेत जमीन विनयकुमार गोवर्धन यांना विकली होती. अशाप्रकारे श्री माणिकराव वैद्य यांनी ती शेत जमीनीच्या मुळ मालकाने गोवर्धन यांना विकली होती हे माहीत असून देखील चिंधुजी ठाकरेच्या वारसदारांकडून ती शेत जमीन श्री.माणिकराव वैद्यनी विकत घेतली आणि त्यावर ले-आऊट टाकून प्लॉट तक्रारकर्त्यास विकले. अशाप्रकारे श्री माणिकराव वैद्य यांनी तक्रारकर्त्याची फसवणूक केली.
3. श्री माणिकराव वैद्य यांचे निधन दिनांक 10.8.2010 ला झाले. त्याचे निधनानंतर विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 हे विरुध्दपक्ष क्र.3 फर्मचे व्यवहार पाहात आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 कडे भूखंडाचे विक्रीपञ लावून देण्यासाठी वेळोवेळी विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिला. तक्रारकर्त्याने विक्रीपञासाठी खर्च रुपये 7,000/- देखील दिले आहे, तरी सुध्दा विरुध्दपक्ष विक्रीपञ लावून देण्यास तयार नाही. म्हणून या तक्रारीव्दारे अशी विनंती करण्यात आली आहे की, विरुध्दपक्षाकडून त्याचा भूखंड परत त्याला द्यावा आणि त्याचे विक्रीपञ करुन द्यावे, अन्यथा आजच्या भूखंडाचे किंमतीनुसार रक्कम देण्यात यावी. त्याशिवाय, मानसिक, शारिरीक, आर्थिक ञासापोटी एकूण रुपये 5,00,000/- नुकसान भरपाई द्यावी आणि खर्च म्हणून रुपये 10,000/- मागितला आहे.
4. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्षाला मंचाची नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र.1 व 2 मंचात उपस्थित होऊन आपला लेखी जबाब निशाणी क्र.10 खाली दाखल करुन तक्रारीतील मजकूर नाकबूल केला. विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 ला तक्रारकर्त्याबद्दल काहीही माहिती नाही. परंतु, त्यांनी हे कबूल केले आहे की, माणिकराव वैद्य यांचा शेती विकत घेऊन प्लॉट विकण्याचा व्यवसाय होता आणि विरुध्दपक्ष क्र.3 ही त्यांनी सुरु केलेली फर्म होती, ज्याचे विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 वारस हक्काने मालक झाले आहे. तक्रारकर्ता आणि श्री माणिकराव वैद्य मधील व्यवहाराबद्दल काहीही माहीत नाही. तसेच, माणिकराव वैद्य आणि तक्रारकर्ता मध्ये कुठलाही लेखी करार झालेला नव्हता. श्री माणिकराव वैद्य यांनी तक्रारकर्त्याला भूखंडाचा करारनामा व कब्जापञ करुन दिले हे सुध्दा नाकारण्यात आले. तसेच त्यानंतर तक्रारकर्त्याने भूखंडावर कुंपन घालून बांधकामाची सुरुवात केली, ही बाब सुध्दा नाकारण्यात आली आहे. विनयकुमार गोवर्धन नावाच्या इसमाने तक्रारकर्त्याकडून जबरदस्तीने कब्जा घेतला याबद्दल माहीती नसल्याचे नमूद केले. परंतु, ही बाब स्विकारली आहे की, श्री माणिकराव वैद्य यांनी मुळ शेत मालक चिंधुजी ठारकरेच्या वारसदारांकडून सदरहू शेत नमीन सन 2002 मध्ये विकत घेतली होती. परंतु, श्री माणिकराव वैद्यला विनयकुमार गोवर्धन याचे व्यवहाराबद्दल माहिती नव्हती. विरुध्दपक्ष सदरहू जमीन खसरा नंबर 62/1 चे मालक नसल्यामुळे भूखंडाचे विक्रीपञ तक्रारकर्त्याला करुन देऊ शकत नाही. श्री माणिकराव वैद्य यांनी कुठलिही तक्रारकर्त्याची फसवणूक केली नाही. अशाप्रकारे तक्रार नामंजूर करुन ती खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
5. विरुध्दपक्ष क्र.3 ला नोटीस बजावणी होऊनही त्याचेकडून कोणीही हजर न झाल्याने, विरुध्दपक्ष क्र.3 चे विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्यात आले.
6. दोन्ही पक्षाच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
7. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीच्या समर्थनार्थ काही दस्ताऐवज दाखल केले आहे. ज्यामध्ये विरुध्दपक्ष क्र.3 च्या नावे भरण्यात आलेल्या रकमेच्या पावत्या, भूखंडाचा कब्जापञ, तसेच पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीची प्रत आहे. त्याशिवाय शेतीचे मुळ मालक चिंधुजी ठाकरे आणि विनयकुमार गोवर्धन यांच्यातील शेत जमिनीच्या विक्रीपञाची प्रत दाखल केलेली असून, श्री माणिकराव वैद्य यांनी चिंधुजी ठाकरेच्या वारसदारांकडून ती शेत जमीन विकत घेतल्याचा विक्रीपञाची प्रत दाखल केली आहे. या दस्ताऐवजावरुन एक बाब स्पष्ट होते की, शेत जमिनीचा मुळ मालक चिंधु ठाकरे होता व त्यांनी ती शेत जमीन सन 1991 मध्ये विनयकुमार गोवर्धन या इसमाला नोंदणीकृत विक्रीपञाव्दारे विकली होती. अशाप्रकारे विनयकुमार गोवर्धन हा त्या जमीनीचा विक्रपञ झाल्यापासून पूर्ण मालक झाला होता, असे असतांना चिंधुजी ठाकरेच्या वारसदारांना ती शेत जमीन नंतर सन 2002 मध्ये श्री माणिकराव वैद्यला विकण्याचा कुठलाही अधिकार किंवा मालकी हक्क नव्हता. परंतु ही वस्तुस्थिती आहे की, तसे असतांना सुध्दा वारसदारांनी श्री माणिकराव वैद्यला ती शेत जमीन विकली या सर्व बाबीची कल्पना तक्रारकर्त्याला होती हे त्याचे तक्रारीतील कथनावरुन दिसून येते. श्री माणिकराव वैद्यने चिदूंजी ठाकरेच्या वारसदारांकडून त्या जमिनीचे विक्रीपञ करुन घेतले, त्याला कायद्यानुसार काहीही महत्व मिळत नाही आणि त्या विक्रीपञाव्दारे माणिकराव वैद्यला त्या जमीनीसंबंधी कुठलाही मालकी हक्क मिळत नाही, जोपर्यंत विनयकुमार गोवर्धनचा मालकी हक्क कायद्यानुसार नष्ट होत नाही.
8. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पावत्यावरुन असे म्हणता येईल की, त्याने विरुध्दपक्ष क्र.3 ला भूखंड विकत घेण्यासाठी वेळोवेळी रकमा देण्यात आलेल्या आहेत, त्या पावत्यावर विरुध्दपक्ष क्र.3 तर्फे स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. म्हणजेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.3 ला भूखंड विकत घेण्यास रकमा दिल्या हे दिसून येते आणि त्या पावत्याबद्दल विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 ने स्पष्टपणे नाकारले नाही किंवा त्या पावत्या खोट्या असल्याचा आरोप सुध्दा केला नाही. तसेच, तक्रारकर्त्याला श्री माणिकराव वैद्य यांनी भूखंडाचा कब्जापञ व करारनामा करुन दिला हे सुध्दा दस्ताऐवजावरुन दिसून येते. परंतु, तक्रारकर्त्याने हा सर्व व्यवहार श्री माणिकराव वैद्य सोबत केलेला होता आणि अशा जमिनीसोबत केला होता ज्याचा मालकी हक्क श्री माणिकराव वैद्य यांचेकडे कधीच नव्हता. त्यामुळे, तक्रारकर्ता आणि माणिकराव वैद्य मधील भूखंड विकत घेण्याच्या व्यवहाराला कायद्यानुसार मान्यता मीळत नाही, त्यामुळे भूखंडाचे विक्रीपञ लावून देण्याचा प्रश्न येत नाही.
9. या प्रकरणात विरुध्दपक्षाच्या वकीलांनी, “Kundlik Ganpat Mokal –Vs.- Jaysheel Construction Company and Ors., III (2011) CPJ 404 (NC)” या न्यायनिवाड्याचा आधार घेवून असा युक्तीवाद केला आहे की, विरुध्दपक्ष क्र.3 हे श्री माणिकराव वैद्य याचे एकट्याची फर्म होती आणि म्हणून ज्याच्या मृत्युनंतर त्याचे वारसदारांना म्हणजेच विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 ला माणिकराव वैद्यने केलेल्या कुठल्याही व्यवहारासाठी जबाबदार धरता येणार नाही. तसेच, तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 यांचेमध्ये कुठलाही करार झाला नवहता. त्यामुळे, विरुध्दपक्षाचे वकीलांनी घेतलेल्या वरील न्यायनिवाड्याचा आधार विरुध्दपक्षाला याप्रकरणात मिळतो.
10. विरुध्दपक्षाच्या वकीलांनी पुढे असा सुध्दा मुद्दा उपस्थित केला आहे की, ही तक्रार मुदतबाह्य आहे. कारण, श्री माणिकराव वैद्य यांनी दिनांक 18.8.2003 ला करारनामा व कब्जापञ करुन दिले होते व त्यानंतर विक्रीपञ दिलेले नाही. यासाठी, विरुध्दपक्षाच्या वकीलांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेतला, “State Bank of India –Vs.- B.S. Agriculture Industries(I), 2009 (6) Mh.L.J. 369” याप्रकरणात तक्रारकर्त्याने बँकेकडून रकमेची मागणी केली होती. त्यामुळे, असे ठरविण्यात आले होते की, तक्रार दाखल करण्यास 2 वर्षापेक्षा जास्त विलंब झाला असल्याने त्यास विलंब झाला होता. परंतु, हातातील प्रकरणातील वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. यामध्ये तक्रारकर्त्याने भूखंडाचे विकीपञ व ताबा मागितला आहे, त्यामुळे तक्रारीचे कारण सतत घडत असल्यामुळे तक्रार मुदतबाह्य होत नाही.
11. तक्रारकर्त्याने स्वतः सांगितल्याप्रमाणे सदरहू शेत जमीन मुळ मालकांनी विनयकुमार गोवर्धनला 1991 मध्येच विकली होती व ते विक्रीपञ आजही अस्तित्वात आहे. त्या जमिनीचा मालक विनयकुमार गोवर्धन असल्यामुळे श्री माणिकराव वैद्यला ती जमीन मुळ मालकाच्या वारसदारांकडून विकत घेण्याचा अधिकार नव्हता आणि त्याला कुठल्याही प्रकारे मालकी हक्क हस्तांतरीत होऊ शकत नव्हते. तक्रारकर्त्याने भूखंडाचे विक्रीपञ आणि ताबा विरुध्दपक्षाकडून मागितला आहे. अशापरिस्थितीत, या मंचास विरुध्दपक्षाला निर्देशीत करणे शक्य नाही की, त्यांनी ते मालक नसलेल्या भूखंडाचे विक्रीपञ आणि त्याचा ताबा तक्रारकर्त्याला द्यावा. त्यासाठी, प्रथम विनयकुमार गोवर्धनचे विक्रीपञ सक्षम न्यायालयाव्दारे रद्द करणे जरुरी आहे. अशापरिस्थितीत, तक्रारकर्त्याला दिलेली रक्कम परत घेण्याचा आदेश करता येऊ शकला असता, परंतु मा. राष्ट्रीय आयोगाने, कुंडलीक मोकाल याप्रकरणात दिलेल्या निवाड्यानुसार आता मय्यत माणिकराव वैद्यच्या वारसदारांना म्हणजेच विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 ला जबाबदार धरता येणार नाही.
वरील कारणास्तव ही तक्रार खारीज होण्यालायक आहे. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 10/2/2017