::आदेश:: (पारीत व्दारा – श्री नितीन माणिकराव घरडे , मा.सदस्य ) (पारीत दिनांक –09 जानेवारी, 2014 ) 1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तूत तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे कडून नळाचे कनेक्शन व्दारे पिण्याचे पाण्याची पुर्तता होण्या करीता आणि इतर अनुषंगिक मागण्यांसाठी प्रस्तुत तक्रार दाखल केली. 2. तक्रारकर्त्याचे थोडक्यात कथन येणे प्रमाणे- तक्रारकर्ता हा कांद्री, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर येथील वार्ड नं.4, घर क्रमांक-276 येथे राहत आहे. तक्रारकर्त्याने दि.07.06.2011 रोजी विरुध्दपक्ष ग्राम पंचायत कार्यालय कांद्री (खदान) येथे पिण्याचे पाण्याचे नळ कनेक्शन मिळण्या करीता रितसर अर्ज केला व त्या संबधाने ग्राम पंचायत कार्यालयात पावती क्रं 79 अनुसार रुपये-700/- अनामत रकमेचा भरणा केला. त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे. विरुध्दपक्ष ग्राम पंचायत कार्यालया मार्फत तक्रारकर्त्यास 08 दिवसा नंतर नळाचे कनेक्शन देण्यात आले. परंतु नळ कनेक्शन दिल्या पासून तक्रारकर्त्यास त्यामधून पाण्याचा एकही थेंब मिळालेला नाही म्हणून तक्रारकर्त्याने दि.28.07.2011 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 अनुक्रमे सचिव व सरपंच, ग्राम पंचायत, कांद्री (खदान) यांचे नावे लेखी अर्ज सादर केला. त्यावर विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 यांनी कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही. या उलट, विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 यांनी माहे जुन-2011 चा 60/- रुपये कर तक्रारकर्त्या कडून वसुल केला. उन्हाळयाचे दिवसां मध्ये पिण्याचे पाण्याची सक्त आवश्यकता असते परंतु तक्रारकर्त्यास नळाचे पाणी मिळत नसल्यामुळे बाहेरुन पाणी आणावे लागते,त्यामुळे तक्रारकर्त्यास शारीरीक त्रास व मनःस्ताप सहन करावा लागत आहे. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, शुध्द पाणी पुरवठा करणे हे ग्राम पंचायतीचे कर्तव्य आहे. पाणी ही एक मुलभूत गरज असून स्वच्छ पाणी पुरवठा हा नागरीकांचा एक मुलभूत हक्क आहे. पाण्याशिवाय जीवन जगणे
शक्यच नाही, त्यामुळे जनतेला पुरेसे पाणी उपलब्ध करणे ही एक शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे आणि घटनेच्या कलम-21 नुसार पिण्याचे शुध्द पाणी नागरीकानां पुरविणे हे राज्याचे कर्तव्य आहे. तक्रारकर्त्याने या संबधाने विरुध्दपक्षानां दि.11.03.2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली असता ती विरुध्दपक्षानां प्राप्त झाली परंतु अशी नोटीस प्राप्त झाल्या नंतरही विरुध्दपक्षाने कोणतेही उत्तर दिले नाही वा कार्यवाही केली नाही. तक्रारकर्ता नोटीसची प्रत व पोस्टाच्या पावत्या, पोच पावत्या जोडत आहे. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्षा विरुध्द खालील मागण्या केल्यात- (1) तक्रारकर्त्याचे राहते घर क्रं 276, वार्ड नं.4, कांद्री (खदान) येथील नळाला विरुध्दपक्षाने त्वरीत पाणी सोडावे या करीता विरुध्दपक्षास मंचाने आदेशित करावे. (2) विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे हलगर्जीपणामुळे त्यांचेवर ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-14 (ड) नुसार दंडात्मक नुकसान भरपाई रुपये-40,000/- बसवून ती रक्कम तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे. तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्षा कडून मिळावा. 3. तक्रारकर्त्याने मूळ तक्रारीचा निकाल लागे पर्यंत वेळ असल्यामुळे अंतरिम आदेशासाठी मंचा समक्ष किरकोळ प्रकरण क्रं-एम.ए.-13/9 दाखल केले होते, ते मंचाने दि.15 जुलै, 2013 रोजीचे आदेशान्वये खारीज केले. 4. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी आपले लेखी उत्तर निशाणी क्रं-10 अनुसार मंचा समक्ष सादर केले. तक्रारकर्त्याने ग्राम पंचायत कांद्री (खदान) कार्यालयात राहते घरी पिण्याचे पाण्याचे नळाचे कनेक्शन मिळण्यासाठी दि.27/05/2011 रोजी अर्ज केला. तक्रारकर्त्याचे अर्जा नुसार ग्राम पंचायत कार्यालयाने ठराव क्रं-7/4, दि.27.07.2011 अन्वये नळ कनेक्शन देण्याचे मान्य केले. नविन नळाचे कनेक्शन देत असताना ग्राम पंचायत कांद्री (खदान) कार्यालयाने नमुना व नियम क्रं 14 अन्वये सरपंच, ग्राम पंचायत कांद्री खदान व तक्रारकर्ता यांचेमध्ये साक्षीदारा समक्ष दि.27.05.2011 ला करारनामा करण्यात आला व करारातील अनुक्रमांक-1 ते 8 अटी व शर्ती तक्रारकर्त्यास
मान्य असल्या बाबत लिहून दिले, करारामधील मुद्दा क्रं-2 मधील अटी व शर्ती नुसार पाणी पुरवठा ग्राम पंचायतीच्या सोई प्रमाणे केला जाईल असे नमुद असून किती पाणी पुरवठा करावा या बाबत ग्राम पंचायतीवर बंधन नाही असेही नमुद करण्यात आले. तक्रारकर्त्याने नळ कनेक्शनसाठीची अनामत रक्कम रुपये-700/- ग्राम पंचायत कार्यालयात जमा केली असता त्यास दि.08.06.2011 रोजीच पावती क्रं-79 निर्गमित करण्यात आली आणि तक्रारकर्त्यास करारनाम्या नुसार ग्राम पंचायतीचे नळाचे नविन कनेक्शन देण्यात आले. तक्रारकर्त्याने दि.28.07.2011 रोजी अर्ज करुन, ज्या दिवसा पासून पाण्याचे कनेक्शन घेतले त्या दिवसा पासून पाणी मिळत नसल्याचे नमुद केले. तक्रारकर्त्याचे अर्जावर ग्राम पंचायत कांद्री खदान कार्यालयात दि.26.08.2011 रोजीचे मासिक सभेत ठराव क्रं-7 ई अन्वये चर्चा करुन ठरविण्यात आले की, कांद्री माईन परि सरात वैयक्तिक नळ कनेक्शनमध्ये वाढ न झाल्याने नगरधन पाणी पुरवठा योजनेचे पैसे भरण्यास ग्राम पंचायत असमर्थ असल्याने त्या परिसरात नळ कनेक्शन वाढविण्यात यावे किंवा पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने तक्रारकर्त्याने ग्राम पंचायतीमध्ये नळाचे कनेक्शनपोटी जमा केलेली अनामत रक्कम त्यास परत करण्यात यावी, त्यानुसार तक्रारकर्त्यास अनामत रक्कम परत नेण्यास वारंवार ग्राम पंचायती तर्फे सांगण्यात आले. ग्राम पंचायत कांद्री खदान मार्फत माहे जून-2011 महिन्यात तक्रारकर्त्याचे घरी पाणी पुरवठा करण्यात आला होता, त्यामुळे त्यांनी जून-2011 महिन्याचे विशेष पाणी पटटीची रक्कम रुपये-60/- नमुना-10 कर पावती क्रं 637 अन्वये ग्राम पंचायत कार्यालयात जमा केली होती. माहे जून-2011 नंतर तक्रारकर्त्याने पाणी मिळत नसल्याची तक्रार नोंदविली असल्याने ग्राम पंचायतीने त्यापुढील कराची रक्कम आकारणी केली नाही वा मागणीही केलेली नाही. ग्राम पंचायत कांद्री खदान अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची 80,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून त्या टाकी पासून तक्रारकर्त्याचे घर 01 किलो मीटर अंतरावर उंच भागावर असल्याने तक्रारकर्त्यास पाणी मिळत नाही. सध्या या परिसरात पिण्याचे पाण्या करीता 04 हातपंप सुरु असून येथील नागरीक सदर पाणी पिण्या करीता वापरत आहे. भविष्यात त्या भागात नळ योजना मंजूर झाल्यास त्या परिसरातील नागरीकानां पाणी पुरवठा करण्यात येईल असे विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी आपले लेखी उत्तरामध्ये नमुद केले. 5. तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर सादर केली. सोबत निशाणी क्रं-3 वरील यादी नुसार तक्रारकर्त्याने पिण्याचे पाणी मिळत नसल्या बाबत ग्राम पंचायतीकडे केलेला अर्ज, पाणी पटटी कराची पावती, नळाचे कनेक्शन संबधाने अनामत रक्कम भरल्याची पावती, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षानां दिलेली नोटीस प्रत, पोस्टाच्या पावत्या, पोच पावत्या अशा दस्तऐवजांच्या प्रती सादर केल्यात. तसेच निशाणी 12 प्रमाणे प्रतिउत्तर दाखल केले व लेखी युक्तीवाद दाखल केला. 6. विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 यांनी आपले लेखी उत्तरा सोबत श्री विनोद भैयालाल परतेती यांचे निवडणूक ओळखपत्र झेरॉक्स, श्री विनोद सहदेव शिंगारे यांचे आयकर विभागाचे पॅनकॉर्ड झेरॉक्स, ग्राम पंचायतीचे तक्रारकर्त्यास नळ कनेक्शन देण्या बाबत ठराव बुकाची प्रत, तक्रारकर्त्याने नळाचे नविन कनेक्शन मिळण्या बाबत ग्राम पंचायतीमध्ये केलेला अर्ज, नळाचे कनेक्शन संबधाने सरपंच आणि तक्रारकर्ता यांचेमध्ये झालेला करारनामा, तक्रारकर्त्याचे नळ कनेक्शन संबधाने अनामत रक्कमेची पावतीप्रत, पाणीपटटी कराची पावती प्रत, नळाचे पाणी मिळत नसल्या बाबत तक्रारकर्त्याने ग्राम पंचायतीकडे केलेला अर्ज, ग्राम पंचायत मासिक सभेचे इतिवृत्त अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 7. प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष चालू असताना मंचाचे दि.24.06.2011 रोजीचे पत्रा नुसार खंडविकास अधिकारी, पंचायत समिती, रामटेक यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र क्रं-पंसरा/पंचाचौ/2400/2013 दि.10.07.2013 अन्वये चौकशी अहवाल मंचा समक्ष दाखल केला आणि सोबत सरपंच, सचिव यांचे लेखी बयानाची प्रत, नळ कनेक्शन मिळण्या बाबत अर्जाची प्रत, करारनामा प्रत, नमुना-7 ची पावती, अर्जदाराचा दि.28.07.2011 रोजीचा अर्ज अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 8. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 यांचे लेखी उत्तर, विरुध्दपक्ष क्रं-3 यांचा चौकशी अहवाल व दाखल बयानाच्या प्रती तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज यावरुन न्यायमंचाचे निर्णयार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दा निष्कर्ष (1) तक्रारकर्त्यास ग्रा.पं.चे नळ कनेक्शन मधून पाणी पुरवठा उपलब्ध नसल्याने विरुध्दपक्षाने दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय?............................................. नाही. (2) काय आदेश?.......................................................तक्रार खारीज :: कारण मिमांसा :: मुद्दा क्रं-1 व 2 बाबत. 9. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष ग्राम पंचायत कांद्री खदान येथे घरगुती नळ कनेक्शन संबधाने ग्राम पंचायतीकडे दि.27.05.2011 रोजी केलेला अर्ज, सामान्य पावती क्रं-79, दि.08.06.2011 अन्वये अनामत रक्कम रुपये-700/- भरल्याची पावती, नळ कनेक्शन संबधाने सर्वश्री रंगलाल चैतराम यादव आणि विनोद परतेती या साक्षीदारां समक्ष दि.27.05.2011 रोजी करुन दिलेला करारनामा, तक्रारकर्त्याने पाणी करा पोटी माहे जून-2011 मध्ये दि.06.08.2011 रोजी भरलेली रक्कम रुपये-60/- ची पावती इत्यादी दस्तऐवजाच्या प्रती अभिलेखावर दाखल आहेत आणि या बाबी उभय पक्षानांही निर्विवाद मान्य आहेत. 10. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार महत्वाचे विवादीत मुद्दे खालील प्रमाणे आहेत- (अ) तक्रारकर्त्याने ग्राम पंचायतीव्दारे घरगुती नळ कनेक्शन घेतल्या पासून एकही दिवस त्याला सदर नळ कनेक्शन मधून पाणी मिळालेले नाही. (ब) असे असताना ग्राम पंचायत कांद्री खदान यांनी माहे जून-2011 रोजी पाणी कराची रक्कम रुपये-60/- तक्रारकर्त्या कडून वसुल केली. (क) विरुध्दपक्ष ग्राम पंचायतीचे उत्तरा नुसार तक्रारकर्त्यास नळाचे कनेक्शन मधून त्यास पाणी मिळत नसल्या बाबतची तक्रार दि.28.07.2011 रोजी प्राप्त झाल्या नंतर ग्राम पंचायतीने तक्रारकर्त्यास त्याची अनामत रक्कम परत घेऊन जावी असे सांगितल्या बाबत कोणताही पुरावा न्यायमंचा समक्ष दाखल केलेला नाही. (ड) विरुध्दपक्ष ग्राम पंचायतीचे म्हणण्या नुसार तक्रारकर्त्याचे घर पाणी पुरवठा योजने पासून 01 किलोमीटर अंतरावर असून उंचावर असल्याने तक्रारकर्त्याचे नळाचे कनेक्शन मधून पाणी पुरवठा होत नाही या बद्दलचा पुरावा वि.प.ग्राम पंचायतीने दाखल केलेला नाही. 11. तक्रारकर्त्याने नविन नळाचे कनेक्शन संबधाने ग्राम पंचायत कांद्री खदान येथे आवश्यक ती पुर्तता केल्या नंतर त्यास ग्राम पंचायती व्दारे दि.08.06.2011 रोजी नळाचे कनेक्शन देण्यात आले. नळ कनेक्शन दिल्या नंतर त्यामधून पाणी उपलब्ध होत नसल्याने तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष ग्राम पंचायत सरपंच आणि सचिव, कांद्री खदान यांचे नावे दि.28.07.2011 रोजी केलेला अर्ज, जो त्यांना त्या दिवशी प्राप्त झाल्याची पोच त्यावर दाखल आहे. विरुध्दपक्ष ग्राम पंचायत कांद्री खदान पंचायत समिती रामटेक यांचे दि.26.08.2011 रोजीचे मासिक सभेच्या ईतिवृत्ताची प्रत विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी दाखल केली, सदरचे इतिवृत्तात तक्रारकर्ता कुलदीप तुळशीराम सारवे राहत असलेल्या भागात जास्तीत जास्त नळ कनेक्शनचे पैसे भरण्यास ग्राम पंचायत असमर्थ असल्याने अनामत रक्कम परत करण्यात यावी असे नमुद आहे. यावरुन विरुध्दपक्ष ग्राम पंचायत तक्रारकर्त्याने नळ कनेक्शपोटी भरलेली अनामत रक्कम रुपये-700/- परत करण्यास तयार होती व आहे, ती रक्कम परत घ्यावी किंवा नाही हा तक्रारकर्त्याचे मर्जीचा भाग आहे. तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, त्यास नळामधून पाणी उपलब्ध होत नसतानाही त्याचे कडून पाणी करा पोटी माहे जून-2011 मध्ये दि.06.08.2011 रोजी रुपये-60/- ग्राम पंचायतीने वसुल केले. या संदर्भात विरुध्दपक्षा तर्फे लेखी उत्तरात असे
नमुद करण्यात आले की, तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त झाल्या नंतर त्यांनी जून-2011 नंतरचे कालावधीसाठी पाणी पटटीची आकारणी केली नाही व तशी मागणीही केली नाही. मंचाचे मते, कराची रक्कम ही ग्राम पंचायतीने विकास कामांसाठी वापरत असल्याने तक्रारकर्त्याने पाणी पटटीची भरलेली रक्कम रुपये-60/- तक्रारकर्त्याचे नळ कनेक्शनला पाणी पुरवठा न झाल्याने परत करण्यास आदेशित करणे न्यायोचित होणार नाही व तशी तक्रारकर्त्याची मागणी सुध्दा नाही. 12. तक्रारकर्त्याचे नळाचे कनेक्शन मधून पाणी उपलब्ध न होणे यासाठी खंडविकास अधिकारी व विस्तार अधिकारी, पंचायत समिती रामटेक यांचा चौकशी अहवाल प्रस्तुत तक्रार निकालाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याने चौकशी अहवालातील मुद्दे खालील प्रमाणे उदधृत करण्यात येतात.
तक्रारकर्त्याचे वार्ड क्रं 4 मधील घर उंच भागावर असून त्या ठिकाणी सदर नळ योजनेचे पाणी उंच परिसर असल्यामुळे पाणी पुरवठा करण्यास ग्राम पंचायतीला अउचण येत आहे. सध्या या परिसरात 4 हातपंप सुरु असून येथील नागरीक सदर पाणी पिण्या करीता वापरत आहेत.
13. या व्यतिरिक्त विरुध्दपक्षाचे कथना नुसार तक्रारकर्त्याने नळ कनेक्शन घेताना ग्राम पंचायतीस करारनामा लिहून दिलेला असून त्यामध्ये अट क्रं 1 ते 8 मान्य असल्या बाबत लिहून दिलेले आहे. सदर करारानाम्यातील अट क्रं 02 चा विरुध्दपक्षाने विशेष खुलासा केला, त्यातील अट क्रं-02 मधील मजकूर येणे प्रमाणे- (02) “पाण्याचा पुरवठा ग्राम पंचायतीचे सोयी प्रमाणे केला जाईल. किती पाणी पुरवठा करावा या बाबत ग्राम पंचायतीवर बंधन राहणार नाही”. 14. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी आपले लेखी उत्तरा मध्ये ग्राम पंचायत, कांद्री (खदान) अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची 80,000/- लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून त्या टाकी पासून तक्रारकर्त्याचे घर 01 किलोमीटर अंतरावर उंच भागावर असल्याने, तांत्रिक कारणास्तव तक्रारकर्त्यास देण्यात आलेल्या नळाचे कनेक्शन मधून पिण्याचे पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 ग्राम पंचायत सचिव श्री विनोद शिंगारे यांनी मंचा समक्ष युक्तीवादाचे वेळेस असेही नमुद केले की, तक्रारकर्ता राहत असलेल्या परिसरात पिण्याचे पाण्या करीता 04 हातपंप सुरु असून तेथील नागरीक सदर पाणी पिण्या करीता वापरतात व भविष्यात त्या भागात नळ योजना मंजूर झाल्यास त्या परिसरातील नागरीकानां पाणी पुरवठा करण्याची सोय करण्यात येईल. तक्रारकर्त्यास ग्राम पंचायतीच्या हातपंपा व्दारे पाणी पुरवठा होत असल्याची बाब तक्रारकर्त्याने नाकारलेली नाही. 15. याच कथनाचे अनुषंगाने विरुध्दपक्ष क्रं 3 तर्फे त्यांचे चौकशी अहवाला सोबत सरपंच, ग्राम पंचायत, कांद्री (खदान) श्री विनोद भैयालाल परतेती व ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत, कांद्री (खदान) श्री विनोद सहदेवराव शिंगारे यांनी दि.10.07.2013 रोजी दिलेल्या बयानाच्या न्यायमंचा समक्ष अभिलेखावर दाखल केली व उपरोक्त आपल्या विधानानां पुष्टी दिली. 16. विरुध्दपक्ष क्रं-3 खंडविकास अधिकारी,पंचायत समिती, रामटेके यांचे दि.10.07.2013 रोजीचे चौकशी अहवाला वरुन तक्रारकर्ता राहत असलेले कांद्री वार्ड क्रं-4 मधील घर मुख्य जलस्त्रोत कुंभा पासून 01 किलोमीटर अंतरावर असून, तक्रारकर्त्याचे घर उंच भागात असल्याने अस्तित्वात असलेल्या जलकुंभा पासून उंचावर पाणी चढू शकत नाही, ही बाब सिध्द होते. विरुध्दपक्ष ग्राम पंचायत कांद्री खदान पंचायत समिती रामटेक यांचे दि.26.08.2011 रोजीचे मासिक सभेच्या ईतिवृत्ताची प्रत विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी दाखल केली, सदरचे इतिवृत्तात नगरधन पाणी पुरवठा योजनेचे पैसे भरण्यास ग्राम पंचायत असमर्थ असल्याने एक तर त्या परिसरात नळ कनेक्शन वाढविण्यात यावे किंवा पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने तक्रारकर्त्याने ग्राम पंचायतीमध्ये जमा केलेली अनामत रक्कम परत न्यावी असे त्यामध्ये नमुद केलेले आहे, यावरुन तक्रारकर्त्याने नळ कनेक्शनपोटी भरलेली अनामत रक्कम रुपये-700/- ग्राम पंचायत परत करण्यास तयार होती व आहे ही बाब सुध्दा सिध्द होते.
तक्रारकर्त्यास नळ कनेक्शनची अनामत रक्कम परत पाहिजे असल्यास तक्रारकर्त्याने त्या प्रमाणे ग्राम पंचायत कार्यालयात अर्ज करावा व योग्य ती कार्यवाही करावी असे मंचाचे मत आहे. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते. 2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत. 3) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |