(पारीत व्दारा श्री भास्कर बी.योगी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक–18 जानेवारी, 2022)
01. तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 कृषी भरारी तर्फे भागीदार श्री सचिन प्रविणराव देशमुख व विरुध्दपक्ष क्रं-2 श्री अमित देशमुख, कृषी भरारीचे प्रमोटर यांचे विरुध्द विरुध्दपक्षाची योजना कृषी भरारी अंतर्गत बकरी पालन व्यवसायात गुंतवणूक केलेली रक्कम देय लाभासह व व्याजासह परत मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारदार हे उपरोक्त नमुद पत्त्यावर राहतात. यातील विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख हा नोंदणीकृत कृषी भरारी योजनेचा भागीदार असून या योजने अंतर्गत तो शेळी पालनाचा व्यवसाय करतो. विरुध्दपक्ष क्रं 2 अमित देशमुख हा कृषी भरारी योजनेचा प्रमोटर असून तो विरुध्दपक्ष क्रं 1 याने भंडारा जिल्हया करीता नियुक्त केलेल्या सहयोगी श्री निशीकांत लेंडे आणि श्री मंगेश वैद्द मांचे मार्फतीने सदर योजनेची जाहिरात करुन ग्राहकां कडून निवेश रक्कम जमा करण्याचे कार्य करतो. विरुध्दपक्ष क्रं 1 याची पत्नी श्रीमती भाग्यश्री देशमुख ही सुध्दा सदर योजने मध्ये डायरेक्टर आहे. विरुध्दपक्षांनी सदर योजने अंतर्गत शेळी पालन व्यवसायासाठी तक्रारकर्त्या कडून रक्कम स्विकारली व मुदती नंतर सदर रक्कम दुप्पट वा त्या ऐवजी तेवढयाच किमतीच्या शेळया देण्याची हमी दिली होती. विरुध्दपक्ष क्रं 1 याने कृषी भरारी योजने अंतर्गत तक्रारदारां कडून करारनामा लिहून घेऊन व त्यांचे कडून रक्कम स्विकारुन त्या रकमेची गुंतवणूक केली होती आणि त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी प्रमाणे विरुध्दपक्षांचे ग्राहक असून विरुध्दपक्ष हे सेवा देणारे आहेत.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 याने, विरुध्दपक्ष क्रं 2 याचे मार्फतीने तक्रारदारां कडून तक्रारकर्ती क्रं-3 शेवंताबाई बबनराव लेंडे हिचे राहते घरी कृषी भरारी योजने अंतर्गत दिनांक-15.07.2015 रोजी प्रत्येकी रुपये-5000/- प्रमाणे एकूण रुपये-15,000/- स्विकारले व त्याच दिवशी या योजने अंतर्गत विरुध्दपक्ष क्रं 1 याने एक करारनामा तक्रारदार क्रं 1 ते 3 यांचे नावे स्टॅम्प पेपरवर लिहून दिला, ज्यावर तक्रारकर्ती क्रं-3 आणि विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख यांच्या स्वाक्ष-या आहेत. सदर करार हा दिनांक-24.06.2015 ते दिनांक-24.01.2019 पर्यंत म्हणजे 43 महिन्या करीता अस्तित्वात राहिल असे करारार नमुद असून विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख याने 43 महिन्यात 01 शेळीच्या बदल्यात तक्रारदारांना 05 शेळया देण्याची किंवा शेळया बाजारात विक्री करुन नफ्यापोटी रुपये-30,000/- परत करण्याची हमी दिली होती.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, दिनांक-24 जानेवारी, 2019 रोजी करारनाम्याची मुदत संपली होती आणि मुदती नंतर ते करारान्वये परिपक्व रक्कम रुपये-30,000/- विरुध्दपक्षा कडून मिळण्यास पात्र झाला होते. तक्रारकर्त्याने फेब्रुवारी, 2019 मध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 आणि त्यांचे सहयोगी यांना दुरध्वनीव्दारे रक्कम परत करण्याची मागणी केली होती. विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन देशमुख याने एप्रिल-2019 मध्ये भंडारा येथे योजनेच्या लाभार्थ्यांची सभा घेऊन सभेमध्ये तो लाभार्थ्यांना सप्टेंबर, 2019 मध्ये व्याजासह रक्कम परत करेल अशी हमी दिली होती. परंतु त्यानंतरही रक्कम देण्यात आली नाही म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष व त्यांचे सहयोगी यांचे कडे दुरध्वनी वरुन वारंवार रकमेची मागणी केली परंतु नंतर विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी दुरध्वनी घेणे सुध्दा बंद केले म्हणून तक्रारकर्त्याने अधिवक्ता श्री विनय भोयर यांचे मार्फतीने उभय विरुध्दपक्षांना दिनांक-28.07.2020 रोजीची रजिस्टर पोस्टाव्दारे कायदेशीर नोटीस पाठविली होती. सदर कायदेशीर नोटीस विरुध्दपक्ष क्रं-2 यास दिनांक- 05.08.2020 रोजी प्राप्त झाली होती परंतु उत्तर दिले नाही तर विरुध्दपक्ष क्रं 1 यास पोस्ट विभागाव्दारे सुचना मिळूनही त्याने सदर कायदेशीर नोटीस स्विकारली नसल्याने नोटीस परत आली. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. त्यामुळे तक्रारदारांना आर्थिक, शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी तक्रारदारांनी विरुध्दपक्षां विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्याव्दारे खालील मागण्या केल्यात-
- तक्रारदार क्रं 1 ते 3 यांना विरुध्दपक्षांचे योजने प्रमाणे देय असलेली रक्कम रुपये-30,000/- देय दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18 टक्के दराने व्याजासह विरुध्दपक्षांकडून देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय विरुध्दपक्षांचे अनुचित व्यापारी पध्दती आणि दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा व नोटीसचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्षांकडून देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख यास जिल्हा ग्राहक आयोग, भंडारा व्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस तामील न झाल्याने तक्रारकर्ता यांचे वकील श्री विनय भोयर यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 याची नोटीस वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यासाठी परवानगी अर्ज सादर केला होता, सदरचा अर्ज जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे मंजूर करण्यात आला होता. त्या अनुसार जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख याचे नावाने दैनिक भास्कर दिनांक-18.03.2021 रोजी नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती परंतु अशी जाहिर नोटीस प्रसिध्द होऊनही विरुध्दपक्ष क्रं 1 हा जिल्हा ग्राहक आयोगा समोर उपस्थित झाला नाही वा त्याने लेखी निवेदन सुध्दा दाखल केले नाही म्हणून सदर तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 याचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने प्रकरणात दिनांक-29.09.2021 रोजी पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 अमित देशमुख यास जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस तामील झाल्या बाबत रजि. पोस्टाची पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु अशी नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष क्रं 2 हा जिल्हा ग्राहक आयोगा समोर उपस्थित झाला नाही वा त्याने लेखी निवेदन सुध्दा दाखल केले नाही म्हणून सदर तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 याचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने प्रकरणात दिनांक-29.09.2021 रोजी पारीत केला.
05. तक्रारदारांची सत्यापना वरील तक्रार तसेच अज्ञान तक्रारकर्ता क्रं 1 श्री यश दशरथ धावडे तर्फे अज्ञान पालकर्ता वडील श्री दशरथ सदाशिव धावडे यांचा शपथे वरील पुरावा आणि लेखी युक्तीवाद त्याच बरोबर साक्षदार श्री मंगेश रामकृष्ण वैद्द याचा शपथे वरील पुरावा तसेच त्याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवज ईत्यादीचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री विनय भोयर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्रं | मुद्दा | उत्तर |
1 | तक्रारदार हे विरुध्दपक्षाचे ग्राहक होतात काय? | -होय- |
2 | तक्रारदारांची गुंतवणूक केलेली रक्कम देयलाभ व व्याजासह परत न केल्याने विरुध्दपक्ष यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
3 | करारा प्रमाणे तक्रारदारांची गुंतवणूक केलेली रक्कम देयलाभ व व्याजासह देण्यास कोण जबाबदार आहे? | कृषी भरारी योजना ही नोंदणीकृत फर्म आणि तिचे भागीदार/संचालक आणि एक भागीदार/संचालक श्री सचिन प्रविणराव देशमुख |
4 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: निष्कर्ष ::
मुद्दा क्रं 1 बाबत
06. तक्रारदारांची तक्रार सत्यापनावर दाखल आहे, त्याच बरोबर त्यांनी अज्ञान तक्रारकर्ता क्रं 1 श्री यश दशरथ धावडे तर्फे अज्ञान पालकर्ता वडील श्री दशरथ सदाशिव धावडे यांचा शपथे वरील दाखल केलेला पुरावा आणि साक्षदार श्री मंगेश रामकृष्ण वैद्द याचा शपथे वरील पुरावा दाखल केलेला आहे तसेच तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख यांचे मध्ये झालेला करारनामा पुराव्यार्थ दाखल केलेला आहे या सर्व दस्तऐवजाचे अवलोकन करण्यात आले. तक्रारदारांनी तक्रारीतून केलेले आरोप विरुध्दपक्षांना संधी मिळूनही खोडून काढलेले नाहीत त्यामुळे सदर तक्रार ही गुणवत्तेवर (On Merit) निकाली काढण्यात येत आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 याने, तक्रारदारां कडून तक्रारकर्ती क्रं-3 शेवंताबाई बबनराव लेंडे हिचे राहते घरी कृषी भरारी योजने अंतर्गत प्रत्येक तक्रारदारा कडून रुपये-5000/- प्रमाणे एकूण रुपये-15,000/- दिनांक-15.07.2015 रोजी स्विकारले व त्याच दिवशी या योजने अंतर्गत तक्रारदारांचे नावे विरुध्दपक्ष क्रं 1 याने एक करारनामा स्टॅम्प पेपरवर लिहून दिला, ज्यावर तक्रारकर्ती क्रं-3 आणि विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख यांच्या स्वाक्ष-या आहेत व काही मुदती नंतर सदर रकमेच्या मोबदल्यात व्याजासह एकूण रककम रुपये-30,000/- देण्याची हमी विरुध्दपक्ष क्रं 1 याने लिखित स्वरुपात स्टॅम्प पेपरवर लिहून दिली होती, त्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्ष कृषी भरारी योजना ही फर्म आणि तिचे तर्फे भागीदार/संचालक आणि एक भागीदार/संचालक श्री सचिन प्रविणराव देशमुख यांचा ग्राहक होतो म्हणून आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 2 बाबत
07. तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख यांचे मध्ये कृषी भरारी योजने अंतर्गत झालेल्या दिनांक-15.07.2015 रोजीच्या करारा अनुसार सदर करार हा दिनांक-24.06.2015 ते दिनांक-24.01.2019 पर्यंत म्हणजे 43 महिन्या करीता अस्तित्वात राहिल असे नमुद आहे. सदर करारान्वये विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख याने 43 महिन्यात 01 शेळीच्या बदल्यात तक्रारदारांना 05 शेळया देण्याची किंवा शेळया बाजारात विक्री करुन नफ्यापोटी रुपये-30,000/- परत करण्याची हमी दिली होती. तक्रारदारांचे म्हणण्या प्रमाणे दिनांक-24 जानेवारी, 2019 रोजी करारनाम्याची मुदत संपली होती आणि मुदती नंतर ते करारान्वये परिपक्व रक्कम रुपये-30,000/- विरुध्दपक्षा कडून मिळण्यास पात्र झाले होते. विरुध्दपक्ष यांनी सुध्दा कराराची मुदत संपल्या नंतर देय लाभाची रक्कम दिली नाही म्हणून त्यांनी त्यांचे वकील श्री विनय भोयर यांचे मार्फतीने उभय विरुध्दपक्षांना दिनांक-28.07.2020 रोजीची रजिस्टर पोस्टाव्दारे कायदेशीर नोटीस पाठविली होती. सदर कायदेशीर नोटीस बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख यास पोस्ट विभागाव्दारे सुचना मिळूनही त्याने सदर कायदेशीर नोटीस स्विकारली नसल्याने नोटीस परत आली. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. त्यामुळे त्याला आर्थिक, शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब सिध्द होते आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 3 बाबत
08. तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख यांचे मध्ये कृषी भरारी योजने अंतर्गत झालेला दिनांक-03.07.2015 रोजीच्या करारा प्रमाणे सदर करार हा दिनांक-24.06.2015 ते दिनांक-24.01.2019 पर्यंत म्हणजे 43 महिन्या करीता अस्तित्वात होता आणि सदर करारान्वये विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख याने 43 महिन्यात 01 शेळीच्या बदल्यात तक्रारदारांना 05 शेळया देण्याची किंवा शेळया बाजारात विक्री करुन नफ्यापोटी रुपये-30,000/- परत करण्याची हमी दिली होती. तक्रारदारांच्या म्हणण्या प्रमाणे दिनांक-24 जानेवारी, 2019 रोजी करारनाम्याची मुदत संपली होती आणि मुदती नंतर ते करारान्वये परिपक्व रक्कम रुपये-30,000/- विरुध्दपक्षा कडून मिळण्यास पात्र झाले होते परंतु आज पावेतो पर्यंत विरुध्दपक्ष क्रं 1 याने करारा प्रमाणे देय रक्कम त्याला दिलेली नाही.
जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे सदर कराराचे अवलोकन केले असता सदर करार हा फक्त तक्रारदार आणि विरुध्दपक्ष कृषी भरारी योजना ही फर्म आणि तिचे तर्फे भागीदार श्री सचिन प्रविणराव देशमुख यांचे मध्ये झालेला आहे. तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 अमित देशमुख हा कृषी भरारी योजनेचा प्रमोटर असून तो विरुध्दपक्ष क्रं 1 याने भंडारा जिल्हया करीता नियुक्त केलेल्या सहयोगी श्री निशीकांत लेंडे आणि श्री मंगेश वैद्द याचे मार्फतीने सदर योजनेची जाहिरात करुन ग्राहकां कडून निवेश रक्कम जमा करण्याचे कार्य करतो. विरुध्दपक्ष क्रं 1 यांची पत्नी श्रीमती भाग्यश्री देशमुख ही सुध्दा सदर योजने मध्ये डायरेक्टर आहे. परंतु सदर कृषी भरारी योजने अंतर्गत श्री अमित देशमुख हा सदर योजनेचा प्रमोटर असल्या बाबत तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख याची पत्नी श्रीमती भाग्यश्री देशमुख डायरेक्टर असल्या बाबत तक्रारदारांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष कोणताही दस्तऐवजी पुरावा दाखल केलेला नाही. परंतु एक बाब सिध्द होते की, तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख यांचे मध्ये जो स्टॅम्प पेपरवरील करार झालेला आहे आणि त्याची प्रत या प्रकरणात दाखल आहे, त्यानुसार कृषी भरारी योजना ही एक फर्म आणि सदर फर्म मध्ये कोणी भागीदार/संचालक असतील ते आणि सदर फर्म तर्फे एक भागीदार विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख ज्याने तक्रारदारां सोबत करारनामा केलेला आहे तो या सर्वांवर तक्रारदारांनी गुंतवणूक केलेली रक्कम देयलाभांसह व व्याजासह देण्याची जबाबदारी येते. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे येथे स्पष्ट करणे आवश्यक आहे की, तक्रारदार आणि विरुध्दपक्ष श्री सचिन प्रविणराव देशमुख यांचे मध्ये जो करार झालेला आहे, त्या करारनाम्यावर कृषी भरारी फर्मचा उल्लेख असून तिचे तर्फे भागीदार म्हणून विरुध्दपक्ष सचिन प्रविणराव देशमुख याने करारावर सही केलेली आहे. याचाच अर्थ असा होतो की, कृषी भरारी योजना ही एक भागीदारी फर्म असावी आणि सदर भागीदारी फर्म तर्फे भागीदार म्हणून श्री सचिन प्रविणराव देशमुख याने करार करुन करारावर सही केलेली आहे. भागीदारी कायदया अंतर्गत भागीदारी फर्म ही नोंदणीकृत असो किंवा नसो एका भागीदाराचे कृत्या बद्दल अन्य भागीदारांची सुध्दा सारखीच जबाबदारी येते
Section 25 in The Indian Partnership Act, 1932
25. Liability of a partner for acts of the firm.—every partner is liable, jointly with all the other partners and also severally, for all acts of the firm done while he is a partner.
आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 3 चे उत्तर होकारार्थी नोंदवित असून करारा प्रमाणे कृषी भरारी योजना ही फर्म आणि सदर फर्म मध्ये जे कोणी भागीदार/संचालक असतील ते आणि सदर फर्म तर्फे एक भागीदार विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख ज्याने तक्रारदारां सोबत करार केलेला आहे, या सर्वांची तक्रारदारांनी योजने मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम देय लाभ व व्याजासह तक्रारदारांना परत करण्याची जबाबदारी येते आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 3 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत. विरुध्दपक्ष क्रं 2 श्री अमित देशमुख हा विरुध्दपक्षाचे कृषी भरारी योजनेचा प्रमोटर असल्याचे आणि त्याचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख हा पैसे गोळा करीत असल्याचा आरोप तक्रारदारांनी तक्रारीतून केलेला आहे परंतु तक्रारदार आणि विरुध्दपक्ष क्रं 1 श्री सचिन प्रविणराव देशमुख यांचे मध्ये जो करार झालेला आहे त्यावर विरुध्दपक्ष क्रं 2 श्री अमित देशमुख याची सही
नाही. दुसरी बाब अशी आहे की, तक्रारदारांच्या आरोपा प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 श्री अमित देशमुख हा सदर योजेने मध्ये प्रमोटर असल्या बाबतचा कोणताही दस्तऐवजी पुरावा तक्रारदारांनी सादर केलेला नाही त्यामुळे योग्य त्या पुराव्या अभावी त्याचे विरुध्द कोणताही आदेश पारीत करता येणार नाही. त्याच बरोबर तक्रारदारांनी कृषी भरारी योजने मध्ये नेमके कोण कोण भागीदार आहेत या बाबतचाही दस्तऐवज पुराव्या दाखल सादर केलेला नाही परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 श्री अमित देशमुख हा कृषी भरारी योजनेचा भागीदार असल्यास व ही बाब पुढे समोर आल्यास त्याची तक्रारदारांना देय असलेल्या रकमे बाबतची जबाबदारी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या येईल ही बाब जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे विशेषत्वाने येथे नमुद करण्यात येते.
09. उपरोक्त नमुद मुद्दा क्रं 1 ते 3 यांचे उत्तर होकारार्थी आल्याने तक्रारदारांची प्रस्तुत तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. परिणामी तक्रारदारांनी विरुध्दपक्षाचे योजने मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम देय लाभासह व व्याजासह विरुध्दपक्षा कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. त्याच बरोबर विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्या अनुसार आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
:: अंतिम आदेश ::
- तक्रारदार क्रं-1) श्री यश दशरथ धावडे, अज्ञान तर्फे अ.पा.क. श्री दशरथ सदाशिव धावडे, तक्रारदार क्रं-2) अनुसया धनराज बरभैय्या आणि तक्रारदार क्रं-3) शेवंताबाई बबनराव लेंडे यांची तक्रार विरुध्दपक्ष कृषी भरारी योजना (Registration No.-NG000001301) अंजनगाव बारी, जिल्हा अमरावती ही भागीदारी फर्म आणि सदर भागीदारी फर्म तर्फे तिचे सर्व भागीदार/संचालक तसेच एक भागीदार/संचालक श्री सचिन प्रविणराव देशमुख यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष कृषी भरारी योजना ही भागीदारी फर्म आणि सदर भागीदारी फर्म तर्फे तिचे सर्व भागीदार/संचालक तसेच एक भागीदार/संचालक श्री सचिन प्रविणराव देशमुख यांना आदेशित करण्यात येते की,त्यांनी दिनांक-15.07.2015 रोजीच्या करारा प्रमाणे तिन्ही तक्रारदारांनी गुंतवणूक केलेली आणि परिपक्व दिनांक-24.01.2019 रोजी देय झालेली रक्कम रुपये-30,000/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्त) तक्रारदारांना अदा करावी आणि सदर रकमेवर दिनांक-25.01.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्के दराने व्याज तक्रारदारांना दयावे.
- तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल भरपाई म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्ष कृषी भरारी योजना ही भागीदारी फर्म आणि सदर भागीदारी फर्म तर्फे तिचे सर्व भागीदार/संचालक तसेच एक भागीदार/संचालक श्री सचिन प्रविणराव देशमुख यांनी तक्रारदार यांना अदा कराव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष कृषी भरारी योजना ही भागीदारी फर्म आणि सदर भागीदारी फर्म तर्फे तिचे सर्व भागीदार/संचालक तसेच एक भागीदार/संचालक श्री सचिन प्रविणराव देशमुख यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- विरुध्दपक्ष क्रं 2 श्री अमित देशमुख हा विरुध्दपक्ष कृषी भरारी योजनेचा भागीदार असल्या बाबत कोणताही दस्तऐवजी पुरावा समोर न आल्याने विरुध्दपक्ष क्रं 2 याचे विरुध्द तुर्तास कोणतेही आदेश पारीत करण्यात येत नाहीत.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त संच त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.