तक्रारदारातर्फे अॅड. घोणे हजर.
जाबदेणार गैरहजर
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(02/01/2014)
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणारांविरुद्ध निकृष्ट सेवा दिल्याबद्दल ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार हे पर्वती, यशोप्रभा बिल्डिंग, पुणे – 9 येथील रहीवासी असून जाबदेणार हे विष्णु विहार, बिबवेवाडी, पुणे 37 येथील रहीवासा आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना विष्णु विहार हौसिंग सोसायटीतील 1073.31 चौ. फु. क्षेत्रफळ असलेली सदनिका क्र. 12 दाखविली. सदरची सदनिका तक्रारदार यांना पसंत पडल्यानंतर त्याची किंमत रक्कम रु. 51,00,000/- ठरली. जाबदेणार यांनी सदरची सदनिका विष्णु डेव्हलपर्स यांचेकडून दि. 19/9/2002 रोजी खरेदी केलेली होती. या सदनिकेवर स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेचे कर्ज होते. दि. 30/3/2011 रोजी सदरची सदनिका खरेदीसंबंधी तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये व्यवहार झाला व विसारापोटी तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रक्कम रु. 11,00,000/- दिले. उर्वरीत रक्कम रु.40,00,000/- नोंदणीकृत करारनामा करण्याच्या वेळी देण्याचे ठरले. परंतु त्यापूर्वी जाबदेणार यांनी कर्जाचा बोजा कमी करण्याचे मान्य केले होते. त्यामुळे सदरचा व्यवहार पूर्ण झाला नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 11,00,000/- परत करण्याचे मान्य केले. दि. 5/9/2011 रोजी जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 11,00,000/- चा बँक ऑफ बडोदाचा चेक दिला, परंतु तो वठला नाही. त्यानंतर जाबदेणार यांनी तक्रारदार यांना केवळ रक्कम रु. 50,000/- परत करुन रक्कम रु. 10,50,000/- आठ दिवसंत देण्याचे मान्य केले, परंतु सदरची रक्कम दिली नाही, म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
2] जाबदेणार प्रस्तुत प्रकरणी मंचामध्ये हजर झाले, परंतु त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे प्रस्तुतचे प्रकरण, तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे व शपथपत्र यांचा विचार करता गुणवत्तेवर चालविण्यात आले.
3] तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदोपत्री पुरावे आणि लेखी कथने विचारात घेता खालील मुद्दे निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्ये | निष्कर्ष |
1. | तक्रारदार हे ‘ग्राहक’ या व्याख्येमध्ये बसतात का? | नाही |
2. | प्रस्तुतची तक्रार चालविण्याचा अधिकार या मंचास आहे का? | नाही |
3. | अंतिम आदेश काय ? | तक्रार फेटाळण्यात येते |
कारणे
4] या प्रकरणात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे स्पष्ट होते की जाबदेणार यांनी विष्णु हौसिंग सोसायटीमध्ये एक सदनिका स्वत:साठी खरेदी केली होती व ती तक्रारदार यांना विकण्याचे मान्य केले होते. जाबदेणार हे बिल्डर आहेत, असा उल्लेख तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये कुठेही केलेला नाही. त्याचप्रमाणे सदरचा व्यवहार हा सदनिकेच्या फेरविक्रीचा आहे. अशा परिस्थितीमध्ये तक्रारदार व जाबदेणार यांचा व्यवहार हा ‘ग्राहक’ व ‘विक्रेता’ किंवा सेवा पुरवठादार, असा होता हे सिद्ध होत नाही. या प्रकरणामध्ये तक्रारदार जर ग्राहक नसतील तर या ग्राहक मंचास प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे अधिकार नाहीत. सबब, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येत आहे.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
4. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की त्यांनी
आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या
आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे संच घेऊन
जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 02/जाने./2014