तक्रारदार स्वत:
जाबदेणार नो से
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
श्री, एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 20 जुन 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
[1] तक्रारदारांनी समता नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, पुणे मध्ये पुढील प्रमाणे मुदतठेवी ठेवल्या होत्या-
1. सौ. प्रभावती बी. आचारी – धनवर्धिनी ठेव योजना – 57 महिने दामदुप्पट रुपये 10,000/- दिनांक 7/5/1999, पावती क्र.399
2. ऋतिका उमेश आचारी – मुदत ठेव – दामदुप्पट – मुळ रक्कम रुपये 10,000/-, पावती क्र.104, ठेव दिनांक 6/1/2001
3. कायम मुदत ठेव रक्कम रुपये 1,000/- दिनांक 6/2/2001, 26000/- रुपये दामदुपटीची रक्कम
4. सौ. प्रभावती बी आचारी – शेअर्स खाते फॉर्म नं 3415 रक्कम रुपये 110/-
समता पतपेढी ही सहयाद्री नागरी पतसंस्थेत विलीन झाल्यानंतर तक्रारदारांना जाबदेणार बँकेनी - सहयाद्री नागरी पतसंस्थेने एकूण रुपये 36,000/- अदा केले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी एकूण रुपये 47,110/- व त्यावरील व्याज रक्कम रुपये 46,000/- मिळून होणारी रक्कम रुपये 93,110/- तक्रारदारांना मिळावयास हवे होते. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 36,000/- वजा जाता उर्वरित ठेवीवरील व्याज व मुदतीनंतरचे व्याजासह जी काही रक्कम होईल ती मागणी करतात. तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
[2] जाबदेणार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर मंचापुढे हजर झाले परंतु लेखी जबाब दाखल केला नाही म्हणून जाबदेणार यांच्या विरुध्द मंचाने नो से आदेश पारीत केला.
[3] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी मंचासमोर समता नागरी सहकारी पतपेढी मर्या. यांची दिनांक 7/5/1999 ची रुपये 10,000/- धनवर्धिनी ठेव योजना बोनस खाते 57 महिन्यात दाम दुप्पटीची मुळ पावती दाखवून त्याची व्हेरिफाईड प्रत दाखल केली आहे. समता नागरी सहकारी पतपेढी मर्या. यांची दिनांक 6/5/2001 ची रुपये 110/- ची शेअर्स पोटी रोख रक्कम जमा झाल्याची मुळ पावती दाखवून त्याची व्हेरिफाईड प्रत दाखल केली आहे. तसेच समता नागरी सहकारी पतपेढी मर्या. यांची दिनांक 7/5/1999 ची रुपये 10,000/- दामदुप्पट योजनेअंतर्गत जमा झाल्याची मुळ पावती दाखवून त्याची व्हेरिफाईड प्रत दाखल केली आहे. त्यामुळे या तिन्ही पावत्यांअंतर्गत तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या कडे एकूण रुपये 20,110/- दिनांक 7/5/1999 पासून जमा केलेली आहे. तक्रारदारांनी रुपये 110/- शेअर्स पोटी भरलेले असल्यामुळे रुपये 110/- तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून मिळण्यास पात्र नाहीत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांकडून दामदुप्पट गुंतवणूक योजनेअंतर्गत रक्कम स्विकारुन मॅच्युरिटी दिनांकानंतर दामदुप्पट होऊन मिळणारी रक्कम रुपये 40,000/- वारंवार लेखी व तोंडी मागणी करुनही रक्कम परत न करणे ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार समता नागरी सहकारी पतपेढी मर्या. ही जाबदेणार सहयाद्री नागरी पतसंस्थेमध्ये विलीन झालेली आहे. त्यानंतर तक्रारदारांना जाबदेणार यांच्याकडून रुपये 36,000/- प्राप्तही झालेले आहे. उर्वरित रक्कमेची मागणी करणारा पत्रव्यवहार तक्रारदारांनी मंचासमोर दाखल केलेला आहे. तक्रारदारांनी वर नमूद केल्याप्रमाणे फक्त रुपये 20,000/- च्या मुळ पावत्या दिनांक 7/5/1999 मंचासमोर दाखवून त्याची व्हेरिफाईड प्रत दाखल केलेली आहे. मॅच्युरिटी दिनांकानंतरही जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम मागणी करुनही परत केली नाही, म्हणून तक्रारदार मॅच्युरिटी रक्कम रुपये 40,000/- व त्यावर दिनांक 7/9/2003 पासून 9 टक्के द.सा.द.शे व्याजही मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. उर्वरित रकमांच्या मुळ पावत्या मंचासमोर दाखविण्यात आलेल्या नाहीत, तसेच त्यांच्या व्हेरिफाईड प्रतीही रेकॉर्ड वर दाखल करण्यात आलेल्या नसल्यामुळे तक्रारदारांची ही मागणी मंच नामंजुर करीत आहे. तक्रारदारांना व्याज देण्यात आल्यामुळे तक्रारदारांच्या नुकसान भरपाई पोटीच्या इतर मागण्या मंच अमान्य करीत आहे. तक्रारदार तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मिळण्यास पात्र आहेत.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 40,000/- मॅच्युरिटी दिनांक 7/9/2003
पासून द.सा.द.शे 9 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम मिळेपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
[एस.के.कापसे] [अंजली देशमुख]
सदस्य अध्यक्ष