तक्रारदारांतर्फे प्रतिनिधी हजर.
जाबदेणार गैरहजर (एकतर्फा)
द्वारा मा. श्रीमती. गीता. एस. घाटगे, सदस्य
** निकालपत्र **
(21/01/2014)
सर्व तक्रारदारांनी जाबदेणार यात्रा कंपनीविरुद्ध, त्यांनी ठरविल्याप्रमाणे यात्रा घडविली नाही म्हणून सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. याबाबत थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे :
1] सर्व तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. तक्रारदार यांनी जाबदेणार श्री. शिरीष खेडेकर यांच्या मालकीच्या अथर्व ट्रॅव्हल्स या कंपनीमार्फत बद्रीनाथ-केदारनाथ या चारधाम यात्रेस जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी जाबदेणार यांच्याकडे प्रत्येकी रक्कम रु. 51,900/-, 57,800/-, 26,276/- व 61,300/- या रकमा जमा केल्या. जाबदेणार कंपनीमार्फत यात्रेची तारीख निश्चित करुन तक्रारदार यांना कळविण्यात आली. तसेच या सहलीसाठी रेल्वेची तिकिटे बुक झाल्याचेही कळविले. तक्रारदार यांच्या कथनानुसार, जाबदेणार यांनी प्रवासाची तारीख दि. 24/05/2013 ते दि.08/06/2013 अशी ठरविली होती, परंतु या तारखेस प्रवासाची सुरुवात झाली नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दि. 27/5/2013 ला राजधानी एक्सप्रेस आणि दुरांतो एक्सप्रेसने जायचे ठरले आहे, असे कळविले. सदरच्या एक्सप्रेस या मुंबईहून निघणार होत्या. या सहलीमध्ये काही प्रवासी पुण्याहून तर काही प्रवासी मुंबईहून निघणार होते. तक्रारदारांना पुण्याहून मुंबईस नेण्यासाठी बस पाठवितो असे जाबदेणार यांनी कळविले होते, परंतु कबुल केलेल्या वेळेत जाबदेणार यांनी बस पाठविली नाही. रात्री 9.30 वा. सर्व प्रवाशांना घेवून बस पुण्याहून मुंबईकडे निघाली. रात्री 12 च्या बांद्रा-हरीद्वार या गाडीने तक्रारदार यांची सहल सुरु होणार असे जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कळविले होते व या गाडीचे पक्के आरक्षण असल्याचेही कळविले होते, परंतु मुळातच तक्रारदार यांची बस रात्री 9.30 वाजता निघाल्यामुळे बांद्रा-हरिद्वार या एक्सप्रेसच्या वेळेत मुंबईला पोहचली नाही आणि तक्रारदारांची बांद्रा-हरिद्वार एक्सप्रेस चुकली व त्यांना सहल रद्द करावी लागली. म्हणून तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेविरुद्ध प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांच्या कथनानुसार, जाबदेणार यांनी मुद्दामहून त्यांना नेण्यासाठी उशिराने बस पाठविली. जाबदेणार यांना तक्रारदारांना सहलीला नेण्याचे नव्हते. जाबदेणार यांच्या अशा वागणुकीमुळे तक्रारदार यांना प्लॅटफॉर्मबाहेरच थांबावे लागले व मन:स्ताप सहन करावा लागला. जाबदेणार यांनी तक्रारदारांकडे मुळ आरक्षित तिकिट न देता त्याच्या झेरॉक्स प्रती दिलेल्या होत्या. तक्रारदारांच्या कथनानुसार, जाबदेणार यांनी त्यांची हेतुपुरस्सर फसवणुक केलेली आहे व त्यामुळे तक्रारदार यांना त्यांची सहल रद्द करुन पुन्हा परत यावे लागले. त्यानंतर तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडे प्रत्यक्षात भेटून, लेखी व टेलीफोनद्वारे संपर्क करुन सहलीच्या रकमेची मागणी केली. तथापी, जाबदेणार यांनी त्यांना दाद दिली नाही. दि. 28/5/2013 रोजी जाबदेणार यांनी तक्रारदारांना त्यांनी जमा केलेल्या रकमेचे पुढील तारखेचे (Post dated) धनादेश दिले, परंतु सदरचे धनादेश न वठता परत आले. यानंतर तक्रारदारांनी रक्कम परत मिळण्याच्या केलेल्या कोणत्याही मागणीची दखल जाबदेणार यांनी घेतली नाही, म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीअन्वये तक्रारदार यांनी सहलीपोटी जमा केलेली एकुण रक्कम रु. 1,97,276/-, 18% व्याजासह तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी एकुण रक्कम रु.70,000/-, कोर्टाचा खर्च व अन्य खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- अशी मागणी केलेली आहे.
2] तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ प्रतिज्ञापत्र व एकुण नऊ कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
3] मंचाच्या नोटीसीची बजावणी जाबदेणारांचेवर होऊनदेखील जाबदेणार प्रस्तुत प्रकरणी हजर न राहील्यामुळे त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत करण्यात येऊन सदरहू प्रकरण निकालवर नेमण्यात आले.
4] तक्रारदारांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र व दाखल कागदपत्रे यांचे साकल्याने अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी अथर्व ट्रॅव्हल्स या कंपनीकडे खालीलप्रमाणे रकमा जमा केलेल्या होत्या.
अ. क्र. | तक्रारदारांचे नाव | जमा केलेली रक्कम |
1. | श्री. विलास श्रीरंग बडवे | रु. 51,900/- |
2. | श्री. विजयकुमार तांबोळकर | रु. 57,800/- |
3. | श्री. हेमंत स. हळवे | रु. 26,276/- |
4. | सौ. प्रतिमा इंगोले | रु. 61,300/- |
या रकमांच्या जाबदेणारांनी दिलेल्या पावत्या प्रस्तुत प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आहेत. या पावत्यांवर तक्रारदारांनी जाबदेणारांकडे रक्कम जमा केलेल्या रकमेसह त्यावर अधिकृत इसमाच्या सह्या दिसून येतात. यावरुन तक्रारदार यांनी जाबदेणार अथर्व ट्रॅव्हल्स या कंपनीकडे चारधाम यात्रेसाठी त्यांच्या कथनानुसार रकमा जमा केल्या होत्या, हे शाबीत होते. त्या पावत्यांसोबत तक्रारदार यांनी, जाबदेणार यांनी त्यांना दिलेल्या आरक्षित तिकिटांच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. या तिकिटांवरील तारखेवरुन व त्यावर नमुद करण्यात आलेल्या पोहचण्याच्या ठिकाणावरुन तक्रारदार यांनी जाबदेणार कंपनीमार्फत चारधाम यात्रेसाठी जायचे निश्चित केले होते व त्याकरीता त्यांचे रेल्वेचे आरक्षण करण्यात आले होते, हे सिद्ध होते. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या लेटरहेडवर चारधाम यात्रा, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ व केदारनाथ येथील 16 दिवसांचा लेखी नियोजीत कार्यक्रम दाखल केलेला आहे. तसेच जाबदेणार यांनी तक्रारदार श्रीमती इंगोले व श्री. तांबोळकर यांना दिलेले जे धनादेश न वठता परत आलेले होते त्याच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. यावरुन तक्रारदारांचे जे म्हणणे आहे की जाबदेणार यांनी त्यांना धनादेश दिलेले होते व ते न वटता परत आले, ही बाबही प्रस्तुत प्रकरणी शाबीत होते. जाबदेणारांचेवर मंचाची नोटीस बजवूनसुद्धा व त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी असूनसुद्धा ते प्रस्तुत प्रकरणी हजर राहीले नाहीत व त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारीचे खंडन केले नाही. या सर्व बाबींचा एकत्रितरित्या विचार करता, तक्रारदारांनी जाबदेणार कंपनीकडे यात्रेपोटी संपूर्ण रक्कम जमा करुनदेखील, जाबदेणार यांनी हेतुपुरस्सर यात्रा घडविण्याचे टाळले व तक्रारदारांच्या मागणीनंतरही त्यांनी यात्रेपोटी जमा केलेली रक्कम तक्रारदारांना परत केली नाही व बँक खात्यावर रक्कम नसतानाही धनादेश देवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन दुषित सेवाही पुरविली, ही बाब मंचापुढे स्पष्टपणे शाबीत होते, असा मंचाचा स्पष्ट निष्कर्ष निघतो.
5] वर नमुद विवेचन व निष्कर्षास अनुसरुन जाबदेणार यांनी सर्व तक्रारदारांना त्यांनी यात्रेपोटी जमा केलेली सर्व रक्कम परत करावी, असा आदेश करणे योग्य व न्याय ठरेल असे मंचास वाटते. सदरची रक्कम जाबदेणार यांनी तक्रारदार यांना आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत दिली नाही, तर सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याज देण्याचेही आदेश करण्यात येतात. प्रस्तुत प्रकरणातील सर्व तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून त्यांनी यात्रेसाठी रक्कम जमा करुनसुद्धा आणि पुण्याहून मुंबईपर्यंत जाऊनसुद्धा जाबदेणार यांनी अवलंबलेल्या अनुचित व्यापारी प्रथेमुळे व त्यांनी पुरविलेल्या दुषित सेवेमुळे तक्रारदारांना सहलीचा आनंद घेता आला नाही. यामध्ये तक्रारदारांना जो मानसिक व शारीरिक त्रास झाला याची नोंद घेऊन तक्रारदारांना प्रत्येकी रक्कम रु.7,000/- मंजूर करण्यात येत आहेत. तसेच तक्रार अर्जाच्या खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. 3000/- मंजूर करण्यात येत आहे.
सबब मंचाचा आदेश की,
** आदेश **
1. यातील जाबदेणार यांनी तक्रारदार क्र 1 व 2
यांना रक्कम रु. 51,900/-, तक्रारदार क्र.3 व 4
यांना रक्कम रु.57,800/- तक्रारदार क्र. 5 यांना
रक्कम रु. 26,276/- आणि तक्रारदार क्र. 6 व
7 यांना रक्कम रु. 61,300/- या आदेशाची
प्रत मिळाल्या पासून सहा आठवड्यांच्या आंत
अदा करावी.
जाबदेणार यांनी वर नमुद केलेल्या रकमा जर
तक्रारदार यांना मुदतीत दिल्या नाहीत, तर सदर
रकमांवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रकमांची
फेड होईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याज द्यावे
2. जाबदेणार यांना असेही आदेश देण्यात येतात
की त्यांनी सर्व तक्रारदारांना प्रत्येकी रक्कम
रु. 7,000/- (रु. सात हजार फक्त) नुकसान
भरपाईपोटी आणि एकत्रितरित्या रक्कम रु.3,000/-
(रु. तीन हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी या
आदेशाची प्रत मिळाल्या पासून सहा आठवड्यांच्या
आंत अदा करावी.
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
4. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की
त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 21/जाने./2014