द्वारा- मा. श्री. एस. एम. कुंभार, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 28/मे/2013
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 12 अंतर्गत जाबदेणार करणपार्क गृहरचना संस्थेविरुध्द दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार करणपार्क बिल्डींग सी – 1 सदनिका क्र 2 येथील रहिवासी असून त्यांच्या वरील बाजूस श्री. विश्वनाथ काटे व श्री. मनोज काटे यांची सदनिका क्र.6 आहे. सदनिका क्र 6 मधून सुमारे 2 वर्षापासून त्यांचे संडास व बाथरुम मधील आऊटलेट मधील पाण्याची गळती बाहेरील बाजूस होऊन त्यांच्या भिंतीत पाणी मुरून तक्रारदारांच्या संडास व बाथरुम मधील भिंती सतत ओल्या आहेत. आतमध्ये लाईट व गिझर असल्यामुळे भिंतीत लाईट करंट उतरुन तक्रारदारांच्या कुटूंबियांच्या जिवास धोका असल्याबाबत तक्रारदारांनी जाबदेणार यांना कळविले होते. गळती थांबविणेबाबत दिनांक 18/8/2010 पासून सतत वारंवार तक्रारी अर्ज केले होते. परंतू जाबदेणार सोसायटी व श्री. काटे यांनी पाणी गळती अद्यापी थांबविलेली नाही. त्यामुळे संडास व बाथरुम मधील खिडक्या, रंग, प्लास्टर असे सुमारे रुपये 50,000/- चे नुकसान झाले. जाबदेणार यांनी नेमलेल्या समितीने पाणी झिरपत असल्याचे सांगितल्यामुळे श्री. काटे यांनी जुजबी वॉटर प्रुफिंगचे काम केले. गळती थांबली नसल्याचे तक्रारदारांनी सोसायटीस परत कळविले. श्री. काटे यांनी 4 वेळा काम करुन घेतलेले असून सदर काम दोघातील असल्यामुळे दोघांनीच करुन घ्यावे असेही सोसायटीने तक्रारदारांना सांगितले. जाबदेणार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली नाही, पाणी गळतीचा ठरावही केला नाही, नियमावली बनविली नाही. तक्रारदार देखभाल खर्च देत असल्यामुळे गळती दुरुस्तीची जबाबदारी जाबदेणार यांचीच आहे. जाबदेणार यांनी गळती दुरुस्तीचे काम करुन दिले नाही म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. जाबदेणार यांनी त्यांच्या वरील मजल्यावरील सदनिकेतील गळती थांबवावी, संडास व बाथरुममधील नुकसानीचे रुपये 50,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 40,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 9,000/- मिळावा अशी मागणी तक्रारदार करतात.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या कथनानुसार तक्रारदारांनी रुपये 50,000/- नुकसानीचा पुरावा दाखल केला नाही. पावत्या दाखल केलेल्या नाहीत. श्री. काटे यांना गळती थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार श्री. काटे यांनी ठेकेदार नेमून दुरुस्तीचे काम करुन घेतले होते. तक्रारदारांकडून गळती न थांबल्याचा अर्ज प्राप्त झाल्यावर कंत्राटदाराकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. ठेकेदाराने काम व्यवस्थित न केल्यामुळे पैसे परत करण्यास भाग पाडण्यात आले होते. नंतर श्री. काटे यांनी दुस-या ठेकेदाराकडून गळतीचे काम करुन घेतलेले आहे. गळतीची वॉरंटी ठेकेदाराने लेखी स्वरुपात श्री. काटे यांना दिलेली होती. तक्रारदारांनी महाराष्ट्र शासन हौसिंग सोसायटी बायलॉजप्रमाणे [दुरुस्ती व देखभाल] वर्गणी दिलेली नाही. सोसायटीची कार्यकारिणी सोसायटीच्या कामकाजासाठी कोणताही मोबदला घेत नाही. सामाजिक कार्य म्हणून स्वत:चा वेळ देऊन कामकाज करते. सबब तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, कथने व शपथपत्र यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहे. मुद्ये, निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत काय | नाही |
2 | तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून गळती थांबविण्याची मागणी व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय | नाही |
3 | आदेश काय | तक्रार नामंजूर करण्यात येते |
कारणे-
मुद्या क्र 1 ते 3-
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार गृहनिर्माण संस्थे विरुध्द दाखल केलेली आहे. तक्रारदारांच्या वरील मजल्यावरील सदनिकेतील संडास व बाथरुम मधील गळतीमुळे तक्रारदारांच्या सदनिकेचे नुकसान झाले, गळती थांबलेली नाही त्यामुळे तक्रारदारांच्या कुटूंबियास धोका आहे असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांना गळती थांबविण्यासाठी मोबदला दिला होता यासंदर्भात तक्रारदारांनी कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत. जाबदेणार यांना मोबदला देऊनही जाबदेणार यांनी गळतीचे काम पूर्ण केले नाही, अथवा तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये गळती थांबविली नाही अशी तक्रारदारांची तक्रार नाही. सबब तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत असे मंचाचे मत आहे.
सोसायटीच्या बायलॉज प्रमाणे तक्रारदारांच्या सदनिकेतील गळतीचे काम जाबदेणार सोसायटीने करुन दयावयाचे होते यासंदर्भातही तक्रारदारांनी पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांच्या वरच्या मजल्यावरील श्री. काटे यांच्या सदनिकेतील संडास व बाथरुम मधील पाणी गळती बाबत जाबदेणार यांच्याकडे तक्रारदारांनी तक्रार केल्यानंतर जाबदेणार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे, श्री. काटे यांना दुरुस्ती करुन देण्याबाबत लेखी कळविले होते हे जाबदेणार यांनी दाखल केलेल्या दिनांक 26/9/2010 च्या पत्रावरुन स्पष्ट होते. तसेच श्री. काटे यांनी धनश्री एंटरप्रायझेस यांच्याकडून दिनांक 25/10/2010 रोजीच्या बील क्र डी ई 1684 नुसार संडास व बाथरुम मधील वॉटर प्रुफिंगचे काम करुन घेतले होते त्या कामाची धनश्री एंटरप्रायझेस यांनी पाच वर्षाची वॉरंटीही दिल्याचे दाखल बीलावरुन स्पष्ट होते. त्यामुळे गळतीचा वाद हा तक्रारदार व श्री. काटे यांच्यामधील असल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांच्या सेवेमधील त्रुटी तक्रारदारांनी पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही. तसेच संडास व बाथरुम मधील खिडक्या, रंग व प्लास्टरचे रुपये 50,000/- नुकसान झाल्यासंदर्भात तक्रारदारांनी कोणताही पुरावाही, आर्किटेक्ट अहवाल दाखल केलेला नाही. सबब तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक नसल्यामुळे तसेच जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी तक्रारदारांनी सिध्द केलेली नसल्यामुळे प्रस्तुतची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
वरील विवेचन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.