द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(30/05/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध सेवेतील त्रुटी करीता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालील प्रमाणे आहेत.
1] तक्रारदार यांच्या मालकीचा प्लॉट, सर्व्हे नं. 120, वडगाव बुद्रुक, तालुका हवेली येथे असून त्याचा प्लॉट नं. 21/40 असा आहे. त्याचे क्षेत्र 2 गुंठे आहे. या प्लॉटवर जुने तार कंपाउउंड काढून त्या ठिकाणी तिन्ही बाजूंनी भींतीचे कंपाऊंड करण्याचा करार जाबदेणार यांचेबरोबर तक्रारदार यांनी केलेला होता. हे बांधकाम करण्याकरीता पूर्वीचे 18 लोखंडी अॅंगल्स तसेच वापरण्याचे ठरले होते. सदर बांधकामाचे मुल्य रक्कम रु. 1,50,000/- ठरले होते. या करारापोटी तक्रारदार यांनी दि. 19/2/2012 रोजी रक्कम रु. 50,000/- चा चेक जाबदेणार यांना दिला. सदरचे काम प्रलंबीत असताना, जाबदेणार यांनी दि. 19/3/2012 रोजी रक्कम रु. 50,000/- ची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जाबदेणार यांना त्या रकमेचा चेक दिला. बँकेने तक्रारदार यांच्या खात्यातून शैक्षणिक कर्जाचा हप्ता रक्कम रु. 38,000/- कापल्यामुळे चेक वठला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दि. 4/4/2012 रोजी रक्कम रु. 50,000/- चा दुसरा चेक जाबदेणार यांना दिला. सदरचा चेक वठल्यानंतर जाबदेणारांनी ठरलेल्या किंमतीमध्ये काम होणार नाही व काम करावयाचे असेल, तर रक्कम रु. 50,000/- ज्यादा द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदारांच्या मुलाने सदरचे काम पूर्ण करण्याविषयी विचारणा केली असता, सदरचे काम पूर्ण करण्याची त्यांची ईच्छा नाही आणि एकुण रक्कम रु. 1,00,000/- पैकी रक्कम रु. 94,000/- चे बील दिले व उर्वरीत रक्कम रु. 6,000/- घेऊन जावे असे सांगितले. जाबदेणार यांनी तक्रारदार यांची फसवणुक केली आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांना उर्वरीत रक्कम रु. 50,000/- घेऊन काम पूर्ण करावे अशी नोटीस पाठविली आणि ग्राहक पंचायतीच्या सुचनेनुसार सदर बांधकाम खर्चाचे प्रमाणपत्र तयार करुन घेतले. केलेल्या बांधकामाचा खर्च रक्कम रु. 42,910/- झाला, असे प्रमाणपत्र संबंधीतांनी दिले. त्यामुळे जाबदेणारांकडे तक्रारदारांचे रक्कम रु. 57,090/- ज्यादा गेले. तक्रारदार यांना मनस्ताप झाला म्हणून त्यांनी रक्कम रु. 20,000/- ची
मागणी केलेली आहे, तसेच खटल्याच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/-, व्हॅल्युअर चार्जेस रु. 500/- पंप खरेदीपोटी रक्कम रु. 3,100/- आणि रक्कम रु. 200/- पोस्टल चार्जेसपोटी, असे एकुण रक्कम रु. 87,750/- ही रक्कम मागितलेली आहे.
2] जाबदेणार यांना या प्रकरणाची नोटीस बजवली असता, ते गैरहजर राहिले, त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी एकतर्फा करण्यात आलेली आहे.
3] या प्रकरणातील तक्रारदार यांनी स्वत:चे प्रतिज्ञापत्र, जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिलेले लेखी निवेदन, जाबदेणार यांना पाठविलेल्या नोटीशीची स्थळ प्रत, शासकिय व्हॅल्युअर यांनी तयार केलेले प्रमाणपत्र, बांधकामाचे छायाचित्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
4] या प्रकरणातील कथने विचारात घेतली असता असे, दिसून येते की, जाबदेणार यांनी तक्रारदार यांचे बांधकाम अपूर्ण ठेवून सदरच्या प्रकरणात सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यानुसार असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रक्कम रु. 1,00,000/- दिलेले होते, त्यापैकी जाबदेणार यांनी फक्त रक्कम रु. 42,910/- इतक्याच रकमेचे काम केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार हे जाबदेणार यांचेकडून रक्कम रु. 57,090/- मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी पंप खरेदीपोटी रक्कम रु. 3,100/- ची मागणी केलेली आहे, त्याचप्रमाणे व्हॅल्युअर चार्जेसपोटी रक्कम रु. 500/- ची मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी पंप स्वत:च्या कामाकरीता वापरला होता व सदरचा पंप हा तक्रारदार यांच्याच ताब्यात आहे, म्हणून पंपखरेदीची रक्कम नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार यांना देता येणार नाही. परंतु
जाबदेणार यांनी सदरचे बांधकाम अपूर्ण ठेवल्यामुळे तक्रारदार यांना व्हॅल्युअरची नेमणुक करावी लागली, त्यामुळे तक्रारदार रक्कम रु. 500/- मिळण्यास पात्र आहेत. तक्रारदार या प्रकरणात, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/-, तसेच दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- मिळण्यास पात्र आहेत.
या प्रकरणातील पुरावा विचारात घेतला असता, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचे बांधकाम अपूर्ण
ठेवून सेवेमध्ये कमतरता केलेली आहे, असे जाहीर
करण्यात येते.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना एकुण रक्कम
रु. 63,590/- (रु. त्रेसष्ठ हजार पाचशे नव्वद मात्र)
या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या
आंत द्यावी.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
यावी.